Monday, July 10, 2017

‘गुणां’चे अवगुण! ‘‘क्षणभरही सवड नसते त्याला इकडे तिकडे वेळ काढायला, पुरतं ‘बिझी शेडय़ूल’ असतं

‘गुणां’चे अवगुण!

‘‘क्षणभरही सवड नसते त्याला इकडे तिकडे वेळ काढायला, पुरतं ‘बिझी शेडय़ूल’ असतं

मेघना जोशी | Updated: June 24, 2017 4:23 AM
‘‘क्षणभरही सवड नसते त्याला इकडे तिकडे वेळ काढायला, पुरतं ‘बिझी शेडय़ूल’ असतं त्याचं, सकाळी आठ ते दीड वाजेपर्यंत शाळा आणि नंतर अडीच ते साडेआठ क्लासेस. कसा वेळ देणारेय तो खेळ आणि कलेसाठी? कशाला वेळ फुकट घालवायचा खेळ आणि कलेसाठी?’’   माझ्यासमोर बसलेले पालक त्यांचं म्हणणं मला, शाळेच्या मुख्याध्यापिकेलाच पटवून देण्याचा आटापिटा करत होते. इयत्ता सहावीतला त्यांचा पाल्य आणि आमचा विद्यार्थी आणि त्याचं हे एवढं ‘सो कॉल्ड पॅक्ड शेडय़ूल’ ऐकून आणि बालमानसशास्त्रनुसार खेळ आणि खेळणी यांना बालकांच्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे या मी शिकलेल्या वाक्याला छेद देणारं प्रतिपादन ऐकून माझ्या कपाळावर घामाचे थेंब नकळतच डवरले. ते पुसत त्यांना मी विचारलं, ‘‘हे एवढं का पण? कशासाठी बिचाऱ्याची एवढी ससेहोलपट.’’
‘‘काय मॅम, काय शब्द वापरता तुम्ही? ससेहोलपट कसली, सगळ्या आवडीनिवडी पुरवतो, लाड करतो आणि दोन वर्षांनी आठवीत स्कॉलरशिपला स्कोअिरग करायचं असेल तर एवढं नको का करायला?’’
‘‘एवढं?’’ माझ्या तोंडून मोठय़ा आवाजात निसटलेल्या त्या प्रश्नाकडे त्या बिच्चाऱ्यांचं लक्षच नव्हतं. कारण आठवीपुढे त्याचं नववी. ड्रॉइंग ग्रेड परीक्षा, संगीत वगैरे नकोच बरं का, कारण संगीताचे गुण मिळवायचे तर किमान पाच र्वष क्लासला जावं लागेल, पण चित्रकलेचे गुण दोन वर्षांत मिळतील आणि त्यानंतर गुणांपुरते खेळ वगैरे आणि पुढे दहावीत जास्तीतजास्त गुण याबाबतचं त्याचं नियोजन चालू होतं. ‘शिक्षण’ या संज्ञेच्या एकंदर उद्दिष्टालाच पानं पुसणारा हा प्रसंग.  हे प्रसंगांचं अतिशयोक्तीकरण वगैरे मुळीच नाहीए. अतिशय वास्तव उदाहरण, अगदी माझ्या समोर घडलेलं म्हणूनच काळीज चिरत गेलं.
मूल शाळेत घातलं की नव्वद किंवा त्याहून जास्त टक्के पालकांचा विषय म्हणजे त्याला मिळणारे गुण. इथे मी ‘विषय’ हे विशेषण सहेतुकच वापरलं नाहीए, कारण काहींचा तो चिंतेचा विषय, काहींचा चर्चेचा, काहीजण त्याबाबत इतकं बोलतात की गुण हा मिळवण्याचा विषय आहे की बोलण्याचा हाच प्रश्न पडतो, तर अनेकांच्या तो प्रतिष्ठेचा विषय! मुलाला कमी गुण मिळाले तर शाळेच्या कार्यालयात येऊन एक एक गुणासाठी भांडणाऱ्या नि रडणाऱ्या आया पूर्वीपासून आहेतच, पण खेदाची गोष्ट म्हणजे आजकाल अशा पुरुष पालकांची संख्याही वाढत चालली आहे. इथे स्त्री-पुरुष हा भेद नाही, पण यापूर्वी पुरुष पालक गुणांच्या बाबतीत एवढे ‘पझेसिव्ह’ नव्हते तेही आजकाल या प्रवाहात वाहत चालले आहेत, हेच सांगण्याचा उद्देश!
ज्या व्यक्तींचा शिक्षणक्षेत्राशी फारसा संबंध नाही किंवा शिक्षणक्षेत्राचा ज्यांनी गांभीर्याने विचार केला नाही त्यांना वरचं सगळं विवेचन न पटण्याचीच शक्यता जास्त, कारण अशा व्यक्ती फक्त वर्तमानपत्रातील दहावी-बारावीचे निकाल त्यातील खूप मोठ्ठे आकडे, मोठ्ठा मोठ्ठाले पुष्पगुच्छ आणि तसेच सत्कार नि भाषणे यांच्याशी परिचित असतील. पण, यामागे खूप काही दडलंय ते समोर येतच नाही. या सगळ्यांतून निर्माण झालीए ती या सगळ्यामागे जीव तोडून ऊर फुटेपर्यंत धावण्याची वृत्ती. विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांना या सगळ्याची हाव निर्माण झाली आहे. काहीही झालं तरी दहावीत शंभर टक्के, ही ती हाव. मग या शंभर टक्क्यांसाठी काहीही. चित्रकला लागणारे का यासाठी? मग आम्ही देतो परीक्षा, संगीतही हवंय का? मग शिक तू संगीत, खेळालाही गुण आहेत? मग खेळ हवाच म्हणजे हे सगळं गुणांसाठी पण ‘गुण’ म्हणून या सगळ्याकडे पाहण्याची वृत्ती नाहीच. याचं एक मनाला टोचणी देणारं उदाहरण म्हणजे इयत्ता दहावीत कॅरममधील कौशल्याच्या बळावर राष्ट्रीय पातळीवर रौप्यपदक मिळवलेली आमची एक विद्यार्थिनी दहावीत खेळाचे २५ गुण मिळवत सत्त्याण्णव टक्क्यांवर पोहोचली आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे त्यानंतर तिने कॅरम खेळणंच सोडलं.
फक्त एवढंच नाही तर दहावीला मिळणारे गुण म्हणजे गुणांचं अतिशयोक्तीकरणच वाटतं. निर्जीव मशीनच्या बाबतीतही ‘आउटपुट इज नेव्हर इक्वल टू इनपुट’, असं म्हटलं जातं आणि यामागचं महत्त्वाचं कारण सांगितलं जातं ते फ्रिक्शन. मग, सजीव माणसाच्या स्मृतीमध्ये गेलेल्या माहितीचा शंभर टक्के साठा होईल आणि तो तसाच उतरेल हे पटतच नाही. म्हणजेच आजची परीक्षा केवळ ज्ञानाधिष्ठित आहे, असं जरी मानलं तरी हे पटत नाही, मग शिक्षण ही प्रक्रियाच जर सर्वागीण विकासासाठी असेल तर हे १०० टक्केचं गृहीतक कसं काय पचनी पडावं. याला कोणी नव्वद टक्क्यांची सूज म्हणतं तर कोणी बोर्डाने दिलेलं दान म्हणतं. या संदर्भात ज्या ज्या शिक्षकांशी बोलले त्या सगळ्यांचं एकमत आहे, हे गुण विद्यार्थ्यांच्या क्षमतेपेक्षा ‘किमान’ वीस टक्के तरी जास्त असतात. हा निकाल म्हणजे क्षणिक समाधान आहे हो, असं सहकारी उद्विग्नतेने म्हणाले, पूर्वी पुस्तक किंवा गाइडमधली प्रश्नोत्तरं पाठ करून लिहिणारे जर का वीस टक्के असतील तर आज ते सत्तर किंवा त्यापेक्षा जास्त टक्के आहेत आणि शिक्षणक्षेत्रात ‘घोका आणि ओका’ या पद्धतीला कात्री लावायची म्हणता म्हणता तीच पद्धत जास्त प्रचलित झालीये आणि हे घोकणंही अगदीच तात्पुरतं. या तात्पुरत्या घोकण्यापायी अनेक शाळांमध्ये आणि घरांमध्ये दहावीची मुलं वेठीला धरल्याचं चित्र सर्रास दिसतं. दहावी म्हणजे गॅदिरगमध्ये सहभाग नाही, क्रीडामहोत्सवात भाग नाही, टी.व्ही. वगैरे बंदी असतेच घरात, पण शालेय स्पर्धामध्ये विद्यार्थ्यांला भाग घे म्हटलं तर एखादा गुण तर यामुळे कमी
होणार नाही ना, असं दहा-दहादा विचारणारे पालक बघून जीव घाबराच होतो. या सगळ्यामुळे विद्यार्थ्यांचा दृढ समज व्हायला लागलाच की अभ्यासातलं जे काही लक्षात ठेवायचं आहे ते फक्त येणाऱ्या परीक्षेपुरतंच. परिणामत: विद्यार्थ्यांचा दीर्घकालीन स्मरणशक्तीकडे कलच कमी होत चाललेला आहे. बरं, कमी श्रमात जास्त गुण मिळाले की, श्रम करण्याची वृत्तीच लोप पावत जाते तेच आजकालच्या विद्यार्थ्यांमध्ये जास्त प्रमाणात दिसतंय. अजूनही एक मोठ्ठी खंत आहे, अगदी लहानपणापासूनच गुणांची जी ही अकारण अशी स्पर्धा आहे त्या स्पर्धेमुळे भावी आयुष्यात मुलाला जेव्हा खरी लढत देण्याची गरज असते तेव्हा तो जिद्द हरवून बसलेला असतो, स्पर्धेबाबतची गंमतच करपून गेलेली असते. त्यामुळेच खऱ्या स्पर्धापरीक्षांमध्ये आमचा टक्का नगण्यही उरत नाही. का नाही आपण फार आय.ए.एस. घडवू शकत, ऑलिम्पिकपटू खूप कमी का याची सारी मेख त्या अकाली स्पर्धेमध्ये आहे यावरही माझ्या सर्व शिक्षकमित्रांचं एकमत झालं. दहावीबरोबर एन.टी.एस.(नॅशनल टॅलेंट सर्च) परीक्षेसाठीचं विशेष कोचिंग करणारे माझे एक मित्र एन.टी.एस.च्या निकालाच्या बाबत मात्र समाधानी आहेत. ते म्हणतात, एन.टी.एस. पात्र विद्यार्थ्यांबद्दल प्रश्नच नाही, एन.टी.एस.च्या पहिल्या फेरीत निवडला गेलेला आणि दुसऱ्या फेरीत अपात्र ठरलेला विद्यार्थीही पुढच्या आयुष्यात खचून गेलेला पाहिला नाहीए, पण दहावीत शंभर टक्के मिळवत राज्यात पहिला आलेला विद्यार्थी मात्र बारावी व त्यापुढील स्पर्धेत टिकतोच असं नाही, कारण दहावीपर्यंतचा अभ्यास हा हे मला करायचंच आहे म्हणून केला जातो, हे मला आवडतं का, हे करताना मला आनंद होतोय का याचा विचार करायला विद्यार्थ्यांला सवड दिली जात नाही किंवा त्याला तशी सवय लावली जात नाही. त्यामुळे दहावीत शंभर टक्के मिळवणाराही त्यानंतरच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठीच्या सी.ई.टी.मध्ये किंवा त्या अभ्यासक्रमांच्या परीक्षांमध्ये मागे पडतो, कारण त्यासाठी अभिरुची आणि अभिवृत्तीची गरज असते. त्याचा विचार कोठेच झालेला नसतो. त्यामुळे भावी जीवनात आई-वडिलांकडे पैसा असेल तरच ते त्याला तारून नेऊ शकतात हेही ते सोदाहरण सांगतात.
गुणदानाच्या अतिरेकाने चौऱ्याण्णव टक्के मिळवूनही हमसाहमशी रडणारी, मिटून गेलेली मुलगी पाहून माझी एक शिक्षिका मैत्रीण स्वत:च मिटून जात उद्गारली, ‘‘यापेक्षा जास्त हवेयत?’’ शिक्षक म्हणून गुण देणाऱ्याच्या भूमिकेत जेव्हा आम्ही असतो, तेव्हा या गुणांच्या हव्यासाचा आणि रॅट रेसचा खूप वाईट परिणाम भोगतो. एक तर आम्ही नेहमी संशयाच्या भोवऱ्यात उभे असतो, हे आमचे गुण कमी करणार नाहीत ना, हे पार्शलिटी तर करत नाहीत ना, हे माझे गुण खाणार(?) तर नाहीत?  या मुद्दय़ावर एकजण रागारागाने म्हणतात, ‘‘आमचं आयुष्य हे सापेक्ष आहे, विद्यार्थ्यांचे दहावीचे अंतर्गत मूल्यमापनाचे गुण पाठवेपर्यंतच त्या विद्यार्थ्यांपुरतं माझं आयुष्य.’’ हे सगळ्यांचंच मत नाहीए पण असं मत तयार होतंय हे कानाडोळा करण्यासारखं मुळीच नाहीए. बरं, हे गुण कमी द्यावेत तर ते अशक्य. हे मात्र सगळेजण एकमुखाने मान्य करतात. शाळा तर जास्तीतजास्त गुण देण्यासाठी आग्रही असतेच, पण बोर्डातही मुलांना सढळ(?) हाताने गुण द्या, अशी तोंडी सूचना असते हे अनेक मॉडरेटर आणि परीक्षक खासगीत सांगतात. सढळ म्हणजे काय, सढळ म्हणजे अवास्तव का, सढळ म्हणजे डोक्यात जातील एवढे का, सढळ म्हणजे त्याच्या क्षमतेच्या कक्षेच्या कितीतरी बाहेर असणारे का असे सढळतेबाबतचे अनेक प्रश्न आहेत. विशेष म्हणजे या अवास्तव अतिरेकी सढळतेबाबत पालकांची तक्रार तर नाहीच, उलट त्याचं त्यांना प्रचंड कौतुक आहे.
‘सढळ’ या शब्दाबाबत हे अनेक प्रश्न मनात येतात, कारण हे ‘सढळ’ गुण देण्याच्या गडबडीत गुण कमवायचे असतात, त्यासाठी परिश्रम करायचे असतात, ते कोणी दान देण्याची गोष्ट नाहीच आहे हो, हे कोणी ऐकून घेण्याच्या मन:स्थितीतच नसतं; त्यापेक्षा वाईट शब्द म्हणजे गुण पाडणे. दहावीत एवढे गुण पाडायचे, ते असे पाडायचे ते तसे पाडायचे. अभ्यास, त्याची खोली, त्याचं महत्त्व हे सारं दृष्टीआड करून हे गुण पाडण्याचं ‘स्टॅटिस्टिक’ मांडत बसणाऱ्यांचा मला तरी हेवा वाटतो. त्याबरोबरच व्यवस्थेला नाके मुरडत परत गुणांचाच विचार करत बसणाऱ्यांची कीवही येते, कारण याच व्यवस्थेने कलचाचणीसारखा (अ‍ॅप्टिटय़ूट टेस्ट)उत्तम मार्गदर्शक समोर ठेवला असतानाही त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. कलचाचणीला गुणदान नाही त्यामुळे त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जातं की काय अशी शंकेची पालही मनात चुकचुकते. अजूनही दहावीच्या गुणांबाबत खूप म्हणजे खूपच संवेदनशील असलेले पालक कलचाचणीच्या निकालाबाबत अत्यंत असंवेदनशील कसे असतात तेच समजत नाही. अनेकदा सांगूनही त्यांना त्या निकालामध्ये स्वारस्य नसतंच. आमच्या या निमशहरी भागात साठ टक्क्यांच्या पुढे गुण मिळाले म्हणजे सायन्स असा शेरा मारणारे व तो आचरणारे पालक आहेत, तर शहरी किंवा महानगरी भागात जिथे आयुष्य म्हणजेच एक स्पर्धा आहे तिथे उत्तीर्णापैकी ४५ ते ४८ टक्के लोंढा आंधळेपणाने सायन्सकडे जातो आणि दोन वर्षांनी त्यातला मोठ्ठा वर्ग अनिश्चिततेच्या गर्तेत सापडतो यात आश्चर्य ते काय? दहावीला ८४ टक्के मिळाले म्हणून गणित-सायन्समध्ये कोणतीही गती नसताना सायन्स शाखा निवडत बारावीला आपटी खाणारा माझा एक नातेवाईक हे त्याचं उत्तम उदाहरण. पैसा, श्रम यांची हानी झालीच पण कधीही भरून न येणारी र्वष आणि न्यूनगंडाची पेरणी होते याचं काय?
माझ्या एका पंचविशीच्या माजी विद्यार्थ्यांने गुणांच्या या कसरतीबाबतचे काही अनुभव सांगितले, तो म्हणाला, ‘‘माझे काही मित्र-मैत्रिणी असे आहेत की दहावीमध्ये हे सगळं स्टॅटिस्टिक मांडत भरपूर गुणांचे धनी ठरले, पण पुढे हरतच गेले. कारण तिथे हे स्टॅटिस्टिक उपयोगी पडलं नाही, मग कोणी इंजिनीअिरग अध्र्यातनंच सोडलं, कोणी अनेक कोर्सेसची धरसोड केली वगैरे वगैरे’’ पण बरोबरच त्याला नि मलाही त्याच्या वर्गातल्याच सिद्धेशचं उदाहरण चटकन आठवतं. दहावीला पंचाहत्तर टक्के मिळवलेल्या सिद्धेशने इंजिनीअिरगचा डिप्लोमा ऐंशी टक्क्यांनी पास करत डिग्री तशीच पूर्ण केली आणि वयाच्या पंचविशीतच वेल सेटल्ड झाला. आजच्या भाषेत बोलायचं तर पॅकेजही उत्तम आहे. सिद्धेशसारखी अनेक उदाहरणं आहेत, पण जाणता-अजाणता त्यांच्याकडे डोळेझाक केली जाते. या सढळतेच्या गडबडीत अजून एक गडबड होतेय ती म्हणजे उत्तीर्णतेचं प्रमाणही सढळ असावं म्हणून प्रश्नपत्रिका अजून अजून सोप्प्या काढल्या जातात म्हणजेच काठिण्यपातळी घसरतेय आणि त्यामुळे जे प्रथम श्रेणीत आहेत ते विशेष श्रेणीत आणि विशेष श्रेणीत असणारे त्याच्याही पुढे जातात, कारण अध्यापनात जरी सोप्याकडून कठीणाकडे ही पद्धत असली तरी मूल्यमापनात मात्र सोप्याकडून अजून सोप्याकडे असा प्रवास चाललाय काय अशा संशयाने अनेक शिक्षकमित्रांना भंडावलंय.
जेव्हा मी माझ्या आत्ताच्या विद्यार्थ्यांशी या गुणांच्या हव्यासाबाबत बोलले तेव्हा असं आढळलं की हे असं हवंच हे त्यांनी स्वीकारलेलं आहे त्यामुळे ‘बाय हुक ऑर क्रुक’ ते तसे गुण मिळवणार, त्यात त्यांचं भलंच आहे असं त्यांना वाटतं. पण जेव्हा पंचविशीच्या मुलांशी बोलले तेव्हा त्यांचं म्हणणं खूप वेगळं होतं. भरपूर गुण मिळवायचे(की पाडायचे?) या वृत्तीमुळे शालेय जीवनात फोकस फक्त गुण आणि त्यासाठीच्या पूरक गोष्टी. त्यामुळे आजची मुलं मल्टीटास्किंग कपॅसिटीज, खूप काही गोष्टी करण्यातलं कौशल्य हरवत चाललीत असं त्यातल्या अनेकांना वाटतंय, ही मुलं पुढे असमाधानी वृत्तीची शिकार होतील अशीही भीती त्यातील काहींनी बोलून दाखवली, कारण गुणांबाबतचं जसं असमाधान तसंच जीवनाबाबतचं. खेळ खेळण्याचं प्रमाण कमी, सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग बेताबेताने, कौटुंबिक कार्यक्रमांना हजेरी क्वचितच त्यामुळे त्यांचं सामाजिक जीवनही धोक्यात येतंय हे सगळ्यांचंच म्हणणं पडलं.
पेशाने डॉक्टर असणाऱ्या माझ्या पालक मैत्रिणीने खूप दूरगामी विचार करून एक भाष्य केलं ते खरंच हेलावणारं आहे, ती म्हणते, या मुलांना खूप गुण मिळवायची सवय आहे हा मोठय़ा मुलांबाबतचा विचार, पण लहानपणापासूनच श्रेणी जरी असेल तरी अ+ किंवा शेरा जरी असला तरी अप्रतिम वगैरेच मिळण्याची सवय त्यामुळे जेव्हा पुढे हे संसारात पडतील किंवा नोकरीला जातील तेव्हा सहचराने किंवा सहकाऱ्याने यांची चूक दाखवून दिली ती तर यांना रुचणारच नाही, त्यातून विमनस्कता किंवा वैफल्य येईल, मानसिक शांती ढळेल, त्यातून कौटुंबिक वादळं निर्माण होतील, घटस्फोटाचं प्रमाण अतिरेकी होईल, सतत नोकरीधंदा बदलण्याची वृत्ती वाढेल आणि त्याचा परिणाम त्यापुढच्या पिढीवर नक्कीच होईल आणि तो नकारात्मकच असेल. हा विचार डोक्याला झिणझिण्या आणणाराच आहे. विचार करायला लावणारा आहे.
एकेकाळी कमी लागणारे निकाल, नापास होण्याचं मोठं प्रमाण, स्थगन आणि गळती हे सारे प्रश्न शिक्षणक्षेत्राला भेडसावत होते म्हणून हा सढळतेचा पर्याय काढला गेला तर त्यावरही हे भाष्य करतायत, काहीही करा त्यावर भाष्य करणारे असणारच असं मत या सर्व लिखाणाबाबत व्यक्त होऊ शकतं. पण हा विरोधाला विरोध नाहीए, स्थगन आणि गळती हे नापास होण्याचे किंवा कमी गुणांचे दृश्य परिणाम होते, त्यामुळे होणाऱ्या आत्महत्या हाही दृश्य परिणाम पण आजच्या या भरपूर गुणांचे अदृश्य आणि दूरगामी परिणाम त्यापेक्षा जास्त आहेत. तरुणपणात न्यूनगंड, वैफल्य निर्माण होऊन या मुलांच्या ज्या मानसिक आत्महत्या होतात याबाबतचा विचार किंवा अभ्यास कोणी केलाय का? कारण ज्यांना भरपूर गुण मिळून ते याच्यातून बाहेर पडलेयत ते सिंहावलोकन करत, याच व्यवस्थेचे ते परिणाम आहेत हे मान्य करायला कचरतायत त्यामुळे त्याचा पुरता स्फोट होईपर्यंत ते पुढे येणार नाहीत. पण हे असंच चाललं तर भौमितिक श्रेणीने बदल घडत स्फोट व्हायला जास्त काळ लागणारही नाही.
आज मुलं अभ्यास करत नाहीत, त्यांना अभ्यासात रस नाही, जास्त गुण मिळवणारे सगळेच घोकू आहेत असं मुळीच नाही. असे अपवाद आहेत, पण ते नियमाला असणारे अपवाद, संख्येने कमी. जास्त संख्येने असणाऱ्यांना त्यांच्या क्षमतेची अचूक जाणीव करून द्यायची असेल तर गुण त्यांच्या क्षमतेच्या प्रमाणातच असावेत हे सांगण्यासाठीच हा सारा प्रपंच!
‘सढळ’ या शब्दाबाबत हे अनेक प्रश्न मनात येतात, कारण हे ‘सढळ’ गुण देण्याच्या गडबडीत गुण कमवायचे असतात, त्यासाठी परिश्रम करायचे असतात, ते कोणी दान देण्याची गोष्ट नाहीच आहे हो, हे कोणी ऐकून घेण्याच्या मन:स्थितीतच नसतं; त्यापेक्षा वाईट शब्द म्हणजे गुण पाडणे. दहावीत एवढे गुण पाडायचे, हा विचार फारच भयावह.
सढळतेच्या गडबडीत अजून एक गडबड होतेय ती म्हणजे उत्तीर्णतेचं प्रमाणही सढळ असावं म्हणून प्रश्नपत्रिका अजून अजून सोप्प्या काढल्या जातात म्हणजेच काठिण्यपातळी घसरतेय आणि त्यामुळे जे प्रथम श्रेणीत आहेत ते विशेष श्रेणीत आणि विशेष श्रेणीत असणारे त्याच्याही पुढे जातात, कारण अध्यापनात जरी सोप्याकडून कठीणाकडे ही पद्धत असली तरी मूल्यमापनात मात्र सोप्याकडून अजून सोप्याकडे असा प्रवास चाललाय काय अशा संशयाने अनेक शिक्षकमित्रांना भंडावलंय.
दहावीला मिळणारे गुण म्हणजे गुणांचं अतिशयोक्तीकरणच वाटतं. सजीव माणसाच्या स्मृतीमध्ये गेलेल्या माहितीचा शंभर टक्के साठा होईल आणि तो तसाच उतरेल हे पटतच नाही. म्हणजेच आजची परीक्षा केवळ ज्ञानाधिष्ठित आहे असं जरी मानलं तरी हे पटत नाही, मग शिक्षण ही प्रक्रियाच जर सर्वागीण विकासासाठी असेल तर हे १०० टक्केचं गृहीतक कसं काय पचनी पडावं? याला कोणी नव्वद टक्क्यांची सूज म्हणतं तर कोणी बोर्डाने दिलेलं दान म्हणतं. या संदर्भात ज्या ज्या शिक्षकांशी बोलले त्या सगळ्यांचं एकमत आहे, हे गुण विद्यार्थ्यांच्या क्षमतेपेक्षा ‘किमान’ वीस टक्के तरी जास्त असतात.
स्थगन आणि गळती हे नापास होण्याचे किंवा कमी गुणांचे दृश्य परिणाम होते, त्यामुळे होणाऱ्या आत्महत्या हाही दृश्य परिणाम पण आजच्या या सढळ हस्ते दिल्या जाणाऱ्या भरपूर गुणांचे अदृश्य आणि दूरगामी परिणाम त्यापेक्षा जास्त आहेत. तरुणपणात न्यूनगंड, वैफल्य निर्माण होऊन या मुलांच्या ज्या मानसिक आत्महत्या होतात याबाबतचा विचार किंवा अभ्यास कोणी केलाय का?
मेघना जोशी
joshimeghana.23@gmail.com

First Published on June 24, 2017 4:23 am
Web Title: ssc result 2017 and student psychology marathi articles

No comments:

Post a Comment