Monday, January 27, 2020

शब्दबोध : घातवाफ घातवाफ हा घात आणि वाफ या दोन शब्दांपासून बनला आहे.

शब्दबोध : घातवाफ

घातवाफ हा घात आणि वाफ या दोन शब्दांपासून बनला आहे.

(संग्रहित छायाचित्र)

डॉ. उमेश करंबेळकर
कुठल्याही भाषेचे सामथ्र्य हे त्या भाषेतील शब्दसंपत्तीवर अवलंबून असते. मराठी भाषेचे सौंदर्य आणि सामथ्र्य जाणून घ्यायचे असेल तर आपल्या संतवाङ्मयाचा अभ्यास करायला हवा. ज्ञानेश्वरी, गाथा, दासबोध यांसारख्या संतसाहित्यात अनेक आशयगर्भ शब्द आपल्याला पदोपदी आढळतात. हे शब्द काळाच्या ओघात लुप्त झाले असले तरी घासूनपुसून नव्याने वापरता येणारे आहेत. घातवाफ हा असाच एक आशयगर्भ शब्द संतवाङ्मयात आपल्याला आढळतो.
घातवाफ हा घात आणि वाफ या दोन शब्दांपासून बनला आहे. अर्थात त्यातील घात हा शब्द आघात, हत्या, वध या अर्थाने आलेला नाही. तसेच घात म्हणजे गुणाकार असाही त्याचा अर्थ नाही. हे सर्व संस्कृतमधील घात शब्दाचे अर्थ आहेत.
आज आपण ज्या शब्दाबद्दल बोलत आहोत, तो घातवाफ हा अस्सल मराठी शब्द आहे. त्यातील घात याचा अर्थ शेतीमधील पेरणी, लावणी  इत्यादीच्या कामाची किंवा ऋतुपरत्वे येणाऱ्या, पिकणाऱ्या धान्याची योग्य वेळ किंवा मोसम अथवा हंगाम असा आहे. उदाहरणार्थ पेरण्याची घात, कापण्याची घात इत्यादी. घात हा स्त्रीलिंगी शब्द आहे. ‘या दिवसात उत्तरा व हस्त या पावसाने पेरणीस घात थोडी उशिरा आली आहे’ म्हणजे ‘यंदा पेरणीची योग्य वेळ उशिरा आली’, असा आहे.
घातवाफ हाही स्त्रीलिंगी शब्द आहे. मे महिन्याच्या अखेरीस वळीवाचा जोरदार पाऊस होतो. त्यानंतर पुन्हा कडक ऊन पडते. त्यामुळे जमिनीतून पाण्याच्या वाफा वर येतात. असा, एकदा पर्जन्यवृष्टी होऊन जमिनीतून वाफा निघत असलेला काळ हा पेरणीला अत्यंत उपयुक्त असा काळ असल्याचे मानले आहे. बीज अंकुरण्यासाठी लागणारा ओलावा आणि उबदारपणा त्या वेळी रानात असतो, असा काळ म्हणजेच घातवाफ होय.
घातवाफचा क्रियापद म्हणून वापर केल्यास सांभाळणे, जपणे, साधणे असा त्याचा अर्थ होतो. जसे,
क्षेत्र गुणे बीज अंकुरे।
ते अनंत धा वृत्ची विकार।
घातवाफ ते आदरे।
साधूनि घेतली।
घातीचे दिवस म्हणजे सुगीचे दिवस किंवा सत्तेचा, सुबत्तेचा, भरभराटीचा काळ. सध्या आपल्या मायमराठी भाषेला चांगले दिवस नाहीत. तिच्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे भविष्यात आपली भाषा नष्ट होईल की काय, अशी भीती अनेकजण व्यक्त करताना दिसतात. परंतु तिला उर्जितावस्था येण्यासाठी प्रयत्न करणारे मात्र त्या तुलनेत बरेच कमी आहेत. खरोखरच मराठी भाषेला असे ‘घातीचे दिवस’ यावेत असे वाटत असेल, तर आपल्या प्राचीन संतवाङ्मयाचा अभ्यास करणे अगत्याचे ठरेल.
First Published on July 25, 2019 12:11 am
Web Title: word sense article abn 97

No comments:

Post a Comment