Sunday, February 5, 2017

वेगळय़ा वाटा : सायबर गुन्हेगारीचे शोधतंत्र रक्ताचे डाग, हस्ताक्षर, वस्तूवरील गुन्हेगाराचे ठसे हे तपासाचे तंत्र आता लोकांना माहीत आहे.

वेगळय़ा वाटा : सायबर गुन्हेगारीचे शोधतंत्र

रक्ताचे डाग, हस्ताक्षर, वस्तूवरील गुन्हेगाराचे ठसे हे तपासाचे तंत्र आता लोकांना माहीत आहे.

प्रा. योगेश हांडगे | February 3, 2017 12:34 AM



अनेक प्रकारचे गुन्हे, दहशतवादी हल्ले यांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर वाढलेला आहे.  मधल्या काळात जगाला हादरवणाऱ्या पॅरीस हल्ल्यामध्येसुद्धा या तंत्रज्ञानाचा मोठय़ा प्रमाणात वापर झाला होता. त्याविषयी अनेक ठिकाणी लिहिलेही गेले.   दहशतवाद्यांनी या हल्ल्यात ऑनलाइन चॅटिंग, गेमिंग, सोशल मीडिया आणि जीपीएसचा वापर केला होता. या नव्या तंत्रज्ञानाचा त्यांनी अत्यंत हुशारीने या हल्ल्यासाठी फायदा करून घेतला. संगणकाचा वापर करून केली जाणारी ही गुन्हेगारी अतिशय धोकादायक आहे. अगदी दक्षिण कोरियासारखे लहान देशही सायबर तंत्रज्ञानात आपल्यापेक्षा फार पुढे आहेत. यापुढे जर जगात महायुद्ध झाले तर ते सायबर युद्ध असेल, असे म्हटले जात आहे.  इंटरनेटवरच्या या सायबर गुन्हेगारांना शोधून काढण्यासाठी कम्प्युटर फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेटर अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात. हे एक चांगले करिअरही आहे.
रक्ताचे डाग, हस्ताक्षर, वस्तूवरील गुन्हेगाराचे ठसे हे तपासाचे तंत्र आता लोकांना माहीत आहे. सायबर जगतातले गुन्हे जसे नवीन आहेत तसाच या जगातील तपासही नवीन आहे. सायबर फॉरेन्सिक ही नवीन शाखा आता विकसित होत आहे. सायबर तपासामध्ये दोन पातळ्या महत्त्वाच्या आहेत.
१) पुरावा गोळा करणे – सायबर गुन्ह्य़ांमधील पुरावा हा इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड (शब्द, आवाज आणि चलचित्र) अशा स्वरूपाचा असतो. गुन्हा घडला त्या ठिकाणी हा पुरावा; संगणक, मोबाइल फोन, सीडी अशा स्वरूपात सापडतो. हा पुरावा काळजीपूर्वक गोळा करावा लागतो, जेणेकरून त्यातील सत्यता नष्ट होणार नाही.
२) पुराव्याचे पृथक्करण करणे – मिळालेल्या उपकरणांमधून आपल्याला हवी असणारी फाइल शोधणे हे काम सोपे नाही. एका यंत्रामध्ये हजारो फायली असतात. त्यातून चोरी झालेली फाइल मिळविणे हे कापसाच्या ढिगाऱ्यातून सुई शोधण्यासारखे आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या उपकरणांतून माहिती कशी शोधायची याची वेगवेगळी सॉफ्टवेअर्स उपलब्ध आहेत. ती वापरण्याचे कौशल्यदेखील आपल्यामध्ये पाहिजे.
अभ्यासक्रम
पदवी, पदव्युत्तर पदवी, पदविका, प्रगत पदविका, प्रमाणपत्र
शैक्षणिक अर्हता-
संगणकशास्त्र विषयासह बी.एससी. किंवा बी.कॉम. किंवा एलएलबी, बीसीए, बीई- कॉम्युटर सायन्स किंवा इन्फोर्मेशन टेक्नॉलॉजी, त्याचबरोबर फॉरेन्सिक सायन्स विषयीचे अभ्यासक्रम गुजरात विद्यापीठ, दिल्ली विद्यापीठ, बुंदेलखंड विद्यापीठ, मदुराई कामराज विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ आणि या विद्यापीठांशी संलग्न महाविद्यालयांमधून चालविले जातात.
या अभ्यासक्रमामध्ये तुम्ही सायबर फॉरेन्सिक हा विषय स्पेशल म्हणून घेऊ  शकता.
तसेच सीडॅकतर्फे सायबर फॉरेन्सिकवर विशेष अभ्यासक्रम आहे. त्याचबरोबर अनेक खासगी संस्थांनी मागणी लक्षात घेऊन असे अभ्यासक्रम तयार केले आहेत.
करिअरच्या संधी

  • माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयात सल्लागार
  • सॉफ्टवेअर डेव्हलपर संस्थांमध्ये सल्लागार
  • पोलिस विभाग, बँका, आयटी फर्ममध्ये सायबर कन्सल्टंट
  • पोलिसांच्या सायबर सेलमध्ये कम्प्युटर फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेटर म्हणून तसेच खासगी गुप्तहेर म्हणून स्वत:चा व्यवसाय सुरू करता येतो. सायबर फॉरेन्सिकमध्ये काम करणाऱ्या सरकारी फॉरेन्सिक लॅब्स आहेत.
  • महाराष्ट्रामध्ये मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर इथे त्याची केंद्रे आहेत. त्याचबरोबर काही खासगी प्रयोगशाळासुद्धा आता सुरू झाल्या आहेत. सायबर फॉरेन्सिकचा अभ्यास केलेल्या मुलांना या प्रयोगशाळांमध्ये संधी मिळू शकते.
या विषयातील शिक्षण देणाऱ्या संस्था 
  • कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, कल्लप्पारा, केरळ (cek.ac.in)
अभ्यासक्रम-  एम.टेक. इन कॉम्प्युटर सायन्सेस वुइथ स्पेशलायझेशन इन फॉरेन्सिक सायन्स अँड इन्फॉर्मेशन सिक्युरिटी
शैक्षणिक अर्हता-  बीई/बीटेक-  कॉम्प्युटर सायन्स/ आयटी/ इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन
सायबर क्राइम इन्व्हेस्टिगेटर.
  • सेंटर ऑफ एक्सलन्स इन डिजिटल फॉरेन्सिक ,चेन्नई (http://www.coedf.org/)
अभ्यासक्रम- एमएससी इन सायबर फॉरेन्सिक अँड इन्फोर्मेशन सिक्युरिटी
शैक्षणिक अर्हता- संगणकशास्त्र विषयासह बी.एससी.
  • स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी अँड अप्लाइड सायन्सेस,कोट्टायम ( http://www.stasmgu.org/ )
अभ्यासक्रम – बी.एससी इन सायबर फॉरेन्सिक
शैक्षणिक अर्हता- गणित, संगणकशास्त्र, भौतिक आणि रसायनशास्त्र या विषयांसह विज्ञान शाखेतील बारावी उत्तीर्ण
  • फॉरेन्सिक सायन्स एज्युकेशन ऑनलाइन (ifs.edu.in)
इन्स्टिटयमूट ऑफ फॉरेन्सिक सायन्स, गुजरात फॉरेन्सिक सायन्सेस युनिव्हर्सिटी
अभ्यासक्रम- सायबर क्राइम इन्व्हेस्टिगेटर, कॉम्प्युटर फॉरेन्सिक एक्स्पर्ट, सेलफोन फॉरेन्सिक प्रोफेशनल, सायबर सिक्युरिटी एक्स्पर्ट (www.gfsu.edu.in)
पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन डिजिटल अँड सायबर फॉरेन्सिक अँड रिलेटेड लॉ.

No comments:

Post a Comment