Tuesday, March 7, 2017

एमपीएससी मंत्र : सामान्य अध्ययन-२ चे हुकमी एक्के सामान्य अध्ययन २ या पेपरमधले हुकमी एक्के म्हणजे गणित, बुद्धिमत्ता आणि तर्कशास्त्र.

एमपीएससी मंत्र : सामान्य अध्ययन-२ चे हुकमी एक्के

सामान्य अध्ययन २ या पेपरमधले हुकमी एक्के म्हणजे गणित, बुद्धिमत्ता आणि तर्कशास्त्र.

वसुंधरा भोपळे | February 8, 2017 4:40 AM


सामान्य अध्ययन २ या पेपरमधले हुकमी एक्के म्हणजे गणित, बुद्धिमत्ता आणि तर्कशास्त्र. पण बरेचदा विद्यार्थी याची धास्ती घेतात आणि सपशेल शरणागती पत्करतात. पण गेल्या चार वर्षांतली परिस्थिती पाहिली तर या विषयांत किमान पन्नास-साठ टक्के गुण मिळवणारे विद्यार्थी पूर्व परीक्षेत चांगली कामगिरी करतात. या घटकावरील प्रश्नांचे विश्लेषण पाहिल्यास कोणत्या घटकावर किती भर द्यावा याचा आपल्याला अंदाज येऊ शकतो.
गणिताच्या भीतीपोटी विद्यार्थी आपल्याला इथे गुण मिळणारच नाहीत म्हणून गणित विभागात आपली विकेट आधीच फेकतात. पण गणिताची तयारी इतकीही काही कठीण नाही.
*    अंकगणिताची तयारी
या विभागात जर चेंडू तडीपार करून अधिकाधिक गुण मिळवायचे असतील तर अभ्यासाचे घटक ठरवून घेऊन त्यांची चौफेर तयारी करा. यामध्ये सरासरी, शेकडेवारी, नफा-तोटा,भागीदारी, गुणोत्तर-प्रमाण, काळ-काम-वेग, वेग-वेळ-अंतर, सरळव्याज, चक्रवाढव्याज, कालमापन अशा घटकांवर अधिक भर द्यावा. हे सर्व घटक दहावीपर्यंतच्या अभ्यासाच्या आधारावर सोडविता येतात. योग्य त्या सरावाने या घटकातील यॉर्करसुद्धा तडीपार ठोकता येऊ शकतात. यासाठी चौथी व सातवी स्कॉलरशिपची गाइड्स, आठवी, नववी, दहावीची प्रज्ञा शोध परीक्षेची गाइड्स तसेच स्पर्धा परीक्षा अंकगणित या आणि अशा वरील घटकांचा समावेश असणाऱ्या पुस्तकांचा वापर करावा.
*    बुद्धिमत्ता व तर्कशास्त्र तयारी
या विभागात आकृत्यांवरील प्रश्न, घनाकृती, संख्यामाला, अक्षरमाला, चिन्हमाला, नातेसंबंध, कालमापन, तर्क अनुमान, माहितीचे आकलन, बठक व्यवस्था, इनपुट-आउटपुट अशा घटकांचा समावेश होतो. या प्रश्नांमधून विद्यार्थ्यांच्या निरीक्षण व ताíकक क्षमतेच्या कसोटीबरोबरच त्यांच्या चौकस बुद्धी आणि बौद्धिक क्षमतेचाही कस पाहिला जातो. या विभागातील प्रश्न सोडविण्यासाठी जास्तीत जास्त सराव आणि उजळणीची गरज असते. एकच प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीने सोडविता येऊ शकतो. त्यामुळे या पद्धतींचा विचार करून त्यातील खाचाखोचा लक्षात ठेऊन प्रश्न सोडविण्याचा सराव केलात तर परीक्षेतही कमीत कमी वेळात प्रश्न सोडविता येऊ शकतात.
यासंदर्भात कालमापन या घटकाचे उदाहरण घेतल्यास सरावाच्या वेळी खालील मुद्दे लक्षात घ्यावेत.
१. प्रत्येक महिन्याच्या १,८,१५,२२,२९ या तारखांना एकच वार असतो.
२.सामान्य वर्षांत आजच्या तारखेला जो वार असतो त्याच्या पुढचा वार पुढच्या वर्षांत त्याच तारखेला असतो, परंतु लीप वर्षांत मात्र पुढच्या वर्षांतील वार दोन दिवस पुढे जातो.

हे मुद्दे पाठ करण्याऐवजी ‘असे का होत असावे?’ याचे कारण जाणून घेऊन लक्षात ठेवल्यास ते कायमस्वरूपी लक्षात राहतात. याचे स्पष्टीकरण खालीलप्रमाणे करता येईल.
१. आठवडय़ामध्ये एकूण सात वार असल्यामुळे १+७=८, ८+७=१५.. म्हणून १,८,१५,२२,२९ या तारखांना तोच वार येतो.
२. सामान्य वर्षांचे एकूण ३६५ दिवस असतात, ३६५ ला ७ या एकूण वारांच्या संखेने भागल्यास बाकी १ उरते म्हणून सामान्य वर्षांत पुढील वर्षांतील वार १ दिवसाने पुढे जातो तर लीप वर्षांत ३६६ दिवस असल्यामुळे ७ ने भागल्यास बाकी २ उरते म्हणून पुढचे वर्ष लीप वर्ष असेल तर पुढच्या वर्षांतील त्याच तारखेचा वार दोन दिवस पुढे जातो.(लीप वर्षांतील अधिक वार फेब्रुवारीमध्ये असल्यामुळे हा नियम चालू वर्षांच्या १ मार्च ते पुढच्या २८ फेब्रुवारीपर्यंतच्या दिवसांना लागू होतो.)
अशा प्रकारे सर्वच उदाहरणांच्या बाबतीत ‘असे का?’ याचे उत्तर तुम्ही स्वत: मिळविले तरच या घटकातील सर्व खाचाखोचा लक्षात राहू
शकतील. एकूणच या विभागाची तयारी करताना शांतपणे विचार करून ‘असे का?’ याचे उत्तर मिळवून शक्य तेवढी सूत्रे, १ ते ३० पर्यंतचे पाढे, १ ते २० पर्यंतचे वर्ग, १ ते १५ पर्यंतचे घन, इंग्रजी वर्णमालेतील वर्णाचे अनुक्रम अशा मूलभूत गोष्टींचे पाठांतर आणि योग्य तो सराव केल्यास हा विभाग तुम्हाला हमखास गुण मिळवून देऊ शकतो. यासाठी आर एस आगरवाल यांच्या पुस्तकातील वरील घटकांचा सरावासाठी वापर करता येईल.
First Published on February 8, 2017 4:39 am
Web Title: mpsc success mantra 7


 
You Might Also Like

करिअरमंत्र तुम्ही एम.एस्सी करायला काहीच हरकत नाही. यामुळे तुमच्या करिअरच्या संधी अधिक व्यापक होतील.

करिअरमंत्र

तुम्ही एम.एस्सी करायला काहीच हरकत नाही. यामुळे तुमच्या करिअरच्या संधी अधिक व्यापक होतील.

सुरेश वांदिले | February 8, 2017 4:38 AM


*   मी बीएससी केमिस्ट्रीच्या शेवटाला वर्षांला आहे. मी एम.एससी करावी का? यानंतर कोणत्या प्रकारच्या शासकीय किंवा इतर संधी प्राप्त होतात.
– गणेश नागरगोजे
तुम्ही एम.एस्सी करायला काहीच हरकत नाही. यामुळे तुमच्या करिअरच्या संधी अधिक व्यापक होतील. शासकीय कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये तुम्हाला अध्यापनाची संधी मिळू शकते. संशोधनाच्या क्षेत्रात करिअर करता येणे शक्य आहे. पीएच.डी. करून भविष्यात वरिष्ठ महाविद्यालये किंवा विद्यापीठात अध्यापनाची संधी मिळू शकते.
*    मी सध्या एमबीए-मार्केटिंग या विषयाच्या दुसऱ्या वर्षांला आहे. मला लोकसेवेसाठी जिल्हाधिकारी हे पद मिळवायचे आहे. मी अजून एकदाही एमपीएससी परीक्षा दिलेली नाही. मी त्याची तयारी कशी करू?
– धम्मपाल थोरात
थेट जिल्हाधिकारी होण्यासाठी संघ लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी नागरी सेवा परीक्षा द्यावी लागते. उपजिल्हाधिकारी हे पद राज्य लोकसेवा आयोगामार्फत भरले जाते. या पदावर प्रथम नियुक्ती मिळालेले उमेदवार साधारणत: पंधरा वर्षांत भारतीय प्रशासनिक सेवेत पदोन्नत होतात. त्यानंतर त्यांना जिल्हाधिकारी हे पद मिळू शकते. सध्या तुम्ही एमबीए अभ्यासक्रम उत्तम रीतीने पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करावे. राज्यसेवा वा केंद्रीय नागरीसेवा परीक्षा अत्यंत स्पर्धात्मक अशा आहेत. त्यात लाखो उमेदवार बसतात. त्यातून बाराशेच्या आसपास उमेदवारांची निवड होते. त्यामुळे नैराश्य टाळण्यासाठी स्वत:कडे उत्तम असा एक दुसरा पर्याय तयार असणे सध्याच्या काळात गरजेचे आहे.
*    मी विद्युत अभियांत्रिकी शाखेमध्ये पदवी घेतली आहे. मला एमपीएससी देण्याची इच्छा आहे. पण मला विद्युत शाखेतूनच परीक्षा द्यायची आहे. तरी मला या परीक्षेचे स्वरूप सांगा. परीक्षेचे अर्ज कधी निघतात. ही परीक्षा कधी घेण्यात येते? नोकरीची संधी कुठे मिळेल?
– यशश्री महाले

तुम्ही राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र अभियांत्रिकी (विद्युत आाणि यांत्रिकी) सेवा ही परीक्षा देऊन महाराष्ट्र शासनाच्या सेवेत येऊ  शकता. ही परीक्षा साधारणत: मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर या केंद्रांवर घेण्यात येते. वयोमर्यादा किमान १९ वर्षे कमाल ३३ वर्षे. महाजेनको कंपनीमार्फत स्वंतत्ररीत्या विद्युत अभियंत्यांची पदे भरली जातात. त्यांची माहिती महाजेनकोच्या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रकाशित केली जाते.
*    मी ११वीपासून एमपीएससी/यूपीएससीची तयारी करत आहे. आता मी एसवाय बीकॉमला आहे. मला वेळेच्या व्यवस्थापनाविषयी माहिती द्याल का?
श्वेता नंदनवार
नक्कीच श्वेता. आपल्या प्रश्नावरून आपणास नेमके कशासाठी वेळेच्या व्यवस्थापनाची माहिती हवी आहे, ही बाब स्पष्ट होत नाही. तथापी बीकॉमचा अभ्यास आणि यूपीएससी/ एमपीएससीचा   अभ्यास करण्यासाठी वेळ कसा पुरवावा, हा प्रश्न पडला असावा. या दोन्ही अभ्यासाशिवाय आपणास आपल्या व्यक्तिमत्त्व विकासाकडेही लक्ष द्यावे लागेल. यामध्ये व्यायाम, एखाद्या कलेची जोपासना, छंद, लेखन व वक्तृत्व कौशल्यात वृद्धी करणे गरजेचे आहे. यासाठी तुम्हाला सर्व बाबींकडे लक्ष द्यावे लागेल. यासाठी वेळापत्रक तयार करावे. प्रत्येक बाबींसाठी विशिष्ट वेळ राखून ठेवावा. या वेळापत्रकाचे पालन प्रामाणिपणे करण्याचा प्रयत्न  केल्यास असाध्य गोष्टीसुद्धा साध्य होऊ  शकतात.
First Published on February 8, 2017 4:35 am
Web Title: expert career advice

यूपीएससीची तयारी : नियोजनाची आखणी प्रस्तुत नियोजनाचा विचार करताना काही महत्त्वपूर्ण मुद्दे लक्षात घेणे गरजेचे ठरते.

यूपीएससीची तयारी : नियोजनाची आखणी

प्रस्तुत नियोजनाचा विचार करताना काही महत्त्वपूर्ण मुद्दे लक्षात घेणे गरजेचे ठरते.

तुकाराम जाधव | February 7, 2017 5:08 AM


यूपीएससी परीक्षेतील पूर्व, मुख्य परीक्षा आणि मुलाखत असे तीन भिन्न टप्पे, विविध विषय आणि त्यांचा व्यापक अभ्यासक्रम, त्यासाठी वाचायची अनेक संदर्भपुस्तके आणि किमान वर्षभराचा सातत्यपूर्ण अभ्यास या वैशिष्टय़ांमुळे यासाठी नियोजित तयारीशिवाय दुसरा मार्ग नाही. परीक्षेचे स्वरूप व व्याप्ती लक्षात घेऊन पद्धतशीरपणे केलेला अभ्यास व वेळेचे नियोजन आणि त्याची प्रभावी अंमलबजावणीच या परीक्षेचा मार्ग सुकर करू शकते.
प्रस्तुत नियोजनाचा विचार करताना काही महत्त्वपूर्ण मुद्दे लक्षात घेणे गरजेचे ठरते. पहिली बाब म्हणजे आपण कोणत्या वर्षी परीक्षा देणार आहोत हे ठरवून अभ्यासास सुरुवात करावी. या परीक्षेच्या तयारीसाठी किमान एक वर्ष पूर्ण वेळ अभ्यास करणे आवश्यक ठरते. त्यापेक्षा जास्त वेळ उपलब्ध असेल तर तयारीचे दीर्घकालीन नियोजन आखता येईल. दुसरी बाब म्हणजे परीक्षेपूर्वी एक वर्ष आधी सुरू करायचा अभ्यास हा शक्यतो पूर्णवेळ स्वरूपाचा असावा. म्हणजे या परीक्षेच्या तयारीच्या पहिल्या वर्षभरात पूर्णपणे याच परीक्षेच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. अभ्यासाचे वर्ष निश्चित झाल्यावर हाती घ्यावयाची तिसरी बाब म्हणजे पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेच्या अभ्यासाचे सखोल व सविस्तर वेळापत्रक तयार करावे. त्या अंतर्गत मुख्य परीक्षेसाठी साधारणत: सात-आठ महिने तर पूर्वपरीक्षेसाठी चार महिन्यांचा कालावधी निर्धारित करावा.
चौथी बाब म्हणजे मुख्य परीक्षेसाठी राखीव आठ महिन्यांचा आणि पूर्व परीक्षेसाठी राखीव चार महिन्यांच्या कालखंडाचे विषय आणि अभ्यासक्रमानुसार सखोल नियोजन करणे. यात कोणता विषय आधी घ्यायचा, त्यास किती वेळ द्यायचा, त्यानंतर कोणता विषय घ्यायचा याचा विचार करून वेळेची विभागणी करावी.
यानंतरची बाब म्हणजे दैनंदिन आणि आठवडय़ाभराचे नियोजन बनवावे. यात दररोज एक अथवा दोन विषय अभ्यासायचे की आठवडा तीन-तीन दिवसांत विभागून त्या तीन दिवसांत सुरुवातीला एक आणि नंतर एक असे दोन विषय अभ्यासायचे हे ठरवावे. म्हणजे दिवस विभागून अथवा आठवडा विभागून विषयांचा अभ्यास करता येतो. वर्तमानपत्रांच्या वाचनासाठी दररोज दोन तासांचा कालावधी निर्धारित करणे महत्त्वाचे आहे. त्याखेरीज नियतकालिके आणि भारत वार्षकिीसारख्या चालू घडामोडीवरील संदर्भाच्या वाचनासाठी (एकंदर चालू घडामोडीसाठी) वर्तमानपत्रांच्या वेळेशिवाय आठवडय़ातील एक दिवस राखीव ठेवावा.
नियोजन प्रक्रियेतील पुढील बाब म्हणजे केलेल्या अभ्यासाची व्यवस्थितपणे उजळणी होईल, याची हमी होय. अनेक विषय, विविध पुस्तके आणि वर्तमानपत्रे-नियतकालिकांचे वाचन करायचे असल्यामुळे अभ्यासून झालेला विषय त्यानंतर किमान दोन वेळा तरी पुन्हा वाचला गेला पाहिजे, याची काळजी घ्यावी. व्यक्तीपरत्वे विषयाच्या उजळणीचे वेळापत्रक बदलू शकते. मुख्य परीक्षा आणि पूर्व परीक्षेत उजळणीस अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण त्याशिवाय अभ्यासात नेमकेपणा व अचूकता, याची हमी देता येणार नाही. म्हणूनच पुरेशा उजळणीद्वारे अभ्यासाचे मजबुतीकरण करण्यावर भर द्यावा.
अभ्यासाच्या नियोजनात परीक्षेच्या स्वरूपानुसार सराव चाचण्या सोडवण्यासाठी वेळ राखीव ठेवणे निर्णायक ठरते. सराव चाचण्यांद्वारेच त्या त्या टप्प्यासाठी आवश्यक क्षमता व कौशल्ये विकसित करता येतात. आपल्या तयारीतील कच्चे दुवे शोधून त्यावर मात करण्यासाठी प्रयत्न करता येतात आणि अभ्यासात परीक्षाभिमुखतेची हमी देता येते. त्यामुळे जसजसा अभ्यास पूर्ण होत जाईल त्याप्रमाणे प्रारंभी विभागावर आणि नंतर संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित सराव चाचण्या सोडवाव्यात.
अभ्यासाचे नियोजन करताना मुख्य परीक्षेच्या तयारीनेच आपल्या अभ्यासाची सुरुवात करावी. त्यानंतरच पूर्व परीक्षेचा अभ्यास करावा. आपल्या अभ्यासात कोणत्याही एका विषयाला अनावश्यक जास्त वेळ किंवा कमी वेळ देणे शक्यतो टाळावे. त्या विषयाचे परीक्षेतील महत्त्व, अभ्यासक्रम, त्यासाठी वाचायची संदर्भपुस्तके आणि संबंधित विषयासंदर्भातील आपली गती लक्षात घेऊनच प्रत्येक विषयास पुरेशा प्रमाणात वेळ निर्धारित करावा.
शेवटची बाब म्हणजे या परीक्षेच्या तयारीसाठी आखलेले नियोजन हे ताठर स्वरूपाचे असू नये. प्रत्यक्ष तयारी करताना विचारात न घेतलेले मुद्दे लक्षात आल्यास त्यानुसार बदल करण्यासाठी नियोजनात लवचीकता हवी. मात्र ते अतिलवचीक दरदिवशी व आठवडय़ास बदलणारेही असू नये. थोडक्यात आपले नियोजन व्यावहारिक असावे याची खबरदारी घ्यावी.
अर्थात या लेखात मांडलेले मुद्दे म्हणजे अंतिम शब्द नव्हे, तर एक व्यापक मार्गदर्शक चौकट म्हणूनच त्याकडे पाहावे. अभ्यासास प्रत्यक्षपणे सुरुवात केल्यानंतर यातील बऱ्याच बाबी लक्षात येतील. आपापल्या गरजेनुसार आवश्यक ते बदल करता येतील. कारण प्रत्येक व्यक्ती ही सारखीच असत नाही आणि स्पर्धा परीक्षेच्या तयारीत अमुक एक प्रारूपच अंतिम व प्रमाण मानता येत नाही. म्हणून स्वत:चे व्यक्तिमत्त्व आणि गरजा लक्षात घेऊन उपलब्ध वेळेचा कमाल व प्रभावी वापर होईल हे पाहावे.
प्रवेश प्रक्रिया
*   एम फिल आणि पीएचडीसाठी प्रवेश प्रक्रियेची जाहिरात विद्यापीठाच्या संकेतस्थळावर आणि किमान दोन राष्ट्रीय स्तरावरच्या त्यापैकी एक मराठी भाषेतील वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध केली जाईल.

*  एम फिल आणि पीएचडीसाठी प्रवेश परीक्षेद्वारे प्रवेश दिला जाईल. यूजीसी-नेट, यूजीसी-सीएसआयआर नेट, एसएलईटी/गेट किंवा टीचर फेलोशिपधारक किंवा एम.फिल पदवीधर उमेदवारांना प्रवेश परीक्षेतून सवलत देण्यात आली आहे. * पात्र उमेदवारांची प्रवेश प्रक्रिया लेखी परीक्षा आणि मुलाखतीद्वारे दोन टप्प्यांत केली जाईल.
*  या प्रवेश परीक्षेत १०० गुणांची लेखी परीक्षा घेतली जाईल, ज्यात बहुपर्यायी स्वरूपाचे १०० प्रश्न असतील. प्रत्येक प्रश्नाला प्रत्येकी एक गुण असेल.
* ५० टक्के प्रश्न हे संशोधन पद्धतीवर तर ५० टक्के प्रश्न हे उमेदवाराने निवडलेल्या विषयाच्या संबंधीने असतील.
* लेखी परीक्षेत उत्तीर्ण पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जातील. उमेदवारामध्ये संशोधनाची क्षमता, प्रस्तावित संशोधन कार्याचा उपयोग शैक्षणिक संस्थांना अथवा विद्यापीठांमध्ये कसा होईल आणि या प्रस्तावित शोधामुळे संबंधित क्षेत्रातील नवीन अतिरिक्त ज्ञान मिळू शकेल का? या घटकांचाही मुलाखतीमध्ये विचार केला जाईल.
तुकाराम जाधव
First Published on February 7, 2017 5:08 am
Web Title: upsc preparation 8

Monday, March 6, 2017

संशोधनाचा राजमार्ग पीएचडी आणि एम फिलसाठी आता प्रवेशपात्रतेबरोबरच प्रवेशपूर्व परीक्षा असते.

संशोधनाचा राजमार्ग

पीएचडी आणि एम फिलसाठी आता प्रवेशपात्रतेबरोबरच प्रवेशपूर्व परीक्षा असते.

वर्षां फडके | February 7, 2017 5:05 AM


पीएचडी किंवा एम फिल म्हणजे फक्त पुस्तकी पदवी नाही. तुम्ही केलेल्या संशोधनाचा, त्यातील निरीक्षणांचा उपयोग जनहितासाठी व्हावा, अशी त्यामागची भावना असते. अलीकडे पीएचडी किंवा एम फिल करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढताना दिसतेय. त्यामुळेच पीएचडी आणि एम फिलसाठी बदललेले काही नियम समजून घेणे आवश्यक आहे.
पीएचडी आणि एम फिलसाठी आता प्रवेशपात्रतेबरोबरच प्रवेशपूर्व परीक्षा असते. तसेच प्रबंध सादर करण्याच्या कालमर्यादेत आणि लेखन पद्धतीत बदल झाला आहे. महिला व अपंग संशोधकांना प्रबंध सादर करण्यासाठी विशेष मुदतवाढही देण्यात आली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या आदेशानुसार हे बदल करण्यात आले आहेत. यासंदर्भातील नियमावली आयोगाच्या ६६६.४ॠू.ूं.्रल्ल या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. आयोगाने पीएचडी ट्रॅकिंग सिस्टीम सुरू केल्यामुळे प्रत्येक संशोधक विद्यार्थ्यांची माहिती ऑनलाइन उपलब्ध होणे शक्य झाले आहे.
एम फिल प्रवेशासाठी पात्रता
* किमान ५५ टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी अथवा समतुल्य व्यावसायिक अभ्यासक्रम उत्तीर्ण
* अनुसूचित जाती-जमाती, इतर मागासवर्गीय आणि १९ सप्टेंबर १९९१ पूर्वी पदव्युत्तर पदवी किंवा एम फिल अभ्यासक्रम उत्तीर्ण करणाऱ्या उमेदवारांना गुणांमध्ये ५ टक्के सवलत.
* पदव्युत्तर पदवीच्या समकक्ष विदेशी विद्यापीठाचा पदवीधर उमेदवारही प्रवेशासाठी पात्र
पीएचडी प्रवेशासाठी पात्रता-
* किमान ५५ टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी किंवा एम फिल अभ्यासक्रम अथवा समतुल्य व्यावसायिक अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.
* अनुसूचित जाती-जमाती, इतर मागासवर्गीय आणि १९ सप्टेंबर १९९१ पूर्वी पदव्युत्तर पदवी किंवा एम फिल अभ्यासक्रम उत्तीर्ण करणाऱ्या उमेदवारांना गुणांमध्ये ५ टक्के सवलत.
* ज्या उमेदवारांच्या एम फिल शोध प्रबंधाचे मूल्यांकन झाले आहे, मात्र मुलाखत बाकी आहे, त्यांनाही पीएचडी अभ्यासक्रमास प्रवेश घेता येईल.
*  एम फिलच्या समकक्ष विदेशी विद्यापीठाचा पदवीधारक उमेदवारही प्रवेशासाठी पात्र
अभ्यासक्रमाचा अवधी
एम फिल अभ्यासक्रमासाठी किमान दोन सत्र किंवा एक वर्षे आणि कमाल चार सत्र किंवा दोन वर्षे

पीएचडी अभ्यासक्रमासाठी कमीत कमी तीन वर्षे आणि जास्तीत जास्त सहा वर्षांचा कालावधी महिला आणि दिव्यांग व्यक्ती यांना अभ्यासक्रम कालावधीत एम फिलसाठी एक वर्षे आणि पीएचडीसाठी जास्तीत जास्त दोन वर्षांची सवलत दिली जाईल.
 यूजीसीचा महिलांना दिलासा
एम फिल आणि पीएचडी करणाऱ्या अनेकींना गरोदरपणासारख्या कारणामुळे आपले संशोधन मध्येच सोडून द्यावे लागते. अशा वेळी त्यांनी त्याआधीपर्यंत केलेले कामही वाया जाते. हीच अडचण लक्षात घेऊन आयोगाने संशोधन पूर्ण करण्यासाठी महिलांना दोन वर्षांचा अतिरिक्त अवधी आणि २४० दिवसांची बाळंतपण तसेच अपत्यसंगोपनाची रजा देण्यात येणार आहे. याशिवाय पीएचडी किंवा एम फिल करताना महिलेला मूळ शहर काही कारणास्तव सोडावे लागले तरी संशोधनासाठी ती दुसऱ्या विद्यापीठात, त्याच आधारावर काही अटी-शर्तीच्या आधारे आपले संशोधन पूर्ण करू शकते.
एकूणच, संशोधनाच्या क्षेत्रात भरीव आणि महत्त्वपूर्ण योगदान मिळावे यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने केलेल्या नव्या नियमामुळे एम फिल आणि पीएचडीच्या अभ्यासक्रमात सुसूत्रता येणार आहे.
varsha100780@gmail.com
(लेखिका  माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात वरिष्ठ साहाय्यक संचालक असून उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या संपर्क अधिकारी आहेत.)
First Published on February 7, 2017 5:05 am
Web Title: new rules for award of mphil phd degrees

Sunday, February 5, 2017

पुढची पायरी : वार्षिक मूल्यमापनाची तयारी कार्यकौशल्य, कार्यतत्परता, परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता आणि विश्वासार्हता.

पुढची पायरी : वार्षिक मूल्यमापनाची तयारी

कार्यकौशल्य, कार्यतत्परता, परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता आणि विश्वासार्हता.

डॉ. जयंत पानसे | February 4, 2017 12:31 AM


फेब्रुवारी महिना लागला की सगळ्या कार्यालयांमध्ये वार्षिक मूल्यमापन नावाच्या एका अपरिहार्य सोहळ्याचे वेध लागतात. वर्षभराच्या वैयक्तिक व सांघिक कामगिरीनंतर कुणाला किती पगारवाढ मिळणार, कोण बढती घेणार, कुणाची बदली होणार तर कुणाचा पत्ता कट होणार, अशी ‘कुणकुण’ लागायला सुरुवात होते. दबक्या आवाजातल्या गप्पा आणि चर्चानी सर्वात जास्त घाबरून जातात ते नवे कर्मचारी. कारण बाकीचे जरी चर्चा करत असले तरी त्यांना थोडाफार अनुभव असतो. पण ज्यांची ही पहिलीच नोकरी असते त्यांच्यासाठी मात्र हा पहिलाच धडा असतो. या वार्षिक मूल्यमापनाला कसे सामोरे जायचे व आपला फायदा कसा करून घ्यायचा याची युक्ती सांगायचा प्रयत्न करतो. पण त्यासाठी तुम्हाला काही गोष्टींची अगोदरच तयारी करायला हवी.
कुठल्याही कंपनीमध्ये पहिल्या वर्षांतील तुमच्या कामगिरीचे मूल्यमापन मुख्यत: चार घटकांवर केले जाते. कार्यकौशल्य, कार्यतत्परता, परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता आणि विश्वासार्हता.
प्रत्येक कंपनीच्या प्रथेप्रमाणे मूल्यमापनाची पद्धत वेगवेगळी असू शकते; परंतु सामान्यत: तुमचे वरिष्ठ, त्यांचे वरिष्ठ आणि मनुष्यबळ विकास विभागाचा एक अधिकारी असा एक संच तुमचे मूल्यमापन करतो. बहुतेक कंपन्यांमध्ये या चार घटकांचा समावेश
केलेली मूल्यमापनाची एक प्रश्नावली तयार असते. बऱ्याच वेळेला ती प्रश्नावली तुम्हालाही दाखवली जाते.
आता या घटकांचा साकल्याने विचार करू –
कार्यकौशल्य :
ज्या शिक्षणकौशल्यामुळे तुम्हाला या पदावर घेतले आहे त्याचा तुम्ही तुमच्यावर सोपवलेल्या कामामध्ये किती प्रभावीपणे वापर करता याचे परीक्षण.
कार्यतत्परता :
यामध्ये तुमच्यावर सोपवलेल्या कामांमध्ये तुम्ही दाखवलेली कार्यक्षमता, प्रभावी गुणवत्ता, वेळेत अचूक काम करण्याची जाण इत्यादींचा समावेश होतो.
परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता :
काम करताना दरवेळीच अनुकूल परिस्थिती असेलच असे नाही. पण कुठल्याही सबबी न सांगता, आपल्या मर्यादांचे भान ठेवून, वेळ पडल्यास परिस्थितीला योग्य अशा व्यक्तीची मदत घेऊन काम यशस्वीरीत्या पूर्णत्वाला नेण्याची क्षमता.

विश्वासार्हता :
कुठल्याही कंपनीत भविष्यात बढतीची शिडी चढायची असेल तर अगदी कनिष्ठ कर्मचाऱ्यापासून ते सर्वात वरिष्ठ सहकाऱ्यांमध्ये तुमच्याबद्दल विश्वासार्हता निर्माण व्हायला हवी. त्यासाठी अत्यंत आवश्यक आहे ते म्हणजे अनाठायी अहंभावाचा त्याग. हा माणूस दुसऱ्याचे व कंपनीचे फक्त भलेच करेल असा विश्वास तुमच्या प्रत्येक सहकाऱ्याच्या मनात निर्माण व्हायला हवा.
आता मूल्यमापनाची तयारी कशी करायची ते बघू
प्राथमिक माहिती :
तुमच्या पदाच्या जबाबदाऱ्या, उद्दिष्टे काय आहेत व त्या तुम्ही किती प्रभावीपणे पार पाडल्या आहेत, तसेच तुमची शक्तिस्थळे व कमकुवत बाजूंचे पृथ:करण याचे लिखित विवरण तयार करा.
स्वत:च्या मूल्यमापनाची लिखित नोंद :
वर दिलेल्या चार घटकांना अनुसरून तुम्ही आता स्वत:चेच मूल्यमापन प्रामाणिकपणे करा. आत्तापर्यंतच्या काळात तुम्ही मिळवलेले यश, झालेल्या चुका, तुम्ही केलेल्या अवघड परिस्थितीवर मात आणि मिळवलेली सहकाऱ्यांची विश्वासार्हता, या सगळ्यांचा त्यात समावेश हवा.
भविष्यातील तुमची भूमिका :
वार्षिक मूल्यमापन करण्यामागे कंपनीला कर्मचाऱ्यांकडून अधिक चांगले काम कसे करून मिळेल व अधिक फायदा कसा होईल हाच एकमेव उद्देश असतो. कुणालाही नवनवीन कौशल्ये आत्मसात करणारा, कार्यक्षम, स्वत:ला विकसित करणारा कर्मचारी हवा असतो. तेव्हा पुढील वर्षांत तुम्ही स्वयंविकास व प्रगती करण्याचे कसे योजले आहे त्याचा पक्का आराखडा तयार करा. याचा तुम्हाला या कंपनीत व पुढील आयुष्यातील  व्यावसायिक कारकीर्दीसाठीही फार उपयोग होणार आहे.
मूल्यमापनाच्या दिवशी :
  • इतरांच्या चांगल्या किंवा वाईट मूल्यमापनाच्या कथा ऐकून मनावर कुठलाही ताण येऊ देऊ नका. मन प्रसन्न ठेवा.
  • स्वच्छ इस्त्री केलेले कार्यालयीन कपडे, पादत्राणे घाला. आवश्यक असेल तरच टाय लावा.
  • वर लिहिल्याप्रमाणे तयार केलेल्या सर्व नोंदींची कागदपत्रे योग्य क्रमाने लावून त्यावर नजर टाका.
  • मूल्यमापनाच्या प्रत्यक्ष मुलाखातीवेळी प्रथम सर्वाना नम्रपणे दिवसाच्या वेळेप्रमाणे शुभेच्छा द्या. परवानगी मागूनच खुर्चीत बसा.
  • प्रश्न नीट समजून घेऊन नंतर उत्तरे द्या. उद्धटपणा टाळून आणि ठामपणे व्यक्त करा.
  • अशा रीतीने प्रयत्न केल्यास पहिल्या वर्षीच्या मूल्यमापनाची तुमची मुलाखत यशस्वीच होणार आहे. पगारवाढ तर मिळेलच, पण एक उत्तम व विश्वासार्ह सहकारी म्हणूनही तुमचे नाव होईल. तुम्हाला मूल्यमापनाच्या मुलाखतीसाठी हार्दिक शुभेच्छा!
First Published on February 4, 2017 12:31 am
Web Title: annual evaluation of preparations
0
SHARES
Share to Google+Google+

राज्य मराठी विकास संस्था ‘मराठीचा विकास : महाराष्ट्राचा विकास' हे संस्थेचे बोधवाक्य आहे.

राज्य मराठी विकास संस्था

‘मराठीचा विकास : महाराष्ट्राचा विकास' हे संस्थेचे बोधवाक्य आहे.

लोकसत्ता टीम | February 4, 2017 12:30 AM


मराठी भाषा आणि महाराष्ट्राची संस्कृती यांचे संरक्षण, संगोपन आणि संवर्धन करण्याच्या हेतूने महाराष्ट्र शासनाने राज्य मराठी विकास संस्थेची स्थापना केली.
‘मराठीचा विकास : महाराष्ट्राचा विकास’ हे संस्थेचे बोधवाक्य आहे. त्यावरून संस्थेच्या व्यापक कार्यकक्षेची कल्पना येऊ  शकेल.
संस्थेच्या स्थापनेमागील दोन मुख्य उद्दिष्टे आहेत.
Ads by ZINC

  • विविध क्षेत्रात मराठीचा होणारा वापर अधिकाधिक गुणवत्तापूर्ण होत जावा यासाठी प्रयत्नशील राहावे
  • मराठी भाषेच्या अभिवृद्धीची प्रक्रिया नियोजनपूर्वक गतिमान करावी
संस्थेची माहिती
  • संस्था सरकारशी संलग्न परंतु बऱ्याच अंशी स्वायत्त आहे
  • या संस्थेचे काम विद्वत्सुलभ म्हणजे ‘अकॅडेमिक’ पद्धतीने चालते
  • संस्थेचे ग्रंथालय आहे. लोककलांचे नमुने, ध्वनिफिती व दृश्य स्वरूपात जतन करण्याची आणि अभ्यासकांना ते उपलब्ध करून देण्याची सोय आहे,
  • त्याचप्रमाणे संस्थेत ध्वनिमुद्रिते, भाषावैज्ञानिक संशोधनार्थ प्रयोगशाळा, ध्वनिमुद्रणशाळा, ध्वनिशाळा, मुद्रणजुळणीघर इत्यादी सोयी आहेत.
First Published on February 4, 2017 12:30 am
Web Title: state marathi development agencies

बायोटेक्नॉलॉजीमध्ये संशोधन करण्यासाठी.. उमदेवारांचे वय १० फेब्रुवारी २०१७ रोजी २८ वर्षांहून अधिक नसावे.

बायोटेक्नॉलॉजीमध्ये संशोधन करण्यासाठी..

उमदेवारांचे वय १० फेब्रुवारी २०१७ रोजी २८ वर्षांहून अधिक नसावे.

केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत कार्यरत असणाऱ्या डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजीतर्फे बायोटेक्नॉलॉजी वा संबंधित क्षेत्रात संशोधनपर पीएच.डी. करण्यासाठी ज्युनिअर रिसर्च फेलोशिप इन बायोटेक्नॉलॉजी म्हणजेच बायोटेक्नॉलॉजी एलिजिबिलिटी टेस्ट २०१७ या निवड परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे.
  • फेलोशिपची संख्या व तपशील- निवड परीक्षेद्वारा गुणवत्ता यादीनुसार पहिल्या २७५ संशोधक उमेदवारांची फेलोशिपसाठी निवड करण्यात येईल. याशिवाय वरील निवड परीक्षेद्वारा पुढील १०० उमेदवारांची त्यांच्या गुणांकानुसार प्रतीक्षायादी तयार करण्यात येईल.
  • आवश्यक शैक्षणिक पात्रता – अर्जदारांनी बायोटेक्नॉलॉजीसह बीई./ बीटेक अथवा एमएससी, एमटेक, एमव्हीएससी, बायोटेक्नॉलॉजी कृषी पशुविज्ञान, वैद्यकशास्त्र, मरिन, औद्योगिक पर्यावरण, औषधी निर्माण, अन्नप्रक्रिया, बायो रिसोर्सेस बायोटेक्नॉलॉजी, बायोकेमिकल इंजिनीअिरग, बायो-सायन्सेस, बायो- इन्फरमॅटिक्स, मॉलिक्युलर अ‍ॅण्ड हय़ुमन जिनॅस्टिक्स वा न्युरोसायन्स यांसारख्या विषयातील पदव्युत्तर पदवी कमीत कमी ६०% गुणांसह (राखीव गटातील उमेदवारांसाठी ५५%) उत्तीर्ण केलेली असावी व त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असायला हवा.
  • वयोमर्यादा- उमदेवारांचे वय १० फेब्रुवारी २०१७ रोजी २८ वर्षांहून अधिक नसावे. वयोमर्यादेची अट राखीव गटातील उमेदवारांसाठी सरकारी नियमांनुसार शिथिलक्षम आहे.
  • निवड पद्धती- अर्जदारांपैकी पात्रताधारकांची बायोटेक्नॉलॉजी एलिजिबिलिटी टेस्ट, बीईटी- २०१७ ही निवड परीक्षा घेण्यात येईल. निवड परीक्षा संगणकीय पद्धतीने १९ मार्च २०१७ रोजी घेण्यात येईल.
निवड परीक्षेत निर्धारित गुणांक मिळविणाऱ्या उमदेवारांना देशांतर्गत विविध शैक्षणिक वा संशोधन संस्थांमध्ये बायोटेक्नॉलॉजी वा संबंधित विषयात संशोधनपर पीएच.डी. करण्यासाठी नेमण्यात येईल. या संशोधकांची नेमणूक दोन वर्षांसाठी करण्यात येईल व त्यादरम्यान त्यांना संबंधित विषयांतर्गत पीएच.डी. करता येईल.
  • अर्जासह भरावयाचे शुल्क- अर्जासह भरावयाचे शुल्क म्हणून उमेदवारांनी १००० रु. ऑनलाइन संगणकीय पद्धतीने भरणे आवश्यक आहे.
  • अर्जाचा नमुना व तपशील – अर्जाचा नमुना व तपशिलासाठी डिपार्टमेंट ऑफ बायो टेक्नॉलॉजीच्या http://www.bcil.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
  • अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख – विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तपशिलासह असणारे अर्ज वरील संकेतस्थळावर १० फेब्रुवारीपर्यंत पाठवावेत.
सैन्यातील प्रवेशाची पूर्वतयारी
महाराष्ट्रातील युवकांना संरक्षण दलात अधिकारी म्हणून दाखल होण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देतानाच त्यांची एनडीए म्हणजेच राष्ट्रीय संरक्षण अकादमी, खडकवासला येथील राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश पात्रता परीक्षेची पूर्वतयारी करवून घेण्याच्या दृष्टीने स्थापना करण्यात आलेल्या सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था, औरंगाबाद येथे खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक विद्यार्थ्यांकडून प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत.
आवश्यक पात्रता- अर्जदार महाराष्ट्र राज्याचे अधिवासी असावेत व ते मार्च/एप्रिल २०१७ मध्ये होणाऱ्या प्रस्तावित शालान्त परीक्षेला बसणारे असायला हवेत.
विशेष सूचना-
वरील मार्गदर्शक अभ्यासक्रम केवळ मुलांसाठी असल्याने विद्यार्थ्यांनीच अर्ज करणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा-
अर्जदार विद्यार्थ्यांची जन्मतारीख २ सप्टेंबर २००० ते ३१ डिसेंबर २००२ च्या दरम्यान असायला हवी.
आवश्यक शारीरिक पात्रता- अर्जदार विद्यार्थ्यांची किमान शारीरिक पात्रता उंची १५७ सेंटिमीटर्स, वजन ४३ किलो व छाती न फुगवता ७४ सेंटिमीटर्स व फुगवून ७९ सेंटिमीटर्स असावी व त्यांना दृष्टिदोष नसावा.

निवड पद्धती-
अर्जदारांपैकी पात्रताधारक विद्यार्थ्यांची लेखी निवड परीक्षा सैनिक सेवा पूर्वशिक्षण संस्था, औरंगाबादतर्फे घेण्यात येईल. इंग्रजी माध्यमातील ही निवड परीक्षा राज्य स्तरावर मुंबई, नागपूर, पुणे, कोल्हापूर, व औरंगाबाद या परीक्षा केंद्रांवर एप्रिल २०१७ मध्ये घेण्यात येईल. परीक्षेची नेमकी तारीख संबंधित उमेदवारांना वेगळी कळविण्यात येईल.
लेखी निवड परीक्षा शालान्त परीक्षेच्या राज्य व केंद्रीय शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमावर आधारित व एकूण १५० गुणांची असेल. यामध्ये प्रत्येकी ७५ गुणांच्या गणित व सामान्य क्षमताज्ञान या विषयांचा समावेश असेल.
निवड परीक्षेत विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या गुणांकाच्या आधारे त्यांना सैनिकी सेवा पूर्वशिक्षण संस्था, औरंगाबादद्वारे मुलाखतीसाठी बोलाविण्यात येऊन त्यानुसार त्यांना या मार्गदर्शनपर अभ्यासक्रमामध्ये प्रवेश देण्यात येईल.
अर्जासह भरावयाचे शुल्क : अर्जासह भरावयाचे शुल्क म्हणून उमेदवारांनी ४८५ रु. राज्यातील बँक ऑफ महाराष्ट्राच्या कुठल्याही शाखेत चलनद्वारा भरावेत अथवा ४५० रु.चा डायरेक्टर, एसपीआय- औरंगाबाद यांच्या नावे असलेला व औरंगाबाद येथे देय असणारा डिमांड ड्राफ्ट प्रवेश अर्जासह पाठवावा.
अधिक माहिती व तपशील- या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था, औरंगाबादच्या दूरध्वनी क्र. ०२४०- २३८१३७० वर संपर्क साधावा अथवा संस्थेच्या www.spiaurangabad.com  या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख :
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील, कागदपत्र आणि डिमांड ड्राफ्टसह असणारे अर्ज संचालक, सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था, औरंगाबाद या पत्त्यावर १० फेब्रुवारी २०१७ पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.
राज्यातील शालान्त परीक्षा देणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांना १२ वीनंतर खडकवासलाच्या राष्ट्रीय प्रबोधिनीच्या माध्यमातून सैन्यदलात दाखल होऊन आपले करिअर करायचे असेल अशांनी या मार्गदर्शनपर संधीचा अवश्य लाभ घ्यावा.
First Published on February 4, 2017 12:25 am
Web Title: biotechnology research