एमपीएससी मंत्र : सामान्य अध्ययन-२ चे हुकमी एक्के
सामान्य अध्ययन २ या पेपरमधले हुकमी एक्के म्हणजे गणित, बुद्धिमत्ता आणि तर्कशास्त्र.
वसुंधरा भोपळे |
February 8, 2017 4:40 AM
गणिताच्या भीतीपोटी विद्यार्थी आपल्याला इथे गुण मिळणारच नाहीत म्हणून गणित विभागात आपली विकेट आधीच फेकतात. पण गणिताची तयारी इतकीही काही कठीण नाही.
* अंकगणिताची तयारी
या विभागात जर चेंडू तडीपार करून अधिकाधिक गुण मिळवायचे असतील तर अभ्यासाचे घटक ठरवून घेऊन त्यांची चौफेर तयारी करा. यामध्ये सरासरी, शेकडेवारी, नफा-तोटा,भागीदारी, गुणोत्तर-प्रमाण, काळ-काम-वेग, वेग-वेळ-अंतर, सरळव्याज, चक्रवाढव्याज, कालमापन अशा घटकांवर अधिक भर द्यावा. हे सर्व घटक दहावीपर्यंतच्या अभ्यासाच्या आधारावर सोडविता येतात. योग्य त्या सरावाने या घटकातील यॉर्करसुद्धा तडीपार ठोकता येऊ शकतात. यासाठी चौथी व सातवी स्कॉलरशिपची गाइड्स, आठवी, नववी, दहावीची प्रज्ञा शोध परीक्षेची गाइड्स तसेच स्पर्धा परीक्षा अंकगणित या आणि अशा वरील घटकांचा समावेश असणाऱ्या पुस्तकांचा वापर करावा.
* बुद्धिमत्ता व तर्कशास्त्र तयारी
या विभागात आकृत्यांवरील प्रश्न, घनाकृती, संख्यामाला, अक्षरमाला, चिन्हमाला, नातेसंबंध, कालमापन, तर्क अनुमान, माहितीचे आकलन, बठक व्यवस्था, इनपुट-आउटपुट अशा घटकांचा समावेश होतो. या प्रश्नांमधून विद्यार्थ्यांच्या निरीक्षण व ताíकक क्षमतेच्या कसोटीबरोबरच त्यांच्या चौकस बुद्धी आणि बौद्धिक क्षमतेचाही कस पाहिला जातो. या विभागातील प्रश्न सोडविण्यासाठी जास्तीत जास्त सराव आणि उजळणीची गरज असते. एकच प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीने सोडविता येऊ शकतो. त्यामुळे या पद्धतींचा विचार करून त्यातील खाचाखोचा लक्षात ठेऊन प्रश्न सोडविण्याचा सराव केलात तर परीक्षेतही कमीत कमी वेळात प्रश्न सोडविता येऊ शकतात.
यासंदर्भात कालमापन या घटकाचे उदाहरण घेतल्यास सरावाच्या वेळी खालील मुद्दे लक्षात घ्यावेत.
१. प्रत्येक महिन्याच्या १,८,१५,२२,२९ या तारखांना एकच वार असतो.
२.सामान्य वर्षांत आजच्या तारखेला जो वार असतो त्याच्या पुढचा वार पुढच्या वर्षांत त्याच तारखेला असतो, परंतु लीप वर्षांत मात्र पुढच्या वर्षांतील वार दोन दिवस पुढे जातो.
१. आठवडय़ामध्ये एकूण सात वार असल्यामुळे १+७=८, ८+७=१५.. म्हणून १,८,१५,२२,२९ या तारखांना तोच वार येतो.
२. सामान्य वर्षांचे एकूण ३६५ दिवस असतात, ३६५ ला ७ या एकूण वारांच्या संखेने भागल्यास बाकी १ उरते म्हणून सामान्य वर्षांत पुढील वर्षांतील वार १ दिवसाने पुढे जातो तर लीप वर्षांत ३६६ दिवस असल्यामुळे ७ ने भागल्यास बाकी २ उरते म्हणून पुढचे वर्ष लीप वर्ष असेल तर पुढच्या वर्षांतील त्याच तारखेचा वार दोन दिवस पुढे जातो.(लीप वर्षांतील अधिक वार फेब्रुवारीमध्ये असल्यामुळे हा नियम चालू वर्षांच्या १ मार्च ते पुढच्या २८ फेब्रुवारीपर्यंतच्या दिवसांना लागू होतो.)
अशा प्रकारे सर्वच उदाहरणांच्या बाबतीत ‘असे का?’ याचे उत्तर तुम्ही स्वत: मिळविले तरच या घटकातील सर्व खाचाखोचा लक्षात राहू
शकतील. एकूणच या विभागाची तयारी करताना शांतपणे विचार करून ‘असे का?’ याचे उत्तर मिळवून शक्य तेवढी सूत्रे, १ ते ३० पर्यंतचे पाढे, १ ते २० पर्यंतचे वर्ग, १ ते १५ पर्यंतचे घन, इंग्रजी वर्णमालेतील वर्णाचे अनुक्रम अशा मूलभूत गोष्टींचे पाठांतर आणि योग्य तो सराव केल्यास हा विभाग तुम्हाला हमखास गुण मिळवून देऊ शकतो. यासाठी आर एस आगरवाल यांच्या पुस्तकातील वरील घटकांचा सरावासाठी वापर करता येईल.
First Published on February 8, 2017 4:39 am
Web Title: mpsc success mantra 7
No comments:
Post a Comment