यूपीएससीची तयारी : नियोजनाची आखणी
प्रस्तुत नियोजनाचा विचार करताना काही महत्त्वपूर्ण मुद्दे लक्षात घेणे गरजेचे ठरते.
तुकाराम जाधव |
February 7, 2017 5:08 AM
प्रस्तुत नियोजनाचा विचार करताना काही महत्त्वपूर्ण मुद्दे लक्षात घेणे गरजेचे ठरते. पहिली बाब म्हणजे आपण कोणत्या वर्षी परीक्षा देणार आहोत हे ठरवून अभ्यासास सुरुवात करावी. या परीक्षेच्या तयारीसाठी किमान एक वर्ष पूर्ण वेळ अभ्यास करणे आवश्यक ठरते. त्यापेक्षा जास्त वेळ उपलब्ध असेल तर तयारीचे दीर्घकालीन नियोजन आखता येईल. दुसरी बाब म्हणजे परीक्षेपूर्वी एक वर्ष आधी सुरू करायचा अभ्यास हा शक्यतो पूर्णवेळ स्वरूपाचा असावा. म्हणजे या परीक्षेच्या तयारीच्या पहिल्या वर्षभरात पूर्णपणे याच परीक्षेच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. अभ्यासाचे वर्ष निश्चित झाल्यावर हाती घ्यावयाची तिसरी बाब म्हणजे पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेच्या अभ्यासाचे सखोल व सविस्तर वेळापत्रक तयार करावे. त्या अंतर्गत मुख्य परीक्षेसाठी साधारणत: सात-आठ महिने तर पूर्वपरीक्षेसाठी चार महिन्यांचा कालावधी निर्धारित करावा.
चौथी बाब म्हणजे मुख्य परीक्षेसाठी राखीव आठ महिन्यांचा आणि पूर्व परीक्षेसाठी राखीव चार महिन्यांच्या कालखंडाचे विषय आणि अभ्यासक्रमानुसार सखोल नियोजन करणे. यात कोणता विषय आधी घ्यायचा, त्यास किती वेळ द्यायचा, त्यानंतर कोणता विषय घ्यायचा याचा विचार करून वेळेची विभागणी करावी.
यानंतरची बाब म्हणजे दैनंदिन आणि आठवडय़ाभराचे नियोजन बनवावे. यात दररोज एक अथवा दोन विषय अभ्यासायचे की आठवडा तीन-तीन दिवसांत विभागून त्या तीन दिवसांत सुरुवातीला एक आणि नंतर एक असे दोन विषय अभ्यासायचे हे ठरवावे. म्हणजे दिवस विभागून अथवा आठवडा विभागून विषयांचा अभ्यास करता येतो. वर्तमानपत्रांच्या वाचनासाठी दररोज दोन तासांचा कालावधी निर्धारित करणे महत्त्वाचे आहे. त्याखेरीज नियतकालिके आणि भारत वार्षकिीसारख्या चालू घडामोडीवरील संदर्भाच्या वाचनासाठी (एकंदर चालू घडामोडीसाठी) वर्तमानपत्रांच्या वेळेशिवाय आठवडय़ातील एक दिवस राखीव ठेवावा.
नियोजन प्रक्रियेतील पुढील बाब म्हणजे केलेल्या अभ्यासाची व्यवस्थितपणे उजळणी होईल, याची हमी होय. अनेक विषय, विविध पुस्तके आणि वर्तमानपत्रे-नियतकालिकांचे वाचन करायचे असल्यामुळे अभ्यासून झालेला विषय त्यानंतर किमान दोन वेळा तरी पुन्हा वाचला गेला पाहिजे, याची काळजी घ्यावी. व्यक्तीपरत्वे विषयाच्या उजळणीचे वेळापत्रक बदलू शकते. मुख्य परीक्षा आणि पूर्व परीक्षेत उजळणीस अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण त्याशिवाय अभ्यासात नेमकेपणा व अचूकता, याची हमी देता येणार नाही. म्हणूनच पुरेशा उजळणीद्वारे अभ्यासाचे मजबुतीकरण करण्यावर भर द्यावा.
अभ्यासाच्या नियोजनात परीक्षेच्या स्वरूपानुसार सराव चाचण्या सोडवण्यासाठी वेळ राखीव ठेवणे निर्णायक ठरते. सराव चाचण्यांद्वारेच त्या त्या टप्प्यासाठी आवश्यक क्षमता व कौशल्ये विकसित करता येतात. आपल्या तयारीतील कच्चे दुवे शोधून त्यावर मात करण्यासाठी प्रयत्न करता येतात आणि अभ्यासात परीक्षाभिमुखतेची हमी देता येते. त्यामुळे जसजसा अभ्यास पूर्ण होत जाईल त्याप्रमाणे प्रारंभी विभागावर आणि नंतर संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित सराव चाचण्या सोडवाव्यात.
अभ्यासाचे नियोजन करताना मुख्य परीक्षेच्या तयारीनेच आपल्या अभ्यासाची सुरुवात करावी. त्यानंतरच पूर्व परीक्षेचा अभ्यास करावा. आपल्या अभ्यासात कोणत्याही एका विषयाला अनावश्यक जास्त वेळ किंवा कमी वेळ देणे शक्यतो टाळावे. त्या विषयाचे परीक्षेतील महत्त्व, अभ्यासक्रम, त्यासाठी वाचायची संदर्भपुस्तके आणि संबंधित विषयासंदर्भातील आपली गती लक्षात घेऊनच प्रत्येक विषयास पुरेशा प्रमाणात वेळ निर्धारित करावा.
शेवटची बाब म्हणजे या परीक्षेच्या तयारीसाठी आखलेले नियोजन हे ताठर स्वरूपाचे असू नये. प्रत्यक्ष तयारी करताना विचारात न घेतलेले मुद्दे लक्षात आल्यास त्यानुसार बदल करण्यासाठी नियोजनात लवचीकता हवी. मात्र ते अतिलवचीक दरदिवशी व आठवडय़ास बदलणारेही असू नये. थोडक्यात आपले नियोजन व्यावहारिक असावे याची खबरदारी घ्यावी.
अर्थात या लेखात मांडलेले मुद्दे म्हणजे अंतिम शब्द नव्हे, तर एक व्यापक मार्गदर्शक चौकट म्हणूनच त्याकडे पाहावे. अभ्यासास प्रत्यक्षपणे सुरुवात केल्यानंतर यातील बऱ्याच बाबी लक्षात येतील. आपापल्या गरजेनुसार आवश्यक ते बदल करता येतील. कारण प्रत्येक व्यक्ती ही सारखीच असत नाही आणि स्पर्धा परीक्षेच्या तयारीत अमुक एक प्रारूपच अंतिम व प्रमाण मानता येत नाही. म्हणून स्वत:चे व्यक्तिमत्त्व आणि गरजा लक्षात घेऊन उपलब्ध वेळेचा कमाल व प्रभावी वापर होईल हे पाहावे.
प्रवेश प्रक्रिया
* एम फिल आणि पीएचडीसाठी प्रवेश प्रक्रियेची जाहिरात विद्यापीठाच्या संकेतस्थळावर आणि किमान दोन राष्ट्रीय स्तरावरच्या त्यापैकी एक मराठी भाषेतील वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध केली जाईल.
* या प्रवेश परीक्षेत १०० गुणांची लेखी परीक्षा घेतली जाईल, ज्यात बहुपर्यायी स्वरूपाचे १०० प्रश्न असतील. प्रत्येक प्रश्नाला प्रत्येकी एक गुण असेल.
* ५० टक्के प्रश्न हे संशोधन पद्धतीवर तर ५० टक्के प्रश्न हे उमेदवाराने निवडलेल्या विषयाच्या संबंधीने असतील.
* लेखी परीक्षेत उत्तीर्ण पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जातील. उमेदवारामध्ये संशोधनाची क्षमता, प्रस्तावित संशोधन कार्याचा उपयोग शैक्षणिक संस्थांना अथवा विद्यापीठांमध्ये कसा होईल आणि या प्रस्तावित शोधामुळे संबंधित क्षेत्रातील नवीन अतिरिक्त ज्ञान मिळू शकेल का? या घटकांचाही मुलाखतीमध्ये विचार केला जाईल.
तुकाराम जाधव
First Published on February 7, 2017 5:08 am
Web Title: upsc preparation 8
No comments:
Post a Comment