एमपीएससी मंत्र : दुय्यम सेवा पदनिहाय पेपर राज्यव्यवस्था घटक
दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षेच्या पदनिहाय स्वतंत्र पेपरमध्ये जवळपास ३०% अभ्यासक्रम हा सामायिक आहे.
(संग्रहित छायाचित्र)
दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षेच्या पदनिहाय स्वतंत्र पेपरमध्ये जवळपास ३०% अभ्यासक्रम हा सामायिक आहे. या सामायिक घटकांची तयारी एकत्रितपणे केल्यास स्वतंत्र अभ्यासक्रमांसाठी जास्त वेळ उपलब्ध होतो. तिन्ही पेपरमध्ये राज्यव्यवस्था घटक हा सामायिक असला तरी त्यातील काही भाग तिन्ही पदांसाठी आहे तर काही भाग केवळ सहायक कक्ष अधिकारी व विक्रीकर निरीक्षक या पदांसाठी आहे.
आयोगाने तिन्ही पदांसाठी पेपर दोनमध्ये विहित केलेला राज्यव्यवस्था घटकाचा अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे आहे :
भारतीय राज्यघटना
(तिन्ही पदांसाठी)
घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका व तत्त्वे, घटनेची महत्त्वाची कलमे / ठळक वैशिष्टय़े, केंद्र व राज्य संबंध, निधर्मी राज्य, मूलभूत हक्क व कर्तव्ये, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे – शिक्षण, युनिफॉर्म सिव्हिल कोड, स्वतंत्र न्यायपालिका.
(केवळ सहायक कक्ष अधिकारी व विक्रीकर निरीक्षक पदांसाठी)
राज्यपाल, मुख्यमंत्री व मंत्रिमंडळाची भूमिका, अधिकार व कार्य, राज्य विधि मंडळ – विधानसभा, विधान परिषद व त्यांचे सदस्य, अधिकार, कार्य व भूमिका, विधी समित्या.
या घटकाची तयारी पुढीलप्रमाणे करता येईल.
* भारताची राज्यघटना
* घटना कशी तयार झाली याबाबत तयारी करताना घटना समितीची रचना, महाराष्ट्रातील सदस्य, समित्या व त्यांचे सदस्य / अध्यक्ष, समितीच्या बठका व त्यातील प्रसिद्ध चर्चा, समितीचे कार्य याबाबत अभ्यास करणे आवश्यक आहे.
* तसेच भारतासाठी वेळोवेळी झालेली घटनेची मागणी, राज्यघटनेतील संभाव्य तत्त्वे व त्यामागील भूमिका या बाबी समजून घेणे आवश्यक आहे.
* घटनेची प्रस्तावना, त्यामागील वेगवेगळ्या नेत्यांच्या भूमिका व प्रतिक्रिया, त्यामध्ये समाविष्ट तत्त्वे / विचार आणि प्रस्तावनेचे घटना समजून घेण्यासाठीचे महत्त्व हे मुद्देही व्यवस्थित समजून घ्यावेत.
2 मूलभूत हक्क व कर्तव्ये याबाबतची सर्व कलमे मुळातून समजून घेऊन त्यामध्ये समाविष्ट अपवादांसहित पाठच करायला हवीत. त्याबाबतच्या चालू घडामोडी व सर्वोच्च न्यायालयाचे अद्ययावत निकाल माहीत असणे आवश्यक आहे. या तरतुदींबाबत झालेल्या घटनादुरुस्त्या व महत्त्वाचे सर्वोच्च न्यायालयाचे निकाल यांचा आढावा घेणे गरजेचे आहे.
* राज्याच्या धोरणाची सर्व नीतिनिर्देशक तत्त्वे समजून घेणे आवश्यकच आहे. मात्र शिक्षण, युनिफॉर्म सिव्हिल कोड, स्वतंत्र न्यायपालिका या मुद्दय़ांचा अभ्यासक्रमामध्ये विशेष उल्लेख केलेला असल्याने त्याबाबतची कलमे, तरतुदी व त्यानुसार केंद्र व राज्य शासनाने वेळोवेळी घेतलेले महत्त्वाचे निर्णय व केलेले कायदे समजून घ्यावेत. उदा. शिक्षण हक्क कायदा, न्यायपालिकांमधील नेमणुकांची कोलेजियम पद्धत व त्याबाबत शासन व न्यायपालिकेमधील संघर्ष इ.
* राज्यघटनेतील महत्त्वाची कलमे ही केंद्र व राज्य संबंध व घटनादुरुस्ती तसेच घटनात्मक पदे यांपुरती मर्यादित ठेवता येतील. मात्र चालू घडामोडींच्या अनुषंगाने त्या त्या कलमांचा महत्त्वाच्या कलमांमध्ये समावेश करणे आवश्यक आहे.
* केंद्र व राज्य सरकारे यांच्यामध्ये प्रशासकीय, आíथक व कायदेशीर अधिकारांची विभागणी कशा प्रकारे झाली आहे; याबाबतची कलमे समजून घ्यावीत व सातव्या परिशिष्टातील विषयांची विभागणी व्यवस्थित समजून घ्यायला हवी. शक्य असेल तर केंद्र, राज्य व समवर्ती सूचीतील विषय पाठच करावेत.
* राज्य शासन
हा भाग पोलीस उपनिरीक्षक पदासाठीच्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट नाही. फक्त सहायक कक्ष अधिकारी आणि विक्रीकर निरीक्षक या पदांसाठीच्या अभ्यासक्रमामध्ये आहे.
* विधानसभा व विधान परिषदेच्या सदस्यांच्या निवडणुका, राज्यपाल व मुख्यमंत्री व मंत्रिमंडळाची नेमणूक, कार्यकाळ, पदावरून हटविणे, राजीनामा, हक्क, कर्तव्ये या सर्व मुद्दय़ांशी संबंधित राज्यघटनेतील तरतुदी बारकाईने अभ्यासणे आवश्यक आहे. विधानमंडळातील विधि समित्यांचा अभ्यास त्यांची रचना, काय्रे व अधिकार या मुद्दय़ांच्या आधारे करावा.
* विधानसभा आणि विधान परिषद यांच्या कामकाजाची माहिती असायला हवी. कायदा निर्मिती प्रक्रिया तसेच विविध प्रश्न / ठराव इत्यादी कामकाजाचे महत्त्वाचे नियम माहीत असायला हवेत.
दुय्यम सेवा मुख्य परीक्षेच्या पदनिहाय पेपरमधील सामायिक अभ्यासक्रमाच्या तयारीबाबत आतापर्यंत चर्चा करण्यात आली. पुढील लेखापासून प्रत्येक पदासाठी स्वतंत्र विहित केलेल्या अभ्यासक्रमाची तयारी कशा प्रकारे करावी, याबाबत चर्चा करण्यात येईल.
First Published on July 26, 2019 12:04 am
Web Title: secondary service designation paper state governance components abn 97
No comments:
Post a Comment