शब्दबोध : दिवटा
आठवणीतल्या कवितांमध्ये वि. म. कुलकर्णीची ‘ज्योत’ नावाची एक सुंदर कविता आहे.
(संग्रहित छायाचित्र)
आदिमानवाने जेव्हा प्रथम अग्नी निर्माण केला तेव्हाच तो इतर प्राण्यांपासून वेगळा आणि श्रेष्ठ ठरला. मात्र त्याच वेळी अग्नीमुळे मानव निसर्गापासूनही दूर झाला आणि त्याने हळूहळू निसर्गावर अतिक्रमण करण्यास सुरुवात केली. शिकारीचे मास अग्नीवर भाजण्यापासून ते अग्नीचा प्रकाशासाठी उपयोग करण्यापर्यंत मानवाने प्रगती केली.प्राण्यांची चरबी, वनस्पतींची तेले यांचा उपयोग करून ज्योत निर्माण केली. ज्योतीच्या प्रकाशाने रात्रीचा अंधार दूर केला. दिवटी किंवा मशाल हे त्या ज्योतीचेच रूप होय. आठवणीतल्या कवितांमध्ये वि. म. कुलकर्णीची ‘ज्योत’ नावाची एक सुंदर कविता आहे. ज्योतीचा प्रवास दिवटी, पणती, समई, कंदील, बत्ती असा पुढे सरकत आजच्या बिजलीपर्यंत कसा झाला याचे सुरेख वर्णन कवितेत आहे. तिची सुरुवातच
आधी होते मी दिवटी शेतकऱ्यांची आवडती
झाले इवली मग पणती,
घराघरांतून मिणमिणती
या कडव्याने झाली आहे. थोडक्यात दिवटी म्हणजे मशाल.
पूर्वी रात्रीच्या वेळी प्रवास करायचा झाल्यास काही जण मार्ग दाखवण्यासाठी दिवटी हातात घेऊन पुढे चालत. मशाल किंवा दिवटी हातात धरून मार्ग दाखवणाऱ्या अशा व्यक्तींना मशालजी किंवा दिवटा असे म्हणत. ज्ञानेश्वरीत दहाव्या अध्यायात श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात,
तयां तत्त्वज्ञां चोखटां
दिवी पोतसाची सुभटा
मग मीचि होऊनी दिवटां
पुढां पुढां चाले.
याचा अर्थ ‘अर्जुना, त्या श्रेष्ठ शुद्ध प्रेमळ भक्तांकरिता तत्त्वज्ञानरूपी मशाल घेऊन मी स्वत: दिवटा होऊन त्यांच्यापुढे दिवस रात्र चालतो’. अशा तऱ्हेने श्रीकृष्ण स्वत:ला दिवटा म्हणजे मार्ग दाखवणारा, वाटाडय़ा म्हणवून घेतात. त्यानंतर मात्र दिवटा या शब्दाला जरा हलका अर्थ प्राप्त झालाय. दिवटा म्हणजे वाया गेलेला, दुर्गुणी, वाईट मार्गाला लागलेला असे अर्थ त्याला चिकटले आहेत. अर्थात या नव्या अर्थापेक्षा आपल्या आद्य ज्ञानेश्वरीतला अर्थ ध्यानी घेतला तर ते दिवटेपण आपल्याला खरोखरच ज्ञानज्योतीकडे नेईल.
First Published on August 2, 2019 12:02 am
Web Title: word sence article abn 97
No comments:
Post a Comment