Sunday, February 5, 2017

पुढची पायरी : वार्षिक मूल्यमापनाची तयारी कार्यकौशल्य, कार्यतत्परता, परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता आणि विश्वासार्हता.

पुढची पायरी : वार्षिक मूल्यमापनाची तयारी

कार्यकौशल्य, कार्यतत्परता, परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता आणि विश्वासार्हता.

डॉ. जयंत पानसे | February 4, 2017 12:31 AM


फेब्रुवारी महिना लागला की सगळ्या कार्यालयांमध्ये वार्षिक मूल्यमापन नावाच्या एका अपरिहार्य सोहळ्याचे वेध लागतात. वर्षभराच्या वैयक्तिक व सांघिक कामगिरीनंतर कुणाला किती पगारवाढ मिळणार, कोण बढती घेणार, कुणाची बदली होणार तर कुणाचा पत्ता कट होणार, अशी ‘कुणकुण’ लागायला सुरुवात होते. दबक्या आवाजातल्या गप्पा आणि चर्चानी सर्वात जास्त घाबरून जातात ते नवे कर्मचारी. कारण बाकीचे जरी चर्चा करत असले तरी त्यांना थोडाफार अनुभव असतो. पण ज्यांची ही पहिलीच नोकरी असते त्यांच्यासाठी मात्र हा पहिलाच धडा असतो. या वार्षिक मूल्यमापनाला कसे सामोरे जायचे व आपला फायदा कसा करून घ्यायचा याची युक्ती सांगायचा प्रयत्न करतो. पण त्यासाठी तुम्हाला काही गोष्टींची अगोदरच तयारी करायला हवी.
कुठल्याही कंपनीमध्ये पहिल्या वर्षांतील तुमच्या कामगिरीचे मूल्यमापन मुख्यत: चार घटकांवर केले जाते. कार्यकौशल्य, कार्यतत्परता, परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता आणि विश्वासार्हता.
प्रत्येक कंपनीच्या प्रथेप्रमाणे मूल्यमापनाची पद्धत वेगवेगळी असू शकते; परंतु सामान्यत: तुमचे वरिष्ठ, त्यांचे वरिष्ठ आणि मनुष्यबळ विकास विभागाचा एक अधिकारी असा एक संच तुमचे मूल्यमापन करतो. बहुतेक कंपन्यांमध्ये या चार घटकांचा समावेश
केलेली मूल्यमापनाची एक प्रश्नावली तयार असते. बऱ्याच वेळेला ती प्रश्नावली तुम्हालाही दाखवली जाते.
आता या घटकांचा साकल्याने विचार करू –
कार्यकौशल्य :
ज्या शिक्षणकौशल्यामुळे तुम्हाला या पदावर घेतले आहे त्याचा तुम्ही तुमच्यावर सोपवलेल्या कामामध्ये किती प्रभावीपणे वापर करता याचे परीक्षण.
कार्यतत्परता :
यामध्ये तुमच्यावर सोपवलेल्या कामांमध्ये तुम्ही दाखवलेली कार्यक्षमता, प्रभावी गुणवत्ता, वेळेत अचूक काम करण्याची जाण इत्यादींचा समावेश होतो.
परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता :
काम करताना दरवेळीच अनुकूल परिस्थिती असेलच असे नाही. पण कुठल्याही सबबी न सांगता, आपल्या मर्यादांचे भान ठेवून, वेळ पडल्यास परिस्थितीला योग्य अशा व्यक्तीची मदत घेऊन काम यशस्वीरीत्या पूर्णत्वाला नेण्याची क्षमता.

विश्वासार्हता :
कुठल्याही कंपनीत भविष्यात बढतीची शिडी चढायची असेल तर अगदी कनिष्ठ कर्मचाऱ्यापासून ते सर्वात वरिष्ठ सहकाऱ्यांमध्ये तुमच्याबद्दल विश्वासार्हता निर्माण व्हायला हवी. त्यासाठी अत्यंत आवश्यक आहे ते म्हणजे अनाठायी अहंभावाचा त्याग. हा माणूस दुसऱ्याचे व कंपनीचे फक्त भलेच करेल असा विश्वास तुमच्या प्रत्येक सहकाऱ्याच्या मनात निर्माण व्हायला हवा.
आता मूल्यमापनाची तयारी कशी करायची ते बघू
प्राथमिक माहिती :
तुमच्या पदाच्या जबाबदाऱ्या, उद्दिष्टे काय आहेत व त्या तुम्ही किती प्रभावीपणे पार पाडल्या आहेत, तसेच तुमची शक्तिस्थळे व कमकुवत बाजूंचे पृथ:करण याचे लिखित विवरण तयार करा.
स्वत:च्या मूल्यमापनाची लिखित नोंद :
वर दिलेल्या चार घटकांना अनुसरून तुम्ही आता स्वत:चेच मूल्यमापन प्रामाणिकपणे करा. आत्तापर्यंतच्या काळात तुम्ही मिळवलेले यश, झालेल्या चुका, तुम्ही केलेल्या अवघड परिस्थितीवर मात आणि मिळवलेली सहकाऱ्यांची विश्वासार्हता, या सगळ्यांचा त्यात समावेश हवा.
भविष्यातील तुमची भूमिका :
वार्षिक मूल्यमापन करण्यामागे कंपनीला कर्मचाऱ्यांकडून अधिक चांगले काम कसे करून मिळेल व अधिक फायदा कसा होईल हाच एकमेव उद्देश असतो. कुणालाही नवनवीन कौशल्ये आत्मसात करणारा, कार्यक्षम, स्वत:ला विकसित करणारा कर्मचारी हवा असतो. तेव्हा पुढील वर्षांत तुम्ही स्वयंविकास व प्रगती करण्याचे कसे योजले आहे त्याचा पक्का आराखडा तयार करा. याचा तुम्हाला या कंपनीत व पुढील आयुष्यातील  व्यावसायिक कारकीर्दीसाठीही फार उपयोग होणार आहे.
मूल्यमापनाच्या दिवशी :
  • इतरांच्या चांगल्या किंवा वाईट मूल्यमापनाच्या कथा ऐकून मनावर कुठलाही ताण येऊ देऊ नका. मन प्रसन्न ठेवा.
  • स्वच्छ इस्त्री केलेले कार्यालयीन कपडे, पादत्राणे घाला. आवश्यक असेल तरच टाय लावा.
  • वर लिहिल्याप्रमाणे तयार केलेल्या सर्व नोंदींची कागदपत्रे योग्य क्रमाने लावून त्यावर नजर टाका.
  • मूल्यमापनाच्या प्रत्यक्ष मुलाखातीवेळी प्रथम सर्वाना नम्रपणे दिवसाच्या वेळेप्रमाणे शुभेच्छा द्या. परवानगी मागूनच खुर्चीत बसा.
  • प्रश्न नीट समजून घेऊन नंतर उत्तरे द्या. उद्धटपणा टाळून आणि ठामपणे व्यक्त करा.
  • अशा रीतीने प्रयत्न केल्यास पहिल्या वर्षीच्या मूल्यमापनाची तुमची मुलाखत यशस्वीच होणार आहे. पगारवाढ तर मिळेलच, पण एक उत्तम व विश्वासार्ह सहकारी म्हणूनही तुमचे नाव होईल. तुम्हाला मूल्यमापनाच्या मुलाखतीसाठी हार्दिक शुभेच्छा!
First Published on February 4, 2017 12:31 am
Web Title: annual evaluation of preparations
0
SHARES
Share to Google+Google+

No comments:

Post a Comment