Wednesday, February 1, 2017

एमपीएससी मंत्र : सामान्य अध्ययन- पेपर -२ मुळात ८०प्रश्नांपकी ७०प्रश्न जरी सोडवता आले तरी आपल्याला पंधरा प्रश्न चुकायला अनुमती असते.

एमपीएससी मंत्र : सामान्य  अध्ययन- पेपर -२

मुळात ८०प्रश्नांपकी ७०प्रश्न जरी सोडवता आले तरी आपल्याला पंधरा प्रश्न चुकायला अनुमती असते.

वसुंधरा भोपळे | February 1, 2017 5:01 AM


विद्यार्थी मित्रांनो, राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये जर हमखास यश मिळवायचे असेल तर सामान्य अध्ययन पेपर दोन अर्थात CSAT मध्ये प्रभुत्व मिळविल्याशिवाय गत्यंतर नाही. वेळेचे बंधन काढून टाकल्यास बारावी पास असणारी कोणतीही व्यक्ती हा पेपर अगदी सहजपणे सोडवू शकते. परंतु राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये खरी कसोटी असते ती दोन तासांत छप्पन्न पानी पेपर सोडविण्याची!
यामध्ये साधारणपणे दहा ते बारा उतारे आणि त्यावरील पन्नास प्रश्न, गणित, बुद्धिमत्ता आणि तर्क अनुमान संबंधित पंचवीस प्रश्न, तसेच विद्यार्थ्यांच्या निर्णय क्षमतेची कसोटी पाहणाऱ्या पेचप्रसंगांवरील पाच प्रश्न यांचा समावेश होतो. त्यामुळे CSAT चा चक्रव्यूह भेदायचा असेल तर अचूकता आणि समयनियोजनाचा कस लावावा लागतो. या लेखामध्ये आपण राज्यसेवा पूर्व परीक्षेतील यशाचा हुकमी एक्का असणाऱ्याचे महत्त्व जाणून घेऊ यात.
*   अंतिम सीमारेखा पातळी आणि CSAT
गेल्या चार वर्षांतील पूर्व परीक्षेच्या निकालावर नजर टाकल्यास एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे परीक्षेचा पॅटर्न बदलल्यापासून अंतिम सीमारेखा पातळी (UT-OFF Line)चा आलेख खाली जाऊन आता पुन्हा वर येत आहे. २०१३ ते २०१६ पर्यंतच्या राज्यसेवा पूर्व परीक्षेतील अंतिम सीमारेखा पातळी अनुक्रमे १७७, १३८, १२५, १५३ अशी आहे. या परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांचा आढावा घेतला असता पेपर एकमध्ये सर्वसाधारणपणे ६० ते ८५पर्यंत गुण मिळाले आहेत व पेपर दोनमध्ये सर्वसाधारणपणे ७० ते १२० पर्यंत गुण मिळाले आहेत. त्यामुळे अधिक गुण मिळवून देणारा विषय म्हणून CSAT चे महत्त्व अधोरेखित होते.
*   अभ्यासाचे नियोजन
या पेपरमध्ये अधिकाधिक गुण प्राप्त करण्यासाठी जास्तीत जास्त सराव करून समयनियोजनाचे तंत्र आत्मसात करावे लागते. यासाठी सर्वप्रथम निर्धारित वेळेत आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिका सोडवून तयारीच्या आजच्या टप्प्यावर आपण कोठे आहोत हे जाणून घ्यावे. आयोगाची प्रश्नपत्रिका सोडविल्यानंतर आपल्याला मिळालेल्या गुणांचे घटक निहाय विश्लेषण करावे. त्यापकी कोणत्या घटकावर आपले प्रभुत्व आहे,  कोणता घटक अजून तयारी केल्यास जमू शकतो, कोणता घटक खूपच
अवघड वाटतो याबद्दल सविस्तर नोंदी करून ठेवाव्यात आणि आपल्या या विश्लेषणातून आपल्या पुढील दोन महिन्यांतील अभ्यासाची रणनीती ठरवावी. जितका पेपर सोडविण्याचा सराव जास्त असेल तितका सक्सेस रेट जास्त असतो, परंतु जेवढय़ा प्रश्नपत्रिका सोडवाल त्या प्रत्येक प्रश्नपत्रिकेचे काटेकोर विश्लेषण करून आपण कुठे आहोत आणि अजून आपली मजल कुठेपर्यंत नेता येईल याचा विचार होणे ही तितकेच महत्त्वाचे आहे.
प्रश्नपत्रिका सोडविण्याचे तंत्र
या पेपरमध्ये जर १०० ते १२५ पर्यंत गुण प्राप्त करायचे असतील तर साधारणपणे ४० ते ५० प्रश्न बरोबर येणे गरजेचे असते. आयोगाचा पेपर साधारणपणे ५६ पानांचा असतो आणि तो तुम्हाला १२० मिनिटांत वाचून सोडवायचा असतो. यावरूनच आपल्याला वापराव्या लागणाऱ्या समयनियोजन कौशल्याचे महत्त्व समजू शकते. मुळात विद्यार्थी जर पहिल्यापासून सलग पेपर सोडवत गेले तर ८०व्या प्रश्नापर्यंत पोहोचूच शकत नाहीत, काही प्रश्न हमखास सोडवायचे राहून जातात. या ठिकाणी जर विद्यार्थ्यांनी पेपर सोडविण्याचा अगोदरच सराव केला असेल तर ते आपल्याला कठीण वाटणाऱ्या घटकावरील प्रश्न किंवा हमखास वेळ खाणाऱ्या प्रश्नांना बगल देऊन कमी वेळात सुटणारे प्रश्न सोडवू शकतात; जेणेकरून सुटू शकणारे प्रश्न वेळेअभावी सोडवायचे राहात नाहीत. मुळात ८०प्रश्नांपकी ७०प्रश्न जरी सोडवता आले तरी आपल्याला पंधरा प्रश्न चुकायला अनुमती असते. या पंधरा चुकलेल्या प्रश्नांसाठी पाच प्रश्नांचे गुण वजा झाले तरी आपल्याला ५० प्रश्नांचे गुण हमखास मिळू शकतात.
म्हणूनच विद्यार्थी मित्रहो, हा फक्त बुद्धिमत्तेचा कस पाहाणारा विषय नाही तर सर्व अभ्यासतंत्रांचा कस पहाणारा विषय आहे. त्यामुळे स्वत:ची अभ्यासतंत्रे विकसित करण्यासाठी आयोगाच्या प्रश्नपत्रिका सोडवून आपापले कच्चे दुवे हेरून घ्या, त्यांचा सराव करा आणि सराव चाचण्यांमधून आपली तयारी पडताळून पाहा. पुढील भागात आपण घटकनिहाय अभ्यासाच्या नियोजन आणि तंत्रांबद्दल माहिती घेऊ यात.
वसुंधरा भोपळे
First Published on February 1, 2017 5:01 am
Web Title: mpsc success mantra 6
0
SHARES
Share to Google+Google+

No comments:

Post a Comment