Saturday, June 29, 2019

यूपीएससीची तयारी : आधुनिक भारत ०१४ मध्ये १८५८च्या राणीचा जाहीरनाम्याचा उद्देश काय होता, असा प्रश्न विचारण्यात आलेला होता.

यूपीएससीची तयारी : आधुनिक भारत

०१४ मध्ये १८५८च्या राणीचा जाहीरनाम्याचा उद्देश काय होता, असा प्रश्न विचारण्यात आलेला होता.

(संग्रहित छायाचित्र)

श्रीकांत जाधव
आजच्या लेखात आपण १८व्या शतकाची सुरुवात ते १८५७ पर्यंतचा कालखंड याविषयाची यूपीएससी पूर्वपरीक्षेसाठी तयारी कशी करावी याची चर्चा करणार आहोत. या विषयावर २०११ ते २०१८ दरम्यान, एकूण ८ प्रश्न विचारण्यात आले आहेत. पूर्वपरीक्षेमध्ये १८व्या शतकाची सुरुवात ते १८५७पर्यंतचा कालखंड यावर साधारणपणे कमी प्रश्न विचारले जातात. प्रश्नांचा कल हा संकीर्ण माहितीच्या अनुषंगाने अधिक असतो.
या घटकाचे स्वरूप व अभ्यासाचे नियोजन
या कालखंडाअंतर्गत आपणाला युरोपियनांचे आगमन आणि ब्रिटिशसत्तेची भारतात स्थापना, ब्रिटिशसत्तेचा भारतावरील परिणाम, ब्रिटिशांची प्रशासकीय रचना आणि धोरणे, ब्रिटिशसत्तेच्या विरोधातील बंड आणि उठाव, १९व्या शतकातील सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळी, शिक्षण आणि वृतपत्रे व ब्रिटिशकालीन संविधानात्मक विकास इत्यादी महत्त्वपूर्ण घडामोडींची माहिती अभ्यासावी लागणार आहे. या कालखंडाची तीन महत्त्वाची वैशिष्टय़े आहेत. यातील पहिले वैशिष्टय़ म्हणजे १८व्या शतकाच्या सुरुवातीपासून मुघल सत्तेच्या ऱ्हासाला सुरुवात झाली होती. दुसरे वैशिष्टय़ म्हणजे भारताच्या विविध भागांत प्रादेशिक देशी सत्ता उदयाला आल्या होत्या. (या सत्तांचे वर्गीकरण साधारणत: तीन प्रकारात केले जाते – मुघल साम्राज्यात कार्यरत असणाऱ्या प्रांतीय सुभेदारांनी स्थापन केलेल्या सत्ता उदा. बंगाल, अवध, हैदराबाद; मुघल साम्राज्याच्या विरोधात उठाव करून स्थापन झालेल्या सत्ता उदा. मराठे, शीख, जाठ व अफगाण आणि स्वतंत्ररीत्या स्थापन झालेल्या सत्ता उदा. म्हैसूर, राजपूत आणि केरळ; आणि तिसरे वैशिष्टय़ म्हणजे भारतात व्यापार करण्यासाठी आलेल्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतातील विविध प्रांतात अस्तित्वात असणाऱ्या प्रादेशिक सत्तांमध्ये तसेच एकमेकांमध्ये असणाऱ्या संघर्षांचा फायदा घेऊन स्वत:ला एक राजकीय प्रतिस्पर्धेच्या भूमिकेत स्थापन केले होते. तसेच सर्व प्रादेशिक देशी सत्तांचा निर्णायक पराभव करून ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने आपले अधिराज्य त्यांना मान्य करण्यास भाग पाडले व सबंध भारतभर आपला राजकीय अंमल प्रस्थापित केला.
१७५७ च्या प्लासीच्या लढाईपासून आपणाला ब्रिटिश गव्हर्नर आणि गव्हर्नर जनरल यांच्याविषयीची माहिती, त्यांनी केलेली युद्धे, त्यांच्याद्वारे राबविण्यात आलेली सामाजिक आणि आर्थिक तसेच प्रशासकीय धोरणे आणि या धोरणांचा भारतीयांवर झालेला परिणाम, याला भारतीयांनी दिलेला प्रतिसाद ज्यात ब्रिटिशसत्तेच्या विरोधातील बंड आणि उठाव, प्रबोधनपर्वाला झालेली सुरुवात आणि परिणामस्वरूप सुरू झालेल्या सामाजिक आणि धार्मिक चळवळी व या चळवळींचा भारतीयांवर झालेला परिणाम तसेच शिक्षण आणि वर्तमानपत्रे यांची जनजागृती करणामध्ये असलेली निर्णायक भूमिका इत्यादी घडामोडींची माहिती घ्यावी लागेल. तसेच १७७२च्या रेग्युलेटिंग कायद्यापासून ब्रिटिश संसदेने पारित केलेले कायदे व त्यातील तरतुदी, ज्याला आपण ब्रिटिशकालीन संविधानाचा विकास म्हणून पाहतो इत्यादीशी संबंधित मूलभूत माहिती सर्वप्रथम अभ्यासावी लागणार आहे. त्यामुळे या विषयाचे व्यापक आणि परीक्षाभिमुख आकलन करणे अधिक सुलभ होऊ शकेल.
मागील परीक्षेत विचारण्यात आलेले प्रश्न व स्वरूप
* २०१२मध्ये रयतवारी पद्धती संदर्भात प्रश्न विचारण्यात आलेला होता.
ज्यामध्ये
१)शेतकऱ्यामार्फत थेट शेतसारा सरकारला दिला जात असे. २)रयतेला सरकारने पट्टा दिलेला होता. ३)महसूल लावण्याअगोदर जमिनीचे सर्वेक्षण आणि मोजमाप केले जात असे. अशा प्रकारची तीन विधाने दिलेली होती आणि यातील योग्य विधाने निवडायची होती.
* तसेच २०१२ मध्ये ब्राह्मो समाजावर आणि २०१६ मध्ये सत्यशोधक समाजावर प्रश्न विचारण्यात आलेला होता.
* २०१४ मध्ये १८५८च्या राणीचा जाहीरनाम्याचा उद्देश काय होता, असा प्रश्न विचारण्यात आलेला होता.
* २०१७ मध्ये ब्रिटिश सत्तेच्या काळात भारतात रयतवारी पद्धतीची सुरुवात करण्याशी खालीलपैकी कोण संबंधित होते, हा प्रश्न विचारला होता. त्यासाठी लॉर्ड कॉर्नवॉलिस, अलेक्झांडर रीड, थॉमस मुनरो हे पर्याय देण्यात आलेले होते.
* २०१८मध्ये खालीलपैकी कोणामुळे भारतात इंग्रजी शिक्षणाची सुरुवात झाली, हा प्रश्न विचारण्यात आला होता. यासाठी १८१३ चा सनदी कायदा, १८२३ची जनरल कमिटी ऑफ पब्लिक इन्स्ट्रक्शन, प्राच्य-अंग्लो वादविवाद. – हे पर्याय देण्यात आलेले होते.
तसेच याव्यतिरिक्त संस्कृत कॉलेज, कलकत्ता मदरसा, फोर्ट विलियम अर्थर कॉलेज याची स्थापना कोणी केली, यावर प्रश्न विचारण्यात आलेला होता.
वरील प्रश्नांवरून लक्षात येते की, या घटकाचा अभ्यास करताना संकीर्ण माहितीसह विश्लेषणात्मक पद्धतीचाही आधार घ्यावा लागतो. या घटकावर कमी प्रश्न विचारण्यात आलेले असले तरी हा घटक मुख्य परीक्षेलाही आहे. त्यामुळे या घटकाचे सखोल आकलन असणे अपरिहार्य आहे. या विषयावर बाजारामध्ये अनेक संदर्भ ग्रंथ उपलब्ध आहेत पण सर्वप्रथम या विषयाची मूलभूत माहिती अभ्यासण्यासाठी बिपिन चंद्र लिखित आधुनिक भारतावरील जुने एनसीईआरटीचे पुस्तक अभ्यासावे. त्यानंतर या विषयाचा अधिक सखोल अभ्यास करण्यासाठी बी. एल. ग्रोवर आणि एस. ग्रोवर लिखित ‘आधुनिक भारताचा इतिहास’ हे पुस्तक वाचावे.
First Published on March 26, 2019 2:50 am
Web Title: upsc exam 2019 upsc preparation tips ias 2019 exam

विद्यापीठ विश्व : हिरवाईने नटलेले विद्यापीठ प्रिन्स्टन विद्यापीठ, अमेरिका

विद्यापीठ विश्व : हिरवाईने नटलेले विद्यापीठ

प्रिन्स्टन विद्यापीठ, अमेरिका

प्रिन्स्टन विद्यापीठ, अमेरिका

प्रिन्स्टन विद्यापीठ, अमेरिका
प्रथमेश आडविलकर itsprathamesh@gmail.com
विद्यापीठाची ओळख – प्रिन्स्टन खुर्च्या किंवा प्रिन्स्टन या नावाने सर्वत्र परिचित असलेले विद्यापीठ अमेरिकेतील न्यू जर्सीमधील प्रमुख विद्यापीठ आहे. प्रिन्स्टनमध्ये स्थित असलेले हे जागतिक दर्जाचे विद्यापीठ आयव्ही लीग विद्यापीठांपैकी एक आहे.
प्रिन्स्टन विद्यापीठ क्यूएस वर्ल्ड खुर्च्या रँकिंगनुसार जगातले तेराव्या क्रमांकाचे विद्यापीठ आहे. या विद्यापीठाची स्थापना अमेरिकन क्रांतीच्याही अगोदर म्हणजे १७४६ साली एलिझाबेथमध्ये कॉलेज ऑफ न्यू जर्सी या नावाने झालेली होती. प्रिन्स्टन विद्यापीठ हे अमेरिकेतील चौथ्या क्रमांकाचे जुने विद्यापीठ आहे. प्रिन्स्टन विद्यापीठ हे खासगी संशोधन विद्यापीठ आहे.
प्रिन्स्टन विद्यापीठ एकूण पाचशे एकरच्या कॅम्पसमध्ये पसरलेले आहे. प्रिन्स्टनचा मुख्य कॅम्पस हिरव्यागार निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. कॅम्पसमध्ये सर्व मिळून १८० इमारती असून लुईस लायब्ररीसारख्या अनेक इमारती त्यांच्या स्थापत्यशास्त्रीय वैविध्यासाठीदेखील प्रसिद्ध आहेत. आज प्रिन्स्टनमध्ये एक हजारपेक्षाही अधिक प्राध्यापक-संशोधक आपले अध्यापन-संशोधनाचे कार्य करत आहेत. तर जवळपास आठ हजारांहून अधिक पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी येथे त्यांचे शिक्षण पूर्ण करत आहेत.
अभ्यासक्रम – प्रिन्स्टन विद्यापीठातील पूर्णवेळ पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचे असून पदव्युत्तर अभ्यासक्रम वेगवेगळ्या कालावधींचे आहेत. विद्यापीठामध्ये साहित्य, समाजशास्त्र, गणित, अभियांत्रिकी, कायदा, अर्थशास्त्र, तत्त्वज्ञान, उद्योजकता, साहित्यिक टीका कला आणि विज्ञान या प्रमुख विभागांसहित एकूण ४२ विभाग (स्कूल्स) कार्यरत आहेत.
पारंपरिक विषयांशिवाय वेगळ्या शैक्षणिक विषयांना विद्यार्थ्यांकडून प्राधान्य दिले जाते. विद्यापीठातील या सर्व स्कूल्सच्या अंतर्गत सर्व पदवी, पदव्युत्तर व संशोधन विभाग चालतात. प्रिन्स्टनमधील या स्कूल्सच्या माध्यमातून, विद्यापीठ सर्व मेजर्स आणि मायनर्स म्हणजेच पदवी अभ्यासक्रम, पदव्युत्तर अभ्यासक्रम आणि व्यावसायिक अभ्यासक्रम चालवते. या सर्व विभागांमधून विद्यार्थ्यांना पदवी, पदव्युत्तर आणि पीएचडी वा संशोधन पातळीवरील शेकडो अभ्यासक्रमांचे सर्टििफकेट, ऑनलाइन व ऑफलाइन पर्याय विद्यापीठाने उपलब्ध करून दिले आहेत. विद्यापीठामार्फत चालणाऱ्या या सर्व अभ्यासक्रमांना त्या त्या  क्षेत्रातील विविध संस्थांची मान्यता मिळालेली आहे. विद्यापीठातील ऑफलाइन अभ्यासक्रम हे फॉल आणि स्प्रिंग या दोन सत्रांमध्ये चालतात तर ऑनलाइन अभ्यासक्रम वर्षभर उपलब्ध असतात. विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमांना प्रवेश मिळविण्यासाठी त्या त्या पदवी वा पदव्युत्तर स्तरासाठी आवश्यक असलेली प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे आहे.
सुविधा – प्रिन्स्टन विद्यापीठातील शिक्षण जरी अतिशय महाग असले तरी पात्रतेच्या निकषांनुसार विद्यापीठाने आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, शैक्षणिक शुल्क, शैक्षणिक कर्ज, निवास व भोजन आदी सुविधा दिलेल्या आहेत. प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी बहुतांश विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून शिष्यवृत्ती दिली जाते. तसेच, आवश्यकतेनुसार विद्यापीठाच्या आवारात विवाहित व अविवाहित विद्यार्थ्यांना निवासाची सुविधा बहाल करण्यात येते. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर यासाठी असलेली अर्जप्रक्रिया व इतर बाबींबद्दल माहिती देण्यात आलेली आहे. प्रिन्स्टन एक महत्त्वाची आयव्ही लीग संस्था असल्याने पदवीच्या चार वर्षांच्या कालावधीदरम्यान सर्व पदवीधर विद्यार्थ्यांना त्यांच्या निवासाच्या सोयीची हमी विद्यापीठाकडून दिली जाते. विद्यापीठाशी संलग्न काही निवासी महाविद्यालये असून ती विद्यार्थ्यांना शैक्षणिक वातावरणाबरोबरच उत्कृष्ट सामाजिक व सांस्कृतिक वातावरण प्रदान करतात.
वैशिष्टय़ – प्रिन्स्टन विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक अभ्यासाच्या पलीकडे हितसंबंध ठेवण्यासाठी संधी दिली जाते. यामध्ये मग एखाद्या साहित्यिक प्रकाशनासाठी लेखन करणे, मधमाश्या पाळण्याचे शास्त्र शिकणे, किंवा कॅपेला गटांमध्ये गायन करणे आदी बाबींचा समावेश होतो. प्रिन्स्टनच्या माजी विद्यार्थ्यांमध्ये अनेक दिग्गजांचा समावेश आहे. यामध्ये, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष व्रुडो विल्सन व जेम्स मॅडिसन, तसेच अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांचा समावेश आहे. अमेरिकेच्या माजी ‘फर्स्ट लेडी’ मिशेल ओबामा यादेखील याच विद्यापीठाच्या विद्यार्थी आहेत. ऑक्टोबर २०१८पर्यंतच्या सांख्यिकीनुसार, आतापर्यंतचे एकूण ६५ नोबेल पारितोषिक विजेते आणि तेरा टय़ुरिंग पुरस्कार विजेते या विद्यापीठाचे विद्यार्थी वा प्राध्यापक होते/आहेत.
संकेतस्थळ –  https://www.princeton.edu/
First Published on March 26, 2019 2:46 am
Web Title: university world princeton university usa

Friday, June 28, 2019

यूपीएससी प्रश्नवेध : स्वातंत्र्योत्तर भारत या सर्व प्रश्नांच्या चर्चेमुळे या विषयावर विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांचे स्वरूप लक्षात येते

यूपीएससी प्रश्नवेध : स्वातंत्र्योत्तर भारत

  या सर्व प्रश्नांच्या चर्चेमुळे या विषयावर विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांचे स्वरूप लक्षात येते

(संग्रहित छायाचित्र)

श्रीकांत जाधव
प्रस्तुत लेखामध्ये आपण स्वातंत्र्योत्तर भारत या घटकावर २०१३ ते २०१८ या दरम्यान यूपीएससी मुख्य परीक्षेत विचारण्यात आलेल्या काही प्रश्नांचा थोडक्यात आढावा घेणार आहोत.
* Critically discuss the objectives of Bhoodan and Gramdan movements initiated by Acharya Vinoba Bhave and their success.
विनोबा भावे यांच्या भूदान व ग्रामदान आंदोलनाच्या उद्देशाची चिकित्सा करा आणि त्याच्या यशाची चर्चा करा. (२०१३, १० गुण आणि २०० शब्दमर्यादा)
* Write a critical note on the evolution and significance of the slogan “Jai Jawan Jai Kisan”.
‘जय जवान जय किसान’ नाऱ्याचा (घोषवाक्य) उदय आणि महत्त्व यावर चिकित्सक पद्धतीने लेख लिहा. (२०१३, १० गुण आणि २० शब्दमर्यादा).
* Analyse the circumstances that led to Tashkent Agreement in 1966. Discuss the highlights of the agreement.
कोणत्या परिस्थितीमुळे १९६६चा ताश्कंद करार करण्यात करण्यात आला, त्याचे विश्लेषण करा. करारातील प्रमुख वैशिष्टय़ांची चर्चा करा. (२०१३, १० गुण आणि २०० शब्दमर्यादा)
* Critically examine the compulsions which prompted India to play decisive roles in the emergence of Bangladesh.
कोणत्या अटळ परिस्थितीमुळे भारताला तत्परतेने बांगलादेशाच्या उदयामध्ये निर्णायक भूमिका बजावावी लागली याचे चिकित्सक पद्धतीने परीक्षण करा. (२०१३, १० गुण आणि २०० शब्दमर्यादा)
* The New Economic Policy – 1921 of Lenin had influenced the policies adopted by India soon after independence. Evaluate.
भारताने स्वातंत्र्यप्राप्तीनंतर लगोलग आखलेल्या धोरणांना लेनिनच्या १९२१ सालच्या नवीन आíथक धोरणाने प्रभावित केलेले होते. मूल्यांकन करा. (२०१४, १० गुण आणि १५० शब्दमर्यादा)
* Has the formation of linguistic states strengthened the cause of Indian unity?
भाषावार राज्यनिर्मितीमुळे भारतीय एकतेच्या उद्देशाला मजबुती मिळालेली आहे का? (२०१६, १२.५ गुण आणि २०० शब्दमर्यादा).
* What are the two major legal initiatives by the State since Independence addressing discrimination against Scheduled Tribes(STs)?
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर अनुसूचित जमाती (STs) विरोधात होणारे भेदभाव दूर करण्यासाठी कोणते दोन मुख्य कायदेशीर पुढाकार राज्याद्वारे घेण्यात आले? (२०१७, १० गुण आणि १५० शब्दमर्यादा)
(२०१८मध्ये या घटकावर थेट प्रश्न विचारण्यात आलेला नाही).
प्रश्नाचे योग्य आकलन करण्यासाठी लागणारा दृष्टिकोन
*     उपरोक्त प्रश्नांचे योग्य आकलन केल्यास आपणाला असे दिसून येते की, यातील जवळपास सर्व प्रश्न हे भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या पुढील दोन दशकांतील महत्त्वाच्या घडामोडींशी संबंधित आहेत. म्हणून भारताच्या स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या दोन दशकांतील घडामोडींची योग्य माहिती असणे गरजेचे आहे.
*     वरील प्रश्नामध्ये भूदान व ग्रामदान चळवळीवरील प्रश्न तसेच ‘जय जवान जय किसान’ नाऱ्याशी संबंधित प्रश्न आहेत. त्याचे विश्लेषणात्मक पद्धतीने आकलन करायला हवे. तसेच तत्कालीन सामाजिक आणि आíथक विकासामध्ये त्याची नेमकी काय उपयुक्तता होती आणि यामुळे काय साध्य झाले अशा महत्त्वाच्या पलूंचा विचार करून चिकित्सक पद्धतीने उत्तराची मांडणी करणे अपेक्षित आहे.
*     भारताने स्वातंत्र्यप्राप्तीनंतर नियोजन पद्धतीने जो आíथक विकास घडवून आणण्यासाठी धोरण आखले होते त्यावर लेनिनच्या १९२१ सालच्या नवीन आíथक धोरणांचा प्रभाव कसा होता हे उदाहरणासह चर्चा करून याचे मूल्यांकन उत्तरामध्ये करणे अपेक्षित आहे.
*     उपरोक्त प्रश्नामधील ‘भाषावार राज्यनिर्मितीमुळे भारतीय एकतेच्या उद्देशाला मजबुती मिळालेली आहे का?’ हा प्रश्न योग्य पद्धतीने समजून घ्यायला हवा. त्यासाठी भाषावार प्रांतरचना का करण्यात आली होती, तसेच याची नेमकी कोणती कारणे होती व नेमका इतिहास काय आहे आणि यासाठी सरकारमार्फत कोणत्या उपाययोजना आखण्यात आलेल्या होत्या हे समजून घेणे महत्त्वाचे राहील. तसेच १९६२ मध्ये स्थापन करण्यात आलेली राष्ट्रीय एकता परिषद व तिची उद्दिष्टे यासारख्या पलूंचा एकत्रित विचार करून उदाहरणासह उत्तर लिहिणे अपेक्षित आहे. शिवाय भाषावार राज्यनिर्मितीमुळे भारतीय एकतेच्या उद्देशाला मजबुती मिळालेली आहे का, याचे संतुलित पद्धतीने विश्लेषण उत्तरामध्ये असणे अपेक्षित आहे.
*     वरील प्रश्नामधील दोन प्रश्न हे भारतासोबत पाकिस्तानने केलेल्या दोन युद्धांच्या पाश्र्वभूमीला ग्राह्य़ धरून विचारण्यात आलेले आहेत. या दोन्ही प्रश्नांचे योग्य आकलन होण्यासाठी आपणाला भारताची फाळणी, फाळणीचे परिणाम, संस्थानांचे विलीनीकरण याची योग्य माहिती असणे गरजेचे आहे. त्यानंतर घडलेल्या घडामोडींचीही माहिती असणे गरजेचे आहे. तत्कालिक कारणे नेमकी कोणती होती इत्यादीची सखोल माहिती असणे गरजेचे आहे. त्याशिवाय या प्रश्नाची मुद्देसूद उत्तरे लिहिता येत नाहीत. यासोबतच ताश्कंद कराराची वैशिष्टय़े नेमकी काय होती याची संकीर्ण माहिती असणेही गरजेचे आहे. थोडक्यात हे प्रश्न विषयाची सखोल माहिती आणि संकीर्ण माहिती या दोन्ही बाबींचा एकत्रित विचार करून विचारण्यात आलेले आहेत.
*     या सर्व प्रश्नांच्या चर्चेमुळे या विषयावर विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांचे स्वरूप लक्षात येते. आणि त्याची उत्तरे कशी लिहावी याची एक योग्य दिशा मिळते. याचबरोबर या विषयाची तयारी कशी करावी याची एक स्पष्ट आखणी करता येते.
First Published on March 22, 2019 11:58 pm
Web Title: article on post independence india

यूपीएससीची तयारी : भारतीय कला आणि संस्कृती भारतात अस्तित्वात असणाऱ्या विविध कला आणि संस्कृतींचा उगम कसा झालेला आहे याची ऐतिहासिक पाश्र्वभूमी आपल्याला लक्षात घेता येते.

यूपीएससीची तयारी : भारतीय कला आणि संस्कृती

भारतात अस्तित्वात असणाऱ्या विविध कला आणि संस्कृतींचा उगम कसा झालेला आहे याची ऐतिहासिक पाश्र्वभूमी आपल्याला लक्षात घेता येते.

(संग्रहित छायाचित्र)

श्रीकांत जाधव
आजच्या लेखामध्ये आपण भारतीय कला आणि संस्कृती या घटकाची पूर्वपरीक्षेच्या दृष्टीने तयारी कशी करावी याची चर्चा करणार आहोत. या घटकावर २०११ ते २०१८ मध्ये एकूण ४२ प्रश्न विचारण्यात आले आहेत. परीक्षेचा विचार करता हा घटक अधिकच महत्त्वपूर्ण बनत आहे; कारण या विषयाची तयारी फक्त पूर्वपरीक्षेसाठी मर्यादित नसून मुख्य परीक्षेसाठीसुद्धा करावी लागते.
*     घटकाचे स्वरूप व अभ्यासाचे नियोजन
या घटकाची तयारी करताना प्राचीन भारतातील कला आणि संस्कृती यापासून सुरुवात करावी लागते. ज्यामुळे भारतात अस्तित्वात असणाऱ्या विविध कला आणि संस्कृतींचा उगम कसा झालेला आहे याची ऐतिहासिक पाश्र्वभूमी आपल्याला लक्षात घेता येते. स्थापत्यकला व शिल्पकला, भारतीय संगीत, नाटय़ व नृत्य, चित्रकला, साहित्य आणि भारतीय तत्त्वज्ञान या घटकाविषयी अधिक सखोल आणि सर्वागीण माहिती अभ्यासणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी प्राचीन भारतातील सिंधू संस्कृती, बौद्धयुग अथवा महाजनपदाचा कालखंड, मौर्य कालखंड, मौर्योत्तर कालखंड, गुप्त कालखंड आणि गुप्तोत्तर कालखंड अशा प्रकारे कालखंडनिहाय वर्गीकरण करून घ्यावे. संबंधित कालखंडातील स्थापत्यकला, शिल्पकला, चित्रकला, साहित्य आणि तत्त्वज्ञान याच्याशी संबंधित विविध संकल्पना, कलेचे प्रकार आणि वैशिष्टय़े तसेच याच्याशी निगडित ऐतिहासिक स्थळे तसेच ही स्थळे कोणत्या कालखंडात निर्माण करण्यात आलेली होती, ही स्थळे कोणत्या धर्माची होती आणि कोणत्या व्यक्तीने अथवा राजाने ती निर्माण केली होती; इत्यादी पलूंविषयी सर्वप्रथम अभ्यास करावा लागतो. यामुळे या विषयाची परीक्षेच्या दृष्टीने योग्य तयारी आपल्याला करता येईल.
मध्ययुगीन भारतातील कला व संस्कृतीचा अभ्यास करताना उपरोक्त पद्धतीनेच करावा कारण प्राचीन भारतातील विविध कलांचे परिपक्व स्वरूप आपणाला या कालखंडात पाहावयास मिळते. उदाहरणार्थ स्थापत्यकला, चित्रकला आणि साहित्य याचबरोबर आपणाला या कालखंडात बौद्ध, जैन आणि हिंदू धर्माव्यतिरिक्त इस्लाम धर्माशी संबंधित इंडो-इस्लामिक स्थापत्यकलेचा उदय झालेला पाहावयास मिळतो. तसेच चित्रकलेमध्ये भित्ती चित्रकला सोबतच लघू चित्रकलेचा उदय झालेला दिसून येतो. याच्या जोडीला आपणाला धर्मनिरपेक्ष साहित्य, स्थापत्यकला आणि प्राचीन व मध्ययुगीन कालखंडातील विज्ञान आणि तंत्रज्ञान याविषयी माहिती असणे गरजेचे आहे.
*     गतवर्षीय परीक्षेत विचारण्यात आलेले प्रश्न व त्यांचे स्वरूप
*   २०११मध्ये प्रश्न होता..
जैन तत्त्वज्ञानानुसार जगाची निर्मिती व संचालन कशामार्फत होते?
पर्याय होते –
१)वैश्विक कायदा, २)वैश्विक सत्य, ३)वैश्विक श्रद्धा आणि ४)वैश्विक आत्मा
*   २०१२ च्या परीक्षेत प्रश्न होता..
भूमिस्पर्श मुद्रा या हस्तमुद्रेतील भगवान बुद्धाची प्रतिमा काय दर्शविते?
*   २०१३ मध्ये प्रश्न होता..
बौद्ध धर्माशी संबंधित शिल्प लेणी, स्तूप आणि इतर विहारे असे संबोधले जाते, या दोन्हीमध्ये काय फरक आहे?
*   २०१४ मध्ये प्रश्न होते..
भारताच्या सांस्कृतिक इतिहासासंदर्भात पंचयतन संज्ञा कशाशी संबंधित आहे?    आणि
भारताच्या संस्कृती आणि परंपरासंदर्भात कालरीपयत्तू (ङं’ं१्रस्र्ं८ं३३४) काय आहे?
*   २०१५ मध्ये दोन प्रश्न होते..
१)कलमकारी चित्रकला काय निर्देशित करते? आणि
२)अलीकडेच खालीलपकी कोणत्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा बहाल करण्यात आलेला आहे? हा प्रश्न विचारण्यात आलेला होता.
*   २०१६ मध्ये बौद्ध धर्मातील बोधिसत्त्व या संकल्पनेशी संबंधित प्रश्न विचारण्यात आलेला होता.
*   २०१७ मध्ये जैन धर्म, चित्रकला, भारतातील विविध जमातीद्वारे साजरे केले जाणारे उत्सव, सण, तसेच सूर्यमंदिरे यासाठी प्रसिद्ध असणारी ठिकाणे यावर प्रश्न विचारण्यात आलेले होते.
*   २०१८ मध्ये मुघल स्थापत्यकला, ईशान्य भारतातील नृत्य, भारतीय हस्तकला, राजस्थानी चित्रकला, त्यागराज (व्यक्तिविशेष)  इत्यादींवर प्रश्न विचारण्यात आलेले होते.
या व्यतिरिक्त भारतीय षड्द्दर्शने, त्रिभंगा आणि सत्तारीया नृत्य, मूर्तिशिल्प, मंदिर शैली, अभिजात भाषा, यावरदेखील प्रश्न विचारण्यात आलेले होते.
या विषयावर आलेल्या प्रश्नाचे योग्य आकलन केल्यास असे दिसून येते की प्रश्नांचे स्वरूप हे वस्तुनिष्ठ आणि विश्लेषणात्मक या दोन्ही प्रकारांत मोडणारे आहे. त्यामुळे या विषयाचा अभ्यास या घटकाच्या मूलभूत माहितीसह विश्लेषणात्मक बाजू विचारात घेऊन करावा लागतो. बहुतांश प्रश्न हे संकल्पनांवर आधारित विचारण्यात आलेले असल्यामुळे या घटकाशी संबंधित संकल्पना, त्यांचा अर्थ, उगम व वैशिष्टय़े इत्यादींची माहिती असणे गरजेचे आहे.
 *     संदर्भ साहित्य
या घटकाची मूलभूत माहिती अभ्यासण्यासाठी सर्वप्रथम एनसीईआरटीच्या शालेय पुस्तकांचा आधार घ्यावा लागतो. इयत्ता ११वीचे An Introduction to Indian Art Part -I हे पुस्तक सर्वप्रथम अभ्यासणे गरजेचे आहे.
तसेच १२वीचे Themes in Indian History part- I  आणि II  व प्राचीन आणि मध्ययुगीन भारतावरील जुन्या एनसीईआरटी पुस्तकातील भारतीय कला आणि संस्कृती संबंधित कालखंडनिहाय अभ्यास करावा.
विद्यार्थ्यांनी आपली आपण टिप्पणे काढणे गरजेचे आहे. त्यामुळे कमीतकमी वेळात या विषयाची तयारी करता येऊ शकेल.
First Published on March 22, 2019 12:03 am
Web Title: indian art and culture

शब्दबोध : बुंथ रात्र काळी घागर काळी ही सोळाव्या शतकातील विष्णुदास नामा नावाच्या संत कवीची रचना

शब्दबोध : बुंथ

रात्र काळी घागर काळी ही सोळाव्या शतकातील विष्णुदास नामा नावाच्या संत कवीची रचना

(संग्रहित छायाचित्र)

डॉ. उमेश करंबेळकर
गोविंद पोवळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गायलेलं ‘रात्र काळी घागर काळी’ हे गाणे अनेकदा ऐकलेले असते. ‘रात्र काळी घागर काळी’ या नावाची चिं.त्र्यं.खानोलकरांची कादंबरीही बरीच गाजली होती. तर या गाण्यामध्ये भेटतो, ‘बुंथ’ हा शब्द.
रात्र काळी घागर काळी ही सोळाव्या शतकातील विष्णुदास नामा नावाच्या संत कवीची रचना. रात्र काळी, घागर काळी, यमुनेचे जळ काळे, बुंथ काळी, बिलवर काळी, गळ्यातील मोत्याची एकावळी काळी, काचोळी काळी हे सर्व परिधान केलेली नायिका नखशिखांत काळी आणि तिचा एकलेपणा घालवणारी कृष्णमूर्तीही काळी.
काळा रंग हा आपली दृक्-संवेदना शून्यावर आणतो. जणू काही कृष्णविवर. या गाण्यातील कृष्णभक्तीचे आकर्षण कृष्णविवरासारखे आहे. त्यात शिरले की बाहेर पडणे अशक्य अगदी प्रकाशदेखील. अशी ही सुंदर रचना. त्यातील बुंथ हा शब्द नवखा.
त्याचा अर्थ शब्दकोशात शोधला. बुंथ म्हणजे डोक्यावरून सर्व शरीरभर आच्छादनासाठी घेतलेले वस्त्र, ओढणी, खोळ. तसेच बुरखा किंवा घुंगट. तसेच रूप किंवा वेश या अर्थानेही बुंथ हा शब्द वापरलेला आढळतो.(होतों दाशरथी तुम्ही वसुमती घ्या वानराच्या बुंथी)
विशेष म्हणजे बुंथ हा शब्द ज्ञानेश्वरीतही आच्छादन या अर्थाने आलेला आहे.
सहाव्या अध्यायातील
जैसी आभाळाची बुंथी
करूनि राहे गभस्ती
मग फिटलिया दीप्ति धरूं नये  २५१
किंवा त्याच अध्यायातील
नातरी कर्दळीचा गाभा
बुंथी सांडोनी उभा
कां होता चमत्कार पिंडजनी   २९५
या ओव्यांत बुंथ हा शब्द ‘आच्छादन’ या अर्थाने वापरला आहे. एकंदरीत विष्णुदास नामा यांच्या अजरामर काव्यामुळे बुंथ शब्द विस्मरणात जाण्यापासून वाचला असे म्हणता येईल.
या ठिकाणी या काव्यरचनेच्या दुसऱ्या एका वैशिष्टय़ाकडे आपले लक्ष वेधायचे आहे. ‘ळ’ हे अक्षर मराठी भाषेचे वैशिष्टय़ म्हणून ओळखले जाते. मराठीतील अनेक शब्द संस्कृतोद्भव असले किंवा संस्कृत ही मराठीप्रमाणे सर्व भारतीय भाषांची जननी म्हणून ओळखली जात असली तरी ‘ळ’ हे अक्षर संस्कृतमध्ये नाही. तसेच हिंदीमध्येही नाही. अशा या वैशिष्टय़पूर्ण ‘ळ’ अक्षराचा मराठी काव्यात फारसा वापर केलेला आढळत नाही. या संदर्भातील गदिमांचा किस्सा अनेकांना  माहीत असतो. तो असा, एकदा पुलंनी गदिमांजवळ अशी तक्रार केली की ‘ळ’  हे अक्षर मराठी काव्यात फारसे आढळत नाही, कारण त्याचा वापर काव्यात करणे अवघड आहे. तेव्हा गदिमांनी तेथल्या तेथे ‘ळ’चा मुक्त वापर केलेले काव्य रचले आणि ते म्हणजे ‘घननिळा लडिवाळा झुलवू नको हिंदोळा.’ गंमत म्हणजे विष्णुदास नाम्याच्या या रचनेतही ‘ळ’ अक्षराचा असाच मुक्त वापर केलेला आहे.
काळी, जळी, गळा मोती, एकावळी, काचोळी, सावळी असे अंती ‘ळ’ अक्षर असलेले शब्द या रचनेत आहेत. गदिमांचाही संत वाङ्मयाचा गाढा अभ्यास होता. त्यांची काव्यशैली सुबोध, सुगम आणि अर्थवाही असण्यामागे या अभ्यासाचाही मोठा वाटा होता.
First Published on March 22, 2019 12:01 am
Web Title: word sense article

एमपीएससी मंत्र : गट ‘क’ सेवांची काठिण्य पातळी फारूक नाईकवाडे पहिली गट ‘क’ सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा सन २०१८मध्ये पार पडली. या वर्षीची पूर्वपरीक्षा २६ जून रोजी आयोजित करण्यात येत आहे. राज्य लोकसेवा आयोगाकडून

एमपीएससी मंत्र : गट ‘क’ सेवांची काठिण्य पातळी

फारूक नाईकवाडे पहिली गट ‘क’ सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा सन २०१८मध्ये पार पडली. या वर्षीची पूर्वपरीक्षा २६ जून रोजी आयोजित करण्यात येत आहे. राज्य लोकसेवा आयोगाकडून

फारूक नाईकवाडे
पहिली गट ‘क’ सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा सन २०१८मध्ये पार पडली. या वर्षीची पूर्वपरीक्षा २६ जून रोजी आयोजित करण्यात येत आहे. राज्य लोकसेवा आयोगाकडून शासनाच्या विविध विभागांमधील पदांवर भरतीसाठी स्पर्धा परीक्षा आयोजित करण्यात येतात. संबंधित पदांच्या कामाचे स्वरूप लक्षात घेऊन त्या पदांसाठी परीक्षा पद्धती, तिचा अभ्यासक्रम आणि काठिण्य पातळी ठरविण्यात येते. त्यामुळे वेगवेगळ्या पदांसाठी परीक्षेचे स्वरूप, अभ्यासक्रम आणि प्रश्नपत्रिकांचा पॅटर्न व दर्जा यांमध्ये फरक असतो.
गट ब अराजपत्रित अधिकारी व गट क कर्मचारी या सेवांच्या पूर्वपरीक्षेचा अभ्यासक्रम सारखाच आहे आणि परीक्षेचे स्वरूपही.
*    अभ्यासक्रम                    
१. चालू घडामोडी – जागतिक तसेच भारतातील
२. नागरिकशास्त्र – भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन (प्रशासन), ग्राम व्यवस्थापन (प्रशासन)
३. आधुनिक भारताचा विशेषत महाराष्ट्राचा इतिहास
४. भूगोल (महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह) – पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश-रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी.
५. अर्थव्यवस्था  –
अ) भारतीय अर्थव्यवस्था – राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्रय व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती इत्यादी
ब) शासकीय अर्थव्यवस्था – अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षण इत्यादी
६. सामान्य विज्ञान – भौतिकशास्त्र (फिजिक्स), रसायनशास्त्र (केमिस्ट्री), प्राणिशास्त्र (झुलॉजी), वनस्पतीशास्त्र (बॉटनी), आरोग्यशास्त्र (हायजीन).
७. बुद्धिमापन चाचणी व अंकगणित
अ) बुद्धिमापन चाचणी उमेदवार किती लवकर आणि अचूक विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न
ब) अंकगणित – बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णाक व टक्केवारी
*    पूर्वपरीक्षेचे स्वरूप
*    गुणांकन
या परीक्षेत मूल्यांकन करताना उत्तरपत्रित नमूद केलेल्या योग्य उत्तरांनाच गुण दिले जातात. प्रत्येक चार चुकीच्या उत्तरामागे एका प्रश्नाचे गुण एकूण गुणांमधून वजा करण्यात येतात. भरायच्या एकूण पदांच्या सुमारे आठ पट उमेदवार मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र होतील अशा रीतीने प्रथम टप्प्यात गुणांची सीमारेषा निश्चित करण्यात येते. या सीमा रेषेच्या वर ज्या विद्यार्थ्यांचे एकूण गुण असतील त्यांना मुख्य परीक्षेसाठी प्रवेश मिळतो.
गट ब अराजपत्रित अधिकारी व गट क कर्मचारी या दुय्यम सेवांच्या परीक्षेमध्ये फरक आहे तो काठिण्य पातळीचा. गट ब अराजपत्रित अधिकारी पदांच्या परीक्षेसाठी आयोगाने विहित केलेला प्रश्नांचा दर्जा आहे पदवीचा तर गट क पदांसाठी बारावीचा. दर्जातील हा फरक व काठिण्य पातळीचे नेमके स्वरूप समजून घेतले की तयारीसाठी एक दृष्टिकोन ठरवता येतो. गट क सेवेच्या सन २०१७ च्या पहिल्या पेपरचे विश्लेषण केल्यास काठिण्य पातळीबाबत पुढील मुद्दे समजून घेता येतील

* प्रश्नातील मुद्दे हे ढोबळ आणि थेट आहेत.
* प्रश्नांमधील विधाने ही तथ्यात्मक माहिती विचारणारी असली तरी ही तथ्ये त्यामध्ये बारकाईने व नेमकेपणाने माहीत असणे आवश्यक असल्याचे दिसते.
* गट क सेवेसाठीच्या प्रश्नामध्ये बारावीच्या स्तराचे ढोबळ मुद्दे विचारलेले आहेत. हे मुद्दे पारंपरिक अभ्यासक्रमाचा भाग आहेत आणि बारावी उत्तीर्ण झालेल्या कोणत्याही उमेदवाराला त्या विषयातील अतिरिक्त प्रावीण्य न मिळवताही या बाबी माहीत असणे सर्वसामान्यपणे अपेक्षित असते.
* चालू घडामोडींवरील प्रश्नसारणी पद्धतीत टिप्पणे मांडून तयारी करता येईल अशा प्रकारचे आहेत. म्हणजेच पूर्णपणे वस्तुनिष्ठ व विश्लेषणाची आवश्यकता नसलेले आहेत.
* इतिहासामध्ये तथ्यात्मक मुद्दे आणि व्यक्तींवर आधारित प्रश्न विशेषत्वाने विचारण्यात येतात.
* नागरीकशास्त्र घटकाचे प्रश्न पूर्णपणे वस्तुनिष्ठ प्रकारचे आहेत. पायाभूत पुस्तकांचा अभ्यास व्यवस्थित केल्यास सहजपणे सोडविता येतात.
* भूगोलामध्ये बहुविधानी प्रश्न जास्त विचारण्यात आले असले तरी ते चूक की बरोबर अशा प्रकारचे असल्याने त्यांचाही समावेश वस्तुनिष्ठ व पारंपरिक प्रकारामध्येच करायला हवा.
* सामान्य विज्ञान व अर्थव्यवस्था या घटक विषयांच्या मूलभूत संकल्पनांवर प्रश्न विचारण्याचे प्रमाण जास्त आहे.
* सामान्य विज्ञानामध्ये भौतिकशास्त्रातील प्राथमिक गणितेही विचारण्यात आली आहेत. ही गणिते बारावी स्तरावरील पाठय़पुस्तकांमधील उदाहरणांसारखी आहेत.
* अर्थव्यवस्था घटकामध्ये मूलभूत संकल्पनांवर बहुविधानी प्रश्न विचारण्यात आले आहेत. तसेच या घटकाच्या प्रश्नांवर चालू घडामोडींचा जास्त प्रभाव दिसून येतो. त्यामुळे आर्थिक चालू घडामोडींच्या पारंपरिक मुद्दय़ांची तयारी करणे आवश्यक ठरते.
काठिण्य पातळीबाबत एकदा स्पष्टता आली की तिचा फारसा विचार न करता जास्तीत जास्त बारकाईने पण व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून अभ्यास करणे जास्त व्यवहार्य आहे. यातून संकल्पना स्पष्ट होण्यास, नेमका अभ्यास होण्यास आणि त्यातून आत्मविश्वास निर्माण होण्यास खूप मदत होते.
पुढील लेखापासून तयारीबाबत विश्लेषणाच्या आधारे घटकनिहाय चर्चा करण्यात येईल.
First Published on March 20, 2019 2:54 am
Web Title: mpsc exam preparation tips useful tips for mpsc exam

यूपीएससीची तयारी : मध्ययुगीन भारत आजच्या लेखामध्ये आपण मध्ययुगीन भारत या घटकाची चर्चा करणार आहोत.

यूपीएससीची तयारी : मध्ययुगीन भारत

आजच्या लेखामध्ये आपण मध्ययुगीन भारत या घटकाची चर्चा करणार आहोत.

संग्रहित छायाचित्र

श्रीकांत जाधव
आजच्या लेखामध्ये आपण मध्ययुगीन भारत या घटकाची चर्चा करणार आहोत. या घटकावर २०११ ते २०१८ मध्ये एकूण १४ प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. इतर घटकांच्या तुलनेत या घटकावर कमी प्रश्न विचारले जातात.
अभ्यासाच्या दृष्टीने या घटकाचे नियोजन
मध्ययुगीन कालखंडाची सुरुवात साधारणत: इ.स ७५०पासून होते, असे मानले जाते. सुरुवातीचा कालखंड (इ.स ७५०-१२००पर्यंत) या कालखंडाची महत्त्वाची दोन वैशिष्टय़े  पाहावयास मिळतात. यातील पहिले म्हणजे भारतात सरंजामशाही स्वरूपाच्या राजकीय शासनव्यवस्थेचा उदय आणि दुसरे म्हणजे भारतात इस्लाम धर्माचे आगमन व सिंध प्रांतातून सुरू झालेली अरबांची व तुर्काची आक्रमणे. या कालखंडामध्ये भारताचा विविध भागांमध्ये प्रादेशिक राजकीय सत्तांचा उदय झालेला होता. उत्तर भारतामधील राजपूत सत्ता-प्रतिहार, परमार, चौहान व चंदेला इत्यादी; पूर्व भारतामध्ये पाल यांची सत्ता तसेच मध्य भारतात राष्ट्रकुट आणि दक्षिण भारतात चोल, चालुक्य इत्यादीच्या सत्ता होत्या. यानंतरचा कालखंड हा दिल्ली सल्तनत व समकालीन प्रादेशिक सत्तांचा होता. दिल्ली सल्तनतीला समकालीन असणाऱ्या सत्तांमध्ये देवगिरीचे यादव, होयसळ, काकतीय विजयनगर साम्राज्य, बहामनी राजघराणे तसेच काश्मीर, बंगाल, गुजरात या प्रांतातील प्रादेशिक राजकीय सत्ता यांचा मुखत्वे समावेश होता. दिल्ली सल्तनतीनंतर मुघल साम्राज्याची सत्ता भारतात स्थापन झालेली होती. या सत्तेला समकालीन असणाऱ्या सत्तांमध्ये राजस्थानमधील राजपूत सत्ता तसेच दख्खन भागातील आदिलशाही, निजामशाही व महाराष्ट्रातील मराठा साम्राज्य इत्यादीचा समावेश होतो.
याचबरोबर मध्ययुगीन भारतात भक्ती चळवळ आणि सुफी चळवळ या दोन धार्मिक चळवळी अस्तिवात आलेल्या होत्या. त्यांचा तत्कालीन समाजजीवनावर खूप मोठा प्रभाव पडलेला होता. यातील भक्ती चळवळ ही िहदू धर्माशी संबंधित होती आणि सुफी चळवळ ही इस्लाम धर्माशी संबंधित होती. याव्यतिरिक्त शीख चळवळीच्या माध्यमातून शीख धर्माची स्थापना गुरुनानक यांनी केलेली होती. अशा पद्धतीने या घटकाचे नियोजन करावे लागते.
मागील परीक्षांमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न पुढीलप्रमाणे
* २०१२ मध्ये सुफी चळवळीवर प्रश्न विचारलेला होता.
तो प्रश्न होता – गूढ सुफिवादी पुढीलपैकी कोणत्या मार्गाचा पुरस्कार करणारे म्हणून ओळखले जातात?
पर्याय होते – १)ध्यान आणि श्वासावर नियंत्रण, २)एकांतात खडतर संन्यासी जीवन आणि ३)धार्मिक गीतांद्वारे श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणे. (हा टउद प्रकारात मोडणारा प्रश्न)
* २०१४ मध्ये प्रश्न होता..
मध्ययुगीन भारतात महत्तर आणि पट्टीकल पदनाम कशाशी संबंधित होते?
पर्याय – १) सैनिक अधिकारी, २)ग्रामप्रमुख, ३)वैदिक कर्मकांडामधील विशेषज्ञ आणि ४)कारागार श्रेणी प्रमुख.
* २०१५ मध्ये प्रश्न होता..
बाबरच्या भारतातील आगमनामुळे काय झाले?
पर्याय – १)उपखंडामध्ये दारूगोळा वापरण्यास सुरुवात झाली, २)स्थापत्यकलेमध्ये कमान आणि घुमट बनण्यास सुरुवात झाली आणि ३)तमुर राजवंशाची स्थापना करण्यात आली हे पर्याय दिलेले होते. (टउद प्रकारात मोडणारा प्रश्न.)
* २०१६ मध्ये प्रश्न होता..
मध्ययुगीन भारताच्या आर्थिक इतिहास संदर्भात अराघत्ता (Araghatta) हे काय दर्शविते? असा प्रश्न विचारण्यात आलेला होता.
यासाठी पर्याय होते. – १) वेठबिगार, २) सैनिक अधिकाऱ्यांना दिले जाणारे भुदान, ३)जमीन सिंचनासाठी वापरले जाणारे जलचक्र आणि ४)पडीक जमिनीचे सुपीक जमिनीमध्ये केले जाणारे रूपांतर.
* २०१७ मध्ये  प्रश्न होता..
काकतीय राज्यामधील खालीलपैकी कोणते महत्त्वाचे बंदर (seaport) होते? असा प्रश्न विचरण्यात आलेला होता.
यासाठी पर्याय होते. – १)काकिनाडा (Kakinada), s)मोतुपल्ली (Motupalli), ३)मसुलीपट्टनम/मच्छलीपट्टनम (Masulipatanam/Machalipatnam) व ४) नेल्लुरू (Nelluru)
* २०१८ मध्ये  प्रश्न होता..
खालीलपैकी कोणत्या परकीय प्रवाशाने विस्तृतपणे भारतातील हिरे आणि हिऱ्यांच्या खाणी यांविषयी चर्चा केलेली आहे? असा प्रश्न विचारलेला होता.
यासाठी पर्याय होते – १) फ्रँकोइस बर्नियर, २)जीन बाप्टिस्टे टेवर्नियर, ३)जेंन दी थेवेनोत व ४)अब्बे बार्थलेमी कारे.
उपरोक्त स्वरूपाचे प्रश्न या घटकावर विचारले जातात, साधारणत: या प्रश्नाचे स्वरूप हे वस्तुनिष्ठ पद्धतीचे आहे. या घटकावर विचारण्यात येणाऱ्या प्रश्नावरून असे लक्षात येते की, हा घटक मुद्देनिहाय माहितीचे संकलन करून अभ्यासणे गरजेचे आहे. पण यासाठी सर्वप्रथम या घटकाचे मूलभूत ज्ञान असणे गरजेचे आहे.
संदर्भ साहित्य – या घटकाची मूलभूत माहिती अभ्यासण्यासाठी सर्वप्रथम एनसीईआरटीच्या शालेय पुस्तकांचा आधार घ्यावा लागतो. यामध्ये Our past part II  इयत्ता सातवी आणि इयत्ता बारावीचे Themes in Indian History part- II  ही पुस्तके अभ्यासावी लागतात. याच्या जोडीला सतीश चंद्र लिखित मध्ययुगीन भारतावरील जुने एनसीईआरटीचे पुस्तक वाचावे. ज्यामुळे या घटकाची योग्य परीक्षभिमुख तयारी आपणाला करता येते.
First Published on March 19, 2019 4:36 am
Web Title: upsc exam preparation tips for upsc exam 2019