Wednesday, October 14, 2015

स्वदेशी कलेक्शन

स्वदेशी कलेक्शन

खादी हा केवळ कापडाचा प्रकार नाही. ती एक चळवळ म्हणून उभी राहिली होती.

मुंबई | October 1, 2015 23:01 pm
खादी हा केवळ कापडाचा प्रकार नाही. ती एक चळवळ म्हणून उभी राहिली होती. महात्मा गांधीजींनी स्वदेशीचा जागर करताना खादीचा प्रसार हा प्रमुख मार्ग अनुसरला होता. साधेपणा दर्शवणारी खादी आता मात्र फॅशन सर्कलमध्ये लोकप्रिय होत आहे. गांधी जयंतीनिमित्त खादीच्या समकालीन स्वरूपावर टाकलेला एक दृष्टिक्षेप…
छाया : डिझायनर श्रुती संचेती यांचे स्वदेशी हे कलेक्शन
First Published on October 2, 2015 1:16 am
Web Title: indian fashion

खादी चळवळीपासून फॅशन स्टेटमेंटपर्यंत

खादी चळवळीपासून फॅशन स्टेटमेंटपर्यंत

खादीचा प्रवास स्वदेशी चळवळीपासून फॅशन स्टेटमेंट पर्यंत झाला आहे.

अमृता अरुण | October 1, 2015 22:37 pm
गांधीजींच्या तत्त्वानुसार चरख्यावर सूत कातून स्वत: बनवलेले वस्त्र आपण सध्या वापरत नसलो तरी खादीचे वस्त्र आपण नक्कीच वापरतो. खादीचा प्रवास स्वदेशी चळवळीपासून फॅशन स्टेटमेंट पर्यंत झाला आहे. गांधी जयंतीच्या निमित्ताने खादी वस्त्रोद्योग भांडारांमध्ये खादीच्या कपडय़ांवर सूट दिली जाते. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडय़ात खास खादीच्या कपडय़ांचे प्रदर्शनही ठेवले जाते.
खादी हे कापड मुख्यत: कॉटनपासून बनवले जाते. त्यामध्ये सिल्क किंवा लोकरीचा वापर केला जातो. थंडीत गरम आणि उन्हाळ्यात थंड वाटणारं हे ऑल सीझन मटेरियल. किंमत वसूल करणारं आहे. महात्मा गांधीजींमुळे आपल्या देशात खादीचा प्रसार झाला. त्यांच्या स्वावलंबी तत्त्वानुसार ब्रिटिशांकडून कापड घेण्यापेक्षा ते स्वत: चरख्यावर कपडे बनवत आणि वापरत. खादी मटेरिअल आता टेक्स्टाइल इंडस्ट्रीमध्ये मोठय़ा प्रमाणात बनत आहे. गांधींप्रमाणे चरख्यावर सूत कातून नाही तरी त्यांची परंपरा आपण जपली पाहिजे. त्यासाठी खादीला एक फॅशनेबल टच देऊन त्यात काय नावीन्य आणता येईल आणि कशा रीतीने वापरता येईल ते पाहू.
खादी हे आता ओल्ड फॅशन मटेरिअल न राहता वेस्टर्न आउटफिट्समध्येही दिसण्यात येते. रॅप्ड स्कर्ट, लॉन्ग मॅक्सी गाऊन्स आणि साडी यामध्ये खादीला जास्त मागणी आहे. शिवाय आता खादीमध्ये डल व्हाइट, खाकी, ऑफ व्हाइट, राखाडी अशा डल शेड्स न राहता केशरी, हिरवा, निळा असे ब्राइट रंग दिसतायत त्यामुळे खादीला एक वेगळा लुक आलाय आणि म्हणूनच फक्त स्वातंत्र दिन, प्रजासत्ताक दिन, महाराष्ट्र दिन अशा वेळेला खादीचा उपयोग न करता तो आता लग्नकार्यात, फंक्शन्समध्ये आणि कॉपरेरेट लेवलवरही केला जातो. त्याचप्रमाणे खादीमध्ये आता विविध प्रिंट्सही पाहायला मिळतात.
लग्नकार्यात खादी सिल्कच्या साडय़ांना जास्त मागणी असते अशा साडय़ा नेसल्यावर आपल्याला एक कलात्मक, क्लासिक लुक येतो. या साडय़ांवर मोत्यांचा डिसेंट नेकलेस आणि इअरिरग्स एवढय़ा अ‍ॅक्सेसरीजसुद्धा आपल्या लुकमध्ये आणखी उठाव आणतात. नुकत्याच झालेल्या एका फॅशन शोमध्ये ‘गांधी ट्रिब्यूट’ या थीमला अनुसरून खादीपासून बनवलेले वेगवेगळे गार्मेट्स, वेगळ्या स्टाइलने ड्रेप केलेल्या साडय़ा रॅम्पवर पाहायला मिळाल्या. अशा गेटअपवर कोल्हापुरी चपला अगदी उठून दिसत होत्या.
आजकाल खादीचे फक्त कपडेच नव्हे तर खादीच्या बॅगा, खादीचे पेपर, सतरंजा, जाजम, ड्रॉइंग कॅनव्हास, टॉवेल, पंचा या गोष्टींसाठीही देशा-विदेशातून मागणी आहे. खादीच्या बॅगांमध्ये हत्तीची, हरणाची, झाडांची आणि मोठय़ा प्रमाणात राजस्थानी प्रिंटची मागणी ग्राहक करतात. शिवाय या बॅगांमध्ये वेगवेगळे पॅटर्नही पाहायला मिळतात. त्यामुळे कॉलेज गोइंग गर्ल्सला अशा बॅगा फॅशन म्हणून वापरता येतात. शिवाय त्यात जास्त सामानही राहत असल्यामुळे त्या कम्फर्टेबल असतात. त्यामुळे आपण कधी तरी आपल्या कम्फर्ट झोनसाठी  जॉर्जेट, सिल्क, शिफॉन अशा विदेशी मटेरिअलपेक्षा आपल्या स्वदेशी खादी मटेरिअलचा वापर करायला काहीच हरकत नाही.
vv03
गुजरातच्या खादी- ग्रामोद्योग मंडळाने खादीच्या प्रसारासाठी आयोजित केलेल्या फॅशन शो मध्ये नामवंत डिझायनर रोहित बाल, अनामिका आणि प्रताप यांचं खादी कलेक्शन सादर करताना अभिनेत्री सोनम कपूर.
अमृता अरुण – viva.loksatta@gmail.com 
First Published on October 2, 2015 1:14 am
Web Title: khadi
टॅग: Fashion,Khadi

स्वदेशी फॅशन साधेपणाचं प्रतीक असली तरी खादी हल्ली फॅशन जगतात आपला ठसा उमटवताना दिसतेय.

स्वदेशी फॅशन

साधेपणाचं प्रतीक असली तरी खादी हल्ली फॅशन जगतात आपला ठसा उमटवताना दिसतेय.

प्राची परांजपे | October 1, 2015 22:39 pm
vv04प्रजासत्ताक दिन किंवा स्वातंत्र्य दिन असो वा गांधी जयंती.. या दिवसांना हटकून पांढरे कुर्ते आणि खादी हमखास कपाटातून बाहेर येत, पण खादी आता फक्त तेवढय़ापुरतीच मर्यादित राहिलेली नाही. साधेपणाचं प्रतीक असली तरी खादी हल्ली फॅशन जगतात आपला ठसा उमटवताना दिसतेय. ही खादी खरं तर भारतीय हवामानाला साजेशी, तरीही खादी आपल्या नेहमीच्या फॅशनेबल वॉर्डरोबमधून अगदी हद्दपार झालेली दिसते. पण सध्या टिपिकल कुर्ता-पायजमा किंवा साडी याव्यतिरिक्त खादीवर वेगवेगळे यशस्वी प्रयोग भारतीय डिझायनर्स करीत आहेत. त्यात आघाडीचं नाव आहे प्रसिद्ध डिझायनर श्रुती संचेती यांचं. खादी नेहमीच्या वापरात कशी आणावी यासंबंधी डिझायनर श्रुती यांच्याशी ‘व्हिवा’ने संवाद साधला.
श्रुती संचेती सांगतात, खादी हा भारतीयांचा खरा वारसा आहे. पूर्वीच्या काळात ब्रिटिश सरकारनं भारतातून कच्चा माल त्यांच्या देशात नेऊन जास्त किमतीत तयार झालेले कपडे भारतात विकण्यास सुरुवात केल. त्यात खादीचे कपडेही होते. तेव्हा ही खादी फक्त बडय़ा मंडळींना परवडणारी होती आणि त्यामुळे खादी ही बडय़ा मंडळींची असेच मानले जात होते. त्यानंतर गांधीजींनी स्वदेशीचा नारा देत सूतकताई करीत देशी कपडय़ाला चालना दिली. तेव्हा खादी सामान्यांच्या आवाक्यात आली. देशाला स्वातंत्र्य मिळालं तसं ‘खादी’ वापरामागचा राष्ट्रवाद कमी झाला. खादीविषयी फॅशन वर्तुळांमध्ये अनेक गैरसमज होते. खादी हे जाड फॅब्रिक आहे आणि त्यामुळे त्यात जाडसर दिसायला होईल. रंग अतिशय सटल आहेत. तेच तेच आहेत. अशा गैरसमजांमुळे खादी वापरली जात नव्हती. पण नंतर अनेक डिझायनर्सनी पुढे येऊन खादी वापरायला सुरुवात केली. अलीकडेच गेल्या पाच-दहा वर्षांत खादीला खूप चांगले दिवस आले आहेत. अनेक सुप्रसिद्ध फॅशन इव्हेंट्समध्ये ‘टेक्स्टाइल डे’ च्या माध्यमातून खादीसाठी वेगळा दिवस, वेगळा सेक्शन राखून ठेवला जातो.. आणि आता डिझायनर्ससुद्धा वेस्टर्न डिझाइन्स किंवा वेस्टर्न कापडावर डोळे झाकून विश्वास ठेवत नाहीत.’
खादीचे प्रयोग
पूर्वी ज्या प्रमाणात आणि ज्या प्रकारे खादी वापरली जात होती त्याप्रमाणे ती आता वापरणे शक्य नाही. खादी आजच्या तरुणाईला आपलंसं करू शकते का, याविषयी बोलताना श्रुती म्हणाल्या,  ‘खादीला प्रेझेंट करताना आजच्या काळातली ग्लोबल लाइफ स्टाइल, लोकांच्या आवडीनिवडी हे लक्षात घेतले पाहिजे. आम्ही डिझायनर्स म्हणून खादीला अजून चांगली ट्रीटमेंट देऊन प्रेझेंट करतो. थ्रेड काउंट वाढवणे, रंगांमध्ये प्रयोग करणे, प्लेन खादीऐवजी वेगवेगळ्या प्रिंट्स किंवा वेगळ्या पद्धतीचे फॅब्रिक कट आणि ड्रेप करून आजच्या तरुणाईला आपलेसे करता येईल. आम्हीदेखील तेच करतोय.’ श्रुती यांच्या स्वदेशी या ब्रॅण्डच्या माध्यमातून खादीवर वेगवेगळे प्रयोग केले जातात. ‘माझ्या ‘स्वदेशी’ या कलेक्शनमध्ये मी काहीसं इंडो- ब्रिटिश कल्चरचं मिश्रण केलंय. पूर्वी ज्याप्रमाणे आपल्या डिझाइन्सवर ब्रिटिशांची छाप होती तसंच काहीसं मी माझ्या डिझाइन्समध्ये वापरलं आहे. कापड मात्र प्युअर खादीचं. चेक्स, कॉलर असलेले ब्लाऊझेस किंवा ज्याप्रमाणे पूर्वी इंग्लिश स्त्रिया लांब जॅकेट्ससारखे ब्लाऊजेस वापरायच्या त्या पद्धतीने मी माझे डिझाइन्स केले आहेत.  त्याचबरोबर सध्याच्या काळात अपील होणारी कंटेम्पररी कलर कॉम्बिनेशन्स वापरली आहेत. माझ्या कलेक्शनची छटा जरी वेस्टर्न असली तरी त्याचा आत्मा मात्र पूर्ण भारतीय आहे,’ त्या म्हणाल्या.
गुजरातच्या खादी- ग्रामोद्योग मंडळाने खादीच्या प्रसारासाठी आयोजित केलेल्या फॅशन शो मध्ये नामवंत डिझायनर रोहित बाल, अनामिका आणि प्रताप यांचं खादी कलेक्शन सादर करताना अभिनेत्री सोनम कपूर.
खादी वापरायची कशी?
स्वातंत्र्य चळवळीचा भाग म्हणून सुरुवात झालेली खादी आता एक फॅशन स्टेटमेंट म्हणून ओळखली जाऊ  लागली आहे. खादी सिल्क तर एलिट फॅशनमध्ये आघाडीवर आहेच. पण नेहमीची कॉटन खादीदेखील तरुणाईला आपलंसं करतेय.
खादी कशी वापरायची, याविषयी डिझायनर श्रुती संचेती यांनी काही टिप्स दिल्या. त्या म्हणाल्या, ‘खादीचा मेंटेनन्स करणं तितकंच महत्त्वाचं असतं. खादीचं कापड धुतल्यावर थोडं आक्रसतं. ते लवकर चुरगळतं. प्रत्येक वेळी स्टार्चची गरज नसते. पण हल्ली त्यासाठी त्यातल्या त्यात कमी चुरगळेल अशा पद्धतीने आम्ही खादीचं स्वरूप ठेवतो, पण तरीही नैसर्गिक फॅब्रिक असल्याने ते चुरगळतंच. पण तेच या फॅब्रिकचं सौंदर्य आहे, असं मी म्हणीन.’ स्त्रियांच्या साडय़ा आणि पुरुषांच्या कुर्ता-पायजम्यापर्यंत मर्यादित असलेली खादी पुरुषांनी वापरायचं फॅब्रिक राहिलेलं नाहीये. डिझायनर्स आपले इनपुट्स घालून  त्याला एक छान स्वरूप देऊन, ट्रेण्डी कलर्स वापरून, भरतकाम करून नाजूक डिझाइन्स वापरून स्त्रियांसाठीसुद्धा असंख्य कॉस्च्युम्स खादीतून बनवत आहेत.
vv06हल्ली खादीमध्ये वेगवेगळे प्रयोग होत आहेत. गदी लग्नकार्यासाठी आणि फेस्टिव्ह सीझनसाठीदेखील खादीचे कपडे बनवले जात आहेत. लग्नासाठी खादी घागरा, खादी गाऊन्स, सलवार कमीज, अनारकली तसंच स्मार्ट आउटिंगसाठी खादीचे शॉर्ट ड्रेसेस, शॉर्ट्स अशा प्रकारचे पाश्चिमात्य ढंगाचे कपडेदेखील बनवले जात आहेत. जॅकेट्स, दुपट्टा, स्टोल अशा फॉर्म्समध्ये खादी वापरायला तरुणाईची पसंती आहे.

खादीला प्रेझेंट करताना आजच्या  काळातली ग्लोबल लाइफस्टाइल, लोकांच्या आवडीनिवडी हे लक्षात घेतले पाहिजे. आम्ही डिझायनर्स म्हणून खादीला अजून चांगली ट्रीटमेंट देऊन प्रेझेंट करीत आहोत. – श्रुती संचेती

प्राची परांजपे – viva.loksatta@gmail.com 
First Published on October 2, 2015 1:13 am
Web Title: indian fashion khadi

सोशल मीडियातून स्वच्छतेचा वसा

सोशल मीडियातून स्वच्छतेचा वसा

स्वच्छता आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा भाग. पण आपल्या देशात त्यासाठी लोकांना सांगावं लागतं.

कोमल आचरेकर | October 1, 2015 22:43 pm
स्वच्छता आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा भाग. पण आपल्या देशात त्यासाठी लोकांना सांगावं लागतं की स्वच्छता राखा. विकसित देशांच्या इतर गोष्टींसोबत त्यांची शिस्त आणि सार्वजनिक ठिकाणच्या स्वच्छतेची सवय घेणं तितकंच गरजेचं. आता देशभरात स्वच्छता मोहीम ही एक प्रकारची चळवळ झाली असून त्यात तरुणांचा सहभाग दिसतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘मन की बात’मधून गांधी जयंतीनिमित्त पुन्हा एकदा स्वच्छ भारत अभियानवर भर देऊन शक्य तितकी स्वच्छता करण्याचं आवाहन केलं. देशभरातून अनेक ग्रुप्स, संस्था यात सहभागी होतायत व त्यासाठी सोशल मीडियाचा वापर करून जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहोचून त्यांना कार्यात सहभागी करून घेतायत. फेसबुक पेज आणि वेबसाइटच्या माध्यमातून लोकांपर्यंत आपले काम पसरवत आहेत. सोशल मीडियावर गाजलेल्या आणि प्रत्यक्षात स्वच्छतेच्या क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या अशाच काही तरुणाईच्या सोशल मीडिया फॉर सोशल कॉज या प्रकारच्या स्वच्छता चळवळींची ही दखल..
आपल्या देशातील नागरिकांच्या नावानं आणि देशी सिस्टीमच्या नावानं नुसते खडे फोडण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती करण्यात आघाडी घेतलीय काही वर्षांपूर्वी सुरू झालेल्या ‘द अग्ली इंडियन’ या ग्रुपनं. या नावाने फेसबुकवर क्रिएट झालेला एक ग्रुप बंगळुरूमध्ये कार्यरत आहे. ‘काम चालू- मूह बंद’ असं म्हणत या ग्रुपच्या सभासदांनी रस्त्यावर उतरून हातात झाडू घेऊन स्वच्छतेचा वसा घेतलाय. द अग्ली इंडियन ही एक कल्पना आहे. आपण सगळे भारतीय घाणेरडे आहोत आणि आपण स्व:तला स्वत:पासून वाचवायला हवं असं या ग्रुपचं म्हणणं आहे. अस्वच्छ सार्वजनिक ठिकाणं, रस्ते स्वच्छ करून तिथे रंगरंगोटी आणि तत्सम सुशोभीकरण ‘द अग्ली इंडियन’च्या माध्यमातून ते करत आहेत. यात सक्रिय सहभाग घेणारे तरुण आयटी आणि सेवा क्षेत्रात काम करणारी मंडळी आहेत. हे सगळं प्रसिद्धीपासून दूर राहून त्यांना करायचं आहे. द अग्ली इंडियन्स प्रसिद्धीपासून दूर आहेत. निनावी राहून आणि कोणतेही श्रेय न घेता एक जबाबदारी म्हणून हे कार्य निरपेक्षपणे पार पाडत आहेत. संपूर्ण बंगलोर शहराच्या स्वच्छतेचा वसा जणू त्यांनी घेतलाय. बीबीसीनेसुद्धा त्यांच्या कार्याची दखल vv18घेतलीये. फेसबुक पेजच्या माध्यमातून केलेल्या कामाचा व्हिडीयो आणि फोटोज त्यांनी अपलोड करून इतरांसमोर एक आदर्श प्रस्थापित केलाय. त्यांचे हे कार्य पाहून इतरांनी त्यात सहभाग घेतलाय. इंदिरानगर राईजिंग, दिल्ली, रांची असे त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन प्रकल्प केले जात आहेत.
त्याचप्रमाणे छत्तीसगड रायपूरमध्ये  ‘बंच ऑफ फूल्स’नी स्वच्छता मोहीम हाती घेतलीये. स्टे फूल, कीप क्लीनिंग हे उद्दिष्ट आहे. या त्यांच्या कार्यासाठी त्यांना पंतप्रधान मोदींच्या टीमकडून गौरवण्यात आले आहे. मेरठच्या ‘पहल एक प्रयास’ या सेवाभावी संस्थेकडूनसुद्धा अशाप्रकारची मोहीम हाती घेतली गेली आहेत. या संस्थेत श्रमदान करणाऱ्यांमध्ये डॉक्टर, इंजिनीअर यापासून विविध क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचा सक्रिय सहभाग असतो. आपला परिसर हा कुणीतरी साफ करेल, यापेक्षा आपण त्यासाठी काम करणं केव्हाही चांगलंच नाही का? प्रत्येक शहरातून अशी स्वच्छतेची सुरुवात देशाला स्वच्छता मोहिमेत नक्कीच यश देईल.
छायाचित्र – द अग्ली इंडियन फेसबुक पेज
कोमल आचरेकर – viva.loksatta@gmail.com 
First Published on October 2, 2015 1:10 am
Web Title: cleaning campaign through social media
सोशल मीडियातून स्वच्छतेचा वसा

Tuesday, October 13, 2015

स्थानिक व अस्थानिक वनस्पती

सध्या पावसाळा संपत आलेला आहे व छोटी झाडे संपण्याच्या मार्गावर आहेत.

डॉ. राहुल मुंगीकर | October 11, 2015 00:25 am
निसर्गातील विविध गोष्टींचीही माहिती
निसर्ग नवलाई
बालमित्रांनो, आपण मागील लेखामध्ये श्रावण महिन्यात, तसेच या काळात असणाऱ्या निसर्गातील विविध गोष्टींचीही माहिती घेतली होती. सध्या पावसाळा संपत आलेला आहे व छोटी झाडे संपण्याच्या मार्गावर आहेत. मोठी झाडे हळूहळू बहरू लागली आहेत. म्हणूनच या वेळी आपण निसर्गसृष्टीतील आणखी काही नवीन बाबींची माहिती घेण्याचा प्रयत्न करू या.
तुम्ही सर्वानी टणटणीची झाडे पाहिली असतील. गेल्या काही वर्षांमधे या टणटणीची वाढ मोठय़ा प्रमाणात होताना दिसत आहे. तुम्ही कधी या टणटणीचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला आहे का? खरे तर या झाडावर मोठय़ा प्रमाणात फुलपाखरे येत असतात. त्यामुळे अनेक वेळा उद्याने विकसित करताना बागेमध्ये खासकरून वेगवेगळे फुलांचे रंग असलेल्या टणटणी लावतात; परंतु टणटणी हे आपल्याकडचे मूळ झाड नाही, याची तुम्हाला कल्पना आहे का? अर्थात, तुम्ही असेही म्हणाल, की आपल्याकडील एखादे झाड मूळचे नसेल तर काय फरक पडतो? खरे तर याच प्रश्नाचे उत्तर आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुमच्या पकी काही जणांनी गाजर गवताचे नाव ऐकले असेल. हेसुद्धा आपल्याकडील मूळ झाड नव्हे. हे झाड भारतात ७० च्या दशकात गव्हाच्या बियाणांबरोबर आले व सर्वत्र वेगाने पसरले. या प्रकारच्या झाडांचा अभ्यास करण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, या प्रकारच्या प्रजातींमुळे नसíगक परिसंस्थेवर बराच परिणाम होत असतो. परंतु अशा प्रकारचे विषय आपल्या अभ्यासक्रमात येत नाहीत. या प्रकारच्या झाडांना इंग्रजीमधे कल्ल५ं२्र५ी ढ’ंल्ल३२ असे संबोधले जाते. या प्रजाती मूळच्या स्थानिक नसल्याने या झाडांचा उपयोग किडे, फुलपाखरे, पशू-पक्षी यांना फारसा कधीही होत नाही. गाजर गवतासारख्या वनस्पतीशी आपला संपर्क झाला तर खाज सुटते. या प्रकारच्या वनस्पतींमुळे होणारा तोटा वेगळाच आहे. या वनस्पती ज्या ठिकाणी वाढीस लागतात, त्या ठिकाणी अन्य स्थानिक वनस्पतींची वाढ हळूहळू कमी होते व पर्यायाने या स्थानिक प्रजातींवर अवलंबून असणारी जीवसृष्टीही कमी होण्यास सुरुवात होते. या प्रकारच्या झाडांवर कोणतेही पक्षी आपले घरटे बांधत नाही. तुम्ही अशाप्रकारचे निरीक्षण कधी केले आहे का? आपल्याकडे सुरुवातीला वेगाने हिरवेगार जंगल वाढावे म्हणून ऑस्ट्रेलियन बाभळीची (अूूं्रं ं४१्रू४’्रऋ१्रे२) लागवड करण्यात आली होती. तर आपल्याला अगदी परिचित असलेली सुबाभुळीची लागवड चाऱ्याच्या उपलब्धतेकरिता करण्यात आली. परंतु जेव्हा याची लागवड मोठय़ा प्रमाणात रस्त्याच्या कडेला वृक्ष म्हणून करण्यास सुरुवात झाली; तेव्हा परिसंस्थेवर याचा परिणाम होण्यास सुरुवात झाली. तुम्हाला माहीत असलेले आणखी एक झाड म्हणजे ऊंदीरमार किंवा  ॅ्र१्र२्र्िरं २ंस्र््र४े. गेल्या काही वर्षांत याची लागवड मोठय़ा प्रमाणात करण्यात आली आहे. या झाडाला पांढरी व गुलाबी रंगाची फुले येतात. परंतु याची वाढ मोठय़ा प्रमाणात झाल्यावर अगदी गवतसुद्धा येणे मुश्कील होऊन जाते. या सर्व परदेशी झाडांची वैशिष्टय़े म्हणजे, यांची वाढ अगदी जोमात होत असते, पण या झाडांवर अवलंबून असणारे पशू नसल्याने त्यांची वाढ नसíगकरीत्या नियंत्रित करणारे घटक निसर्गात आढळत नाहीत.
तुम्ही रहात असलेल्या किंवा शाळेच्या परिसरात आढळणाऱ्या वनस्पतींचा चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकता. याकरिता आपण एक प्रयोग करू या. स्थानिक नसलेली झाडे रस्त्याच्या कडेला किंवा डोंगरांवर तसेच शेताच्या आजूबाजूलादेखील आपणास निश्चितच बघावयास मिळू शकतील. प्रथमत: आपल्या भागातील किती झाडे ही स्थानिक प्रकारची आहेत व किती झाडे स्थानिक नसलेली आहेत याचे वर्गीकरण करा. याकरिता तुम्ही अशा प्रकारच्या झाडांसंबंधात आपले शिक्षक किंवा ज्यांना झाडांची माहिती आहे त्यांना याबाबत विचारू शकतात. स्थानिक असलेल्या व नसलेल्या अशा दोन्ही प्रकारच्या झाडांवर कोणते कीटक, फुलपाखरे व पक्षी येतात यांचे दररोज थोडा वेळ जरी निरीक्षण केले, तरी आपणास या दोन्ही प्रकारच्या झाडांमधील फरक सहजगत्या समजून येईल. याचप्रमाणे आपल्या गावाभोवती जर वनविभागाचे क्षेत्र असेल, तर अशा क्षेत्रावर कोणत्या प्रजातींची लागवड केली आहे तेही बघण्याचा प्रयत्न करा. बघुयात आपल्यापकी किती जणांना वर नमूद केलेल्या झाडांव्यतिरिक्त अस्थानिक प्रजातींची माहिती गोळा करता येते. या झाडांचे निरीक्षण करताना या झाडांच्या अवतीभवती कोणत्या प्रकारच्या अन्य प्रजाती आहेत याचेही निरीक्षण नोंदविले तर अशा झाडांचा व स्थानिक प्रजातींचा अन्य जीवसृष्टीशी असलेला संबंध तुम्हाला कळू शकेल. यातूनच आगामी काळात या स्थानिक नसलेल्या प्रजातींची लागवड टाळण्याकरिता प्रयत्न करता येऊ शकेल.
-rahumungi@gmail.com

First Published on October 11, 2015 12:22 am
Web Title: rahul mungikar article on nature
टॅग: Loksatta-articles

माहिती अधिकार कायदा शस्त्र नव्हे, साधन! कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी आणि उपयोग यांचा लेखाजोखा आणि पुढील वाटचालीची उद्दिष्टे कथन करणारा लेख

माहिती अधिकार कायदा शस्त्र नव्हे, साधन!

कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी आणि उपयोग यांचा लेखाजोखा आणि पुढील वाटचालीची उद्दिष्टे कथन करणारा लेख

विवेक वेलणकर | October 11, 2015 01:34 am
ज्याच्या करांच्या पैशातून शासकीय व्यवस्था चालते तोच या व्यवस्थेमध्ये पिचून जायला लागला.
व्यवस्थेचे नागरिकांप्रती असलेले उत्तरदायित्व अधोरेखित करण्यासाठी देशभरात लागू करण्यात आलेल्या माहिती अधिकार कायद्याला दहा वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने  या कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी आणि उपयोग यांचा लेखाजोखा आणि पुढील वाटचालीची उद्दिष्टे कथन करणारा लेख..
१९५० साली लोकशाही प्रजासत्ताक शासन व्यवस्था स्वीकारलेल्या आपल्या देशात नंतरच्या ५५ वर्षांत सर्वसामान्य नागरिकाला शासन व्यवस्थेत कवडीमोल समजले जाऊ लागले. ज्याच्या करांच्या पैशातून शासकीय व्यवस्था चालते तोच या व्यवस्थेमध्ये पिचून जायला लागला. संपूर्ण व्यवस्था भ्रष्टाचाराने पोखरून निघाली. कुठेतरी या व्यवस्थेला वचक बसावा आणि भ्रष्ट कारभाराला वेसण घातली जावी व नागरिकांप्रती उत्तरदायी करावे या संकल्पनेतून १२ ऑक्टोबर २००५ रोजी विजयादशमीला माहिती अधिकार कायदा संपूर्ण देशभर लागू झाला. या कायद्याला दहा वर्षे पूर्ण होत आहेत, त्या निमित्ताने दहा वर्षांचा लेखाजोखा मांडणे आणि पुढील वाटचालीची उद्दिष्टे निश्चित करणे आवश्यक आहे.
महाराष्ट्रापुरते बोलायचे झाले, तर माहिती अधिकार कायदा लागू झाल्यानंतर पहिल्याच वर्षांत या कायद्याअंतर्गत माहिती मागणारे एक लाख अर्ज दाखल झाले आणि एका अंदाजानुसार या दहाव्या वर्षांत ही संख्या वर्षांला दहा लाख अर्जापर्यंत पोचली असल्याची शक्यता आहे. मात्र तरीही आज दहा वर्षांनंतरही मोठय़ा प्रमाणात हा कायदा सर्वसामान्य जनतेपर्यंत अजूनही पोचला नाही. आजही शहरी भागात जेमतेम १५ टक्क्य़ांपर्यंत तर ग्रामीण भागात ८ टक्के जनतेपर्यंत हा कायदा पोचला आहे. मध्यंतरी झालेल्या एका सर्वेक्षणानुसार, माहिती अधिकार अर्जापैकी फक्त १० टक्के अर्ज महिलांचे असतात. याचाच अर्थ महिलांमध्ये या कायद्यासंदर्भातील जागृतीचे प्रमाण अल्प आहे. अर्थात या सगळ्याला शासनयंत्रणा जबाबदार आहे. याचे कारण माहिती अधिकार कायद्याच्या कलम २६ नुसार, केंद्र व राज्य सरकारांनी हा कायदा सर्वसामान्य जनतेपर्यंत व पददलितांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे; पण या स्तरावर कोणत्याही सरकारकडून फारसे प्रयत्न झाले नाहीत, किंबहुना यासाठी अर्थसंकल्पात तरतूदच केली जात नाही. आज जो काही माहिती अधिकार कायद्याचा प्रचार, प्रसार झाला आहे त्याचे श्रेय अण्णा हजारे, माहिती अधिकार क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते आणि स्वयंसेवी संस्था यांना आहे.
या कायद्याकडे बघण्याचा शासनाचा व राजकीय पक्षांचा दृष्टिकोन अत्यंत नकारात्मक आहे. ज्या सर्व राजकीय पक्षांनी मिळून हा कायदा एकमताने अस्तित्वात आणला, ते सर्वच राजकीय पक्ष स्वत:ला मात्र हा कायदा लागू होऊ नये, म्हणून कायद्यात बदल करायच्या तयारीत आहेत. या कायद्यात असणाऱ्या दंडात्मक तरतुदींमुळे या कायद्याचा काही प्रमाणात धाक निर्माण झाला होता, मात्र हा दंड करण्याची इच्छाशक्तीच बहुतांश माहिती आयुक्त दाखवत नाहीत. ज्या थोडय़ाफार प्रकरणात दोषी अधिकाऱ्यांना माहिती आयुक्त दंड ठोठावतात, तो वसूल झाला की नाही हे बघण्याची यंत्रणाच माहिती आयोगाकडे नाही. परिणामी, सुरुवातीच्या काळात शासकीय अधिकाऱ्यांमध्ये या कायद्याबद्दल असलेला धाक आता जवळपास संपुष्टात आला आहे आणि सामान्य नागरिकाला जी माहिती कायद्याप्रमाणे ३० दिवसांत मिळायला पाहिजे ती ३०० दिवसांतही मिळत नाही, असे चित्र बऱ्याच ठिकाणी दिसून येते. मुख्य माहिती आयुक्तांचा अपवाद सोडला तर बहुतेक सर्व माहिती आयुक्तांकडे माहिती अधिकारातील द्वितीय अपिले व तक्रारी मोठय़ा प्रमाणात प्रलंबित आहेत, कारण ज्या प्रमाणात माहिती आयुक्तांची नेमणूक करणे आवश्यक आहे, त्या प्रमाणात सरकारकडून केली जात नाही, प्रश्नार्थक स्वरूपात माहिती मागितली आहे किंवा ‘सदरहू कागदपत्रांचा आढळ होत नाही’ अशा प्रकारची उत्तरे देऊन अर्ज निकाली काढण्याचे प्रमाण खूप आहे. मात्र कागदपत्रे जपून ठेवण्याचा कालावधी संपायच्या आत ती नष्ट झाली असतील, तर त्यासाठी जबाबदार अधिकारी/ कर्मचारी यांच्यावर महाराष्ट्र रेकॉर्ड्स अ‍ॅक्टनुसार, फौजदारी गुन्हा दाखल करावा, या मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांच्या आदेशाकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जाते. एवढे सगळे असूनही एक गोष्ट मान्यच केली पाहिजे, की या कायद्यामुळे सर्वसामान्य माणसाला शासन यंत्रणेमध्ये थोडे का होईना स्थान आणि आवाज मिळाला आहे. गेल्या १० वर्षांत त्या आधीच्या ५५ वर्षांपेक्षा जास्त घोटाळे उघडकीस आणण्याचे काम या कायद्यामुळे झाले आहे.
‘टू जी स्पेक्ट्रम’पासून ‘आदर्श’पर्यंत सर्व घोटाळे उघडकीस आणण्यामागचा शिल्पकार माहिती अधिकार कायदा आहे. हा कायदा अस्तित्वात आल्यापासून मी देशभरात दहा वर्षांत सरकारी/ निमसरकारी अधिकाऱ्यांची पाचशेहून अधिक प्रशिक्षण शिबिरे घेतली. या प्रत्येक ठिकाणी या कायद्यावर ठरावीक आरोप होताना दिसतात. हा कायदा वापरून नागरिक ब्लॅकमेल करतात हा प्रमुख आरोप. आता खरं तर ज्याने काही काळेबेरे केले आहे त्याचेच ‘ब्लॅकमेलिंग’ होऊ शकते; मग कर नाही त्याला डर कशाला? दुसरं म्हणजे अशा प्रकारे ‘ब्लॅकमेलिंग’ करणाऱ्यांना पकडून देण्याची मानसिकता सरकारी अधिकारी का दाखवत नाहीत, हा प्रश्न अनुत्तरीत आहे. या कायद्याचा दुरुपयोग केला जातो व सरकारी कर्मचाऱ्यांना नाहक कामाला लावण्याचा प्रकार केला जातो, असाही आरोप या कायद्यावर केला जातो; मात्र मध्यंतरी झालेल्या एका राष्ट्रीय सर्वेक्षणानुसार, फक्त एक टक्का माहिती अधिकार अर्ज या प्रकारात मोडतात आणि तसेच बघायला गेले तर या देशात कोणत्या कायद्याचा दुरुपयोग झाला नाही? मात्र, याचा दोष मूठभर व्यक्तींना जातो, कायद्याला नव्हे. तिसरा आरोप म्हणजे खूप मोठी माहिती मागितली जाते व दारिद्रय़रेषेखालच्या माणसाच्या नावाने अर्ज करून हजारो पाने माहिती फुकटात पदरात पाडून घेतली जाते. मात्र, अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी माहिती अधिकार कायद्यातच कलम ७ (९) चा अंतर्भाव केला आहे. मात्र, कायदा येऊन १० वर्षे झाली तरी सरकारी अधिकाऱ्यांनाच जर या कलमांचा अर्थ व उपयोग कळत नसेल, तर सामान्य नागरिकांना तो कधी कळणार? याशिवाय कर्नाटक सरकारप्रमाणे महाराष्ट्र सरकार नियम बनवून दारिद्रय़रेषेखालील माणसाला किती माहिती मोफत द्यावी यावर नियंत्रण आणू शकते. मात्र आजवर सरकारने याबाबत काहीच केलेले नाही.
माहिती अधिकार कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी व्हायची असेल, तर या कायद्याचा आत्मा असलेल्या कलम ४ ची अर्थात प्रत्येक सरकारी/ निमसरकारी कार्यालयाने स्वत:हून घोषित करण्याच्या माहितीची संकेतस्थळांवर व सरकारी कार्यालयात सहज व मोफत उपलब्धता होणे. मात्र, माहिती अधिकार कायदा अस्तित्वात येऊन दहा वर्षे झाली तरी बहुतांश शासकीय/ निमशासकीय कार्यालयांनी ज्या पद्धतीने व ज्या प्रमाणात ही माहिती प्रसिद्ध केली पाहिजे, त्या प्रमाणात केलेली नाही ही वस्तुस्थिती आहे. या स्वत:हून घोषित करण्याच्या माहितीत प्रत्येक अधिकाऱ्याचे व कर्मचाऱ्याचे अधिकार व कर्तव्य, निर्णय घेताना अवलंबवण्यात येणारी प्रक्रिया, कामाची मानके, कामे पार पाडण्यासाठी वापरण्यात येणारी परिपत्रके/ नियमावली/ शासन निर्णय यांची माहिती व प्रती, कार्यालयाचा अर्थसंकल्प, प्रत्येक कर्मचाऱ्याचे वेतन, अनुदान योजनांची माहिती, अनुदान व सवलती प्राप्त होणाऱ्यांचा तपशील, निर्णयामागची कारणे व वस्तुस्थिती या सर्वाचा समावेश होतो. एका सर्वेक्षणानुसार, ही सर्व माहिती संपूर्णपणे स्वत:हून प्रदर्शित केली तर ६७ टक्के माहिती अधिकार अर्ज कमी होऊ शकतात. मात्र, आज दहा वर्षांनंतरही हे कलम दुर्लक्षितच आहे. याचे एक छोटेसे उदाहरण म्हणजे राज्यातील टोल यंत्रणेचा कारभार पूर्णपणे अपारदर्शक असल्याने ‘टोलमध्ये झोल’ आहे, अशीच सर्वसामान्य नागरिकांची भावना आहे. यामध्ये २०१३ साली केंद्र सरकारने आदेश काढून माहिती अधिकार कायद्याच्या कलम ४ नुसार, सर्व टोल कंत्राटांची व टोल किती जमा झाला याची माहिती स्वत:हून संकेतस्थळावर प्रदर्शित करण्याचे बंधन घातले. पण महाराष्ट्रातील सार्वजनिक बांधकाम खाते व रस्ते विकास महामंडळ यांनी अडीच वर्षांत काहीच केले नाही. शेवटी जुलै २०१५ मध्ये मी या संदर्भात राज्याचे मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांच्याकडे माहिती अधिकार कायद्याच्या कलम १८ प्रमाणे तक्रार दाखल केली आणि त्यांनी त्याची तातडीने दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभाग व राज्य रस्ते विकास महामंडळाच्या टोलशी संबंधित सर्व कागदपत्रे व किती टोल जमा झाला याची माहिती संकेतस्थळावर जाहीर करण्याचे आदेश दिले. माहिती आयुक्तांच्या आदेशाच्या दणक्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने ४३ तर रस्ते विकास महामंडळाने १५ ठिकाणच्या टोलसंबंधीची सर्व कागदपत्रे व किती टोल जमा झाला याची माहिती देणारी दहा हजार कागदपत्रे त्यांच्या संकेतस्थळावर प्रदर्शित केली. यातून अर्थातच एकामागून एक टोलमधील झोल बाहेर येऊ लागले.
एकूणातच आगामी काळात हा कायदा परिणामकारक होण्यासाठी जास्तीत जास्त माहिती स्वत:हून घोषित करणे, कायदा सर्वसामान्य नागरिक, पददलित व महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न व आर्थिक तरतूद करणे, पुरेशा प्रमाणात माहिती आयुक्त नेमणे व मुख्य म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांची मालकीभावना काढून विश्वस्ताची भावना आणणे आणि कायद्याचा दुरुपयोग करणाऱ्यांवर कारवाई करणे अशा गोष्टी झाल्या तर हा कायदा खऱ्या अर्थाने क्रांतिकारक ठरेल. हा कायदा हे शस्त्र नसून ‘साधन’ आहे, ही भावना सर्वसमान्यांमध्ये रुजणे आवश्यक आहे. कारण शस्त्र हे विनाशासाठी वापरले जाते तर ‘साधन’ हे दुरुस्तीसाठी वापरले जाते. आपल्याला ही यंत्रणा नष्ट करायची नसून त्यातले दोष दुरुस्त करायचे आहेत, या भावनेने हा वापरण्याचे तारतम्य जनतेने आणि हा कायदा आपल्याला त्रास देण्यासाठी नाही, तर आपल्या व्यवस्थेत गेल्या अनेक वर्षांत निर्माण झालेल्या त्रुटी व चुकीच्या गोष्टींचे दिशादर्शन करण्यासाठी आहे, या सकारात्मक भावनेने शासकीय अधिकाऱ्यांनी या कायद्याकडे पाहायचे ठरवले, तर या कायद्याचा उद्देश सफल होऊन खरे प्रजासत्ताक निर्माण होऊ शकेल.
-विवेक वेलणकर
pranku@vsnl.com 
(लेखक पुण्याच्या सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष आहेत.)



First Published on October 11, 2015 1:34 am
Web Title: write to information act

सोंगे धरिता नाना परी रे। पूर्वी राजांकडून बहुरूपी या जमातींचा गुप्तहेर म्हणून वापर केला जायचा.

सोंगे धरिता नाना परी रे।

पूर्वी राजांकडून बहुरूपी या जमातींचा गुप्तहेर म्हणून वापर केला जायचा.

अ‍ॅड.पल्लवी रेणके | October 10, 2015 04:27 am
बहुरूपी समाज
पूर्वी राजांकडून बहुरूपी या जमातींचा गुप्तहेर म्हणून वापर केला जायचा. राजाश्रय संपल्यावर उपजीविकेसाठी गावोगाव फिरून लोकांचं मनोरंजन करणं हा एकमेव पर्याय उरला. ‘खेळतो एकला बहुरुपी रे। पहाता अत्यंत साक्षेपी रे। सोंगे धरिता नाना परी रे। बहुतचि कलाकुसरी रे॥’ समर्थ रामदासांनी ज्या समाजाचं असं वर्णन केलं त्या बहुरूपी समाजाविषयी..
‘‘काय सांगू ताई तुम्हाला आमच्या बहुरूपी समाजाची जिंदगी आणि आमचं हाल? जाईल तिथं कुणी आम्हाला विचारलं की, तुम्ही कोण्या गावाचं तर आम्ही सांगतो अमरावतीचं. आमच्या मनाला आम्ही विचारलं की, काय आहे तुमचं अमरावतीत तुमचं म्हणून सांगायला? तर उत्तर मिळतं, दुसऱ्याच्या जागेवर टाकलेल्या अनधिकृत पालात राहाणाऱ्या थकलेल्या वृद्ध कुटुंबीयांशिवाय काहीही नाही. रिकामी पडिक जागा बघून तिथं आम्ही पालं टाकतो. मालकाने उठ म्हटलं की उठतो. अशीच दुसरी जागा बघतो आणि तिथं पुन्हा पालं टाकतो. असं पिढय़ान् पिढय़ा चालू आहे. पालात जन्मायचं, तिथंच खेळायचं, मोठं व्हायचं. लगीनबी तिथंच, लेकरं तिथंच आणि मरणबी तिथंच. आमचे कर्तेधर्ते लोक मुलांबाळांसह आठ-नऊ महिने वेगवेगळ्या ठिकाणी फिरून दसरा-दिवाळी सणाच्या आधी इथं येतात. अडीच-तीन महिन्यांनंतर पुन्हा पोट भरण्यासाठी भटकंती सुरू करतात. अशी आमच्या बहुरूपी जमातीची सुमारे साठ कुटुंबं अमरावतीत आहेत. अमरावतीतच नव्हे तर संपूर्ण भारतात आमच्या मालकीची जागा नाही, घर नाही. वीज, पाणी, शौचालय या सोयी मिळण्याचा प्रश्नच नाही. त्यात भटकेपणा. त्यामुळे त्यांना त्यांची ओळखपत्रे मिळत नाहीत व शिक्षणही नाही.’’
‘‘रेशनकार्ड नाही म्हणून रेशन नाही. एखाद दुसऱ्याजवळ ते कार्ड असले तरी फिरतीवर त्याचा उपयोग होत नाही. त्यामुळे रेशन कार्ड मिळायलाच पाहिजे असं वाटत नाही. देशात कोठेही रेशन मिळू शकेल असे कार्ड मिळालं तर मात्र त्याचा त्यांना उपयोग होऊ शकेल. बँक तर आम्हाला दारातसुद्धा उभं राहू देत नाही. कायमच्या व मालकीच्या कच्च्या/पक्क्या घरात राहणाऱ्या गरिबांना धान्य स्वस्तात मिळतं. आमच्यापेक्षा जास्त पोरकं, निराधार, गरीब कोण असंल का? पण आम्हाला नाही मिळत काही.’’ आपलं दु:ख सांगत होत्या प्रमिला शमशेर औंधकर, उजाला चंदू औंधकर, मालू माणिक मिरजकर, वंदना बाबाराव औंधकर आणि बहुरूपी समाजाच्या त्यांच्या इतर नातेवाईक महिला.
अमरावती शहराच्या महेंद्र कॉलनीबाहेर असलेल्या बहुरूपी जमातीच्या पालवस्तीत बबिता राजकपूर बहुरूपी या क्रियाशील कार्यकर्तीने त्यांच्या महिलांची बैठक आयोजित केली होती. ‘बहू’ हा संस्कृत शब्द आहे. बहू म्हणजे अनेक. रूप म्हणजे ठरावीक भूमिकेचं दृष्यस्वरूप. प्राचीन काळापासून बहुरूपी जमातीचं अस्तित्व आहे. बहुरूपी भटके, अस्थिर असले तरी ते प्राचीन काळी समाजकारणात- राजकारणात महत्त्वाच्या भूमिका बजावत होते, त्यांना त्यांचा इतिहास आहे. हजारो वर्षांची परंपरा आहे. श्रीपती भट्टाच्या ‘जोतिष रत्नमाला’ या प्रसिद्ध ग्रंथात यांचा उल्लेख आहे. शिवाय समर्थ रामदासांनीही आपल्या भारुडात यांचा खालीलप्रमाणे उल्लेख केलेला आहे. ‘खेळतो एकला बहुरुपी रे। पहाता अत्यंत साक्षेपी रे। सोंगे धरिता नाना परी रे। बहुतचि कलाकुसरी रे॥’. शिवाय जटाधारी तपस्वी, गोसावी, साधू इत्यादींची सोंगे घेणाऱ्या बहुरूपीसारख्या, वेगवेगळी कला-कौशल्ये जोपासणाऱ्या भटक्या जमातींच्या भिक्षुकांचा हेरगिरीसाठी गुप्तपणे कसा उपयोग करून घ्यावा यासंबंधीची चाणक्य नीती, ख्रिस्तपूर्व चौथ्या शतकातल्या ‘कौटिलीयम अर्थशास्त्रम’ ग्रंथात लिहिलेली आहे.
प्राचीन काळी स्थिर लोकांची करमणूक ही निकडीची गरज होती. ती भागविण्यासाठी गावोगावी फिरून देवादिकांचे, पुराण-पात्रांचे सोंगे घेऊन संगीत, नृत्य, अभिनय या कलांद्वारे पुराणकथांचे कथन करणे, भजन-कीर्तन करणं, छोटे छोटे नाटय़प्रसंग अंगणात, चौकात, मंदिरासमोर सादर करणं अशा कार्यक्रमातून लोकांची आध्यात्मिक करमणूक करून सदाचार व नीतीचा प्रचार करणं आणि लोक देतील ती भिक्षा स्वीकारणं हा या जमातीचा मूळ परंपरागत व्यवसाय होय. कालांतराने लोकांच्या रुचीनुसार अध्यात्मिक करमणुकीबरोबर निखळ करमणूक करण्याची कलाही त्यांनी अवगत केली. हनुमानाच्या गुणवैशिष्टय़ाबरोबर मर्कट चेष्टाही सादर होऊ लागल्या. अस्वल-रेडा-यमराज पण सोंगात आले. साधू-संन्यासी-फकीर, चोर-पोलीस, साव-भ्रष्ट, व्यापारी-अधिकारी, लुळे-पांगळे, जर्जर म्हातारा इत्यादींची सोंगं सुरू झाली. एकाच कार्यक्रमात, लहान मुला-मुलींना, युवकांना, प्रौढांना आणि वृद्धांना खिळवून ठेवणारा हाच खरा ‘उत्कृष्ट बहुरूपी कलाकार’ अशी यांची जमातीअंतर्गत धारणा आहे. म्हणूनच यांच्या कला सादरीकरणात अचकट-विचकट, अश्लील किंवा उथळ विनोद किंवा संवाद नसतात. विश्वमित्राचा मेनकेकडून तपोभंग, मद्यधुंद इंद्राच्या दरबारातले अप्सरेचे नृत्य, सीता स्वंयवर, राधा-कृष्णाची रासक्रीडा, कृष्ण-रुक्मिणीची भेट अशा अनेक प्रसंगांत भरपूर शृंगार व्यक्त केला जातो. पण तो उत्कट या शब्दानेच वर्णणावं लागेल.
ऐतिहासिक विकास प्रक्रिया पाहिली तर पूर्वी भारतात छोटे-मोठे अनेक राजे-महाराजे होते. प्रसंगानुसार त्यांच्यात मैत्री, स्पर्धा, वैर होतं. शत्रुच्या हालचाली, जनतेची सुख-दु:खं, भाव-भावना, निष्ठा-अनिष्ठा याबाबतीतली सत्य परिस्थिती समजून घेण्यासाठी राजांकडून या जमातींचा गुप्तहेर म्हणून वापर केला जायचा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बहुरूपी बहिर्जी नाइकांचं उदाहरण बोलकं आहे. ते हेर खात्याचे प्रमुख होते. त्यांना ‘खबऱ्या’च्या रूपात मदत करणाऱ्या शेकडो बहुरूप्यांची इतिहासात नोंद मिळत नसली तरी त्यांना राजाश्रय मिळत होता. त्यामुळे त्यांना जगण्यासाठीची ऊर्मी, साधने, मोठय़ांची जवळीक, प्रतिष्ठा मिळत होती. सर्व राजांच्या क्षेत्रात हे लागू होतं. राजेशाही, बादशाही संपली. त्याबरोबर यांचा राजाश्रय संपला. मिळणाऱ्या सोयी-सुविधा संपल्या. उपजीविकेसाठी पूर्वीप्रमाणे गावोगाव फिरून लोकांचं मनोरंजन करणं हा एकमेव पर्याय उरला.
औंधकर, सातारकर, मिरजकर, खेडकर, काशीकर, पल्लाणीकर (पैठणकर), वैद्य, काळे अशी यांची आडनावं आहेत. ही आडनावं पूर्वीच्या काळातील राजांच्या राजधान्यांची किंवा राजधानीजवळच्या क्षेत्राची आठवण करून देतात. परंपरागत ज्ञान व अनुभवाच्या आधारे वैद्य घराण्याचं काम आरोग्यसेवा पुरवण्याचं होतं जे आज पण केलं जातं. जमातीत धर्माबद्दल दोन वेगळे विचारप्रवाह आहेत. पहिला, आम्ही मूळ हिंदूच. मराठी प्रांताच्या चारी बाजूला मुस्लीम राजांची राज्यं होती. त्यांच्या हालचालीबाबत हेरगिरी करताना त्यांना संशय येऊ नये म्हणून मुस्लीम नावं व रीतिरिवाज जाणीवपूर्वक स्वीकारलेले आहेत. काही पिढय़ानंतर ती रूढीच बनली. दुसरा विचार, मुस्लीम राजवटीत धर्मप्रसाराच्या मोहिमेत सापडतो. जबरदस्तीनं मुस्लीम करण्यात आलं. भयापोटी मुस्लीम धर्म अमलात आणला, पण हिंदू धर्म सोडला नाही.
हा समाज संपूर्ण भारतभर विखुरलेला असला तरी राज्यवार आणि विभागवार यांचे वेगळे गट निर्माण झाले आहेत. त्यांच्यात आपसात बेटी व्यवहार होत नाही. या सर्व गटांसह महाराष्ट्रात विखुरलेल्या बहुरूपी जमातीची लोकसंख्या सुमारे ३० हजार असावी.
लग्नाच्या जेवणात चिखलाची कडी आणि खडकाची वडी खाण्याचे आग्रहाचं निमंत्रण मोडक्या बजाईला व आंधळ्या कोंडाईला देताना गाण्यातून ‘चला चला चला, बिगी बिगी चला, लग्नाला चला, आता लग्नाला चला.’ अशी लगीनघाई करणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातल्या बहुरूप्यांचं गाणं हसत हसत पुन:पुन्हा ऐकावंसं वाटतं. हे बहुरूपी पूर्णत: हिंदू आहेत. मराठवाडय़ात या बहुरूपींना राईरंग म्हणतात, तर भंडारा जिल्ह्य़ात यांना भिंगी म्हणतात. पात्राला (भूमिकेला) अनुसरून आपला वेश जलदपणे बदलण्यात हे पटाईत आहेत. देशाच्या उत्तर-पूर्वेतले काही बहुरूपी पूर्णत: मुस्लीम आहेत. काही गट हिंदू व मुस्लीम या दोन्ही धर्माचे आचरण गुण्यागोविंदानं करतात. अमरावतीचे बहुरूपी यांच्यापैकीच आहेत. जाईल तिथं पालात राहावं लागणाऱ्या या जमातीच्या बहुतेक महिला ठिगळांच्या साडय़ा नेसलेल्या दिसतात. पुरुषांच्या वेशाचं धोतर व बंगाली टोपी हे वैशिष्टय़ आहे.
आधुनिक काळात विज्ञानाच्या वाढीबरोबर करमणुकीची साधनं वाढली. शिवाय ती घराघरात उपलब्ध झाली. काळाची मानसिकताही बदलली. त्यामुळे बहुरूपींचा हा परंपरागत व्यवसाय उपजीविकेसाठी कमकुवत ठरत आहे. बहुरूपी समाजाकडे पूर्वीसारखं आज प्रेमानं, उपयोगी दृष्टीनं पाहिलं जात नाही. बेघर, भूमिहीन व भटकी प्रवृत्ती यामुळे शिक्षण-प्रशिक्षण नाही. त्यामुळे परंपरागत व्यवसायात गुरफटून गरीब व पालात राहाण्यापलीकडे पर्याय मिळत नाही. शिक्षणासंदर्भात चौकशी करता असं कळलं की, अमरावतीतील त्यांच्या सुमारे तीनशे लोकसंख्येत आजपर्यंत रतन नसरुद्दीन औंधकर हे एकच पदवीधर व निवृत्त बीडीओ आहेत. कागदोपत्री त्यांचा धर्म हिंदू व जात बहुरूपी आहे. या व्यवसायात त्यांच्या महिला प्रेक्षकांसमोर येत नाहीत. स्त्रीपात्रसुद्धा पुरुषांनीच करायचं असतं हा त्या जमातीचा दंडक आहे. इथे पडदा नसला तरी पडद्यामागच्या साऱ्या कलाकारांची कामं महिलांना करावी लागतात. कलाकारांना सजविण्यासाठी आवश्यक नैसर्गिक रंगाची उपलब्धता, त्याची रंगप्रक्रिया, पोषाख व त्यांची स्वच्छता, इतर साधनांची जुळवाजुळव व देखभाल दुरुस्ती आणि महत्त्वाचं म्हणजे प्रत्यक्ष वेशभूषा व रंगरंगोटी करण्यासाठी पुरुषांना मदत करावी लागते. शिवाय सरपणापासून स्वयंपाकपाण्याची तयारी करून, कुटुंबातल्या लहान मुलाबाळांची काळजी घेणं ही रोजची कामं तर न चुकता महिलानांच करावी लागतात. यातूनही वेळ मिळाला तर महिला रोजंदारीवर मजुरीची कामं करायला जातात.
बहुरूपी जमातीत महिलांचं स्थान दुय्यम आहे. जात पंचायतीत महिलांना बसता येतं पण चर्चेत भाग घेता येत नाही. महिलांना घटस्फोट मिळतच नाही. कोणत्याही परिस्थितीत महिलांना पुनर्विवाह करण्यास बंदी आहे. आंतरजातीय विवाहास परवानगी नाही. जातीतल्या एका तरुणाचे जातीतल्या मुलीशी लग्न झाले होते. तरी त्याचे जातीबाह्य़ मुलीशी असलेलं प्रेमप्रकरण उघडकीस आलं. जातपंचायतीने मुलाला दोष दिला. जातीतल्या मुलीचं लग्न मोडून जातीतल्या दुसऱ्या मुलाशी लावून दिलं. हा अपवादात्मक निर्णय जातपंचायतीनं घेतला आणि त्याच्या जातीबाह्य़ प्रेमिकेशी नोंदणीकृत लग्न करण्यास भाग पाडलं.
एके काळी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात महत्त्वाची भूमिका पार पाडून प्रतिष्ठेचे व गौरवशाली जीवन जगणारा हा समाज विज्ञान तंत्रज्ञानाच्या आजच्या आधुनिक काळात मात्र पोरके, हलाखीचे आणि विकासापासून बहिष्कृत जीवन जगतो आहे. यांच्याकडील कलेचे संगोपन संवर्धन कसे होईल? यांची कला उपजीविकेसाठी भीक मागण्याचे साधन न बनता त्यांना प्रतिष्ठा मिळवून देणारे साधन कसे बनेल? यांना घर व टिकाऊ जीवनधारासह त्यांच्या आवडीप्रमाणे विकासाची संधी कशी मिळेल? त्यासाठी त्यांच्या मुला-मुलींना जीवनोपयोगी व दर्जेदार
शिक्षण कसे मिळेल? एकूण विकास प्रक्रियेत त्यांना प्राधान्य कसे मिळेल हे प्रश्न सतावणारे असले तरी महत्त्वाचे आहेत.
pallavi.renke@gmail.com
First Published on October 10, 2015 4:27 am
Web Title: polymorphism among the tribal groups