Monday, September 14, 2015

व्हॉट्सअप, डॉक?

कोणतेही तंत्रज्ञान जर योग्य पद्धतीने वापरले तर ते उपयोगीच ठरते.

डॉ. समीर भुरे | September 11, 2015 23:10 pm
‘व्हॉट्सअ‍ॅप’चाही चांगल्या प्रकारे वापर होऊ शकतो. माझा आक्षेप आहे तो त्याच्या अतिरेकी वापराला. कोणतेही तंत्रज्ञान जर योग्य
पद्धतीने वापरले तर ते उपयोगीच ठरते. अन्यथा दुष्परिणाम तुमच्याबरोबर इतरांनाही भोगावे लागतात. ‘व्हॉट्सअ‍ॅप’चे हे काही
गमतीशीर(?) अनुभव..
भाग -१
अब्जावधी लोकांना खुळं बनवून अब्जावधी डॉलर्स खिशात टाकणाऱ्या ‘व्हॉट्स अ‍ॅप’च्या त्या दोन निर्मात्यांना आधी दोन्ही हात जोडून कोपरांपासून नमस्कार करतो! ‘व्हॉट्सअप, डॉक?’, असं कुणी सहज जरी विचारलं तर डोकंच फिरतं हल्ली माझं! आज ज्याच्याकडे ‘व्हॉट्स अ‍ॅप’ नाही, त्याच्याकडे अतिशय तुच्छतेनं पाहिलं जातं! म्हणजे, सिग्नलचा लाल दिवा लागल्यावर निमूटपणे गाडी थांबवणाऱ्या वाहनचालकाकडे बेदरकारपणे गाडी हाकणारे ज्या तुच्छतेनं कटाक्ष टाकतात, तशाच तुच्छतेनं! आणि अशा अनेक तुच्छ नजरांना बळी पडून तोही बिचारा कालांतराने ‘व्हॉट्स अ‍ॅप’च्या कळपात सामील होतो आणि अल्पावधीतच त्या मायाजाळात स्वत:ला गुरफटून घेतो!
मागच्याच महिन्यात एक चिंतातुर आई तिच्या तितक्याच बेफिकीर मुलीला घेऊन माझ्याकडे आली. ‘‘डॉक्टर, काही तरी करा हो हिचं! हल्ली बोलतच नाहीय आमच्याशी ही!’’ मी त्या मुलीकडे पाहिलं. ती आपली मान खाली घालून बसली होती. मी त्या मातेला म्हटलं, ‘‘अहो, किती नम्र आहे ही!’’ ‘‘अहो, डॉक्टर, कसली डोंबलाची आलीय आज्ञाधारक? ते म्हणतात ना, खाली मुंडी, आणि ‘व्हॉट्स अ‍ॅप’ धुंडी! (अशी नवीन म्हण आलीय? हे मला माहीतच नव्हतं!) अशी अवस्था झालीय हिची! तुम्ही काहीही करा आणि हिला त्यातून बाहेर आणा हो!’’ ती आई अगदी व्याकूळ होऊन बोलत होती.
क्षणभर माझ्या डोळ्यांसमोर चित्र तरळलं, मी ‘व्हॉट्स अ‍ॅप’ व्यसनमुक्ती केंद्र’ चालवतोय! (ही आयडिया सुचली कशी नाही कोणाला अजून? सुचेल, सुचेल, काही दिवसांनी याचंही मार्केटिंग करणारे पैदा होतील!) मी त्या आईला शक्य होईल तितक्या नम्रपणे सांगितलं, ‘‘अशा गोष्टींसाठी औषधं नसतात हो! हिला समुपदेशनाची गरज आहे!’’ लगेच ती आई म्हणाली, ‘‘मग करा नं समुपदेशन! म्हणूनच तर आणलंय मी हिला इथे!’’ त्यानंतर पुढची वीस मिनिटं मी आणि ती मुलगी एकमेकांचं बौद्धिक घेत होतो. ती मुलगी मला ‘व्हॉट्स अ‍ॅप’चे फायदे काय असतात, त्याने कसं फुकटात चॅटिंग करता येतं, हे सांगत होती. (ही आणखी एक गंमत! टू चॅट म्हणजे गप्पा मारणे.. आम्ही मित्र इराण्याच्या कॅफेत किंवा पार्कातल्या कट्टय़ावर गप्पा मारायचो! अजूनही मारतो. पण आताची पिढी काहीही संवाद न साधता अशा प्रकारे गप्पा ‘मारते’!) आणि मी तिला हे वरवरून जरी फ्री वाटत असलं तरी त्यामध्ये वेळ किती खर्च होतो, डोळ्यांवर कसा ताण पडतो, हातांच्या बोटांच्या सांध्यांची कशी वाट लागते, अशा निरनिराळ्या प्रकारांनी तिला समजावून सांगत होतो. शेवटी, ‘ओके, मी विचार करते याचा’ असं ती म्हणाली आणि मी हुश्श केलं. तिच्या आईकडे उगाचच एक विजयी कटाक्ष टाकला. त्या दोघी जणी बाहेर जायला उठल्या, तेवढय़ात त्या मुलीच्या मोबाइलची चिमणी चिवचिवली आणि ती साधं थँक्सही न बोलता, मोबाइलमध्ये डोकं खुपसून माझ्या केबिनमधून बाहेर पडली!
पंधरा दिवसांनंतर पुन्हा त्या माय-लेकी माझ्याकडे आल्या तेव्हा एकदम ‘ट्रान्स्फर सीन’ होता. आता त्या दोघींचीही अवस्था ‘‘खाली मुंडी, ‘व्हॉट्स अ‍ॅप’ धुंडी’’ अशी झाली होती! मी बोलायचा क्षीण प्रयत्न केला, तेव्हा त्या माऊलीनं मला सांगितलं, ‘‘एक सेकंद हं, डॉक, हा जरा मेसेज पाठवते आणि मग आपण बोलूया!’’ दोन मिनिटं बोटांनी गप्पा मारून झाल्यावर, त्या समाधीवस्थेतून बाहेर आल्यावर तिनं माझ्याकडे पाहिलं. मी व्याकूळ होऊन तिला विचारलं, ‘‘अहो, काय हे? तुम्हाला तर या प्रकाराचा तिटकारा होता ना?’’ त्यावर, तिने ‘हाय, कम्बक्त, तूने पी ही नहीं’ असा एक कटाक्ष माझ्याकडे टाकला आणि म्हणाली, ‘‘अहो, हिच्यासाठी म्हणून मी सुरू केलं एकदाचं ‘व्हॉट्स अ‍ॅप’ आणि खरंच, किती गमतीशीर आहे हो हे! वेळ कसा जातो, ते कळतच नाही! छे बुवा, हा मेसेज जात का नाहीय?’’ शेवटचं वाक्य तिनं मला उद्देशून नक्कीच म्हटलं नव्हतं! ती मुलगी तिच्या आईला म्हणाली, ‘‘अगं, मी सांगतेय ना तुला, नेट पॅक वाढवून घे तुझं!’’ अच्छा, म्हणजे आता ती मुलगी तिच्या आईची सल्लागार झाली होती तर! मग, न रहावून मीसुद्धा त्यांना एक सल्ला देऊनच टाकला, ‘‘मला वाटतं, तुम्ही मोबाइलही नवीन घ्या. थ्री जी सपोर्ट करणारा!’’ ‘‘अय्या, खरंच की! थॅँक्स, डॉक, मला वाटतं, आपण आधी नवीन मोबाइल घेऊ या आणि नंतर नेट पॅक वाढवून घेऊ या!’’ हे शेवटचं वाक्य अर्थातच तिच्या मुलीला उद्देशून होतं! आता, त्या दोघींनाही माझ्या सल्ल्याची गरज नव्हती! त्यांच्यात ‘संवाद’ साधणारं एक नवीन अ‍ॅप त्यांना मिळालं होतं! नवीन मोबाइल कोणता घ्यायचा यावर चर्चा करत त्या बाहेर पडल्या आणि मोबाइलचा खर्च वाढला, नेट पॅकचा खर्च वाढला तरीही ‘व्हॉट्स अ‍ॅप’ कसं फ्री आहे, हे लोकांच्या गळी उतरवणाऱ्या त्या महान निर्मात्या द्वयीला मी पुन्हा एकदा कोपरापासून नमस्कार केला!
भाग -२
वर्ष १९९०
माझ्या दवाखान्यात एक रुग्ण आले. येताक्षणीच त्यांनी टेबलावर सात पाकिटे ओळीने मांडून ठेवली. आता हे कोणती जादू शिकवणार की काय, असा विचार मनात येतच होता, तेवढय़ात ते म्हणाले, ‘‘हे माझे केस!’’ त्यांचा व्याकरणाचा काही गोंधळ होतोय असं वाटून मी त्यांना म्हणालो, ‘‘तुम्हाला ही माझी केस असं म्हणायचंय का?’’
‘‘नाही, हेच केस म्हणायचंय मला.’’ इति रुग्ण, ‘‘अहो, गेले काही दिवस प्रचंड प्रमाणात केस गळती सुरू झालीय. दररोज किती गळतात ते तुम्हाला कळावं म्हणून पाकिटात गोळा करून आणलेत हे. हे पाकीट सोमवार, हे मंगळवार, हे बुधवार..’’ त्यांच्या केसचं गांभीर्य माझ्या लक्षात आलं आणि मी तातडीने उपचार सुरू केले.
वर्ष २०१५
वेळ : सोमवार, रात्री ११. माझी ‘व्हॉट्स अ‍ॅप’ची चिमणी चिवचिवली. मी मोबाइल पाहिला. स्क्रिनवर केसांच्या गुंत्याचा एक फोटो! खाली एक रडक्या चेहऱ्याचं स्माइली (?)
मंगळवार, रात्री ११.. पुन्हा ‘व्हॉट्स अ‍ॅप’चा चिवचिवाट.. पुन्हा केसांच्या गुंत्याचा एक फोटो.. रडका चेहरा, पण आता पुढे एक प्रश्नचिन्हही होतं!
बुधवार, गुरुवार, शुक्रवार.. वेळ तीच.. रात्री ११.. तेच फोटो.. केसांच्या गुंत्याचे.. फक्त आता प्रश्नचिन्हं वाढत चालली होती.. हे काय चाललंय ते मला कळेना, शेवटी मीच उलट टपाली एक प्रश्नचिन्ह पाठवले. तेव्हा कुठे त्या व्यक्तीने मला संदेश पाठवला, ‘‘डॉक्टर, मी गेला आठवडाभर तुम्हाला माझ्या गळणाऱ्या केसांचे फोटो पाठवतेय, पण तुम्ही काहीच रिस्पाँस देत नाही आहात.’’
आता यावर उत्तर देणं मला भाग होतं. मी लिहिलं, ‘‘आपली केस खूपच गुंतागुंतीची दिसतेय. पण असे चिन्हांकित संवाद साधण्यापेक्षा आपण जर समोरासमोर येऊन संवाद साधलात तर फायदा तुमचाच होईल.’’ एक रुग्ण कायमचा गमावल्याच्या दु:खापेक्षा रात्री अकरा वाजता होणारा तो चिवचिवाट कायमचा बंद झाल्याचा आनंद जास्त होता!
असाच एक तरुण रुग्ण.. आजच्या तरुण पिढीचं प्रतिनिधित्व करणारा! लठ्ठ पगाराच्या ओझ्याखाली दबून गेलेला! आपला रक्तदाब वाढलंय,
असं सतत वाटायचं त्याला! त्याच भीतीपोटी रोज रात्री मला त्याचा
‘व्हॉट्सअ‍ॅप’ मेसेज यायला लागले. आत्ता प्रेशर १२०/८० आहे, आत्ता ११०/८२.. तुला काहीही झालेलं नाही, तुझं प्रेशर नॉर्मल असतं, असं सांगून मी थकलो. शेवटी मी त्याच्या त्याच त्याच मेसेजेसना उत्तर देणं बंद केलं. एका रात्री तर त्याने कहरच केला. दर तासांनी तो घरच्या मशीनवर प्रेशर बघून मला तसे मेसेजेस पाठवायला लागला. माझं काहीच उत्तर नाही हे पाहिल्यावर त्याने मला विचारलं, (अर्थात ‘व्हॉट्सअ‍ॅप’वरच!) ‘‘हे काय, तुम्ही काहीच प्रतिक्रिया देत नाही.. काय करू, काही तरी सांगा ना!’’ आता यावर, मी ‘‘जमल्यास ते मशीन बाहेर फेकून दे,’’ असं उत्तर दिलं तर त्यात माझं काही चुकलं का? तुम्हीच सांगा!
आत्ताच जेवायला बसलो असताना ‘व्हॉट्सअ‍ॅप’ची चिमणी चिवचिवली. एक रुग्ण म्हणतोय, ‘‘पोट जरा बिघडल्यासारखं वाटतंय.’’ हे वाचून माझ्या पोटात गोळा आलाय! या रुग्णाला ‘व्हॉट्सअ‍ॅप’वर ब्लॉक करावं की माझं ‘व्हॉट्सअ‍ॅप’ अकाऊंटच डीलीट करून टाकावं, या पेचात मी पडलोय!
त्या दिवशी मुंबईच्या कुप्रसिद्ध ट्रॅफिक जॅममधून वाट काढत काढत घरी चाललो होतो. एका चौकात सिग्नलच्या लाल दिव्याला गाडय़ा चक्क थांबल्या होत्या! काही सेकंदांनी उजव्या बाजूला जाण्यासाठीचा सिग्नल सुरू झाला, पण माझ्या बाजूची गाडी काही हलेना. त्याच्या मागचे वाहनचालक लागले बोंबलायला! लाल दिवा असला तरी थांबत नाही, इकडे तर हिरवा दिवा लागलाय तरी जाता येत नाही म्हणजे काय? त्यांच्या स्वाभिमानाला जणू ठेच लागली होती! न राहवून मी त्या गाडीच्या खिडकीवर ठोठावलं. काच खाली झाली तर चालक माझा रुग्णच निघाला. महाशय मोबाइलवर काही तरी पाहण्यात दंग होते. ‘‘ओ, सॉरी! व्हॉट्सअप, डॉक?’’ असं काहीबाहीसं पुटपुटत स्वारी भरधाव वेगाने निघूनही गेली. या वेळी लाल दिवा असूनही! आता पुढच्या वेळी हा येईल तेव्हा त्याला चांगलंच झापायचं, असं मी मनोमन ठरवून टाकलं.
एक महिन्यानंतर तो माझ्याकडे आला.. आला तो लंगडतच! हातात एक वॉकर.. आतमध्ये आला, खुर्चीवर बसून म्हणाला, ‘‘व्हॉट्सअप, डॉक?’’
‘‘माझं सोड, तुझं हे काय झालंय? हा वॉकर?’’ मी विचारलं.
‘‘बघा ना, काय वेळ आलीय? हातातली जॉनीवॉकर जाऊन आता हा वॉकर आलाय!’’ त्याच्या या उत्तरावर काय बोलावं तेच कळेना! कोणाची विनोदबुद्धी, कधी जागृत होईल, काही सांगता येत नाही, हेच खरं! मनावर खूप ताबा ठेवून मी त्याला विचारलं, ‘‘जरा नीट सांगशील का, काय झालं ते?’’
‘‘तुम्हाला माहीतच आहे, मला गाडी चालवताना ‘व्हॉट्सअ‍ॅप’चे मेसेजेस वाचायची सवय आहे!’’ हे सांगताना अशा चांगल्या सवयी असाव्यात माणसाला, असा त्याचा आविर्भाव होता.
‘‘आहे म्हणजे होती.’’ तो पुढे सांगायला लागला, ‘‘तर त्या दिवशी मी गाडी चालवताना सौभाग्यवतींनी त्यांचा एक फोटो पाठवला. नुकताच हेयर कट करून आल्यानंतर काढलेला! तो फोटो पाहून दचकलोच मी! आणि कचकन् ब्रेक दाबला. मागून येणारी गाडी आदळली माझ्या गाडीवर! आणि हे असं झालं!’’ आता बोला! ‘व्हॉट्सअ‍ॅप’मुळे घटस्फोट होतात हे नुकतंच वाचलं होतं मी, पण असा विचित्र अपघातही होऊ शकतो, याचं प्रत्यक्ष उदाहरण माझ्या डोळ्यांसमोर होतं! या विचित्र अपघाताचे फोटो तुमच्या व्हॉट्सअ‍ॅपवरही आले असतीलच! फक्त त्याच्यामागचं कारण तुम्हाला आत्ता कळलं असेल!
हे सगळं वाचल्यावर तुमचा जर असा समज झाला असेल की ‘व्हॉट्सअ‍ॅप’बद्दल माझ्या मनात आकस आहे, तर तो चुकीचा आहे. ‘व्हॉट्सअ‍ॅप’चाही चांगल्या प्रकारे वापर होऊ शकतो. माझा आक्षेप आहे तो त्याच्या अतिरेकी वापराला. कोणतेही तंत्रज्ञान जर योग्य पद्धतीने वापरले तर ते उपयोगीच ठरते. पण, त्याचा अतिरेक झाला किंवा त्याच्या आहारी गेलात तर त्याचे दुष्परिणाम तुमच्याबरोबर इतरांनाही भोगावे लागतात, वरची सारी उदाहरणे हेच तर सांगतात!
डॉ. समीर भुरे -samirbhure@gmail.com
First Published on September 12, 2015 1:05 am
Web Title: whatsapp experience

निबंधलेखनाची तयारी

निबंधलेखनाची तयारी

मुख्य परीक्षेतील निबंधलेखनाच्या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास कसा करावा, याविषयीचे मार्गदर्शन.

अपर्णा दीक्षित | September 6, 2015 18:32 pm
यूपीएससी- मुख्य परीक्षेतील निबंधलेखनाच्या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास कसा करावा, याविषयीचे मार्गदर्शन.
विद्यार्थी मित्रहो, मागील लेखांत यूपीएससी परीक्षेच्या प्राथमिक तयारीविषयी आपण सविस्तर चर्चा केली. आता मुख्य परीक्षेतील निबंधाच्या विषयापासून सुरुवात करूयात. यूपीएससीच्या मुख्य परीक्षेमधील निबंधाचा पेपर हा महत्त्वाचा तसेच अतिशय आव्हानात्मक असा घटक आहे. २०१३ पर्यंत दिलेल्या सहा विषयांपकी एक विषय निवडून त्यावर तीन तासांमध्ये २,५०० (कमाल मर्यादा) शब्दांमध्ये निबंध लिहिणे अपेक्षित होते. या पेपरसाठी २५० गुण निर्धारित केले आहेत. मात्र, २०१४ पासून २५० गुणांसाठी उमेदवारांनी दोन विषयांवर निबंध लिखाण करणे अपेक्षित आहे.
पहिल्या प्रकारच्या निबंधातून विद्यार्थी एखाद्या तत्त्वविचाराचा अमूर्त पातळीवर कसा विचार करतो, तसेच संबंधित तत्त्वविचार समाजजीवनाच्या विभिन्न क्षेत्रांशी कसा जोडतो याची चाचपणी केली जाते. त्याद्वारे विद्यार्थ्यांच्या विचारव्यूहाची मांडणी मोजली जाते. तद्वतच संबंधित तात्त्विक विधानाचे राजकीय, सामाजिक, आíथक आणि भौगोलिक संदर्भ दाखवता येणे अपेक्षित आहे. तत्त्वविचारांवर आधारलेल्या निबंधाचा लाभ सामान्य अध्ययनाच्या पेपर ४ मधील नीती, सचोटी, तत्त्वज्ञान आणि अभिवृत्ती या अभ्यासघटकांना होतो.
दुसऱ्या प्रकारच्या निबंधाद्वारे विद्यार्थ्यांचे समकालीन घडामोडींचे आकलन, बहुपदरी आणि खोलवर आहे का, याचीचाचणी केली जाते. निबंध लेखनात वर्तमान घडामोडींमागील भिन्न आयाम उलगडून दाखविण्याची क्षमता विकसित करावी लागते. निबंध विषयामध्ये चांगले गुण मिळवून एकंदरीत गुणांची बेरीज वाढवणे शक्य आहे, तर निबंध विषयामुळे एकंदरीत गुणांवर नकारात्मक परिणाम होणे हेदेखील संभव आहे. निबंधाच्या बाबतीत हे लक्षात घेणे आवश्यक आहे की, निबंध हा प्रत्येक व्यक्तीच्या विचारांचा, मतांचा, मूल्यांचा ठसा असतो. यूपीएससी उमेदवारांकडून दिलेल्या विषयाबद्दल माहितीबरोबरच योग्य विश्लेषण व अनुमानांची अपेक्षा करते. म्हणूनच आपली मते, वैचारिक कल, संप्रेषण कौशल्ये या सगळ्याचा परिपाक निबंधात उतरणे अपेक्षित आहे.अनेक विद्यार्थ्यांचे असे मत असते की, सामान्य अध्ययनाच्या इतर तयारीमधूनच निबंधाच्या घटकाचीसुद्धा तयारी होते. मात्र, तयारीच्या या टप्प्यावर आपण हे लक्षात घेतले पाहिजे की, सामान्य अध्ययनाच्या इतर घटकांप्रमाणेच निबंधाच्या घटकाकरता विशिष्ट तयारी करणे गरजेचे असते. ही तयारी करीत असताना विषयाचे ज्ञान संपादन करणे, स्वत:चा वैचारिक कल व मते निश्चित करणे आणि लिखाणाचा सराव करणे या सगळ्या टप्प्यांचे क्रमवार नियोजन करावे लागते. याकरता पुरेसा वेळ द्यावा लागतो. तसेच सामान्य अध्ययनाच्या इतर पेपरप्रमाणे लेखनाचा भरपूर सराव करावा लागतो. दिलेल्या विषयांशी प्रामाणिक राहून सलग तीन तास विचारलेल्या विषयांवर गुणवत्तापूर्ण लिखाण करणे, योग्य माहितीचा वापर करणे, मते आणि विश्लेषण यांची सांगड घालणे या सगळ्याकरता तयारीच्या नियोजनामध्ये वेगळा वेळ द्यावा लागतो. परीक्षेमध्ये यशस्वीरीत्या निबंध लेखन करण्यासाठी तयारीच्या टप्प्यावर भरपूर सराव केलेला असणे आवश्यक आहे. याकरता काय व कसे काम करावे हे आपण पाहणार आहोत.
निबंधाच्या प्रश्नपत्रिकेतील आवश्यक बाबी
विषयाचा आवाका आणि मर्यादा योग्य रीतीने समजून घ्याव्यात.
विचारांतील व मांडणीतील स्पष्टता.
वैचारिक प्रक्रिया.
विषयासंबंधी स्पष्ट भूमिका.
या सर्व गोष्टी लक्षात घेऊन निबंधाच्या पेपरचा सराव करणे गरजेचे आहे. या पेपरमधून तुमच्याकडे असलेल्या माहितीऐवजी, तुम्ही त्या माहितीतून कोणता दृष्टिकोन परावíतत करता हे महत्त्वाचे ठरते.
निबंधलेखनाची तयारी
निबंध हा विशेष लेखन प्रकार आहे हे लक्षात ठेवले पाहिजे आणि म्हणूनच निबंधासाठी लेखनाचा सातत्याने सराव केला पाहिजे. म्हणूनच योग्य शब्दमर्यादेत व कालमर्यादेत लिखाणाचा नियमित सराव करावा. बऱ्याच वेळा विद्यार्थी वाचनावर व वाचलेले लक्षात ठेवण्यावर बहुतेक वेळ खर्च करतात. परंतु लिखाणदेखील अभ्यासाचा नियमित भाग बनले पाहिजे. एकूण अभ्यासाचा साधारण २० टक्के वेळ लिखाणासाठी राखून ठेवला पाहिजे. तसेच या लिखाणामध्ये विचारपूर्वक केलेल्या, सर्जनशील लिखाणाचादेखील समावेश असावा. अशा प्रकारे केलेले लिखाण शिक्षकांकडून, जाणकारांकडून अथवा स्वत: तपासावे. लिखाणातील आवश्यक सुधारणा कोणत्या हे लक्षात घेऊन योग्य ते बदल करावेत. अशा सरावामधून लिखाणाचा वेग, शैली, अर्थपूर्ण शब्दांचा लिखाणातील समावेश व अचूक मजकूर मांडण्याची कौशल्ये विकसित होतात. या सर्वातून निबंध लेखनावर सकारात्मक प्रभाव पडतो. दिलेल्या शब्दमर्यादेत अर्थपूर्ण लिखाण करणे सरावानेच जमते. या सर्व बाबींकडे दुर्लक्ष केल्यास आपल्या अंगी क्षमता व प्रतिभा असली तरीदेखील मोठा फटका बसू शकतो.‘निबंधात काय लिहावे?’ या प्रश्नाचे उत्तर सखोल वाचनात व ताíकक विचारांत दडलेले आहे. सामान्य अध्ययनाच्या इतर पेपरपेक्षा हा पेपर वेगळा ठरतो, याचे कारण याकरता कोणताही ठरावीक अभ्यासक्रम निश्चित केलेला नाही. तसेच निबंधाचे कोणते विषय येऊ शकतील याचा तंतोतंत अंदाज कुणीही वर्तवू शकत नाही. परंतु देशभरातील तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील नुकत्याच घडून गेलेल्या घटनांवरून अपेक्षित निबंध विषयांचा साधारण अंदाज येऊ शकतो. याचबरोबर सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय वर्तुळातील घडामोडीदेखील या दृष्टीने महत्त्वाच्या ठरतात.
एकाच मुद्दय़ाचे अवलोकन विविध दृष्टिकोनांतून केले जाऊ शकते. अनेक विद्यार्थी निबंधाच्या विषयाकडे केवळ दोनच दृष्टिकोनांतून पाहू शकतात. परंतु कोणत्याही विषयाला अर्थाचे अनेक कंगोरे असतात आणि म्हणूनच उमेदवारांनी स्वत:ला मर्यादित दृष्टिकोनांमध्ये अडकवून ठेवू नये. परंतु याचा अर्थ असा नाही की दिलेल्या विषयावर अनेक दृष्टिकोनांतून वरवरचे लिखाण केले जावे. प्रत्येकाने एक ठरावीक दृष्टिकोन, त्यातून निर्माण होणाऱ्या भूमिका यांचा समतोल साधत स्वत:चा ठसा उमटणारे लिखाण करणे अपेक्षित आहे. अनेक वेळा निबंधाच्या विषयासंदर्भातील काही मुद्दे आपल्याला पटत नसतात. परंतु आपले लिखाण ‘योग्य’ व ‘तटस्थ’ असावे या हट्टापायी आपण त्या मुद्दय़ांचेदेखील समर्थन करतो. यामुळे लिखाणात कच्चे दुवे तयार होतात आणि असे लिखाण निबंध तपासणारी व्यक्ती लगेचच ओळखू शकते. म्हणूनच जे आपल्याला पटत नाही ते पटवून देण्याचा अनाठायी प्रयत्न करू नये. याचबरोबर जे मुद्दे आपण पटवून देत आहोत ते नीतीनियमांना, सांविधानिक विचारप्रणालीला व तर्काला धरून असावेत.कोणत्याही निबंधासाठी लिखाणाची शैली व भाषा हे महत्त्वाचे घटक आहेत. प्रत्येकाने आपली स्वतंत्र लेखनशैली विकसित केली पाहिजे. लिखाण सुटसुटीत, अर्थवाही आणि मुद्देसूद असावे. हे लिखाण विचारपूर्वक व ठाम असावे. मात्र ठामपणे मते मांडत असताना त्यात उद्धटपणा नसावा. निबंधामधून ठामपणे व्यक्त केलेल्या मतांचे व विश्लेषणाचे जाळे असावे. आक्रमक अथवा अलंकारिक भाषा वापरून वाचणाऱ्यावर प्रभाव पडतोच असे नाही. तसेच अशी भाषा वापरल्याने चांगले गुण मिळतात हा समजदेखील चुकीचा आहे. निबंधाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत ठरावीक लयीत लिखाण होणे अपेक्षित आहे. भावनांच्या आहारी जाऊन केलेले लिखाण अथवा केवळ माहितीची जंत्री असणारे लिखाण टाळावे. अर्थपूर्ण व प्रभावी निबंध लिहिण्याची प्रक्रिया अनेक वेळा थकवा आणणारी किंवा कंटाळवाणी असू शकते. मात्र कोणत्याही प्रकारच्या अभ्यासपूर्ण लिखाणाच्या सुरुवातीच्या टप्प्यावर असे वाटणे साहजिक आहे. त्यामुळे खचून न जाता सातत्यपूर्ण प्रयत्न करत राहणे गरजेचे आहे.
First Published on September 7, 2015 2:01 am
Web Title: essay writing

Sunday, September 13, 2015

मानसशास्त्राचा अभ्यास व संधी – मनाचिये गुंती..

मानसशास्त्राचा अभ्यास व संधी – मनाचिये गुंती..

मानसशास्त्र विषयाचे पदवी- पदव्युत्तर अभ्यासक्रम, हे अभ्यासक्रम उपलब्ध असणाऱ्या शिक्षणसंस्था आणि त्यातील करिअर संधींचा

September 12, 2015 18:59 pm
मानसशास्त्र विषयाचे पदवी- पदव्युत्तर अभ्यासक्रम, हे अभ्यासक्रम उपलब्ध असणाऱ्या शिक्षणसंस्था आणि त्यातील करिअर संधींचा सविस्तर परिचय-
एखादी तरल भावकविता लिहिणाऱ्या कवींपासून थेट विज्ञानाच्या संशोधकांपर्यंत, प्रत्येकासाठी, अदृश्य मानवी मन हा कायमच कुतूहलाचा विषय राहिला आहे. मानवी मनाचा आणि मानवी वर्तणुकीचा विज्ञाननिष्ठ दृष्टिकोनातून केलेला शास्त्रोक्त अभ्यास म्हणजेच मानसशास्त्र (सायकॉलॉजी).
खरे पाहता मानसशास्त्राच्या अभ्यासाचा उगम ग्रीक संस्कृतीत सापडतो. साधारण एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत मानसशास्त्र हा तत्त्वज्ञान शास्त्राचाच एक भाग मानला जात असे. भारतात १९१६ साली सर्वप्रथम कोलकाता विद्यापीठात ‘एक्स्पिरिमेंटल सायकॉलॉजी’ या अभ्यासविषयाचा अंतर्भाव करण्यात आला.
जागतिकीकरण, झपाटय़ाने होणारे शहरीकरण, आरोग्य सेवा उद्योगात होत असलेली जागतिक वाढ, मानवी आरोग्याबद्दलची वाढती जागरूकता, वाढते वैयक्तिक आणि सामाजिक ताणतणाव, वाढती गुन्हेगारी या सर्व घटकांचा
विचार केल्यास मानसशास्त्राच्या अभ्यासकांना काम करायला मोठा वाव आहे, हे सुस्पष्ट आहे.
मानसशास्त्राच्या क्षेत्रात करिअर करायचे असेल तर मानवी भावनांचा आणि त्यांच्या वर्तणुकीचा अर्थ लावण्याची मनापासून आवड, संवेदनशीलता, तारतम्य, सतत निरीक्षणे घेण्याची आणि त्यातून निष्कर्षांप्रत पोहोचण्याची चिकाटी आणि संयम, मेहनत या गोष्टी खूप आवश्यक ठरतात. बहुतेकदा या कार्यक्षेत्रातील व्यक्ती, आरोग्य क्षेत्रातील अथवा समाजातील अन्य व्यावसायिकांच्या सहकार्याने काम करत असल्याने संघभावना आणि सामंजस्य हेही स्वभावात िबबवणे गरजेचे ठरते.
अनेक महाविद्यालयांमध्ये तसेच विद्यापीठ स्तरावर मानसशास्त्रातील विविध पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणक्रम उपलब्ध असलेले दिसतात. सामान्यत: कोणत्याही अभ्यासशाखेतून १०+२ शिक्षण पूर्ण केल्यानंतर मानसशास्त्रातील पदवी शिक्षणक्रम पूर्ण करता येतो. मानसशास्त्राचे उपयोजन व्यवसाय-उद्योगाच्या अनेक शाखांतून आणि विविध स्तरांतील समाज घटकांसाठी होताना दिसते. याचाच परिणाम म्हणून मानसशास्त्रातील पदव्युत्तर शिक्षणात अनेक अभ्यासशाखा समाविष्ट झालेल्या दिसून येतात.
क्लिनिकल सायकॉलॉजी- या प्रकारातील तज्ज्ञ रुग्णालये, आरोग्य केंद्रे आदी ठिकाणी काम करतात. भावनिकदृष्टय़ा दुर्बल, मनोरुग्ण किंवा प्रदीर्घ आजारामुळे त्रस्त रुग्णांवर उपचार करून त्यांच्या मनाला उभारी देण्याचे काम क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट करतात. रुग्णाच्या मानसिक समस्यांच्या मुळापर्यंत जाऊन त्यावर ते उपाय सुचवतात.
क्लिनिकल न्यूरो सायकॉलॉजी- मेंदूच्या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांच्या मनोवस्था सांभाळणे किंवा तत्संबंधी अडचणी सोडवणे.
समुपदेशन मानसशास्त्र (कौन्सेिलग सायकॉलॉजी) – या विषयाचे तज्ज्ञ समाजातील सर्व घटकांच्या (स्त्री, पुरुष, वृद्ध) कौटुंबिक किंवा नातेसंबंधांतील अडचणींवर समुपदेशन करतात.
शैक्षणिक मानसशास्त्र – शाळकरी, महाविद्यालयीन विद्यार्थी यांना भेडसावणाऱ्या मानसिक समस्या तसेच पालक, पाल्य, शिक्षक यांना ज्या समस्यांना सामोरे जावे लागते, त्यांचा अभ्यास करून मुलांच्या सक्षम, निकोप वाढीसाठी योग्य समुपदेशन करतात.
औद्योगिक मानसशास्त्र (इंडस्ट्रियल सायकॉलॉजी) – या शाखेतील तज्ज्ञ सरकारी, खासगी तसेच अन्य व्यवसायातील निगडित समस्यांचा अभ्यास करून कामगारांच्या कार्यपद्धतीत, मानसिकतेत सुधारणा घडवून आणत उत्पादन क्षमता आणि कार्यक्षमतेत सुधार घडवतात.
क्रीडा मानसशास्त्र (स्पोर्ट्स सायकॉलॉजी) – या विषयातील तज्ज्ञ खेळाडूंच्या मनोवस्थेचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करून त्यांची  कामगिरी उंचावण्यासाठी योग्य ती उपाययोजना करतात.
गुन्हे तपासासाठी मानसशास्त्र (क्रिमिनल सायकॉलॉजी) – गुन्हेगार, कैदी, आरोपी शोधण्यासाठी गुन्हा कोणत्या मानसिकतेतून घडला असेल हे शोधून काढत या विषयातील तज्ज्ञ व्यक्ती गुन्हेतपासात योगदान देतात. गुन्हेगार किंवा गुन्ह्य़ाने पीडित व्यक्तींचे समुपदेशनही या अंतर्गत केले जाते.
मानसशास्त्राचे विविध शिक्षणक्रम उपलब्ध असणाऱ्या शिक्षणसंस्था
* सेंट झेवियर महाविद्यालय, मुंबई.
वेबसाइट- www.xaviers.edu
* ना. दा. ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई.
वेबसाइट- www.sndt.ac.in
* रामनारायण रुईया महाविद्यालय, माटुंगा, मुंबई.
वेबसाइट- www.ruiacollege.edu
* मुंबई विद्यापीठ, कालिना. (मानसशास्त्र विभाग) – पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम (क्लिनिकल सायकॉलॉजी, कौन्सेिलग सायकॉलॉजी, इंडस्ट्रियल सायकॉलॉजी, ऑर्गनायझेशनल सायकॉलॉजी,
सोशल सायकॉलॉजी). पीएच.डी. आणि अ‍ॅडव्हान्स्ड डिप्लोमा कोर्स इन कौन्सेिलग सायकॉलॉजी, अ‍ॅडव्हान्स्ड डिप्लोमा कोर्स इन क्लिनिकल सायकॉलॉजी, अ‍ॅडव्हान्स्ड डिप्लोमा कोर्स इन इंडस्ट्रियल सायकॉलॉजी . कालावधी- एक वर्ष. अर्हता- मानसशास्त्र विषयातील पदव्युत्तर पदवी. संबंधित विषयात स्पेशलायझेशन असल्यास प्राधान्य मिळू शकते. वेबसाइट- www.mu.ac.in
* मुंबईच्या रुपारेल, कीर्ती, के. जे. सोमया आणि जयहिंद महाविद्यालयात मानसशास्त्र विषयक अभ्यासक्रम शिकवले जातात.
* निर्मला निकेतन कॉलेज ऑफ सायकॉलॉजी, मुंबई.
* सिम्बॉयसिस कॉलेज ऑफ आर्ट्स अ‍ॅण्ड कॉमर्स, पुणे.
* फग्र्युसन कॉलेज, पुणे.
मानसशास्त्राचा पदवी अभ्यासक्रम, पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम (इंडस्ट्रियल सायकॉलॉजी आणि क्लिनिकल सायकॉलॉजी).
पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन कौन्सेिलग सायकॉलॉजी,
कालावधी- एक वर्ष. अर्हता- संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी.
वेबसाइट- www.fergusson.edu
* सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (मानसशास्त्र विभाग) अभ्यासक्रम- एमए आणि पीएच.डी. इन सायकॉलॉजी
वेबसाइट- www.unipune.ac.in
* नागपूर विद्यापीठ (मानसशास्त्र विभाग)- एमए आणि पीएच.डी. वेबसाइट- www.nagpurunivercity.org
* हिस्लॉप कॉलेज, नागपूर – बीए आणि एमए इन सायकॉलॉजी ई-मेल- principal@hislopcollege.ac.in
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ (मानसशास्त्र विभाग)- एमए आणि पीएच.डी.
ई-मेल- head.psychology@bamu.net
मानसशास्त्राचे उच्च शिक्षण देणाऱ्या इतर राज्यांतील शिक्षण संस्था
* पीएच. डी.(स्ट्रेस अ‍ॅनालिसिस) – युनिव्हर्सटिी ऑफ दिल्ली, वेबसाइट- director@ducc.du.ac.in
* एम. फील. अप्लाइड सायकॉलॉजी – जस्टीस बशीर अहमद विमेन्स कॉलेज, तामिळनाडू.
वेबसाइट- jbascollege@gmail.com
* इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायकॉलॉजिकल रिसर्च, बंगळुरू – पदव्युत्तर तसेच पदवी शिक्षणक्रम उपलब्ध आहेत.
वेबसाइट- www.iipr.in
* इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ, दिल्ली.
* इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेत ‘ह्य़ुमॅनिटीज अ‍ॅण्ड सोशल सायन्सेस’ या शाखेअंतर्गत मानसशास्त्रातील पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणक्रम शिकवले जातात.
(लखनौ, वाराणसी, दिल्ली, रुरकी, कानपूर)
वेबसाइट- www.iit.ac.in
करिअर संधी
मानसशास्त्राच्या अभ्यासकांना प्रामुख्याने, मानसशास्त्राचे शिक्षक-प्राध्यापक तसेच आरोग्य सेवा उद्योग, सुपरस्पेशालिटी रुग्णालये येथे समुपदेशक म्हणून नोकरीच्या संधी मिळू शकतात. नजीकच्या भविष्यात इंडस्ट्रियल किंवा ऑर्गनायझेशनल सायकॉलॉजीमधील नोकरीच्या संधी विस्तारण्याचे संकेत आहेत. मानसशास्त्रीय अभ्यासाचा उपयोग मीडिया सायकॉलॉजी म्हणजेच दृक्श्राव्य माध्यमांतून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांचा, बातम्यांचा जनमानसावर होणारा परिणाम अभ्यासण्यासाठीही केला जातो.
मानसशास्त्रातील पदवी शिक्षण-
सामाजिक कार्यकर्ता, मनुष्यबळ सहायक, आरोग्य प्रशिक्षक अशा
नोक ऱ्या आरोग्य सेवा क्षेत्रातील उद्योग आणि मानसिक रुग्ण सेवा संस्थांमध्येमिळू शकतात.
मानसशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण-
मानसशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना
रुग्णालये, शाळा-महाविद्यालये, औद्योगिक क्षेत्रांत समुपदेशक म्हणून नोकरीची संधी मिळू शकते.
मानसशास्त्रात एम.फिल., पी.एच.डी-
महाविद्यालये, मनोरुग्णालये, समुपदेशन केंद्रे येथे शिक्षक, समुपदेशक, सल्लागार म्हणून करिअर करता येईल.
– गीता सोनी , geetazsoni@yahoo.co.in
First Published on September 14, 2015 1:03 am
Web Title: psychology education and career opportunities

मपीएससी मंत्र- मुलाखतीची पूर्वतयारी

मपीएससी मंत्र- मुलाखतीची पूर्वतयारी

स्पर्धापरीक्षांच्या मुलाखतीची तयारी करताना सर्वात आधी सकारात्मक दृष्टिकोन विकसित करणे आणि गैरसमजांना थारा न

फारूक नाईकवाडे | September 12, 2015 19:03 pm
स्पर्धापरीक्षांच्या मुलाखतीची तयारी करताना सर्वात आधी सकारात्मक दृष्टिकोन विकसित करणे आणि गैरसमजांना थारा न देणे या गोष्टी आवश्यक असतात. त्याविषयी..
स्पर्धापरीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व उमेदवारांनी अब्राहम िलकनचे एक वाक्य नेहमी लक्षात ठेवायला हवे. ते असे की, यशाच्या ध्येयाप्रती प्रयत्नरत उमेदवाराच्या प्रवासात यशाच्या संकल्पाशिवाय दुसरी कोणतीही बाब महत्त्वपूर्ण असू शकत नाही. राज्य लोकसेवा आयोगाची राज्यसेवा मुख्य परीक्षा अलीकडेच संपली. मुख्य परीक्षा संपली की तीन-चार दिवसांच्या लहानशा ब्रेकनंतर मुलाखतीची तयारी व इतर स्पर्धापरीक्षांची पूर्व, मुख्य परीक्षानिहाय तयारी तुमच्या वेळापत्रकाप्रमाणे सुरू करावी.
राज्य लोकसेवा आयोगाच्या प्रसिद्ध झालेल्या परीक्षांच्या अंदाजित वेळापत्रकात बदल हा नेहमीच ठरलेला असतो. पण म्हणून ‘जेव्हा होईल तेव्हा बघू’ असे धोरण आपल्या वेळापत्रकाचा भाग कधीच असू नये. राज्य लोकसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा संपल्यानंतरच्या लेखात उमेदवारांना सांगितले होते की, पूर्व परीक्षेच्या निकालाची चिंता न करता आपण मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरणार आहोतच असे गृहीत धरून मुख्य परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात करावी. जेणेकरून पूर्व परीक्षेत यशाने हुलकावणी दिली तरी मधला काळ मुख्य परीक्षेच्या अभ्यासासाठी वापरल्याने पुढच्या प्रयत्नांची तयारी भक्कम होते आणि स्पध्रेत आपली दावेदारी कायम राहते. स्पर्धापरीक्षा तयारीचे काही अतिरिक्त नियम आहेत. त्यापकी हा महत्त्वाचा नियम आहे. म्हणूनच आयोगाच्या वेळापत्रकानुसार आपल्या अभ्यासाचे वेळापत्रक गतिशील ठेवावे.
याच धर्तीवर मुख्य परीक्षा दिलेल्या सर्व उमेदवारांनी मुलाखतीसाठी पात्र ठरू किंवा नाही याचे आडाखे न बांधता त्यासाठीची सर्वसाधारण तयारी सुरू ठेवावी. मुख्य परीक्षेत यशस्वी होणारे उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरतीलच. पण अयशस्वी झालेले उमेदवार पुढच्या प्रयत्नांसाठी कार्यरत होतील. मुलाखतीची तयारी हा विषय वस्तुनिष्ठ स्वरूपाचा किंवा दीघरेत्तरी स्वरूपाचा एखादा पेपर सोडविण्यापुरता मर्यादित नाही. मुलाखतीचा थेट संबंध उमेदवारांच्या व्यक्तिमत्त्वाशी असतो. व्यक्तिमत्त्व विकसन ही निरंतर चालणारी प्रक्रिया असते. त्यासाठी नियोजनपूर्वक प्रयत्न आवश्यक असतात.
मुलाखतीसाठी निवड झाली की साहजिकच उमेदवारांना त्याचा आनंद असतो, पण त्याच प्रमाणात दबावसुद्धा जाणवतो. जे उमेदवार पहिल्यांदाच मुलाखत देत आहेत, त्यांच्यावर तर मोठा दबाव असतो. मुलाखतीच्या तयारी दबावात येऊन करणे योग्य नाही. अपेक्षित यश मिळविण्यासाठी तुमचा दबाव सकारात्मक ऊर्जेत परावíतत व्हायला हवा.
मुलाखतीची तयारी करताना उमेदवारांना येणाऱ्या तणावाचे मुख्य कारण म्हणजे त्यांना आपल्या कमतरता ठाऊक असतात. पण हे लक्षात घ्यायला हवे की, उणिवा, कमतरता असणे नसíगक आहे. मुलाखतीच्या तयारीसाठी मिळणाऱ्या दोन-तीन महिन्यांच्या कालावधीत त्या दूर करणे हे अजिबातच शक्य नाही. अशा परिस्थितीत सर्वपथम आपले कच्चे-पक्के दुवे समजून घ्यावेत आणि इच्छाशक्ती आणि दृढ आत्मविश्वासाच्या बळावर उणिवांना सामोरे जाण्याचा प्रयत्न करावा.
काही उमेदवारांना काही बाबतीत साशंक असतात. मुलाखतीबद्दल चुकीच्या लोकांकडून ऐकलेल्या निराधार माहितीमुळे त्यांची चुकीची धारणा झालेली असते. त्या कल्पना विस्तारातच ते उमेदवार मश्गुल असतात. उमेदवारांचा अहंकार- त्यांचे स्वत:बद्दलचे अवास्तव मत फसवे तितकेच धोकादायक असते. अशा सर्व उणिवा-कमतरता जाणून, तणावमुक्त व दबावमुक्त राहून सहजरीत्या मुलाखतीची तयारी करता यायला हवी.
मुलाखतीबाबतचे समज-गरसमज दूर होण्यासाठी सर्वात प्रभावी उपाय म्हणजे याआधी मुलाखतीस सामोरे गेलेल्या यशस्वी-अयशस्वी उमेदवारांशी चर्चा करणे. वेगवेगळ्या मुलाखतींचा अनुभव समजून घेतल्यास मुलाखतीची तयारी आणि विचारांना योग्य दिशा सापडू शकते. पूर्व व मुख्य परीक्षेबाबतचा दृष्टिकोन विकसित करणे, त्याबाबतचे गरसमज दूर होणे ही तुलनात्मकदृष्टय़ा सोपी गोष्ट आहे. मात्र मुलाखतीबाबतचे समज, न्यूनगंड, गरसमज, शंका दूर व्हाव्यात यासाठी नेमके प्रयत्न करणे आवश्यक असतात.
मुलाखतीचा निकाल हा नियुक्तीचे पद, त्यासाठीचे आवश्यक गुण, मुलाखतीचे पॅनल व सदस्य, उमेदवारांच्या तयारीचा व आत्मविश्वासाचा स्तर अशा अनेक मूर्त/अमूर्त गोष्टींवर अवलंबून असतो. त्यामुळे योग्य पद्धतीने व नेमकेपणाने मुलाखतीची तयारी करणे आवश्यक आहे.
शासकीय, निमशासकीय, खासगी क्षेत्रातील मोठय़ा कंपन्या तसेच सार्वजनिक उपक्रमांमध्ये नियुक्तीसाठी मुलाखत मंडळांकडून मुलाखती घेतल्या जातात. या प्रत्येक क्षेत्राची मागणी वेगळी असते आणि त्या त्या क्षेत्रामध्ये कामाच्या/ क्षमतांच्या/ कौशल्यांच्या आवश्यकतेनुसार उमेदवारांची व्यक्तिमत्त्व चाचणी मुलाखत मंडळे घेत असतात. केंद्र व राज्य शासनातील विविध सेवांमधील पदांवर नियुक्तीसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षांमध्येही मुलाखत हा निर्णायक टप्पा असतो. या मुलाखतींच्या तयारीसाठीची चर्चा पुढील काही लेखांमध्ये करूयात..
First Published on September 14, 2015 1:06 am
Web Title: mpsc interview preparation

Wednesday, July 15, 2015

नवनीत [Print] [Email] कुतूहल : केळ्याबद्दल गरसमज

नवनीत

कुतूहल : केळ्याबद्दल गरसमज

Published: Thursday, December 6, 2012
दवाखाना बंद करणार एवढय़ात एक बाई तिच्या मुलीला घेऊन आली. तिचे डोळे लाल झाले होते, तिला सर्दी झाली होती. या सीझनला अशी सर्दी होतेच. तिला तर सर्दी २-३ वर्षांने झालेली दिसत होती. पण दवाखान्यात आई-मुलीत वेगळाच वाद चालू होता. आई मुलीला सांगत होती की रोज एक-दोन केळी खाल्लीच पाहिजेत. तीसुद्धा सालावर काळे ठिपके पडलेली. ती मस्त गोड लागतात. पण गेले तीन-चार महिने ही मुलगी केळीच खात नाही. का ते आईला समजत नव्हते. डॉक्टर बाईंना म्हणाले, मी हिला तपासतो व औषध देतो. डॉक्टर म्हणाले, सध्याचे युग विज्ञानाचे आहे. झाडावर फळे पिकायला लागतात तसा त्यांच्यात इथिलीन वायू निर्माण होतो. त्याचा वास मधुर असतो. त्या वासामुळे चिलटे होतात. निसर्ग असे सिग्नल्स देत असतो. आपण ते सिग्नल्स ओळखण्याची ताकद आपल्यात निर्माण करायची असते. म्हणजे असे सिग्नल्स ओळखता येतात. केळी पिकू लागली की सालावर काळे ठिपके पडू लागतात, पण त्यातच प्रतिकारशक्ती वाढवणारी द्रव्ये असतात. हल्ली संशोधनात असे आढळून आले आहे की, पिकलेल्या केळ्यात तीएन एफ नावाचे रासायनिक द्रव्य तयार होते. या द्रव्यामुळे त्रासदायक पेशी नष्ट होतात किंवा त्यांच्या वाढीला आळा बसतो. केळ जितके पिकेल तेवढे त्याच्यावर जास्त डाग पडतील आणि तेवढी त्याच्यात जास्त प्रतिकारशक्ती निर्माण होते. कार्न्‍सच्या पेशीही त्रासदायक असतात, पण तीएन एफमुळे कार्न्‍सच्या पेशी नष्ट होतील किंवा त्यांच्या वाढीला आळा बसेल. केळ जितके पिकेल तेवढे त्याच्यावर जास्त डाग पडतील आणि तेवढी त्याच्यात कार्न्‍सच्या विरोधात प्रतिकारशक्ती जास्त. नुसत्या कार्न्‍सविरोधातच नाही तर एकंदरीतच सर्व रोगांना ते प्रतिकारक असते. पण बरेच लोक म्हणतात की केळ खाल्ले की सर्दी होते हे चुकीचे आहे. केळ्याने सर्दी होत नाही, उलट प्रतिकारशक्ती वाढते. केळ्यात व्हिटॅमिन ए, लोह, क्षार, कॅल्शियम, फॉस्फरस, तंतू इ. आवश्यक प्रमाणात असतात. केळ्याने बद्धकोष्ठ होत नाही. त्यातील तंतूमुळे मल पुढे ढकलला जातो. त्यामुळे कॉन्स्टिपेशन होत नाही. असे हे केळे बहुगुणी आहे.
डॉ. शशिकांत प्रधान
मराठी विज्ञान परिषद, पुरव मार्ग, चुनाभ ट्टी,
मुंबई २२
office@mavipamumbai.org

Monday, July 13, 2015

नवनीत

सयाजीरावांची चतुराई

Maharaja Sayajirao gaekwad
Published: Monday, June 29, 2015
बडोदा नरेश सयाजीराव जटिल समस्यांमधून सहजतेने मार्ग काढण्यात माहीर होते. शहरातला 'रावपुरा रोड' हा वाहतुकीचा रस्ता अत्यंत अरुंद आहे आणि त्यामुळे वाहतुकीला अडथळा होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. या रस्त्याच्या रुंदीकरणाची योजना त्यांनी नक्की केली. हे काम सुरू करण्याआधी एक मोठा गुंतागुंतीचा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला. एका ठिकाणी रस्त्यामध्येच मौलानाबाबाची कबर होती. कबर रस्त्यातून काढून परस्पर दुसरीकडे हलविली तर समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या जातात. हा संवेदनशील प्रश्न महाराजांनी मोठय़ा चतुराईने सोडविला. त्यांनी आपल्या ज्येष्ठ मुस्लीम अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडूनच ती कबर रस्त्याच्या कामाच्या जागेपासून १०० फुटांवरील मोकळ्या जागेवर रात्रीतूनच हलवून घेतली. त्या अधिकाऱ्यांनीच दुसऱ्या दिवशी सकाळी अफवा पसरविली की, रात्रीतून मौलानाबाबाची कबर आपोआप दुसरीकडे गेली, चमत्कार झाला!  दुसऱ्या दिवशी मोहोल्ल्यातल्या सर्व मुस्लीम बांधवांच्या उपस्थितीत समारंभपूर्वक महाराजांनी कबरीवर चादर चढवून तिथल्या व्यवस्थेसाठी देणगी दिली!
महाराजांच्या चातुर्याचा एक किस्सा बादशाह पंचम जॉर्जच्या बडोदा भेटीप्रसंगी घडलेला मनोरंजक आहे. पंचम जॉर्ज आणि महाराणी राजवाडा पाहत असताना दरबार हॉलच्या प्रवेशद्वाराच्या आतील सोन्याचे दोन सिंह पाहून थबकले! महाराणी मेरीची त्यावेळची लोभी नजर पाहून महाराज काय ते बरोबर उमजले. पंचम जॉर्जची बडोदाभेट संपल्यावर महाराजांनी त्वरित ते सोन्याचे सिंह वितळवून त्याचे सोने संस्थानाच्या खजिन्यात जमा केले. आठ दहा दिवसांनी महाराजांना व्हाइसरॉयचे पत्र आले की, 'आपल्या दरबारातील सोन्याचे सिंह राणीसाहेबांना आवडले. त्यांच्या बकिंगहॅम पॅलेसमध्ये ठेवण्यासाठी ते आमच्याकडे त्वरित पाठवावे म्हणजे मग आम्ही ते लंडनला पाठवू.' चतुर महाराजांनी कळविले की, 'आíथक टंचाईमुळे आम्ही ते वितळवून टाकले आहे. राणीसाहेबांनी सिंहांबद्दल आधी कळविले असते तर आम्ही आनंदाने पाठविले असते!'
सुनीत पोतनीस - sunitpotnis@rediffmail.com

नवनीत [Print] [Email] संस्थानांची बखर - सयाजीरावांची कलासक्ती

नवनीत

संस्थानांची बखर - सयाजीरावांची कलासक्ती

arts and crafts conservation by Sayajirao
Published: Tuesday, June 30, 2015
राजेपद मिळण्यापूर्वी खेडय़ात राहणाऱ्या, अशिक्षित गोपाळने आपल्या कुशाग्र बुद्धीने केवळ सहा वर्षांत पुस्तकी शिक्षणाबरोबर अनेक गोष्टी आत्मसात केल्या. पुढे आपल्या कारकीर्दीत चोख प्रशासनाबरोबर सांस्कृतिक क्षेत्रातही अनेक कलांचे संवर्धन महाराजा सयाजीरावांनी केले. त्यांचे वय १८ वष्रे झाल्यावर त्यांचा विवाह तंजावरचे सरदार मोहिते यांची कन्या लक्ष्मीबाई उर्फ चिमणाबाई प्रथम हिच्याशी झाला.
त्या काळात संस्थानिकांकडे असलेले दरबारी नर्तक, कवी, संगीतकार, कलाकार हे त्या संस्थानिकाचे भूषण समजले जाई. काही ठिकाणी विवाहप्रसंगी देण्याच्या हुंडय़ामध्ये नर्तक, गायक, यांचाही समावेश होता. चिमणाबाई (प्रथम) स्वत भरतनाटय़म् आणि कर्नाटक संगीतामध्ये जाणकार होती. लग्नानंतर चिमणाबाईने आपल्याबरोबर नर्तक गायकांचा एक संच बडोद्याला आणला. त्यात नटवनर अप्पास्वामी आणि त्याची पत्नी कांतिमती हे प्रमुख होते. अप्पास्वामीच्या मृत्यूनंतर कांतीमती आणि तिचा मुलगा कुबेरनाथ हे बडोदा सोडून दाक्षिणात्य चित्रपट उद्योगात गेले होते. परंतु राजे प्रतापसिंगांच्या आग्रहावरून बडोद्यातील कलाभवन पॅलेसमध्ये संगीत शिक्षक म्हणून परत आले.
पुढे कुबेरनाथ तांजोरकरांनी त्यांचा मुलगा रमेश तांजोरकर याच्याबरोबर स्वतची तांजोर डान्स म्युझिक अँड आर्ट रिसर्च सेंटर ही कलाशिक्षणाची संस्था स्थापन केली. सयाजीरावांनी बडोद्यात कलेचे शिक्षण देण्यासाठी कलाभवन ही संस्था सुरू केली. या संस्थेत त्यांनी चित्रकला, शिल्पकला, रंगकाम, विणकाम इत्यादी विषयांचे वर्ग सुरू केले. पुढे या संस्थेत भारतीय संगीत, भरतनाटय़म्, वाद्यवादन यांचेही शिक्षण सुरू झाले.
सुनीत पोतनीस -sunitpotnis@rediffmail.com