निबंधलेखनाची तयारी
मुख्य परीक्षेतील निबंधलेखनाच्या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास कसा करावा, याविषयीचे मार्गदर्शन.
अपर्णा दीक्षित |
September 6, 2015 18:32 pm
विद्यार्थी मित्रहो, मागील लेखांत यूपीएससी परीक्षेच्या प्राथमिक तयारीविषयी आपण सविस्तर चर्चा केली. आता मुख्य परीक्षेतील निबंधाच्या विषयापासून सुरुवात करूयात. यूपीएससीच्या मुख्य परीक्षेमधील निबंधाचा पेपर हा महत्त्वाचा तसेच अतिशय आव्हानात्मक असा घटक आहे. २०१३ पर्यंत दिलेल्या सहा विषयांपकी एक विषय निवडून त्यावर तीन तासांमध्ये २,५०० (कमाल मर्यादा) शब्दांमध्ये निबंध लिहिणे अपेक्षित होते. या पेपरसाठी २५० गुण निर्धारित केले आहेत. मात्र, २०१४ पासून २५० गुणांसाठी उमेदवारांनी दोन विषयांवर निबंध लिखाण करणे अपेक्षित आहे.
पहिल्या प्रकारच्या निबंधातून विद्यार्थी एखाद्या तत्त्वविचाराचा अमूर्त पातळीवर कसा विचार करतो, तसेच संबंधित तत्त्वविचार समाजजीवनाच्या विभिन्न क्षेत्रांशी कसा जोडतो याची चाचपणी केली जाते. त्याद्वारे विद्यार्थ्यांच्या विचारव्यूहाची मांडणी मोजली जाते. तद्वतच संबंधित तात्त्विक विधानाचे राजकीय, सामाजिक, आíथक आणि भौगोलिक संदर्भ दाखवता येणे अपेक्षित आहे. तत्त्वविचारांवर आधारलेल्या निबंधाचा लाभ सामान्य अध्ययनाच्या पेपर ४ मधील नीती, सचोटी, तत्त्वज्ञान आणि अभिवृत्ती या अभ्यासघटकांना होतो.
दुसऱ्या प्रकारच्या निबंधाद्वारे विद्यार्थ्यांचे समकालीन घडामोडींचे आकलन, बहुपदरी आणि खोलवर आहे का, याचीचाचणी केली जाते. निबंध लेखनात वर्तमान घडामोडींमागील भिन्न आयाम उलगडून दाखविण्याची क्षमता विकसित करावी लागते. निबंध विषयामध्ये चांगले गुण मिळवून एकंदरीत गुणांची बेरीज वाढवणे शक्य आहे, तर निबंध विषयामुळे एकंदरीत गुणांवर नकारात्मक परिणाम होणे हेदेखील संभव आहे. निबंधाच्या बाबतीत हे लक्षात घेणे आवश्यक आहे की, निबंध हा प्रत्येक व्यक्तीच्या विचारांचा, मतांचा, मूल्यांचा ठसा असतो. यूपीएससी उमेदवारांकडून दिलेल्या विषयाबद्दल माहितीबरोबरच योग्य विश्लेषण व अनुमानांची अपेक्षा करते. म्हणूनच आपली मते, वैचारिक कल, संप्रेषण कौशल्ये या सगळ्याचा परिपाक निबंधात उतरणे अपेक्षित आहे.अनेक विद्यार्थ्यांचे असे मत असते की, सामान्य अध्ययनाच्या इतर तयारीमधूनच निबंधाच्या घटकाचीसुद्धा तयारी होते. मात्र, तयारीच्या या टप्प्यावर आपण हे लक्षात घेतले पाहिजे की, सामान्य अध्ययनाच्या इतर घटकांप्रमाणेच निबंधाच्या घटकाकरता विशिष्ट तयारी करणे गरजेचे असते. ही तयारी करीत असताना विषयाचे ज्ञान संपादन करणे, स्वत:चा वैचारिक कल व मते निश्चित करणे आणि लिखाणाचा सराव करणे या सगळ्या टप्प्यांचे क्रमवार नियोजन करावे लागते. याकरता पुरेसा वेळ द्यावा लागतो. तसेच सामान्य अध्ययनाच्या इतर पेपरप्रमाणे लेखनाचा भरपूर सराव करावा लागतो. दिलेल्या विषयांशी प्रामाणिक राहून सलग तीन तास विचारलेल्या विषयांवर गुणवत्तापूर्ण लिखाण करणे, योग्य माहितीचा वापर करणे, मते आणि विश्लेषण यांची सांगड घालणे या सगळ्याकरता तयारीच्या नियोजनामध्ये वेगळा वेळ द्यावा लागतो. परीक्षेमध्ये यशस्वीरीत्या निबंध लेखन करण्यासाठी तयारीच्या टप्प्यावर भरपूर सराव केलेला असणे आवश्यक आहे. याकरता काय व कसे काम करावे हे आपण पाहणार आहोत.
निबंधाच्या प्रश्नपत्रिकेतील आवश्यक बाबी
विषयाचा आवाका आणि मर्यादा योग्य रीतीने समजून घ्याव्यात.
विचारांतील व मांडणीतील स्पष्टता.
वैचारिक प्रक्रिया.
विषयासंबंधी स्पष्ट भूमिका.
या सर्व गोष्टी लक्षात घेऊन निबंधाच्या पेपरचा सराव करणे गरजेचे आहे. या पेपरमधून तुमच्याकडे असलेल्या माहितीऐवजी, तुम्ही त्या माहितीतून कोणता दृष्टिकोन परावíतत करता हे महत्त्वाचे ठरते.
निबंधलेखनाची तयारी
निबंध हा विशेष लेखन प्रकार आहे हे लक्षात ठेवले पाहिजे आणि म्हणूनच निबंधासाठी लेखनाचा सातत्याने सराव केला पाहिजे. म्हणूनच योग्य शब्दमर्यादेत व कालमर्यादेत लिखाणाचा नियमित सराव करावा. बऱ्याच वेळा विद्यार्थी वाचनावर व वाचलेले लक्षात ठेवण्यावर बहुतेक वेळ खर्च करतात. परंतु लिखाणदेखील अभ्यासाचा नियमित भाग बनले पाहिजे. एकूण अभ्यासाचा साधारण २० टक्के वेळ लिखाणासाठी राखून ठेवला पाहिजे. तसेच या लिखाणामध्ये विचारपूर्वक केलेल्या, सर्जनशील लिखाणाचादेखील समावेश असावा. अशा प्रकारे केलेले लिखाण शिक्षकांकडून, जाणकारांकडून अथवा स्वत: तपासावे. लिखाणातील आवश्यक सुधारणा कोणत्या हे लक्षात घेऊन योग्य ते बदल करावेत. अशा सरावामधून लिखाणाचा वेग, शैली, अर्थपूर्ण शब्दांचा लिखाणातील समावेश व अचूक मजकूर मांडण्याची कौशल्ये विकसित होतात. या सर्वातून निबंध लेखनावर सकारात्मक प्रभाव पडतो. दिलेल्या शब्दमर्यादेत अर्थपूर्ण लिखाण करणे सरावानेच जमते. या सर्व बाबींकडे दुर्लक्ष केल्यास आपल्या अंगी क्षमता व प्रतिभा असली तरीदेखील मोठा फटका बसू शकतो.‘निबंधात काय लिहावे?’ या प्रश्नाचे उत्तर सखोल वाचनात व ताíकक विचारांत दडलेले आहे. सामान्य अध्ययनाच्या इतर पेपरपेक्षा हा पेपर वेगळा ठरतो, याचे कारण याकरता कोणताही ठरावीक अभ्यासक्रम निश्चित केलेला नाही. तसेच निबंधाचे कोणते विषय येऊ शकतील याचा तंतोतंत अंदाज कुणीही वर्तवू शकत नाही. परंतु देशभरातील तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील नुकत्याच घडून गेलेल्या घटनांवरून अपेक्षित निबंध विषयांचा साधारण अंदाज येऊ शकतो. याचबरोबर सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय वर्तुळातील घडामोडीदेखील या दृष्टीने महत्त्वाच्या ठरतात.
एकाच मुद्दय़ाचे अवलोकन विविध दृष्टिकोनांतून केले जाऊ शकते. अनेक विद्यार्थी निबंधाच्या विषयाकडे केवळ दोनच दृष्टिकोनांतून पाहू शकतात. परंतु कोणत्याही विषयाला अर्थाचे अनेक कंगोरे असतात आणि म्हणूनच उमेदवारांनी स्वत:ला मर्यादित दृष्टिकोनांमध्ये अडकवून ठेवू नये. परंतु याचा अर्थ असा नाही की दिलेल्या विषयावर अनेक दृष्टिकोनांतून वरवरचे लिखाण केले जावे. प्रत्येकाने एक ठरावीक दृष्टिकोन, त्यातून निर्माण होणाऱ्या भूमिका यांचा समतोल साधत स्वत:चा ठसा उमटणारे लिखाण करणे अपेक्षित आहे. अनेक वेळा निबंधाच्या विषयासंदर्भातील काही मुद्दे आपल्याला पटत नसतात. परंतु आपले लिखाण ‘योग्य’ व ‘तटस्थ’ असावे या हट्टापायी आपण त्या मुद्दय़ांचेदेखील समर्थन करतो. यामुळे लिखाणात कच्चे दुवे तयार होतात आणि असे लिखाण निबंध तपासणारी व्यक्ती लगेचच ओळखू शकते. म्हणूनच जे आपल्याला पटत नाही ते पटवून देण्याचा अनाठायी प्रयत्न करू नये. याचबरोबर जे मुद्दे आपण पटवून देत आहोत ते नीतीनियमांना, सांविधानिक विचारप्रणालीला व तर्काला धरून असावेत.कोणत्याही निबंधासाठी लिखाणाची शैली व भाषा हे महत्त्वाचे घटक आहेत. प्रत्येकाने आपली स्वतंत्र लेखनशैली विकसित केली पाहिजे. लिखाण सुटसुटीत, अर्थवाही आणि मुद्देसूद असावे. हे लिखाण विचारपूर्वक व ठाम असावे. मात्र ठामपणे मते मांडत असताना त्यात उद्धटपणा नसावा. निबंधामधून ठामपणे व्यक्त केलेल्या मतांचे व विश्लेषणाचे जाळे असावे. आक्रमक अथवा अलंकारिक भाषा वापरून वाचणाऱ्यावर प्रभाव पडतोच असे नाही. तसेच अशी भाषा वापरल्याने चांगले गुण मिळतात हा समजदेखील चुकीचा आहे. निबंधाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत ठरावीक लयीत लिखाण होणे अपेक्षित आहे. भावनांच्या आहारी जाऊन केलेले लिखाण अथवा केवळ माहितीची जंत्री असणारे लिखाण टाळावे. अर्थपूर्ण व प्रभावी निबंध लिहिण्याची प्रक्रिया अनेक वेळा थकवा आणणारी किंवा कंटाळवाणी असू शकते. मात्र कोणत्याही प्रकारच्या अभ्यासपूर्ण लिखाणाच्या सुरुवातीच्या टप्प्यावर असे वाटणे साहजिक आहे. त्यामुळे खचून न जाता सातत्यपूर्ण प्रयत्न करत राहणे गरजेचे आहे.
First Published on September 7, 2015 2:01 am
Web Title: essay writing
No comments:
Post a Comment