चिंतामणरावांची कारकीर्द
चिंतामणराव पटवर्धन प्रथम यांनी सांगली येथे स्वतंत्र राज्य स्थापन केले.
मुंबई |
September 24, 2015 00:49 am
चिंतामणराव प्रथम हे प्रजाहितदक्ष राजे होते. त्यांनी व्यापारउदीम वाढवून निरनिराळ्या बाजारपेठा वसविल्या, सांगलीत मोठय़ा प्रमाणात येणाऱ्या हळदीच्या शेतीला प्रोत्साहन देऊन त्याची बाजारपेठ निर्माण केली. सरळ, रुंद रस्ते बांधून त्यांच्या दुतर्फा वृक्ष लागवड सुरू केली. त्यांनी १८२१ साली प्रथम शिळाप्रेस छापखाना स्थापन केला. व्यापाऱ्यांना अनेक सवलती देऊन त्यांनी सांगलीत रेशीम उद्योगाचा पाया घालून, मॉरिशसहून उच्च दर्जाचा ऊस आणून त्याची लागवड सुरू केली. स्वतची नाणी पाडण्यासाठी त्यांनी सांगलीत टांकसाळही सुरू केली. गुणग्राहक, कल्पक, बहुआयामी चिंतामणराव यांनी ठिकठिकाणचे विद्वान, कलाकार, कारागिरांना राजाश्रय देऊन सांगली हे दक्षिण महाराष्ट्रातील महत्त्वाचे सांस्कृतिक केंद्र बनविले. विष्णुदास भावे यांच्याकडून ‘सीतास्वयंवर’ हे नाटक लिहून घेऊन राजांनी मराठी रंगभूमीवरचा पहिला नाटय़प्रयोग केला. १८१९ साली सांगलीचा ईस्ट इंडिया कंपनी सरकारशी संरक्षणाचा करार होऊन ते एक संस्थान बनून राहिले. १८५१ साली या महान राज्यकर्त्यांचे निधन झाले.
सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com
No comments:
Post a Comment