Thursday, June 19, 2014

अकरावी ऑनलाइन प्रवेश : पहिल्या दिवशी अडीच हजार विद्यार्थ्यांचे अर्ज

अकरावी ऑनलाइन प्रवेश : पहिल्या दिवशी अडीच हजार विद्यार्थ्यांचे अर्ज

Published: Thursday, June 19, 2014
दहावीच्या विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेशाची प्रक्रिया सुरू केली असून मुंबई महानगर क्षेत्रात ऑनलाइन प्रवेश असल्यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांनी निकालापूर्वीच अर्ज भरून ठेवले होते. निकाल लागल्यावर त्यांनी महाविद्यालयांच्या पर्यायांचे अर्ज सादर केले.
पहिल्या दिवशी मुंबई महानगर क्षेत्रातील एकूण २५,११० विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्यास सुरुवात केली. यातील ११ विभागांमधील १४,०८९ विद्यार्थ्यांनी पर्याय अर्ज अर्धवट ठेवले आहेत. तर ८,५६६ विद्यार्थ्यांनी हे अर्ज पूर्ण केले आणि २,४५५ विद्यार्थ्यांनी अर्ज नक्की केले.
अर्ज भरण्याचा पहिला टप्पा बुधवापर्यंत ९५,२५४ विद्यार्थ्यांनी सुरू केला आहे. यातील ७५,७८७ विद्यार्थ्यांचे अर्ज मान्य झालेले आहेत.
जेईई अ‍ॅडव्हान्सचा आज निकाल
मुंबई : आयआयटीमध्ये प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या जेईई अ‍ॅडव्हान्स या परीक्षेचा निकाल गुरुवारी जाहीर करण्यात येणार आहे. हा निकाल http://jeeadv.iitd.ac.in/  या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. जेईई मेन या परीक्षेतील पहिल्या दीड लाख विद्यार्थ्यांनी जेईई अ‍ॅडव्हान्स दिली होती. देशभरात आयआयटीमध्ये ९,७८४ जागा उपलब्ध आहेत.

Wednesday, June 18, 2014

प्रथम वर्ष पदवी प्रवेशपूर्व नोंदणीस गुरुवापर्यंत मुदतवाढ

प्रथम वर्ष पदवी प्रवेशपूर्व नोंदणीस गुरुवापर्यंत मुदतवाढ

Published: Tuesday, June 17, 2014
मुंबई विद्यापीठाने प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रवेशपूर्व ऑनलाइन नोंदणीची मुदत १९ जूनपर्यंत वाढविली आहे. यामुळे अद्याप नाव नोंदणी न करता आलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशपूर्व नोंदणी करता येणार आहे. आधीच्या वेळापत्रकानुसार ही मुदत सोमवारी संपणार होती.
प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमांचे प्रवेश घेण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे ऑनलाइन नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानुसार विद्यापीठाने प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. २ जूनपासून प्रवेशपूर्व नोंदणी सुरू असून विद्यार्थ्यांना १६ जूनपर्यंत सायंकाळी ६ वाजेपर्यंत नाव नोंदणी करता येणार होती. अनेक विद्यार्थ्यांना प्रवेशपूर्व नोंदणी करता न असल्याने ही मुदत १९ जून रोजी दुपारी १ वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे.  दरम्यान सोमवारी सायंकाळपर्यंत २ लाख ४८ हजार ६०९ विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली आहे. या विद्यार्थ्यांनी ६ लाख ५३ हजार ३५४ अर्ज भरले आहेत.

बुकमार्क - सर्वोत्तम आर. के. नारायण

सर्वोत्तम आर. के. नारायण

Published: Saturday, June 14, 2014
आर. के. नारायण यांच्या ललित आणि ललितेतर साहित्यातील निवडक लेखनाचा समावेश असलेले हे पुस्तक नारायणप्रेमींसाठी पर्वणी आहेच, पण 'मालगुडी' न वाचलेल्यांसाठीही चांगला पर्याय आहे. नारायण यांच्या भाषाशैलीचे, व्यक्तिचित्रांचे आणि त्यांच्या प्रत्यक्ष अनुभवांचे दर्शन या पुस्तकातून होते. वास्तव आणि प्रतिमांमध्ये असलेला विरोधाभासही 'गाइड'वरील दोन लेखांतून व्यक्त होतो. थोडक्यात विचारप्रवृत्त करत अंतर्मुख करणारे हे संकलन आहे.
ललित आणि वैचारिक हे दोन्ही वाङ्मय प्रकार तितक्याच ताकदीने हाताळणाऱ्या काही मोजक्या साहित्यिकांमध्ये आर. के. नारायण यांचा उल्लेख करावा लागेल. या प्रतिभासंपन्न लेखकाने स्वत:ला 'रिअ‍ॅलिस्टिक फिक्शन रायटर' म्हटले आहे. त्यांच्या या वाक्याची प्रचीती थोडक्यात देणारे अलीकडेच प्रसिद्ध झालेले पुस्तक म्हणजे 'द व्हेरी बेस्ट ऑफ आर. के. नारायण - टाइमलेस मालगुडी - सिलेक्टेड फिक्शन अ‍ॅण्ड नॉन फिक्शन.' यात फिक्शन विभागांतर्गत सात आणि नॉन फिक्शनअंतर्गत चार लेखांचा समावेश आहे.  
 काळजाला भिडणारे प्रसंग, नाटय़ात्मक कथन, शैलीमुळे डोळ्यांसमोर उभ्या राहणाऱ्या घटना आणि सोप्या भाषेत सहजपणे सांगून जाणारा खोल, गंभीर जीवनानुभव हे  नारायण यांच्या सृजनात्मक साहित्याचे वैशिष्टय़ म्हणायला हवे. त्यांची पहिली कादंबरी अर्थातच 'स्वामी अ‍ॅण्ड फ्रेंन्ड्स'. मालगुडी गाव, स्वामी, त्याचे नातेवाईक, मित्र आणि तेथील ग्रामस्थ अनेकांना परिचित झाले ते या आणि यानंतर आलेल्या पुस्तकांमुळे. आणि इतर अनेकांना हे सगळे परिचित झाले ते त्यावर कित्येक वर्षांनंतर आलेल्या दूरदर्शन मालिकेमुळे. मानवी स्वभावाचे विविध पलू 'मालगुडी'मध्ये पाहायला मिळतात. अगदी स्वामीच्या घरातले कुटुंबीयसुद्धा आपल्याला आपलेच वाटतात इतके ते प्रसंग कुणाच्याही घरात घडणारे आहेत. आणि ते तितकेच सकसपणे उतरलेले आहेत.
या पुस्तकात अर्थातच त्याची फक्त एक झलकच वाचायला मिळते ती 'स्वामी अ‍ॅण्ड फ्रेंन्ड्स' या एका प्रकरणातून. शाळेला सुट्टी पडल्यामुळे स्वामी दुपारच्या वेळात खेळायला येतो म्हणून मित्रांना सांगून बसलाय. मित्रही वाट बघताहेत. पण नेमका वडिलांना तो सापडतो आणि ते त्याला एकेक कामे सांगतात. वडिलांना तो उलट उत्तरे देऊ शकत नाही, पण त्याची होणारी सारी चरफड शब्दबद्ध करणारी त्याची देहबोली आपल्याला त्याचा उद्वेग जाणवून देते.  बाबांना हवे असलेले कापड खूप शोधूनही त्याला सापडत नाही. आजी, आई काही मदत करत नाही, त्यामुळे चिडलेला स्वामी आपल्या तान्ह्य़ा भावाच्या अंगाखालचे कापड ओढून काढून बाबांना देतो. त्यावर टिप्पणी करताना नारायण लिहितात, 'आपल्या या सगळ्या समस्येला आईला जबाबदार धरत बाळाला त्रास देत त्याच्या अंगाखालचा कपडा ओढून काढण्याने स्वामीला आपल्यावरील अन्यायाचा बदला घेतल्याचा बालसुलभ दिलासा मिळाला.' खेळायला पाठवण्याऐवजी वडील जेव्हा त्याला गणित घालतात तेव्हा मात्र त्याच्या संयमाचा कडेलोट होतो. इतका की महाप्रयासाने जेव्हा ते गणित सुटते तेव्हा त्याच्या डोळ्यांतून पाणी वाहायला लागते.   
या पुस्तकातील सर्वाधिक जागा व्यापणारी दोन प्रकरणे म्हणजे 'द गाइड' आणि 'मिसगायडेड गाइड'. देव आनंद आणि वहिदा रेहमान यांचा 'गाइड' बघणं आणि नारायण यांनी शब्दबद्ध केलेली 'द गाइड' ही कादंबरी 'वाचणं' हे दोन स्वतंत्र अनुभव आहेत. गाइड राजू, रोझी, मार्को, राजूची आई, मामा ही व्यक्तिमत्त्वे पुस्तकात अधिक ठसठशीतपणे येतात, अधिक कळतात. खोटी सही केल्यानंतर राजू पकडला जातो, तेव्हा अपेक्षाभंगामुळे रोझीला झालेले स्वाभाविक दु:ख आणि त्याच वेळी त्याच्यावरचे निरतिशय प्रेम यांची सरमिसळ पुस्तकातून अधिक ठसते. तुरुंगवासानंतर राजूचे गावात येणे, तिथे त्याला संतपद मिळणे आणि त्यातच त्याचा शेवट होणे या राजूच्या अनपेक्षित जगण्यातून मानवी जगण्यातली अपरिहार्यताच व्यक्त होते.
'मिसगायडेड गाइड' या प्रकरणात प्रत्यक्षातला 'गाइड' आणि पडद्यावर साकार झालेला 'गाइड' या दरम्यानची लेखक म्हणून सहन करावी लागलेली तडजोड व्यक्त होते. 'आम्ही नारायण यांनी लिहिलेला 'गाइड' अगदी तसाच्या तसा पडद्यावर साकारू, तेही प्रत्येक टप्प्यावर त्यांना घेऊनच' या नारायण यांनी शूटिंगच्या सुरुवातीच्या टप्प्यात सातत्याने ऐकलेल्या वाक्यातला विरोधाभास नंतर त्यांना सातत्याने प्रत्ययास येऊ लागला. आपली कथा आपल्याच हातातून निसटून चालली आहे, याची जीवघेणी वेदना या  प्रकरणात प्रभावीपणे उतरली आहे.
सुरुवातीच्या काळात अमेरिकी दिग्दर्शक, निर्मात्या आणि नोबेल पुरस्कार विजेत्या लेखिका पर्ल बक यांनी भारतीय मातीतला 'गाइड' बनवण्याची स्वप्ने दाखवली होती. पण त्यांना पहिला धक्का बसला तो मालगुडीच्या अस्तित्वाचाच. 'मालगुडी' हे गाव जरी नारायण यांच्या कल्पनेतले असले तरी दक्षिण भारतातले त्यांनी निर्माण केलेले ते असे गाव आहे जे हजारो लोकांच्या मनात घर करून राहिलेले आहे. त्या गावाला स्वत:चा असा रंग, रूप, अर्थ आहे. त्यामुळे 'गाइड'ची कथाही गावातच साकार व्हायला हवी होती. मात्र सिनेमा वाइड स्क्रीनवर आणि इस्टमन कलरमध्ये दाखवला जाणार असल्याने साहजिकच त्यांना देखणे शहर दाखवायचे होते. ज्यासाठी त्यांनी निवडले जयपूर, जे नारायण यांच्या कल्पनेतल्या गावाशी फटकून वागणारे होते. यावर लिहिताना नारायण यांची उपहासात्मक शैली अधिक तेज होताना दिसते. ते लिहितात, 'चच्रेदरम्यान मला विचारले गेले, 'तुम्हाला वाटतेय तिथेच मालगुडी आहे हे तुम्हाला कसे माहीत, ते कुठेही असू शकते.' तेव्हा मात्र मी माघार घेतली. तरीही मी त्यांना म्हटले, 'मालगुडी माझ्या कल्पनेतले आहे. मी तयार केलेय त्याला. आणि गेली तीस वष्रे या परिसरातल्या कादंबऱ्या मी एका मागोमाग लिहितोय.' ' शेवटी असे जाहीर करण्यात आले की ही कथा मालगुडीमध्ये घडतेय हेच चित्रपटातून काढून टाकू या. ही एका शहरातली प्रेमकथा होईल. तेव्हा मात्र नारायण यांना त्यांच्या मनातल्या मालगुडीला, त्यात साकारत गेलेली प्रेमकथा, त्या मातीचा गोडवा, गावाच्या अस्तित्वातून व्यक्त होणारे लोकमानस या सगळ्याला भव्य-दिव्य सिनेमाच्या स्वप्नापुढे तिलांजली द्यावी लागली. त्यानंतरही मूळ कथेत, प्रसंगात बदल घडवणारे प्रस्ताव सुचवण्यात आले. काही स्वीकारले गेले, काही रद्द केले गेले. ते सांगणारी नारायण यांची प्रसंगी उपहासात्मक शैली वाचण्यासाठी आणि सिनेमापलीकडचा 'गाइड' जाणून घेण्यासाठी मूळ प्रकरणेच वाचायला हवीत.
उर्वरित वाचण्यासाठी: 1 2संपूर्ण

ऑनलाइन प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर

ऑनलाइन प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर

Published: Wednesday, June 18, 2014
मंगळवारी दहावीचा निकाल जाहीर होताच मुंबई महानगर क्षेत्रातील अकरावी ऑनलाइन प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे.
* ऑनलाइन प्रवेश अर्ज सादर करणे - १८ ते २५ जून
* ऑनलाइन सादर केलेले अर्ज विद्यार्थ्यांनी ऑनलाइन तपासून त्रुटी दुरूस्त करून अद्ययावत करणे - २६ जून रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत.
* प्रथम गुणवत्ता यादी - २ जुलै रोजी सायं. ५ वाजता.
*  प्रथम गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांचे शुल्क स्वीकारणे - ३ ते ५ जुलै रोजी सकाळी १० ते सायं. ५ वाजेपर्यंत.
* द्वितीय गुणवत्ता यादी - ९ जुलै रोजी सायं. ५ वाजता.
* द्वितीय गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांचे शुल्क स्वीकारणे - १० ते ११ जुलै रोजी सकाळी १० ते सायं. ३ वाजेपर्यंत.
* तृतीय व अंतिम गुणवत्ता यादी - १५ जुलै रोजी सायं. ५ वा.
* तृतीय गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांचे शुल्क स्वीकारणे - १६ ते १७ जुलै रोजी सकाळी १० ते सायं. ३ वाजेपर्यंत.
मुंबईतील शाखानिहाय प्रवेश क्षमता
१ कला - शाखेसाठी एकूण ३८ हजार ५५९ जागा आहेत. यातील १५ हजार ०८८ जागा या इनहाऊस, अल्पसंख्याक आणि व्यवस्थापन यासाठी राखीव आहेत. तर उर्वरित २३ हजार ४७१ जागा ऑनलाइन प्रवेशामध्ये असतील.
२ वाणिज्य - शाखेसाठी एकूण ८४ हजार २१६ जागा आहेत. यातील ३६ हजार ४९४ जागा या इनहाऊस, अल्पसंख्याक आणि व्यवस्थापन यासाठी राखीव आहेत. तर उर्वरित ४७ हजार ७२२ जागा ऑनलाइन प्रवेशामध्ये असतील.
३ विज्ञान - शाखेसाठी एकूण एक लाख ६० हजार ९४७ जागा आहेत. यातील ७२ हजार ०१२ जागा या इनहाऊस, अल्पसंख्याक आणि व्यवस्थापन यासाठी राखीव आहेत. तर उर्वरित ८८ हजार ९३५ जागा ऑनलाइन प्रवेशामध्ये असतील.
गुणपत्रकांचे वाटप २६ जून, दुपारी ३ वा.
गुणपडताळणीचा अर्ज करण्यासाठी मुदत २६ जून ते ५ जुलै
छायाप्रतीसाठी अर्ज करण्याची मुदत - ७ जुलै
निकाल वेळेतच : यावर्षी दहावीच्या निकालाला झालेला उशीर राज्यमंडळाला मात्र मान्य नाही. निकाल वेळेतच लागला असल्याचे राज्यमंडळाचे म्हणणे आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाचे अध्यक्ष गंगाधर मम्हाणे यांनी सांगितले, ''गेल्या वर्षी ७ जूनला निकाल जाहीर झाल्यामुळे निकालाला उशीर झाला असल्याचे दिसत आहे. मात्र, यावर्षी निकालाला उशीर झाला नाही, तर गेल्यावर्षी निकाल लवकर लागले होते.''

Monday, June 16, 2014

प्रवेशपूर्व नोंदणीसाठी अखेरचे तीन दिवस

प्रवेशपूर्व नोंदणीसाठी अखेरचे तीन दिवस

Published: Monday, June 16, 2014
मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयात पदवीच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठीची ऑनलाइन प्रवेशपूर्व नोंदणीची संख्या शुक्रवापर्यंत दोन लाख तीन हजार ७०० इतकी झाली आहे. ही नोंदणी या नोंदणीसाठी अखेरचे तीन दिवस उरले असल्याने ज्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली नसेल त्यांनी लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे. २ जूनपासून प्रवेशपूर्व नोंदणी सुरू आहे. नोंदणीच्या पहिल्या दिवशी चार हजार ८३८ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नावनोंदणी केली होती. नोंदणीला विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद लाभला असून शुक्रवापर्यंत दोन लाख तीन हजार ७०० विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली आहे. या विद्यार्थ्यांनी पाच लाख ८०८ अर्ज भरले आहेत. विद्यार्थ्यांना १६ जूनपर्यंत विद्यापीठाकडे प्रवेशपूर्व नोंदणी करता येणार आहे. नोंदणीप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नोंदणीच्या िपट्र कॉपीसह विद्यार्थ्यांना १९ जूनपर्यंत कॉलेजात प्रवेश अर्ज भरता येईल. अर्ज सादर केल्यानंतर कॉलेजची पहिली गुणवत्ता यादी १९ जून रोजी कॉलेजांमध्ये जाहीर होणार आहे.

Monday, June 9, 2014

ग्रीन टी मुळे मेंदूला फायदा

Thats इट

ग्रीन टी मुळे मेंदूला फायदा

Published: Saturday, June 7, 2014
आपण जो नेहमी चहा पितो त्यापेक्षा ग्रीन टी महाग असतो पण त्यात जास्त औषधी गुण असतात. तो दुधाबरोबर वापरला जात नाही तर काढय़ासारखा वापरला जातो. त्यामुळे माणसाचे सर्वागीण आरोग्य सुधारते. मेंदूची शक्ती वाढते. स्वित्र्झलडच्या संशोधकांच्या मते ग्रीन टी मुळे आकलन वाढते, डिमेन्शिया (विसरभोळेपणा) यात सुधारणा दिसून येते. आतापर्यंत ग्रीन टी कर्करोगावर कसा गुणकारी आहे यावर बरेच संशोधन झाले आहे, पण ग्रीन टी मुळे मेंदूची बोधन क्षमता वाढते हे बॅसेल विद्यापीठाचे ख्रिस्तोफर बेगलिंगर व सायकिअॅट्रिक युनिव्हर्सिटी क्लिनिकचे स्टेफन बोरगाईट यांनी एक प्रयोग केला. त्यानुसार ग्रीन टी चा अर्क घेतल्यास मेंदूतील जोडण्या सुधारतात. तसेच मेंदूची तंदुरुस्ती वाढते. दोन्ही भाग कार्यक्षमतेने काम करतात, कामचलाऊ स्मृती लगेच सुधारते. काही प्रौढांना ग्रीन टी देऊन स्मृतींशी संबंधित कामे सांगितल्यानंतर त्यांनी ती चटकन केली. मॅग्नेटिक रेझोनन्स पद्धतीने मेंदूचा अभ्यास केला असता मेंदूच्या पॅरिएटल व फ्रंटल कॉर्टेक्स या भागातील जोडणी चांगली झाल्याचे दिसून आले. त्यामुळे ज्यांच्यावर प्रयोग केला त्या प्रौढांची काम करण्याची क्षमता सुधारली. ग्रीन टी मुळे मेंदूतील जोडण्यांची लवचिकता वाढते, असे बोर्गवार्डट यांचे मत आहे. ज्यांच्यात बोधनात्मक क्रियेमध्ये बिघाड आहे अशा लोकांमध्ये मेंदूचे कार्य ग्रीन टी मुळे सुधारते. डिमेन्शिया या न्यूरोसायकिअॅट्रिक आजारातही त्याचा फायदा होतो. सायकोफार्माकोलॉडी या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.
पाणी तपासण्याचे यंत्र
आपल्याकडे पिण्याच्या पाण्याचा दर्जा तपासून बघण्याच्या भानगडीत कुणी फारसे पडत नाही. श्रीमंतांच्या घरात ते तपासण्याची गरज नसते कारण अगदी बोअरचे पाणीही शुद्ध करणारी यंत्रे मिळतात. दूषित पाण्यामुळे माणसाला अनेक आजार होतात, त्यामुळे सुरक्षित पेयजल मिळणे हा खरा तर सर्वाचाच अधिकार आहे. पाणी दूषित आहे की स्वच्छ हे ओळखण्यासाठी भारतीय वंशाच्या मनूप्रकाश या अमेरिकी वैज्ञानिकाने एक रासायनिक संच तयार केला आहे त्याची किंमत अवघी पाच डॉलर आहे. विकसनशील देशात पाण्याच्याच नव्हे तर रोगांच्या निदानासाठी त्याचा वापर करता येणार आहे. मनूप्रकाश हे स्टॅनफर्डच्या जैवअभियांत्रिकी विभागात सहायक प्राध्यापक आहेत. त्यांना हे यंत्र आणखी विकसित करण्यासाठी पन्नास हजार डॉलरचे अनुदान मिळाले आहे. त्यात बऱ्याच नावीन्यपूर्ण कल्पना वापरल्या असून ते यंत्र मुलांना संगीत खेळणे म्हणूनही वापरता येते त्यामुळे तो म्युझिक बॉक्सही आहे. म्हटलं तर पाणी किंवा द्रवाची चाचणी करणारे यंत्र  नाहीतर खेळणे आहे. त्यात एक चाक, एक सिलिकॉन चिप, आवर्ती छिद्र असलेला पेपर टेप आहे. सिलिकॉन चिपमध्ये द्रव वाहिन्या आहेत. जेव्हा पिन पेपर टेपमधील छिद्रात जाते तेव्हा द्रवाचा ठिपका पडतो. असे पंधरा पंप एकावेळी थेंब पडण्याने सुरू होतात. हा रासायनिक संच कुठेही नेता येतो व पाण्याचा, मातीचा दर्जा त्याच्या मदतीने तपासता येतो. शिवाय सापाच्या विषाची चाचणीही करता येते. मनूप्रकाश व जॉर्ज कोरिक यांनी हे यंत्र स्वस्तात तयार केले आहे.
तुमच्या हृदयाचे वय किती?
हृदय हा आपल्या शरीरातील एक महत्त्वाचा अवयव असतो. वैज्ञानिकांनी आता हृदयाचे खरे वय ठरवणारे साधन शोधून काढले आहे. कौटुंबिक व जीवनशैलीविषयक जोखमीचे घटक पाहून हे साधन तयार करण्यात आले आहे. त्यामुळे जोखमीचे घटक नसलेल्यांच्या तुलनेत ते असलेली व्यक्ती उपचार न केल्यास हृदविकाराचा झटका येण्यापूर्वी किती काळ जगू शकेल याचा अंदाज करता येतो. ब्रिटिश मेडिकल सोसायटीजच्या संशोधकांनी केलेल्या संशोधनानुसार जेबीएस३ जोखीम मापक त्यांनी तयार केली आहे. त्यामुळे त्या व्यक्तीला हृदयविकाराचा धोका कितपत आहे? तो कसा टाळता येईल हे अगदी अलीकडच्या टप्प्यात समजते. ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.सध्याची जीवनशैली, रक्तदाब, कोलेस्टेरॉल पातळी, वैद्यकीय स्थिती यांचा हृदयावर जो परिणाम होतो याचा विचार यात केला जात आहे. समजा ३५ वर्षांच्या एका स्त्रीचा सिस्टॉलिक रक्तदाब १६० एमएम व कोलेस्टेरॉल ७ एममोल/ लिटर आहे शिवाय घरात हृदयविकाराचा इतिहास आहे तर तिच्या हृदयाचे वय ४७ समजावे व हृदयविकारापुरता विचार केला तर तिला ७१ व्या वर्षीपर्यंत हृदयविकार व पक्षाघाताचा धोका नाही. दहा वर्षांतील तिची जोखीम ८ टक्के असेल. जर स्त्रियांनी धूम्रपान सोडले, कोलेस्टेरॉल ४ एम.मोल/ लि. व सिस्टॉलिक रक्तदाब १३० ठेवला तर त्यांच्या हृदयाचे वय ३० पर्यंत खाली येते व या स्त्रिया हृदयविकार न होता ८५ वर्षे जगतील. दहा वर्षांत त्यांची जोखीम ०.२५ टक्केही राहणार नाही. जेबीएस३ हा मोठा जोखमीचा घटक असतो. तो तुमच्या जीवनशैलीने किती परिवर्तन घडले हे दाखवतो. धूम्रपान सोडणे, आरोग्यदायी आहार पद्धती, नियमित व्यायाम यामुळे हृदयविकाराचा धोका टळू शकतो.
मेदाचे प्रमाण तपासणारी रक्तचाचणी
डीएनएचे वाचन करणारी एक साधी रक्त चाचणी. तुमच्या मुलात लठ्ठेपणा येणार की नाही हे सांगू शकणार आहे. साऊथहॅम्पटन, एक्स्टर, प्लायमाऊथ या विद्यापीठातील संशोधकांनी ही चाचणी विकसित केली असून, त्यात 'पीजीसी१ए' या जनुकातील एपिजेनेटिक स्वीचेसचा अभ्यास करण्यात आला आहे, हे जनुक शरीरात मेदाचा साठा करण्यास कारणीभूत ठरत असते. डीएनए मेथिलेशन. या रासायनिक बदलामुळे एपिजेनेटिक स्वीचेस तयार होतात. ही स्वीचेस जनुकाचे नियंत्रण करीत असतात. साऊथहॅम्पटन विद्यापीठाच्या संशोधकांना असे दिसून आले की, पाच वर्षांच्या मुलांवर ही चाचणी केली असता ते मोठे होतील तेव्हा त्यांच्या रक्तात मेदाचे प्रमाण किती असेल हे सांगता येते. डीएनए मेथिलेशन हे वयाच्या ५ व्या वर्षी १० टक्के जास्त असले तर वयाच्या १४ व्या वर्षी त्या मुलात मेदाचे प्रमाण हे १२ टक्के असणार हे उघड आहे. मुलगा असो की मुलगी मेदाचे हे गणित चुकणार नाही, असा वैज्ञानिकांचा दावा आहे. साऊथ हॅम्प्टन विद्यापीठाचे डॉ. ग्रॅहॅम ब्रज व डॉ. कॅरेन लिलीक्रॉप यांनी हे संशोधन केले आहे. मोठेपणी मुले लठ्ठ होतील की नाही हे वयाच्या पाचव्या वर्षीय समजण्यासाठी त्यांनी ही  चाचणी विकसित केली आहे. या संशोधनाचा दुसरा अर्थ लहानपणीचा लठ्ठपणा हा केवळ जीवनशैलीवर नव्हे तर त्याचे नियंत्रण करणाऱ्या जनुकांवर अवलंबून असतो. या ज्ञानातून पुढे विकसित व विकसनशील देशातील मुलांमध्ये असलेला लठ्ठपणा रोखण्यात मदत होणार आहे. यात एक्स्टर विद्यापीठाच्या टेरेन्स विलकीन, प्लायमाऊथ विद्यापीठाच्या डॉ. जोआन होस्किंग यांचा सहभाग होता. 'डायबेटिस' या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. अर्ली बर्ड प्रोजेक्ट या प्रकल्पात प्लायमाऊथ विद्यापीठात ३०० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. त्यातील ४० मुलांची डीएनए तपासणी करण्यात आली. वय वर्षे पाच ते १४ या काळात त्यांच्यावर संशोधन करण्यात आलो. मुले किती मेद सेवन करतात, किती व्यायाम करतात, याचा अभ्यास करून त्यांचे रक्त नमुने गोळा करण्यात आले. त्यातील जनुके काढून एपिजेनेटिक स्वीचेस तपासण्यात आली. लठ्ठपणामुळे टाइप-२ मधुमेह होण्याची शक्यता असते.

बहुगुणी प्लास्टिक

Thats इट

बहुगुणी प्लास्टिक

Published: Saturday, June 7, 2014
नुकत्याच साजऱ्या झालेल्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने सालाबादप्रमाणे यंदाही प्लास्टिक 'राग' आवळणारी वृत्तचित्रे माध्यमांकडून जोमाने दाखविली जात होती. प्लास्टिकचा भस्मासुर कसा बोकाळत आहे हे आपण गेली अनेक वर्षे पाहतो आहोत. बाजारात जाताना आपण नेमकी कापडी पिशवी न्यायची विसरतो आणि प्लास्टिक पिशवीत सामान घेतो. काही वेळा तर त्यासाठी पाच रुपयेही मोजतो. मोठय़ा दुकानात प्लास्टिकची पिशवी देतात, पण त्याचे दोन ते पाच रुपये आकारले जातात. पण या प्लास्टिकचे कचऱ्यात गेल्यानंतरही विघटन होत नाही, नदी-नाले तुंबतात, मग या प्लास्टिकच्या कचऱ्याचे करायचे तरी काय? पर्यावरण दिनानिमित्तानेच प्लास्टिकविरोधी पारंपरिक सूर टाळून गरज आणि इच्छाशक्ती असली तर प्लास्टिकचे काय करता येईल, याचा सकारात्मक आढावा.
बंगळुरूतील प्रयोग
खरेतर याला प्रयोग म्हणता येणार नाही कारण ती सिद्ध झालेली गोष्ट आहे, की प्लास्टिकचा वापर रस्ते तयार करण्यासाठी करता येतो. बंगळुरूत रोज एक चतुर्थाश कचरा हा प्लास्टिकचा असतो, पण या प्लास्टिकचे काय करायचे याची चिंता केके प्लास्टिक कचरा व्यवस्थापनाचे अहमद खान यांना पडली होती, त्यांनी प्लास्टिक त्याज्य वस्तू मानतो त्याचा दुसरीकडे काही उपयोग करता येईल का, असा विचार केला. गांधीजी म्हणायचे, की कुठलीही वस्तू पूर्ण वापरल्याशिवाय फेकून देऊ नका. चंगळवादी संस्कृतीत लोक कपडे बदलावे तशा वस्तू बदलतात आणि त्यांचा शेवटी कचराच होतो. तर खान यांनी प्लास्टिक गोळा करून ४३० कि.मी.चा रस्ता तयार केला आहे. अहमद खान सांगतात, की प्लास्टिकचा वापर रस्त्यांसाठी करावा, की करू नये यावर आपण अनेकांशी बरीच सल्लामसलत केली, त्यामुळे आणखी जनजागृती झाली. खान रोज कचराकुंडीत जायचे व प्लास्टिक गोळा करायचे. हे प्लास्टिक गोळा केले, की ते बिटूमेनमध्ये मिसळतात, बिटूमेन हा पदार्थ अस्फाल्ट सिमेंट किंवा अस्फाल्ट म्हणून ओळखला जातो. खनिज तेलशुद्धीकरणात तो तयार होतो व सामान्य तपमानाला अर्धघनअवस्थेत राहतो. काही वेळा दगड, वाळू व बिटूमेन यांच्या मिश्रणाला अस्फाल्ट म्हणतात तर रस्ते निर्मितीत ५ टक्के बिटूमेन वापरलेले असते. तर खान नावाचे हे गृहस्थ बिटूमेनमध्ये प्लास्टिक मिसळत होते. प्लास्टिकमुळे रस्ते टिकतात अधिक. शिवाय रोज ९००० टन प्लास्टिक तयार होते ते सत्कारणीही लागते.
अमेरिकेत प्लास्टिकपासून पेट्रोल
जगात सगळीकडेच वेगवेगळे प्रयोग सुरू असतात पण त्याची माहिती आपल्यापर्यंत येतेच असे नाही. अमेरिकेतील उद्योजिका व वैज्ञानिक प्रियांका बकाया हिने प्लास्टिकपासून वीज तयार करण्याचा प्रयोग केला आहे, हे सगळे प्रकार येथे सांगत आहे, त्याला इनोव्हेशन असे गोंडस नाव आहे व त्यालाच टाकाऊपासून टिकाऊ असे म्हणतात. आता अमेरिकेसारखा देश तिथे तर सगळेच यूज अँड थ्रो. पण फेकून दिलेल्या वस्तूंचा ढीगच जमतोय त्यात प्लास्टिक आहे. प्लास्टिक हे खनिज तेलापासून बनते व त्यामुळे त्याचे ऊर्जा मूल्य खूप अधिक असते त्यामुळे या प्लास्टिकला पुन्हा तेलात रूपांतरित करण्याचा आमचा उपक्रम आहे. त्यामुळे त्याचा इंधन म्हणून वापर करता येईल. ही नवीन कल्पना पी.के. क्लीन या अमेरिकेतील एमआयटी संस्थेने स्थापलेल्या संस्थेने साकार केली आहे. प्रियंका ही त्या कंपनीची मुख्य कार्यकारी अधिकारी आहे. प्रियंकाचे ऑस्ट्रेलियातील कौटुंबिक मित्र पर्सी क्लीन यांनी ही कल्पना प्रथम मांडली. पर्सी हे संशोधक होते व त्यांचा विवाह झालेला नव्हता, मुलेबाळे नाही, ते अगदी आजोबाच होते असे बकाया सांगते. त्यांचे घर म्हणजे रसायनशास्त्राची प्रयोगशाळाच होती. टाकाऊ पदार्थापासून ते तेल तयार करायचे व त्यावर दिवा पेटवायचे, त्यांचे हे सगळे प्रयोग बघून आश्चर्य वाटायचे ,प्रियंका सांगते. कीन यांचे २००७ मध्ये ९५ व्या वर्षी निधन झाले, त्यांनी शोधलेल्या तंत्रज्ञानाचे व्यावसायिकीकरण झाले नाही पण त्यांनी काही नोट्स ठेवल्या होत्या नंतर न्यूयॉर्क येथे मी त्यांच्याप्रमाणेच संशोधन हाती घेतले. खनिज तेलाच्या किमती तर वाढतच आहेत. मग स्वच्छ ऊर्जा तंत्रज्ञान विकसित करण्यावर भर द्यावा असे वाटले. एमआयटीमध्ये प्रियंका ऊर्जा विषय शिकत होती, तेव्हा तिने उटाह येथील सॉल्ट लेक येथे एक कंपनी सुरू केली. तेथे प्लास्टिकवर प्रक्रिया करणारी यंत्रे तयार केली व ते अमेरिकेत सगळीकडे उपलब्ध करून दिली. २०१० मध्ये तिने भारतातही हा प्रयोग केला. तिच्या पी.के.क्लीन या कंपनीला २०११ मध्ये एमआयटीचा स्वच्छ ऊर्जा पुरस्कार मिळाला, यामागे टीमवर्कचे यश आहे असे ती सांगते.
तंत्रज्ञान काय
प्रियंकाने खनिज तेलापासून प्लास्टिक बनवतात तर प्लास्टिकपासून खनिज तेल का बनवता येऊ नये ही संकल्पना वापरली, हे नव्या जगाचे रसायनशास्त्र आहे. पी.के.क्लीन या कंपनीच्या वतीने तिने या तंत्रज्ञानाचे पेटंटही घेतले आहे. प्लास्टिक हे अनेक कार्बन रेणूंचे बनलेले आहे. आमच्या प्रक्रियेत आम्ही कार्बनच्या या मोठय़ा साखळ्या तोडून छोटय़ा करतो. डिझेल हे कार्बनचे १२ ते २० रेणू एकत्र साखळीत जोडून बनते, हे नेमके तंत्र त्या सांगता नाहीत पण हे मात्र खरे, की सरते शेवटी उष्णता व उत्प्रेरक यांच्या वापराने केलेल्या या प्रक्रियेतून ७५टक्के तेलच मिळते. यात प्रदूषण होत नाही. २०  टक्के नैसर्गिक वायू तयार होतो, तो पुन्हा उष्णता निर्मितीसाठी वापरला जातो म्हणजे प्लास्टिक तापवायला वेगळे इंधन वापरावे लागत नाही व ५ टक्के अवशेष राहतात, तेही कसले असते तर प्लास्टिकवर जी लेबले लावतात त्यांचे असते. प्लास्टिकपासून जास्त ऊर्जा मूल्याचे तेल मिळवता येते असा याचा अर्थ आहे.
प्लास्टिक वापरलेला पहिला रस्ता
कणेगरी येथे बंगळुरू विद्यापीठाच्या बाहेर जो ट्रॅक रोड बांधलेला आहे, तो देशात या तंत्रज्ञानाने बांधलेला पहिला रस्ता आहे. यात प्लास्टिक बिटूमेनमध्ये टाकून त्याच्या गोळ्या करण्याचे यंत्र असते, त्याचा वापर केला जातो. खरेतर प्लास्टिकपासून रस्ते तयार करता येतील याचा पथदर्शक प्रकल्प बंगळुरूच्या आर.व्ही कॉलेज अफ इंजिनीयिरगच्या विद्यार्थ्यांनी तयार केला, त्यांनी रस्ते संशोधन संस्थेचे समन्वयक ए.वीरराघवन व तज्ञ प्राध्यापक जस्टो यांना अहवाल सादर केला, त्यात असे दिसून आले, की रस्त्यांमध्ये प्लास्टिक वापरल्याने ते मजबूत होतात व प्रदूषणाचे संकटही टळते.रस्त्यासाठी जे बिटूमेन वापरावे लागते त्यात प्लास्टिक मिसळले जात असल्याने खर्चही कमी होतो., रस्त्याची मजबुती तीन पट वाढते.
प्लास्टिकचे धोके
अगदी २० मायक्रॉन जाडीच्या प्लास्टिक पिशव्याही त्यासाठी वापरतात येतात, ज्यांच्यावर अनेक राज्यात बंदी आहे. के.के.पॉलिफ्लेक्स ही कंपनी कागद-कचरा व्यावसायिकांकडून प्लास्टिक विकत घेते. आता प्लास्टिकमध्ये बिसफेनॉल असेल तर त्यामुळे कर्करोग होतो त्यामुळे लहान बाळांसाठी दुधाच्या बाटल्या चांगल्या दर्जाच्या प्लास्टिकच्या हव्या. हल्लीतर लोक चहाही प्लास्टिक पिशवीत देतात, इतका अतिरेक झाला आहे. उकळता चहा आणि कमी दर्जाचे प्लास्टिक मिळून आपण काय पित असतो ते आपल्याला नंतरच कळते तो भाग अलाहिदा. प्लास्टिकमुळे शुक्रजंतूंचे प्रमाण कमी होते. स्तनाचा कर्करोग होतो. प्लास्टिकच्या पिशव्या नदी-नाल्यात साठून त्यांचे मार्ग बंद होतात असे अनेक दुष्परिणाम आहेत. गाईंच्या पोटातून प्लास्टिकच्या पिशव्या निघाल्याच्या घटनाही आपण वाचतो. मग त्यावरचा हा उपाय सर्वच महापालिकांनी करायला काय हरकत आहे, कदाचित त्यात व्यवहाराच्या दृष्टीने काही भाग नकोसा असेल, तरी शहर विकासासाठी तो आवश्यक असू शकतो.
'प्लास्टिक हा सर्वात वाईट प्रकारचा कचरा असतो, त्याचे विघटन व्हायला कित्येक शतके लागतात, खड्डय़ांमध्ये कचराकुंडीत, पर्यटन स्थळी आपण नकळत हा कचरा टाकत असतो, हजारो टन  प्लास्टिक लँडफील्समध्ये गाडले जाते.'
प्रियंका बकाया
'सुरुवातीला आम्ही रस्ते बांधणीसाठी प्लास्टिक वापरण्याचा प्रयत्न केला, तेव्हा जे हाताला लागेल ते प्लास्टिक गोळा करत होतो, विकतही घेत होतो. कुठेही थांबायची आमची तयारी नव्हती, मग आम्ही त्याचा साठा करून ठेवला, मग आम्ही बंगळुरू महापालिकेपुढे शहरातील ४० टक्के रस्ते प्लास्टिकने तयार करण्याचा प्रस्ताव मांडला, रस्ते बांधलेही, आज या रस्त्यांनी अनेक पावसाळे पाहिले आहेत.'- अहमद खान