Tuesday, March 17, 2015

नवनीत [Print] [Email] अ‍ॅल्युमिनिअम फॉइल

नवनीत

अ‍ॅल्युमिनिअम फॉइल

Published: Thursday, September 25, 2014
आपल्या घरात अ‍ॅल्युमिनिअम फॉइलने एक महत्त्वाची जागा पटकावली आहे. खूपदा खायच्या वस्तू या अ‍ॅल्युमिनिअम फॉइलमध्ये गुंडाळून ठेवल्या जातात. 'अ‍ॅल्युमिनिअम फॉइल' या नावामध्ये असल्याप्रमाणे अ‍ॅल्युमिनिअम या धातूपासून तयार केली जाते. घरांमध्ये वापरली जाणारी फॉइल ही साधारण ०.०१६ मि.मी. जाडीची असते. या फॉइलला हवा तो आकार देता येतो, हवी तशी वाकवता किंवा गुडाळता येते. शिवाय मुख्य म्हणजे या फॉइलची जाडी ०.०२५ मि.मी.(२५ मायक्रॉन)पेक्षा जास्त असल्यास या फॉइलमधून हवा व पाणी आरपार जाऊ शकत नाही. अन्नपदार्थाचा हवेशी संपर्क आल्यास कुबट वास येतो आणि चवही बदलते, म्हणून अन्नपदार्थ हवाबंद करण्यासाठी पॅकेजिंगमध्ये अ‍ॅल्युमिनिअम फॉइलचा वापर करतात. अ‍ॅल्युमिनिअम फॉइल या कमीत कमी ०.००४३ मि.मी. ते जास्तीत जास्त ०.२ मि.मी. या विविध जाडीच्या आढळून येतात.
ही फॉइल अपारदर्शक असल्यामुळे प्रकाशापासून पदार्थाचे संरक्षण होते. म्हणून खायच्या वस्तू, औषधे, सौंदर्य प्रसाधने इ. फॉइल वापरून प्रकाश आणि हवा यांपासून संरक्षित केली जातात. अ‍ॅल्युमिनिअम फॉइल ही कागदी किंवा प्लास्टिक बॉक्स यांवर लॅमिनेट करता येत असल्याने या फॉइलचा वापर मोठय़ा प्रमाणात वाढला आहे.
खरे तर अ‍ॅल्युमिनिअम हा धातू रासायनिकदृष्टय़ा क्रियाशील आहे. क्षरणाच्या संदर्भात अ‍ॅल्युमिनिअम धातूचे एक वैशिष्टय़ आहे. हा धातू हवेच्या संपर्कात आला, की हवेतील ऑक्सिजनबरोबर संयोग पावून अ‍ॅल्युमिनिअम ऑक्साइड (अ‍ॅल्युमिना) तयार होऊन त्याचा एकसंध थर धातूवर जमा होतो. अ‍ॅल्युमिना रासायनिकदृष्टय़ा अक्रियाशील असल्याने त्यावर अन्नद्रव्यातील सौम्य आम्लांचा काहीच परिणाम होत नाही. हा थर आतील अ‍ॅल्युमिनिअम धातूला धट्ट धरून बसत असल्याने थराखालील अ‍ॅल्युमिनिअम धातूचा हवा आणि पाण्याशी संपर्क येत नाही, म्हणून अ‍ॅल्युमिनिअम धातूचे क्षरण होत नाही.
अशी ही फॉइल प्रथम १९१०मध्ये स्वित्र्झलडमध्ये तयार केली. यासाठी शुद्ध अ‍ॅल्युमिनिअम किवा अ‍ॅल्युमिनिअमची संमिश्रे वापरली जातात. पूर्वी टिन(कथिल)ची फॉइल वापरात होती. पण पॅकेजिंगमध्ये टिन फॉइल वापरल्याने आतील पदार्थाच्या स्वादात फरक पडत असे. त्यामुळे टिन फॉइलऐवजी आता अ‍ॅल्युमिनिअम फॉइलचा वापर होतो.

No comments:

Post a Comment