नवनीत
कुतूहल: सुवास घातकसुद्धा!
कुतूहल: सुवास घातकसुद्धा!
गंध हा प्रामुख्यानं वायू अथवा बाष्प याद्वारे गंधपेशीस उद्दीपित करतो. त्याचं प्रमाण जरी अल्प असलं तरी त्यामुळे गंधज्ञान होऊ शकतं. हा वायू त्वचेवरील श्लेष्मात विरघळतो तेव्हाच गंधपेशी उद्दीपित होऊन चेतातंतूद्वारे मेंदूकडे संवेदना पाठवली जाते आणि आपल्याला त्या त्या पदार्थाचं गंधज्ञान होते. ज्या गंधानं आपलं मन प्रफुल्लित व उत्साहित होतं असे गंध आपल्याला आवडतात आणि त्या गंधाला आपण 'सुवास' असं म्हणतो.
परफ्यूम्सना मनमोहक सुवास येतात, खाद्यपदार्थाना मन चाळवणारे वास येतात, स्वच्छता करायच्या रसायनांतून मन प्रसन्न करणारे गंध सोडले जातात, सौंदर्यप्रसाधनांना मन आकर्षून घेणारे सुगंध लाभतात, औषधांना उग्र पण मनाला बरे होण्याचा दिलासा देणारे वास येतात, तर कचऱ्याला किंवा खराब झालेल्या पदार्थाना मन कंटाळून जाईल असे दर्प असतात. गंध आणि परिणाम यांची सांगड आपला मेंदू घालत असतो आणि त्याप्रमाणे आपल्या मनात भावना उमटत असतात. पण असा हा आपला तल्लख मानवी मेंदूही कधी तरी फसतो बरं का! रासायनिक शस्त्र म्हणून वापरल्या जाणाऱ्या रसायनांना उग्र वास येत असणार हा असाच आपला एक समज! पण शस्त्र म्हणून वापरात असलेल्या बऱ्याच रसायनांना ना रंग असतो ना गंध! याला काही अपवादही आहेत. 'ताबून' हा पदार्थ रंगहीन असून बाष्पनशील आहे (याला जीए असंही म्हणतात.). या द्रवाला उष्णता मिळताच त्याचं वाफेत रूपांतर होतं. ताबूनची वाफ झटकन हवेत पसरते आणि तिला एखाद्या फळासारखा मंद सुगंध येतो. त्यामुळे माणसांच्या तो सहजी लक्षात येत नाही आणि आला तरी त्रासदायक वाटत नाही. पण 'ताबून' हे माणसांसाठी अत्यंत घातक असं रसायन आहे. त्यामुळे युद्धामध्ये त्याचा उपयोग रासायनिक शस्त्र म्हणून केला जातो. असंच आणखी एक रसायन म्हणजे 'सोमन' किंवा जीडी. सोमन हा पदार्थ द्रव स्वरूपात असून बाष्पनशील व क्षयकारी आहे. याला कापरासारखा वास येतो आणि हा आरोग्याला विनाशकारी असतो.
डॉ. मानसी राजाध्यक्ष (मुंबई)
मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,
चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org
No comments:
Post a Comment