Published: Monday, November 10, 2014
आपल्या सर्वानाच एक मजेशीर अनुभव आला असेल. आपला मित्र एखादा छान वासाचा पर्फ्यूम वापरतो. आपल्याला तो पर्फ्यूम आवडतो, आपणही आपल्यासाठी तो विकत आणतो. मग मोठय़ा उत्साहाने तो आपल्या अंगावर फवारतो, पण.. आपल्या पदरी थोडी निराशा येते. आपल्या मित्राच्या अंगाला येणारा सुगंध आता आपल्या अंगावर मात्र वेगळा कसा काय वाटतो, याचं आपल्याला आश्चर्य वाटतं; पण त्यात आश्चर्य करण्यासारखं काही नाही. याचं मुख्य कारण म्हणजे, आपलं आणि आपण अंगावर मारलेल्या पर्फ्यूमचं, जसं रासायनिक सूत जमेल तसा त्या पर्फ्यूमच्या सुवासात थोडा बदल होतो.
आपल्या प्रत्येकाचा आहार आणि आहाराच्या सवयी वेगवेगळ्या असतात. त्यामुळे व्यक्तीनुसार त्वचेत रासायनिकदृष्टय़ा थोडासा फरक असतो. काहींची त्वचा अगदी सूक्ष्म प्रमाणात आम्लधर्मी, तर काहींची किंचितशी आम्लारीधर्मी असते, म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या त्वचेचा सामू भिन्न असतो. अंगावर शिडकावा मारलेलं अत्तर किंवा पर्फ्यूम, अंगातली उष्णता शोषतं आणि मग त्याची वाफ होऊन ती आजूबाजूच्या परिसरात पसरते. पर्फ्यूम जेव्हा आपल्या अंगातली उष्णता शोषतात तेव्हा पर्फ्यूमवर अनेक प्रकारचे रासायनिक परिणामही होत असतात. त्यामध्ये मुख्यत्वेकरून आपण घेत असलेला आहार, औषधं, आपल्या त्वचेमध्ये असलेली रंगद्रव्यं किंवा तेलाचा अंश आणि हो.. आपली मन:स्थिती आणि त्यानुसार शरीरात होणारे रासायनिक बदल अशा अनेक गोष्टींचा समावेश असतो. ज्याच्या आहारात चरबीयुक्त पदार्थाचं प्रमाण जास्त असतं, त्याने वापरलेल्या पर्फ्यूमचा गंध जास्त तीव्र असतो. म्हणून तर पर्फ्यूम विकत घेताना थेट बाटलीतल्या रसायनाचा वास घेण्यापेक्षा, आपल्या हातावर वापरूनच तपासायला पाहिजे. त्वचेमध्ये तेलाचा अंश अधिक असलेल्या व्यक्तीने, अगदी थोडय़ा प्रमाणात वापरलेला पर्फ्यूम दिवसभर सुगंध देत राहतो. याउलट कोरडी त्वचा असलेल्या व्यक्तीला दिवसभरात अनेकदा पर्फ्यूम फवारावं लागतं.
No comments:
Post a Comment