नवनीत
Published: Monday, July 28, 2014
जुन्या
काळातील युद्धात वापरली जाणारी हत्यारं म्हणजे तलवारी, ढाल, भाले, वाघनखं
ही असत. त्यामुळे युद्धात संरक्षण व्हावं म्हणून पोलादी चिलखत, शिरेटोप
वापरलं जाई. पण आधुनिकतेबरोबरच युद्धाचं स्वरूप बदलून गेलं. तलवारी जाऊन
बंदुका आल्या. युद्धातील हत्यारांबरोबर संरक्षण हत्यारेही बदलत गेली. आता
तर अणुयुद्धाचीच धमकी दिली जाते. आता केवळ बंदुकीनं युद्ध होत नाही.
आताच्या काळात बंदुकांचा वापर स्वसंरक्षणासाठी सर्रास होतो. बंदुकीच्या
गोळीपासून संरक्षण व्हावं या उद्देशानं बुलेटप्रूफ जॅकेट तयार केलं गेलं.
कशापासून बनवलं असेल हे जॅकेट? बंदुकीची गोळी थांबविण्याची क्षमता कशामुळे
आली असेल?केवलर या धाग्यांपासून बुलेटप्रूफ जॅकेट बनवलं जात. केवलर हे कृत्रिम धागे पॉलिमर या वर्गात मोडतात. या धाग्यांत पॉलिमरची अतिसूक्ष्म जाळी तयार झालेली असते. केवलर धाग्यात पॉलिमरच्या लांबच लांब साखळ्या असतात. प्रत्येक साखळी ही मोनोमिअरच्या अनेक घटकांनी बनलेली असते. हे मोनोमिअर घटक एक-दुसऱ्याशी रासायनिक बंधनानं जोडलेले असतात. केवलरमध्ये केवळ एकाच साखळीतील मोनोमिअर घटक रासायनिक बंधनानं जोडलेले नसतात, तर दुसऱ्या साखळीतील मोनोमिअर घटकांशीही याच बंधानं जोडलेले असतात. त्यामुळे रासायनिक बंधांचं जाळं तयार होतं. याचा परिणाम जाळीदार रचना होण्यात होतो.
या जाळीदार रचनेमुळे यातून एखादी पॉलिमरची साखळी वेगळी करणं कठीण जातं. केवलर धाग्यांच्या मजबुतीचं रहस्य यातच आहे. ही मजबुती पोलादापेक्षा सहा पटीनं जास्त आढळते, मात्र वजनाला पोलादापेक्षा कमी. अशा प्रकारच्या मजबूत पॉलिमरचा जाड थर तयार केला तर त्यात कमी वेग असणाऱ्या बंदुकीच्या गोळीला थोपविण्याची क्षमता येते. वेगवान बंदुकीच्या गोळीपासून महत्त्वाच्या अवयवांचं (उदा. हृदय, फुप्फुस) संरक्षण व्हावं म्हणून त्या त्या भागात केवलर धाग्यांचा जास्तीचा थर लावावा लागतो.
या मजबुतीमुळेच केवलरचा वापर वेगवेगळ्या क्षेत्रात होतो. वेगवेगळ्या खेळांसाठी लागणारं विविध साहित्य उदा. ग्लोव्हज्, हेल्मेट, पॅड इ. तयार करतात. पंक्चररोधक टायर तयार करण्यासाठीसुद्धा केवलर वापरतात. उच्च तापमानाचा या पदार्थावर परिणाम होत नाही म्हणून अग्निशामक दलातील जवानांचे कपडे या पदार्थापासून तयार केलेले असतात.
No comments:
Post a Comment