नवनीत
Published: Monday, August 11, 2014
सुप्रसिद्ध
संशोधक रिचर्ड फाइनमन यांनी कॅल्टेक इथल्या आपल्या भाषणात म्हटलं होतं की,
विज्ञानाच्या कोणत्याही नियमाचं उल्लंघन न करता एनसायक्लोपीडिया
ब्रिटानिका या शास्त्रीय कोशाच्या सर्व खंडांमध्ये दिलेला मजकूर टाचणीच्या
एका टोकावर लिहिणं भविष्यात शक्य होईल. त्याकाळी फाइनमन यांचं ते विधान
म्हणजे परिकल्पना वाटली होती; पण आता मात्र हे शक्य झालं आहे ते नॅनो
तंत्रज्ञानामुळे!नॅनो पदार्थाचा वापर करून तयार केलेली उपकरणं अत्यंत वेगवान आणि कार्यक्षम असतात. उदाहरणार्थ, सुमियो जिजीमा या जपानी शास्त्रज्ञाने तयार केलेल्या कार्बन नॅनो टय़ुब्ज पोलादी तारांपेक्षा शंभर पटींनी मजबूत असल्याचं आढळून आलं आहे. तसंच त्यांची उष्णता आणि विद्युत वाहन क्षमतासुद्धा खूप जास्त आहे. कार्बन नॅनो टय़ुब्ज वापरून तयार केलेले सौरविद्युत घट अतिशय कार्यक्षम असल्याचं शास्त्रज्ञांना आढळलं आहे. त्यामुळे भविष्यात सौरऊर्जेचा मोठय़ा प्रमाणावर वापर होण्याची शक्यता वाढली आहे.
आज जवळ जवळ सर्वच पदार्थाची, मग ते धातू असोत, अधातू असोत, अर्धवाहक असोत किंवा प्लास्टिकसारखे मानवनिर्मित पदार्थ असोत त्यांची नॅनो रूपं बनवली जात आहेत. इतकंच नाही तर हे नॅनो पदार्थ वापरून हळूहळू औषधं, कापड, रंग बनवण्यास आता सुरुवात झाली आहे. सोन्याच्या नॅनो कणांचा उपयोग करून तयार केलेले संवेदक अत्यंत कमी प्रमाणात असलेल्या शिसे, पारा यासारख्या जड धातूंचं अस्तित्व शोधून काढू शकतात.
इलेक्ट्रॉनिक्स आणि संगणक क्षेत्रात नॅनो तंत्रज्ञानामुळे अभूतपूर्व क्रांती झाली आहे. संगणकाचा वेग आणि माहिती साठवून ठेवण्याची क्षमता यांमध्ये नॅनो तंत्रज्ञानामुळे प्रचंड वाढ झाली आहे. खूप मोठय़ा आकाराचं पण अत्यंत कमी जाडीचं स्क्रीन तयार करणं ह्य़ा तंत्रज्ञानामुळे शक्य झालं आहे. स्मार्टफोनला असलेले अत्याधुनिक टचस्क्रीन्स तयार करतानासुद्धा नॅनो तंत्रज्ञान वापरलं जात आहे.
भारतात नॅनो तंत्रज्ञानाचा उपयोग प्रामुख्याने जैवतंत्रज्ञान क्षेत्र आणि औषधनिर्मिती उद्योगांमध्ये दिसून येतो. केंद्र सरकारच्या Defense Research and Development Organization [DRDO] या संस्थेने नॅनो तंत्रज्ञानाचा वापर करून क्षय आणि विषमज्वर या रोगांचं निदान करण्यासाठी उपयुक्त ठरणारी उपकरणं तयार केली आहेत.
No comments:
Post a Comment