Sunday, August 10, 2014

नवनीत कुतूहल: नॅनो तंत्रज्ञानाचा वापर

नवनीत


कुतूहल: नॅनो तंत्रज्ञानाचा वापर

Published: Monday, August 11, 2014
सुप्रसिद्ध संशोधक रिचर्ड फाइनमन यांनी कॅल्टेक इथल्या आपल्या भाषणात म्हटलं होतं की, विज्ञानाच्या कोणत्याही नियमाचं उल्लंघन न करता एनसायक्लोपीडिया ब्रिटानिका या शास्त्रीय कोशाच्या सर्व खंडांमध्ये दिलेला मजकूर टाचणीच्या एका टोकावर लिहिणं भविष्यात शक्य होईल. त्याकाळी फाइनमन यांचं ते विधान म्हणजे परिकल्पना वाटली होती; पण आता मात्र हे शक्य झालं आहे ते नॅनो तंत्रज्ञानामुळे!
नॅनो पदार्थाचा वापर करून तयार केलेली उपकरणं अत्यंत वेगवान आणि कार्यक्षम असतात. उदाहरणार्थ, सुमियो जिजीमा या जपानी शास्त्रज्ञाने तयार केलेल्या कार्बन नॅनो टय़ुब्ज पोलादी तारांपेक्षा शंभर पटींनी मजबूत असल्याचं आढळून आलं आहे. तसंच त्यांची उष्णता आणि विद्युत वाहन क्षमतासुद्धा खूप जास्त आहे. कार्बन नॅनो टय़ुब्ज वापरून तयार केलेले सौरविद्युत घट अतिशय कार्यक्षम असल्याचं शास्त्रज्ञांना आढळलं आहे. त्यामुळे भविष्यात सौरऊर्जेचा मोठय़ा प्रमाणावर वापर होण्याची शक्यता वाढली आहे.
आज जवळ जवळ सर्वच पदार्थाची, मग ते धातू असोत, अधातू असोत, अर्धवाहक असोत किंवा प्लास्टिकसारखे मानवनिर्मित पदार्थ असोत त्यांची नॅनो रूपं बनवली जात आहेत. इतकंच नाही तर हे नॅनो पदार्थ वापरून हळूहळू औषधं, कापड, रंग बनवण्यास आता सुरुवात झाली आहे. सोन्याच्या नॅनो कणांचा उपयोग करून तयार केलेले संवेदक अत्यंत कमी प्रमाणात असलेल्या शिसे, पारा यासारख्या जड धातूंचं अस्तित्व शोधून काढू शकतात.
    इलेक्ट्रॉनिक्स आणि संगणक क्षेत्रात नॅनो तंत्रज्ञानामुळे अभूतपूर्व क्रांती झाली आहे. संगणकाचा वेग आणि माहिती साठवून ठेवण्याची क्षमता यांमध्ये नॅनो तंत्रज्ञानामुळे प्रचंड वाढ झाली आहे. खूप मोठय़ा आकाराचं पण अत्यंत कमी जाडीचं स्क्रीन तयार करणं ह्य़ा तंत्रज्ञानामुळे शक्य झालं आहे. स्मार्टफोनला असलेले अत्याधुनिक टचस्क्रीन्स तयार करतानासुद्धा नॅनो तंत्रज्ञान वापरलं जात आहे.
भारतात नॅनो तंत्रज्ञानाचा उपयोग प्रामुख्याने जैवतंत्रज्ञान क्षेत्र आणि औषधनिर्मिती उद्योगांमध्ये दिसून येतो. केंद्र सरकारच्या Defense Research and Development Organization [DRDO] या संस्थेने नॅनो तंत्रज्ञानाचा वापर करून क्षय आणि विषमज्वर या रोगांचं निदान करण्यासाठी उपयुक्त ठरणारी उपकरणं तयार केली आहेत.

नवनीत कुतूहल: आश्चर्यकारक पदार्थ - ग्राफिन

नवनीत


कुतूहल: आश्चर्यकारक पदार्थ - ग्राफिन

Published: Saturday, August 9, 2014
एखादा बहुरूपी जसा वेगवेगळ्या रूपात आढळतो, तसं कार्बन हे मूलद्रव्य वेगवेगळ्या रूपात आढळतं. कार्बन म्हणजे जणू रसायनाशास्त्रातला बहुरूपीच! कार्बनची ही बहुरूपंसुद्धा वैशिष्टय़पूर्ण आणि आश्चर्यकारक गुणधर्म असलेली आहेत. यापकीच एक आहे ग्राफिन. बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या पोलादापेक्षा तीनशेपट अधिक मजबूत आणि हिऱ्यापेक्षा चाळीसपट कठीण असलेलं ग्राफिन रबरासारखं लवचीक आहे.
मधमाश्यांच्या पोळ्याच्या कप्प्यांचा जसा आकार असतो, त्या आकारात कार्बनचे अणू एकमेकांशी जोडले जाऊन ग्राफिनचे रेणू तयार होतात. या ग्राफिनला लांबी आणि रुंदी आहे, पण जाडी नाही. ग्राफिनचे सुमारे तीस लाख थर एकमेकांवर ठेवले, तर त्याची जाडी केवळ एक मिलिमीटर होईल.
सामान्य तापमानाला ग्राफिन हे विद्युत प्रवाहाचं चांगलं वाहक आहे. त्यामधून उष्णतेचं चांगल्या प्रकारे वहन होतं.
ग्राफिनचा उपयोग वजनाने अतिशय हलके असलेले उपग्रह, विमानं आणि लष्करी मोटारींच्या बांधणीत करता येतो. 'बोइंग ७८७' या अत्याधुनिक विमानातही ग्राफिनचा वापर केलेला आहे. विमानांचा भूसंपर्क होत नसल्याने आकाशात उडणाऱ्या विमानांना लखलखणाऱ्या विजांचा धोका सहसा संभवत नाही. पण तरीही ग्राफिनचा समावेश असलेल्या पदार्थाचा सूक्ष्म थर विमानांना अधिकच सुरक्षित बनवतो.
बर्कलेच्या संशोधकांनी नुकताच ग्राफिनपासून तीस नॅनोमीटर इतक्या सूक्ष्म जाडीचा आणि सात मिलिमीटर रुंदीचा एक पातळ पडदा बनविला आहे. हा पडदा सिलिकॉन डायऑक्साईडचा थर दिलेल्या दोन सिलिकॉन इलेक्ट्रोडमध्ये ठेवण्यात आला. या इलेक्ट्रोडला विद्युतपुरवठा केला असता स्थितीक विद्युत बल निर्माण होतं आणि त्यामुळे ग्राफिनचा पातळ पडदा थरथरतो. पडद्याच्या थरथरण्यामुळे विविध प्रकारचे दर्जेदार आवाज तयार होतात. ग्राफिन अत्यंत पातळ पण लवचीक असल्याने आवाजाचा दर्जा अत्युच्च असतो.
ग्राफिन वापरून तयार केलेले मोबाइल हँडसेट आता येऊ घातले आहेत. हे हँडसेट अत्यंत पातळ आणि लवचीक असल्याने हवे तसे वाकवता येतील किंवा त्यांची चक्क घडी घालता येईल. अशाच प्रकारे घडी घालून कुठेही सहज नेता येणारा टीव्हीसुद्धा भविष्यात तयार होऊ शकेल.

के.जी. टू कॉलेज सीए परीक्षेत देशात पुण्याची हर्षां तिसरी

के.जी. टू कॉलेज


सीए परीक्षेत देशात पुण्याची हर्षां तिसरी

Published: Saturday, August 9, 2014
सनदी लेखापाल (सीए) परीक्षेत पुण्याची हर्षां चंद्रकांत भट्टड या विद्यार्थिनीने देशातून तिसरा क्रमांक पटकावला आहे. मे-जून, २०१४मध्ये झालेल्या या परीक्षेचा अंतिम निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. यात जयपूरचा संजय नावंधर हा विद्यार्थी ७२.८८ टक्के पटकावून देशातून पहिला आला आहे. तर तर जोधपूरचा कुणाला जेठानी हा ७२.५० टक्के गुण मिळवून दुसरा आला आहे. तर तिसरे स्थान मिळविणाऱ्या हर्षां हिने ७१.७५ टक्के गुणांची कमाई केली आहे.
सीएच्या दोन्ही ग्रुपसाठी देशभरातून ४२,५३३ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ३,१०० विद्यार्थी (७.२९टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर पहिल्या ग्रुपसाठी परीक्षा दिलेल्या ६५,७९२ विद्यार्थ्यांपैकी १३.५०टक्के म्हणजे ८,८८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर दुसऱ्या ग्रुपची परीक्षा दिलेल्या ६५,७०६ विद्यार्थ्यांपैकी १०.६६ टक्के म्हणजे ७००४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सीएचा निकाल आधीच्या म्हणजे नोव्हेंबर, २०१३मध्ये झालेल्या परीक्षेच्या तुलनेत चांगलाच वाढला आहे. तसेच, गुणात्मकदृष्टय़ाही २०१४चा निकाल २०१३च्या तुलनेत चांगलाच वाढला आहे.
'द इन्स्टिटय़ूट ऑफ चार्टर्ड अकाऊंट्स ऑफ इंडिया'तर्फे (आयसीएआय) ही परीक्षा होते. अकाऊंटन्सी शिक्षणात जागतिक स्तरावर होणाऱ्या बदलांच्या अनुषंगाने आम्ही सीएच्या परीक्षेत बदल करीत असतो. जेणेकरून आपले सीए व्यावसायिक जागतिक स्तरावरील स्पर्धेलाही तोंड देऊ शकतील, असे आयसीएआयचे अध्यक्ष के. रघु यांनी सांगितले. त्याकरिता अकाऊंटन्सीचे शिक्षण आणि प्रशिक्षण यांचा आढावा घेणारी समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. आधुनिक आणि जागतिक तोडीचा नवीन अभ्यासक्रमही आयसीएआय तयार करीत आहे. जेणेकरून भारतातील सीएचे शिक्षण हे आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वश्रेष्ठ ठरू शकेल, अशी पुस्ती त्यांनी जोडली.
आता तयारी 'आयआयएम'ची
हर्षां भट्टडने फग्र्युसन महाविद्यालायतून अर्थशास्त्रात पदवी घेतली. तिच्या वडिलांचे किराणा मालाचे दुकान आहे. तिची बहीणही 'सीए' आहे. 'सीए'च्या परीक्षेत चांगले यश मिळेल असे वाटले होते, पण देशपातळीवर यश मिळेल, देशात तिसरी येईन असे वाटले नव्हते. खूप छान वाटत आहे. आता 'आयआयएम'मध्ये प्रवेश घेण्याचे लक्ष्य असून त्यासाठी 'कॅट'ची तयारी सुरू आहे, असे हर्षांने सांगितले.

Thursday, August 7, 2014

नवनीत कुतूहल: कार्बन बकीबॉल व नॅनोटय़ूब्ज

नवनीत


कुतूहल: कार्बन बकीबॉल व नॅनोटय़ूब्ज

Published: Thursday, August 7, 2014
दोन किंवा अधिक अणू रासायनिक बंधाने एकमेकांशी बांधले गेले की त्यापासून रेणू बनतो. काही रेणू हे एकाच रासायनिक मूलद्रव्याच्या अणूंपासून तयार झालेले असतात; तर काही पदार्थाचे रेणू हे वेगवेगळ्या मूलद्रव्यांच्या अणूंचे तयार झालेले असतात. या रेणूंच्या आकारांमध्येही भरपूर वैविध्य आढळतं. काही रेणू एखाद्या साखळीप्रमाणे असतात, तर काही रेणूंची रचना त्रिमितीय असते.
काही बाबतीत एकाच मूलद्रव्याचे रेणू वेगवेगळ्या आकारांमध्ये आढळतात. कार्बन हे मूलद्रव्य वेगवेगळ्या स्वरूपात आढळतं. इंधन म्हणून वापरला जाणारा कोळसा हा कार्बनच, शिसपेन्सिलीत वापरलं जाणारं ग्रॅफाइट आणि दागिन्यांमध्ये वापरण्यात येणारा मौल्यवान हिरा हासुद्धा कार्बनच! पण या तिन्ही पदार्थामध्ये कार्बनच्या अणूंची रचना अगदी वेगळी असते.   
१९७० साली ईजी ओसावा या जपानी संशोधकाने कार्बनचे अणू एकमेकांशी चेंडूच्या आकारात बांधलेले असू शकतात, असं भाकीत केलं. यानंतर तब्बल १५ वर्षांनी म्हणजे १९८५ साली रॉबर्ट कर्ल, हॅरॉल्ड क्रॉटो आणि रिचर्ड स्मॉली यांनी प्रयोगशाळेत चक्क हा रेणू तयार करण्यात यश मिळवलं. चेंडूच्या आकाराचा बकीबॉल किंवा फुलेरीन हा एक रेणू असून तो कार्बनच्या ६० अणूंपासून बनलेला असतो. या ६० अणूंची रचना १२ नियमित पंचकोन आणि २० नियमित षटकोनांच्या स्वरूपात असते. या रेणूचा मधला भाग पोकळ असतो. बकीबॉलमध्ये दोन कार्बन अणूंमध्ये असलेले रासायनिक बंध अतिशय मजबूत असतात.
शुद्ध स्वरूपातला बकीबॉलचा रेणू विद्युत दुर्वाहक असला, तरी यात काही नवीन अणूंची भर टाकली की तो अतिसंवाहक बनतो.
बकीबॉल रेणूंची एकमेकांशी जोडणी करून अतिसूक्ष्म अशा नॅनोटय़ूब्ज करणं हे १९९१ साली साध्य झालं. या कार्बन नॅनोटय़ूब्ज म्हणजे नॅनो स्तरावर तयार करण्यात आलेला पहिला पदार्थ होय. अतिप्रचंड दाब, उष्णता यांचा या नॅनोटय़ूब्जवर कोणताही परिणाम होत नाही. त्यामुळे त्यांच्यापासून अतिशय पातळ पण मजबूत कवच, कृत्रिम हिरे, तसंच लवचीक पण तरीही मजबूत असलेले तंतू बनवता येतात.
मनमोराचा पिसारा: चालणे कैसे!

नवनीत कुतूहल: कार्बन नॅनो टय़ूब्जची उपयुक्तता

नवनीत


कुतूहल: कार्बन नॅनो टय़ूब्जची उपयुक्तता

Published: Friday, August 8, 2014
कार्बन नॅनो टय़ूब्ज अतिशय सूक्ष्म असतात. नॅनो टय़ूब्जला फक्त लांबी असते; रुंदी नाही. जर नॅनो टय़ूबची मानवी केसाच्या जाडीची मोळी बनवायची असेल तर सुमारे ऐंशी हजार नॅनो टय़ूब्ज एकत्र कराव्या लागतील. कार्बन नॅनो टय़ूब्जवर सध्या जगभरात संशोधन सुरू आहे. त्यासाठी अब्जावधी रुपयांची गुंतवणूकही केली गेली आहे.
नॅनो टय़ूब्ज पोलादापेक्षा बळकट पण लवचीक असतात. पोलादाच्या तुलनेत त्या शंभर पट मजबूत आणि पाच पट कठीण असतात. या टय़ूब्ज उष्णतेच्या अतिउत्तम वाहक आहेत. जर नॅनो टय़ूब्जपासून स्वयंपाकासाठी वापरण्यात येणारी भांडी तयार केली तर गॅसवर भांडं ठेवेपर्यंत हाताला चटका बसेल.
नॅनो टय़ूब्जचे बरेच प्रकार आहेत. काही नॅनो टय़ूब्ज फक्त एकाच गुंडाळीच्या असतात, तर काही एकात एक असलेल्या अनेक गुंडाळींच्या असतात. ही गुंडाळी कोणत्या कोनातून होते यावर नॅनो टय़ूब्जचे गुणधर्म अवलंबून असतात. विशिष्ट कोनातून गुंडाळी झाली तर नॅनो टय़ूब्ज धातूचे गुणधर्म दाखवतात; तर वेगळ्या कोनातून गुंडाळले गेल्यास त्या अर्धवाहकाचे गुणधर्म दाखवतात.
भविष्यात संगणकामध्ये वापरण्यात येणाऱ्या चिप्स ह्या सिलिकॉनपासून नव्हे तर कार्बनच्या नॅनोटय़ूब्जपासून बनलेल्या असतील. कार्बनची एक नॅनोटय़ूब माणसाच्या केसापेक्षा लाखो पटींनी लहान असते. त्यामुळे या टय़ूब्जपासून अतिसूक्ष्म संगणक तयार करणं सहज शक्य होईल. हे अतिसूक्ष्म आकाराचे नॅनो संगणक उद्या आपलं घर, रस्ते, वाहनं, इतकंच काय पण आपण घातलेल्या कपडय़ांमध्ये आणि आपल्या शरीरातसुद्धा असू शकतील!
मोबाइल हँडसेट, कार बंपर्स, बुलेटप्रूफ जाकिटं, तसंच संरक्षण क्षेत्रात शस्त्रास्त्रांमध्येसुद्धा कार्बन टय़ूब्जचा उपयोग केला जाऊ शकतो.
सध्या भेडसावणाऱ्या इंधनसमस्येवरही कार्बन नॅनो टय़ूब्जमुळे काही प्रमाणात मात करणं शक्य होऊ शकेल. कारण कार्बन नॅनोटय़ूब्जमध्ये हायड्रोजन वायू साठवून ठेवता येतो. हायड्रोजन साठवण्याची कार्बन नॅनो टय़ूब्जची सध्याची क्षमता सुमारे ११ टक्के आहे. हे प्रमाण जर ३० टक्क्यांपर्यंत वाढले तर हायड्रोजन गॅसवर चालणारी वाहने वापरात येऊ शकतील. यासाठी जगभरातले संशोधक प्रयत्नशील आहेत.

नवनीत कुतूहल: खाण्यासाठी योग्य तेल

नवनीत


कुतूहल: खाण्यासाठी योग्य तेल

Published: Friday, July 25, 2014
स्वयंपाकासाठी कोणतं तेल वापरावं असा गृहिणींना नेहमीच प्रश्न पडतो. आवश्यक मेदाम्लं मिळविण्यासाठी एकच तेल न खाता काही तेलं एकत्र करून वापरावीत. जागतिक आरोग्य संघटनेनं संपृक्त, मोनो आणि पॉली तेल याचं आदर्श प्रमाण अनुक्रमे १:१.५:१ असं सुचवलं आहे.
स्निग्ध पदार्थातून ऊर्जेबरोबरच आवश्यक मेदाम्लं शरीरास उपलब्ध होतात. लिनोलेईक (ओमेगा-६) व लिनोलेनिक (ओमेगा-३) ही आवश्यक मेदाम्लं मेंदू, हृदय, मज्जासंस्था, ग्रंथी व त्वचा यांच्या आरोग्यासाठी फार महत्त्वाची आहेत. तसेच डोळ्यातील दृष्टीपटाच्या (रेटिना) निर्मितीसाठी या मेदाम्लांची गरज असते. हृदयाची स्पंदनं नियंत्रित ठेवण्यासाठी व रक्तातील कोलेस्टेरॉलचं प्रमाण कमी करण्यासाठी लिनोलेईक व लिनोलेनिक या मेदाम्लांचा उपयोग होतो. रोगप्रतिबंधासाठी आवश्यक असलेल्या प्रोस्टाग्लांडिन या द्रव्याच्या निर्मितीसाठी या दोन्ही मेदाम्लांची गरज असते. या दोन मेदाम्लांबरोबरच ओलेइक आम्ल, पामिटिक आम्ल इ. आवश्यक मेदाम्लं शरीरात तयार होत नाही. त्यामुळे ती आहारातूनच मिळवावी लागतात.
शरीरांतर्गत होणाऱ्या जैवरासायनिक क्रियांमधे इलेक्ट्रॉन कमी असलेले जे ऑक्सिजनचे रेणू तयार होतात, त्यांना फ्री रॅडिकल्स असं म्हणतात आणि ते शरीराची हानी करतात. फ्री रॅडिकल्स टाळण्यासाठी शरीर अॅन्टिऑक्सिडंट रसायनं तयार करतं; पण ती पुरेशी न झाल्यास अन्नातून मिळवावी लागतात. क आणि इ जीवनसत्त्व आणि लिनोलेनिक (ओमेगा ३) मेदाम्ल ही अशी अॅन्टिऑक्सिडंटस् आहेत जी अन्नातून आपल्या पोटात जातात. पॉली असंपृक्त तेलातील मोहरीचं तेल, ऑलिव्ह तेल, जवस, अक्रोड आणि मासे यामध्ये लिनोलेईक (ओमेगा-६) व लिनोलेनिक (ओमेगा-३)चं प्रमाण जास्त असतं.
याचबरोबर मोनो असंपृक्त तेल (टवाअ) गटातील भुईमुगाचं तेल व तिळाचं तेल यांना महत्त्व आलं आहे, कारण ही तेलं रक्तातील कोलेस्टेरॉल काबूत ठेवायला मदत करतात. तळण्यासाठी तेलाचं तापमान वाढवावं लागतं. तापमान वाढल्यानं त्यातील मेदाम्लांचा नाश होतो. वाढत्या तापमानामुळे पॉली असंपृक्त मेदाम्लात (ढवाअ) बदल होतो म्हणून ती तेलं पदार्थ तळण्यासाठी वापरू नयेत.संपृक्त मेदाम्लातून (रआअ- तूप, लोणी, मटण, खोबरेल तेल इ.) शरीरास अ, क, ड आणि इ या जीवनसत्त्वांचा पुरवठा केला जातो.

नवनीत कुतूहल: बुलेटप्रूफ जॅकेट

नवनीत


कुतूहल: बुलेटप्रूफ जॅकेट

Published: Monday, July 28, 2014
जुन्या काळातील युद्धात वापरली जाणारी हत्यारं म्हणजे तलवारी, ढाल, भाले, वाघनखं ही असत. त्यामुळे युद्धात संरक्षण व्हावं म्हणून पोलादी चिलखत, शिरेटोप वापरलं जाई. पण आधुनिकतेबरोबरच युद्धाचं स्वरूप बदलून गेलं. तलवारी जाऊन बंदुका आल्या. युद्धातील हत्यारांबरोबर संरक्षण हत्यारेही बदलत गेली. आता तर अणुयुद्धाचीच धमकी दिली जाते. आता केवळ बंदुकीनं युद्ध होत नाही. आताच्या काळात बंदुकांचा वापर स्वसंरक्षणासाठी सर्रास होतो. बंदुकीच्या गोळीपासून संरक्षण व्हावं या उद्देशानं बुलेटप्रूफ जॅकेट तयार केलं गेलं. कशापासून बनवलं असेल हे जॅकेट? बंदुकीची गोळी थांबविण्याची क्षमता कशामुळे आली असेल?
केवलर या धाग्यांपासून बुलेटप्रूफ जॅकेट बनवलं जात. केवलर हे कृत्रिम धागे पॉलिमर या वर्गात मोडतात. या धाग्यांत पॉलिमरची अतिसूक्ष्म जाळी तयार झालेली असते. केवलर धाग्यात पॉलिमरच्या लांबच लांब साखळ्या असतात. प्रत्येक साखळी ही मोनोमिअरच्या अनेक घटकांनी बनलेली असते. हे मोनोमिअर घटक एक-दुसऱ्याशी रासायनिक बंधनानं जोडलेले असतात. केवलरमध्ये केवळ एकाच साखळीतील मोनोमिअर घटक रासायनिक बंधनानं जोडलेले नसतात, तर दुसऱ्या साखळीतील मोनोमिअर घटकांशीही याच बंधानं जोडलेले असतात. त्यामुळे रासायनिक बंधांचं जाळं तयार होतं. याचा परिणाम  जाळीदार रचना होण्यात होतो.
या जाळीदार रचनेमुळे यातून एखादी पॉलिमरची साखळी वेगळी करणं कठीण जातं. केवलर धाग्यांच्या मजबुतीचं रहस्य यातच आहे. ही मजबुती पोलादापेक्षा सहा पटीनं जास्त आढळते, मात्र वजनाला पोलादापेक्षा कमी. अशा प्रकारच्या मजबूत पॉलिमरचा जाड थर तयार केला तर त्यात कमी वेग असणाऱ्या बंदुकीच्या गोळीला थोपविण्याची क्षमता येते. वेगवान बंदुकीच्या गोळीपासून महत्त्वाच्या अवयवांचं (उदा. हृदय, फुप्फुस) संरक्षण व्हावं म्हणून त्या त्या भागात केवलर धाग्यांचा जास्तीचा थर लावावा लागतो.  
या मजबुतीमुळेच केवलरचा वापर वेगवेगळ्या क्षेत्रात होतो. वेगवेगळ्या खेळांसाठी लागणारं विविध साहित्य उदा. ग्लोव्हज्, हेल्मेट, पॅड इ. तयार करतात. पंक्चररोधक टायर तयार करण्यासाठीसुद्धा केवलर वापरतात. उच्च तापमानाचा या पदार्थावर परिणाम होत नाही म्हणून अग्निशामक दलातील जवानांचे कपडे या पदार्थापासून तयार केलेले असतात.

नवनीत कुतूहल: फायबर ग्लास

नवनीत


कुतूहल: फायबर ग्लास

Published: Saturday, July 26, 2014
सिमेंट काँक्रीटमध्ये लोखंडी सळ्या टाकून मजबुती प्राप्त केली गेली. याच प्रमाणे प्लास्टिकवर प्रयोग सुरू झाले. अनेक प्रयोगांनंतर 'पॉलिएस्टर' या प्लास्टिकच्या प्रकारात काचेचे धागे वापरून पाहिजे तशी मजबुती प्राप्त झाली व १९३०च्या सुमारास काचतंतू युक्त प्लास्टिक (ग्लास रिइनफोस्र्ड प्लास्टिक) निर्माण झाले. यालाच 'एफआरपी' या नावानं आपल्या देशात ओळखलं जातं, तर जगात इतरत्र मात्र 'जीआरपी' म्हणजेच 'ग्लास रिइनफोस्र्ड प्लास्टिक' या नावानं हा पदार्थ ओळखला जातो. वजनाला अ‍ॅल्युमिनिअम इतपत हलकं पण पोलादासारखं मजबूत, गंजण्याचा प्रश्नच नाही. सर्व प्रकारच्या हवामानाला, समुद्राच्या खाऱ्या पाण्यालासुद्धा वषरेनुवष्रे तोंड देऊन टिकाव धरणाऱ्या या पदार्थानं क्रांती करून टाकली.
काचतंतू म्हणजे प्रत्यक्ष काचेचे धागेच. अती उच्च उष्णतामानावर सिलिका हा पदार्थ(काच) वितळवून प्लॅटिनमच्या सूक्ष्म साच्यातून काचेचे धागे ओढले जातात. नारळाच्या दोरीला ज्याप्रमाणं पीळ द्यावा त्याप्रमाणं पीळ दिला जातो. या पदार्थाचा वितळणांक कमी करण्यासाठी सोडा अ‍ॅश (सोडिअम काबरेनेट) आणि चुनखडी (कॅल्शिअम काबरेनेट) वापरतात, तर रसायनविरोधक गुणधर्म वाढविण्यासाठी बोरॅक्स वापरतात. अशा रीतीनं तयार झालेल्या धाग्यांना निरनिराळ्या पद्धतीनं विणून चटई किंवा तागा तयार होतो. यानंतर पॉलिएस्टर या प्लास्टिकमध्ये फायबर ग्लास गुंफलं जातं. हे पॉलिएस्टर 'डायबेसिक अ‍ॅसिड व डायबेसिक अल्कोहोल यांच्या संलग्नतेतून तयार होतो. स्टायरिन मोनोमर या द्रवरूप रसायनात त्याला विरघळवून 'पॉलिएस्टर' रेझिन तयार होतो. हे तेलासारखं रेझिन हार्डिनग एजंटच्या सहाय्यानं ठरावीक वेळेत कठीण दगडरूप बनू शकतं. अशा रीतीनं तयार केलेले हे दोन पदार्थ कुठल्याही आकाराच्या साच्यावर एकत्र आणून पसरल्यास काही ठरावीक वेळेनंतर त्याच आकारात कठीण होतात व साच्यातून ठरावीक आकाराची वस्तू तयार होते.  पाहिजे तो रंगही त्यात मिसळता येतो.
फायबर ग्लास हा वीजप्रवाह रोधक आहे, शिवाय बऱ्याचशा अ‍ॅसिडचा यावर परिणाम होत नाही. या गुणधर्मामुळे या पदार्थाचा इलेक्ट्रिक, केमिकल उद्योगातही उपयोग होऊ लागला. आखाती देशांतून पेट्रोलियम रसायनं साठविण्यासाठी प्रचंड आकाराच्या फायबर ग्लासच्या टाक्या बनविल्या आहेत.

के.जी. टू कॉलेज निवडणुकांच्या नियमित कामांपासून शिक्षकांची सुटका

के.जी. टू कॉलेज


निवडणुकांच्या नियमित कामांपासून शिक्षकांची सुटका

Published: Thursday, August 7, 2014
मतदार याद्यांच्या पुन:परीक्षणाच्या कामासाठी जुंपलेल्या शिक्षकांना मुक्त करण्याचे आदेश मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. यामुळे सध्या या कामात असलेल्या शेकडो शिक्षकांना दिलासा मिळणार आहे.
शिक्षण हक्क कायद्यानुसार शिक्षकांना शिक्षणेतर कामांतून मुक्त करण्याची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये शिक्षकांना केवळ निवडणुकीच्या दिवसाचे काम देण्यात यावे असे नमूद करण्यात आले आहे. मात्र प्रत्यक्षात तसे न होता शिक्षकांना याद्यांच्या पुन:परीक्षणापासून ते अनेक कामे दिली जात आहेत. शिक्षण हक्क कायद्याची तरतूद दाखवत ज्या शिक्षकांनी ही कामे करण्यास नकार दिला त्यांना कारवाईच्या नोटीसाही बजावण्यात आल्या आहेत. यामुळे शिक्षकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली होती.
या संदर्भात विविध शिक्षक संघटनांनी आवाज उठविले आहे. शिक्षक आमदार कपिल पाटील यांनीही या संदर्भात मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी शेखर चन्न्ो यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली होती. या सर्वाची दखल घेत त्यांनी शिक्षकांना या कामातून वगळण्यात यावे असे आदेश दिले आहेत. यामुळे या विभागातील शिक्षकांना दिलासा मिळाला आहे.

Monday, August 4, 2014

नवनीत कुतूहल - नॅनो तंत्रज्ञान

नवनीत


कुतूहल - नॅनो तंत्रज्ञान

Published: Tuesday, August 5, 2014
तांदळाच्या दाण्यावर काढलेल्या चित्राचं किंवा त्यावर कोरलेल्या नावाचं अनेकांना आकर्षण असतं. अर्थात, अशा तांदळाच्या दाण्यांना केवळ एक संग्राह्य़ वस्तू यापेक्षा जास्त किंमत नसते. पण जसजसं तंत्रज्ञान प्रगत होत गेलं, तसतशा अत्यंत लहान आकाराच्या वस्तू आपण व्यवहारात वापरायला लागलो. कमीत कमी जागेत मावणाऱ्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांनी तर क्रांती घडवून आणली. गेल्या काही वर्षांपासून नॅनो टेक्नॉलॉजीची चर्चा होते आहे. 'नॅनो' हा शब्द ग्रीक भाषेतल्या ज्या मूळ शब्दावरून आला, त्याचा अर्थ 'ठेंगू' किंवा 'बुटका' असा होतो. 'नॅनो' म्हणजे किती लहान, तर हायड्रोजनचे दहा अणू एकमेकांना चिकटून ओळीने जोडले तर त्याची लांबी एक नॅनो मीटर इतकी असेल. इतक्या सूक्ष्म आकाराच्या पदार्थाचे गुणधर्म अभ्यासून त्यांचा योग्य तो वापर करणं ही गोष्ट म्हणजे बॉिक्सगचे ग्लोव्हज हातात घालून जमिनीवर पडलेले वाळूचे कण उचलण्यापेक्षाही कठीण आहे.
नॅनो तंत्रज्ञान म्हणजे, अत्यंत सूक्ष्म स्वरूपातल्या पदार्थावर नियंत्रण मिळवून त्याचे माहिती नसलेले गुणधर्म शोधणं आणि उपयुक्त गुणधर्माचा वापर करणं. प्रामुख्याने भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या दोन विज्ञान शाखा मिळून तयार झालेली नॅनो टेक्नॉलॉजी ही विज्ञानाची उपयोजित शाखा आहे. या तंत्रज्ञानाचे प्रामुख्याने तीन विभाग पडतात - नॅनो मटेरियल्स, नॅनो इलेक्ट्रॉनिक्स आणि नॅनो बायोटेक्नॉलॉजी.
या तंत्रज्ञानात वापरण्यात येणाऱ्या 'नॅनो' म्हणजेच अतिसूक्ष्म कणांचा एक मुख्य गुणधर्म म्हणजे त्यांचं आकारमान इतकं कमी असूनसुद्धा जास्त क्षेत्रफळावर कार्यरत असण्याची त्यांच्याकडे क्षमता असते. त्यामुळे या कणांची रासायनिक किंवा जैविक प्रक्रिया जास्त चांगल्या प्रकारे आणि अधिक प्रमाणात होऊ शकते. त्यातही जे नॅनो कण मुक्त स्वरूपात असतात, त्या कणांचा परिणाम आणखी जास्त प्रमाणात होऊ शकतो.
एकविसावं शतक हे नॅनो तंत्रज्ञानाचं शतक म्हणून ओळखलं जाईल इतकं व्यापक आणि प्रचंड आवाका असलेलं हे तंत्रज्ञान आहे. या तंत्रज्ञानामुळे भविष्यात अनेक आश्चर्यकारक पण अत्यंत कार्यक्षम उपकरणं तयार होतील
हेमंत लागवणकर (डोंबिवली) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

के.जी. टू कॉलेज महाविद्यालयीन तरुण 'पोलीस मित्र'

के.जी. टू कॉलेज


महाविद्यालयीन तरुण 'पोलीस मित्र'

Published: Tuesday, August 5, 2014
महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी मुंबई पोलिसांनी विशेष मोहीम उघडली असून आता यापुढे त्यात तरुणांचाही सहभाग करून घेतला जाणार आहे. छेडछाड विरोधी पथक आणि पोलीस ठाण्यातील हेल्प डेस्कवर विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतले जाणार असल्याची माहिती मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी सोमवारी दिली.
 महिला आणि मुलांविरोधातील अत्याचार रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपायांबाबत यशवंतराव चव्हाण सभागृहात सोमवारी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात राकेश मारिया यांनी महिला, मुले आणि वरिष्ठ नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन राबवत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. यापुढे अशा प्रत्येक उपक्रमात थेट तरुणांना सहभागी करून घेतले जाणार असल्याचे ते म्हणाले. प्रत्येक पोलीस ठाण्यात महिला, मुले आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र हेल्प डेस्क तयार करण्यात आले आहेत. तेथे महाविद्यालयातील तरुणांना बसविण्यात येणार आहे. त्यामुळे तक्रारदरांना विश्वास निर्माण होण्यात मदत होईल. याशिवाय महाविद्यालय आणि शाळांमध्ये छेडछाड विरोधी पथक स्थापन करण्यात येणार आहे. या प्रत्येक पथकात विद्यार्थ्यांचा सहभाग करुन घेतला जाणार आहे.

नवनीत मेण लावलेले सफरचंद

नवनीत


मेण लावलेले सफरचंद

Published: Monday, August 4, 2014
'अ‍ॅन अ‍ॅपल अ डे कीप्स डॉक्टर अवे' (रोज एक सफरचंद खा आणि डॉक्टरला म्हणजेच आजाराला स्वत:पासून दूर ठेवा) या म्हणीला प्रमाण मानून आपण सफरचंदाचं सेवन करत असतो. सफरचंद विकत घेताना ती छान लालसर, ताजी, चमकदार अशी बघून घेतो. झाडावरून काढून दुकानात ही सफरचंदं पोहोचायला बरेच दिवस जातात, तरी ही सफरचंदं ताजी, चमकदार कशी दिसतात? या सफरचंदांवर मेण लावलेलं असतं त्यामुळे ती चमकदार दिसतात. सुरीने या सफरचंदांवर घासलं तर तुम्हाला हे मेण दिसतं.
जेव्हा सफरचंद झाडावरून काढली जातात त्या वेळी त्यांच्यावर निसर्गत:च मेणाचं आवरण असतं. सफरचंदामधील बाष्प निघून जाऊन ती शुष्क होऊ नयेत यासाठी निसर्गत:च ही योजना केलेली असते. सफरचंद चांगली स्वच्छ दिसावी म्हणून व्यापारी ती छान घासून पुसतात त्या वेळी हे नसíगक मेण निघून जातं. आता ही सफरचंदं वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचवायची असतात त्यासाठी ती टिकावीत म्हणून त्यांच्यावर मेणाचं आवरण लावलं जातं.
फळांवर किंवा चमक येण्यासाठी खाद्यपदार्थावर लावण्यात येणाऱ्या मेणाच्या प्रकारात नसíगक आणि कृत्रिम म्हणजेच पेट्रोलियम बेस असे दोन प्रकार पडतात. नसाíगक मेण म्हणजेच कार्नोबा (पामच्या झाडापासून), मधमाश्यांनी तयार केलेलं मेण, आणि शेलॅक मेण हे होत. शेलॅक मेण लाखेचा कीटक तयार करतो. हे मेण इथॅनॉलमध्ये विरघळवून वापरलं जातं. पेट्रोलियम मेणामध्ये हायड्रोकार्बन असतात. पेट्रोलियम मेण आरोग्याला हानीकारक असतं.
सफरचंदांवर पाम झाडाच्या पानांपासून तयार झालेलं मेण वापरलं जातं. या मेणामध्ये मेदाम्लाचे ईस्टर, हायड्रोकार्बनच्या लांब शृंखला, अल्कोहोल यांचा समावेश असतो. या पामच्या झाडाव्यतिरिक्त इतर वनस्पतींपासूनसुद्धा मेण मिळवता येतं. सफरचंद थोडय़ा कोमट पाण्यात धुतली तर नसíगक मेण जाऊ शकतं. व्यापाऱ्यानं कोणतं मेण वापरलंय हे आपल्याला कळणं अशक्य आहे पण खूप चमकदार फळं दिसली तर जरा सांभाळून!
अनघा वक्टे, (मुंबई) -office@mavipamumbai.org

Sunday, August 3, 2014

नवनीत कुतूहल: व्हॅनिला फ्लेवर

नवनीत


कुतूहल: व्हॅनिला फ्लेवर

Published: Saturday, August 2, 2014
कुठलाही पदार्थ फक्त तोंडाने खाल्ला जात नाही, तर तो डोळ्यांना सुखद वाटला पाहिजे तसेच त्याच्या सुगंधानेही तो आपल्याला खावासा वाटला पाहिजे. स्वयंपाकघरात कोणता पदार्थ शिजतोय हे त्याच्या सुगंधावरून ओळखला जातो. आणि या सुगंधाने आपली भूक चाळवली जाते. पदार्थाच्या स्वत:च्या सुगंधाव्यतिरिक्त आपण काही पदार्थ सुगंधासाठी म्हणून वापरतो. गोड पदार्थातील वेलची, जायफळचा सुगंध आपल्याला आवडतो. एकंदरच पदार्थ सुगंधित बनवण्याकडे आपला कल असतो. मग ते आइस्क्रीम असो वा केक. अगदी नेहमीचा चहा किंवा कॉफीसुद्धा आपल्याला आलं, जायफळ घालून प्यायला आवडते. विविध सुगंधांसाठी नसíगक पदार्थाचा वापर तर केला जातोच, पण कृत्रिम म्हणजेच काही रसायनांचा वापरदेखील केला जातो. खरं तर ही सुगंधित द्रव्य किंवा पदार्थ मूळ पदार्थाच्या चवीत बदल करतातच असे नाही, पण तरीदेखील पदार्थात ती आवर्जून वापरली जातात.
लहान मुलांच्या विशेष आवडीचा सुगंध म्हणजे व्हॅनिला. व्हॅनिला फ्लेवर आइस्क्रीमध्ये जास्त वापरला जातो. खरं तर व्हॅनिला आइस्क्रीम म्हणजे प्लेन, नुसतं आइस्क्रीम असंच समजलं जातं. इतका हा सुगंध आइस्क्रीमच्या बाबतीत आपल्याला सवयीचा झालेला आहे. व्हॅनिला हे सुगंधित द्रव्य व्हॅनिलाच्या शेंगांपासून तयार करतात. व्हॅनिलातील व्हॅनिलिन म्हणजेच ४ हायड्रॉक्सी-३ मिथॉक्सी बेंझलडीहाइड या रसायनामुळे सुगंध येतो. याव्यतिरिक्त व्हॅनिलामध्ये पिपिरिनॉल असतं.
१८५८ मध्ये गोबले याने सर्वप्रथम व्हॅनिलाच्या शेंगांपासून व्हॅनिलाचा अर्क वेगळा केला. १८७४ पासून व्हॅनिलाचा अर्क दोन प्रकारांत मिळू लागला. खऱ्या व्हॅनिलाच्या शेंगांपासून मिळणारा अर्क म्हणजे खूप रसायनांचे मिश्रण असते. यात अ‍ॅसिटलडीहाइड, अ‍ॅसिटिक आम्ल, हेक्झॉनिक आम्ल, युजेनॉल, मिथाइल सिनामेट, ४ हायड्रॉक्सी बेंझलडीहाइड, आइसोब्युटेरीक आम्ल या रसायनांचा समावेश असतो. कृत्रिम व्हॅनिलाच्या अर्कात इथेनॉलमधील कृत्रिम व्हॅनिलिनचे द्रावण असते. कृत्रिम व्हॅनिलिन तयार करण्यासाठी विविध पदार्थ वापरले जातात, पण बहुतेक पदार्थामध्ये वापरले जाणारे व्हॅनिलिन मुख्यत: गॉइकॉलपासून  (Guaiacol) तयार केले जाते.

नवनीत कुतूहल: शुष्क बर्फ

नवनीत


कुतूहल: शुष्क बर्फ

Published: Friday, August 1, 2014
बर्फ कोरडा कसा असू शकतो? बर्फ पाण्यापासून तयार होतो हे आपल्याला माहीत आहे, पण हा शुष्क बर्फ म्हणजे घनरूपातील कार्बन डायऑक्साइड. कार्बन डायऑक्साइड वायू कमी तापमानाला म्हणजेच साधारणपणे -५७ अंश सेल्सिअसला घनरूपात रूपांतरित होतो. तोच हा शुष्क बर्फ. या रासायनिक गुणधर्माला निक्षेपण म्हणतात. तापमान कमी केल्यावर नेहमी वायू अवस्थेतील पदार्थाचे, द्रव अवस्थेत रूपांतर होते. निक्षेपण प्रक्रियेत तापमान कमी केल्यावर वायू अवस्थेतील पदार्थाचे द्रव अवस्थेत रूपांतर न होता घन अवस्थेत रूपांतर होते. कक्ष तापमानालाही शुष्क बर्फाचे रूपांतर वायुरूपात होते, इथे पुन्हा मधल्या अवस्थेत म्हणजे द्रव अवस्थेत रूपांतर होत नाही या रासायनिक गुणधर्माला संप्लवन म्हणतात.
कार्बन डायऑक्साइडचा वायुरूप, द्रवरूप व घनरूप या तिन्ही स्थितीत उपयोग केला जातो. वायुरूपातील कार्बन डायऑक्साइड शीतपेयांमध्ये वापरला जातो. नियंत्रित परिस्थितीत वनस्पतींचे संवर्धन करण्याकरिता वापरण्यात येणाऱ्या काचगृहात अल्प प्रमाणात कार्बन डायऑक्साइड ठेवल्यास झाडांची वाढ होण्यास मदत होते. आग विझविण्यासाठी, काही कार्बनी रसायनांच्या निर्मितीत, साखर शुद्ध करण्यासाठी कार्बन डायऑक्साइड वायूचा उपयोग करतात.
द्रव अवस्थेतील कार्बन डायऑक्साइड पाण्याचा सामू (स्र्ऌ) नियमित राखण्यासाठी आणि कारखान्यांमध्ये शीतलक (कूलिंग एजंट) म्हणून वापरला जातो. द्रव अवस्थेत कार्बन डायऑक्साइड साठवून ठेवून नंतर घन किंवा वायू अवस्थेत जशी मागणी असेल तसा पुरवठा केला जातो.
शुष्क बर्फ आइस्क्रीम, जीवशास्त्राचे नमुने, मांस, अंडी, मासे, फळे, इ. खाद्यपदार्थ, तयार अन्नपदार्थ टिकवण्यासाठी वापरला जातो. जिथे यांत्रिक पद्धत म्हणजेच फ्रिज उपलब्ध नसतो अशा भागात, तसेच कमी तापमानात ठेवायला लागणारे अन्नपदार्थ ने-आण करताना शुष्क बर्फ वापरला जातो. चित्रपटगृहात, लग्न समारंभात किंवा एखाद्या कार्यक्रमात अचानक पांढरे ढग तयार होताना आपण बघतो. शुष्क बर्फ पाण्यात ठेवला असता संप्लवनाचा वेग वाढतो आणि आपल्याला पांढऱ्या शुभ्र वायूचे ढग दिसू लागतात. शुष्क बर्फाच्या सान्निध्यात जास्त काळ राहिलं तर त्वचेला ंअपाय होऊ शकतो.

के.जी. टू कॉलेज मागासवर्गीय विद्यार्थ्यांना 'आयडॉल'चे प्रवेश महाग

के.जी. टू कॉलेज


मागासवर्गीय विद्यार्थ्यांना 'आयडॉल'चे प्रवेश महाग

Published: Thursday, July 24, 2014
मुंबई विद्यापीठाच्या 'दूर व मुक्त अध्ययन संस्थे'च्या (आयडॉल) सर्व अभ्यासक्रमांकरिता मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सरकारकडून शुल्क प्रतिपूर्ती हवी असल्यास प्रवेशापूर्वीच समाजकल्याण विभागाकडे नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. परंतु, समाजकल्याण विभागाने योजनेकरिता अर्ज करण्याची प्रक्रिया अद्याप सुरूच न केल्याने आयडॉलच्या विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची शेवटची तारीख दोन दिवसांवर आली तरी एकाही मागासवर्गीय विद्यार्थ्यांला प्रवेश घेता आलेला नाही. त्यामुळे, आयडॉलला प्रवेशाची मुदत आणखी महिनाभराने वाढवावी लागली आहे.
शुल्क प्रतिपूर्ती योजनेकरिता समाजकल्याण विभागाकडे ऑनलाइन अर्ज सादर करावा लागतो. हा अर्ज सादर केल्यानंतर विभागातर्फे मिळणारा नोंदणी क्रमांक आयडॉलकरिता ऑनलाईन प्रवेश घेताना अर्जावर सादर करण्याचे बंधन विद्यार्थ्यांवर घालण्यात आले आहे. परंतु, समाजकल्याण विभागाची शुल्क प्रतिपूर्तीकरिता अर्ज करण्याची प्रक्रिया मुळातच ऑगस्ट महिन्यात किंवा त्यानंतरच सुरू होते. परंतु, ही गोष्ट ध्यानात न घेताच आयडॉलने वरातीमागून घोडे प्रकारातला निर्णय घेत आपल्या ऑनलाइन अर्जामध्ये समाजकल्याणचा नोंदणी क्रमांक लिहिणे बंधनकारक केल्याने एकाही मागासवर्गीय विद्यार्थ्यांला आयडॉलमध्ये प्रवेश घेता आलेला नाही.
आयडॉलतर्फे १४ वेगवेगळ्या प्रकारचे अभ्यासक्रम चालविले जातात. त्यांचे शुल्क चार हजारापासून १६ हजार रुपयांपर्यंत आहे. पण शुल्क प्रतिपूर्ती योजनेमुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांना अवघ्या ३०० ते ७०० रुपये शुल्कात हे अभ्यासक्रम पूर्ण करता येतात. परंतु, आयडॉलने घालून ठेवलेल्या या घोळामुळे हे विद्यार्थी विनाकारण प्रवेशापासून वंचित राहिले आहेत, अशी टीका 'महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेने'चे संतोष गांगुर्डे यांनी केली आहे.
आयडॉलची प्रवेशाची मुदत २५ जुलैला संपणार होती. परंतु, या घोळामुळे विनाविलंब शुल्कासह अर्ज भरण्याची मुदत आता १९ ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यानंतर विलंब शुल्कासह मर्यादीत मुदतीपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज सादर करता येतील.

के.जी. टू कॉलेज मुंबई आयआयटीच्या संकुलात 'टेकफेस्ट'चे रंग



के.जी. टू कॉलेज


मुंबई आयआयटीच्या संकुलात 'टेकफेस्ट'चे रंग

Published: Monday, August 4, 2014
जगभरातील तब्बल तीन हजार महाविद्यालयांना एकत्र आणणारा आणि देशातील सर्वाधिक मोठा तंत्र महोत्सव अशी ओळख असणारा मुंबईच्या 'इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी'चा २०१५चा 'टेकफेस्ट' यंदा पवईच्या संकुलात २ ते ४ जानेवारी दरम्यान रंगणार आहे. हा 'टेकफेस्ट' केवळ रोबो, तांत्रिक उपकरणांपुरता मर्यादित नसेल तर विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीलाही यात आवाहन केले जाणार आहे. 'टेकफेस्ट'-२०१५ची माहिती देणारे संकेतस्थळ रविवारी सायंकाळी कार्यरत करण्यात आले.
यंदाच्याही 'टेकफेस्ट'ला युनेस्को आणि युनिसेफ या आंतरराष्ट्रीय संघटनांचे सहकार्य लाभले आहे. गेली तीन वर्षे सातत्याने 'टेकफेस्ट'च्या केंद्रस्थानी पर्यावरण हा विषय राहिला आहे. या प्रयत्नांची दखल घेत या वर्षी 'सेंटर फॉर एन्व्हॉर्नमेंट एज्युकेशन' आणि 'साऊथ एशिया युथ एन्व्हॉर्नमेंट नेटवर्क' यांनीही 'टेकफेस्ट'ला सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे.
या वर्षी आयोजिण्यात आलेली 'अपारंपरिक उर्जा स्त्रोत' या विषयावरील आंतरराष्ट्रीय विद्यार्थी परिषद 'टेकफेस्ट'चे आकर्षण असणार आहे. यात 'अपारंपरिक उर्जा व्यवस्था' या विषयावर विद्यार्थ्यांकडून संशोधन निबंध मागविण्यात येणार आहेत.
या परिषदेकरिता 'आयआयटी'च्या संशोधन आणि विकास विभागाचे माजी अधिष्ठाता प्रा. रंजन बॅनर्जी मुख्य सल्लागार म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. विद्यार्थ्यांना आपल्या विषयाची संक्षिप्त माहिती ५ सप्टेंबरपूर्वी पाठवायची आहे. यातून निवडक विद्यार्थी सहभागी होतील.
विश्लेषण कौशल्याला आव्हान
'मनी बॉल' ही खेळामधील विश्लेषण कौशल्याला आव्हान देणारी स्पर्धा प्रथमच 'टेकफेस्ट'च्या मैदानावर रंगणार आहे. त्यात फुटबॉल आणि क्रिकेट या दोन खेळांमध्ये 'स्पोर्टस गुरू' बनण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळेल.  या वर्षी 'टेकफेस्ट'मध्ये भारतभरातून सुमारे अडीच हजार तर भारताबाहेरील सुमारे ५०० शिक्षणसंस्थांमधील विद्यार्थी सहभागी होतील. अधिक माहितीसाठी संकेतस्थळ - www.techfest.org

Thursday, July 31, 2014

नवनीत कुतूहल: कार्बन कागद

नवनीत


कुतूहल: कार्बन कागद

Published: Thursday, July 31, 2014
लिखित नमुन्याच्या अनेक प्रती हव्या असतील तर आता झेरॉक्स, कॅम्प्युटर यांसारखी यंत्रं वापरून मिळविता येतात. पण जर ही यंत्रं उपलब्ध नसतील तर मात्र आपल्याला 'कार्बन पेपर'चा आधार घ्यावा लागतो. हा कार्बन पेपर म्हणजे नक्की काय असतं, की ज्यामुळे थोडा जरी दाब पडला तरी त्याखालील पानावर रंग उतरतो? कार्बन पेपर म्हणजे मेणासारखा पदार्थ व रंगद्रव्य यांच्या मिश्रणाचा पातळ लेप दिलेला व एकाच वेळी एक किंवा अधिक प्रती काढण्यासाठी वापरण्यात येणारा कागद होय. दोन कोऱ्या कागदांमध्ये कार्बन कागद योग्य रितीनं ठेवून वरील कोऱ्या कागदावर दाब देऊन जे लिहिलं किंवा रेखाटलं जातं त्याची हुबेहूब नक्कल खालील कोऱ्या कागदावर मिळते. कारण कार्बन कागदावरील रंगद्रव्य कागदापासून सुटं होऊ शकणारं असतं व त्यामुळे दाब दिलेल्या भागावरचं काही रंगद्रव्य खालील कोऱ्या कागदावर गेल्यानं नक्कल निघते. अशा कागदावरील काळ्या रंगासाठी काजळी किंवा ग्रॅफाइट (कार्बनचं अपरूप) वापरत असल्यामुळे 'कार्बन कागद' हे नाव पडलं असावं.
यासाठी लागणारा कागद चिंध्या, लाकूड व ताग यांच्यापासून तयार करतात. तो पातळ, चिवट व टिकाऊ असावा लागतो. साधं मेण व माँटन, जपान, पॅरोफीन, कार्नुबा यांसारखी मेणं व ओलीन, रोझीन यांच्यासारखे पदार्थ लेपासाठी वापरतात. काळ्या कागदासाठी नेहमी काजळी तर इतर रंगांसाठी ब्राँझ निळा, व्हिक्टोरिया निळा, मिलोरी निळा, अल्ट्रामरीन, इंडिगो, कॅरमीन इ. रंगद्रव्ये किंवा त्यांची मिश्रणं व अॅयनिलीन रंजकद्रव्यं किंवा फॅटी अॉसिडमध्ये विद्राव्य अशी रंजकद्रव्यं वापरतात.
    आधुनिक पद्धतीमध्ये लेपाचे मिश्रण तयार करणे व कागदावर लेप देणे या दोन प्रमुख प्रक्रिया असतात. मेणे व इतर पदार्थ सुमारे १५०० सें. तापमानाला वितळवितात, नंतर रंगद्रव्य टाकून मिश्रण एकजीव करतात. टंकलेखन यंत्रांमध्ये सटकू नये व चांगला दिसावा म्हणून त्याच्या दुसऱ्या बाजूवर न चिकटणारा व जलशोषक नसलेला असा मेणाचा थर देतात.
विविध रंगांचे कार्बन कागद उपलब्ध असले तरी काळा, निळा, जांभळा आणि तांबडा हे रंग अधिक वापरले जातात.

Wednesday, July 30, 2014

नवनीत कुतूहल: कार्बन फायबर

नवनीत


कुतूहल: कार्बन फायबर

Published: Wednesday, July 30, 2014
कार्बन हा एक अधातू आहे, पण यापासून सूक्ष्म तार बनते आणि ही 'कार्बन फायबर' म्हणून ओळखली जाते. कार्बन फायबरचं वजन कमी, पण मजबुती मात्र ही स्टीलसारखी. म्हणूनच कार्बन फायबरचा वापर करून गोल्फ खेळासाठी लागणारं साहित्य, टेनिस रॅकेट इ. बनवितात. कार्बन फायबरला ही मजबूती कशामुळं प्राप्त झाली असेल? कार्बन फायबर अर्थातच नावाप्रमाणेच कार्बन अणूंनी बनलेलं आहे. एकच पदार्थ वेगवेगळ्या भौतिक स्वरूपांत, परंतु समान रासायनिक स्वरूपात आढळतात, यांना त्या पदार्थाची अपरूपे म्हणतात. हिरा आणि ग्रॅफाइट ही कार्बनची अपरूपे आहेत. ग्रॅफाइट मऊ, राखाडी काळ्या रंगाचा स्फटिकी पदार्थ आहे, कारण ग्रॅफाइटमध्ये प्रत्येक कार्बन अणू इतर तीन कार्बन अणूंसोबत अशा प्रकारे बंधित असतो की, त्यामुळे प्रतलीय षट्कोनी रचना तयार होते. ग्रॅफाइटमध्ये हे षट्कोनीय अणूचं प्रतल एकमेकांना समांतर असतात, त्यामुळे ग्रॅफाइट हे मऊ आहे. पेन्सिलमध्ये ग्रॅफाइट असल्याने लिहिताना ग्रॅफाइटचे थर घसरल्यानं लिहिणं ही क्रिया सोपी होते. या ग्रॅफाइटप्रमाणेच कार्बन फायबरमध्ये या अणूंची फायबरला समांतर अति अतिसूक्ष्म स्फटिक रचना आढळते. कार्बन फायबरच्या अणूंच्या रचनेत फरक इतकाच की, हे षट्कोनीय प्रतलीय थर एकमेकांशी रासायनिक बंधाने जोडलेले असतात. त्यामुळेच कार्बन फायबरला मजबुती प्राप्त झाली आहे. उष्णताविरोधक असल्यामुळे तापवलं असता प्रसरण पावत नाही.
    १८७९ मध्ये प्रथम एडिसन या शास्त्रज्ञाने त्याच्या सुरुवातीच्या विद्युत दिव्यात बांबूपासून कार्बन फायबर तयार करून वापर केला होता. मात्र आता कार्बन फायबर हे पॉलिमरपासून (पॉलिएॅक्रिलोनायट्रिल) तयार करतात. हे पॉलिमर तयार झाल्यानंतर त्यातील अणू फायबरला समांतर होईपर्यंत ताणलं जातं. नंतर या पॉलिमरचं २०० ते ३०० अंश सेल्सिअस तापमानाला ऑक्सिडेशन प्रक्रियेत हायड्रोजन काढून ऑक्सिजन घातलं जातं. २५०० अंश सेल्सिअस या उच्च तापमानाला तापवून कार्बनीकरण केलं जातं. अशा प्रकारे तयार केलेल्या कार्बन फायबरमध्ये जवळजवळ ९०% कार्बन अणू असतात. हे धागे विणून चटई करतात आणि नंतर ही चटई इपॉक्सी रेझिनमध्ये बद्ध करून वेगवेगळ्या वस्तू तयार करण्यासाठी वापरतात.

नवनीत कुतूहल: आच्छादन प्रक्रिया- लॅमिनेशन

नवनीत


कुतूहल: आच्छादन प्रक्रिया- लॅमिनेशन

Published: Tuesday, July 29, 2014
वह्य़ा, पुस्तके पाण्याने भिजून खराब होऊ नयेत म्हणून पारदर्शक प्लास्टिकची फिल्म बाजारात उपलब्ध आहे. सुरुवातीला आच्छादनासाठी उपयोगात येणारे हे प्लास्टिक 'पॉलिथीन' नामक प्रकारचे असे. परंतु आता त्याची जागा 'पीव्हीसी' (पॉलिव्हिनाइल क्लोराइड) या प्रकाराने घेतली आहे. 'पीव्हीसी'ची फिल्म निरनिराळ्या जाडीची तयार करता येते. लवचीक असूनही या फिल्मला वळ्या पडत नाहीत, त्यामुळं कव्हरसाठी ही फिल्म उत्कृष्ट असते. या कव्हरमुळे पुस्तकं पावसात भिजत नाहीत व वाळवी किंवा इतर कीटकांपासूनही त्यांचं संरक्षण होतं. या आच्छादन क्रियेला तांत्रिक भाषेत 'लॅमिनेशन' असं म्हणतात.
इंग्लंडमधील एका खेडय़ात मोरॅन नावाच्या एका तरुण तंत्रज्ञानाला पुस्तकाची आच्छादनं छापून झाल्यानंतर यांत्रिक पद्धतीनं त्यावर कायम स्वरूपाचं पारदर्शक आच्छादन घालण्याची कल्पना १९५६ साली सुचली. त्या वेळी बाजारात काचेसारखा पारदर्शक असलेला सेलोफेन पेपर मिळत असे. पॉलिव्हिनाइल असिटेटमुळं कागदाच्या पारदर्शकतेत काहीही फरक पडत नाही व पॉलिव्हिनाइल असिटेट लावलेला कागद छापलेल्या कव्हरवर ठेवून बराच वेळ दाब देऊन गरम इस्त्री फिरविल्यास दोन्ही कागद एकजीव झाल्यासारखे होतात. म्हणजेच आच्छादन होऊनसुद्धा आच्छादनाचा निराळा थर दिसत नाही. या क्रियेचं नंतर यांत्रिकीकरण केलं गेलं.
यानंतर जगातील अनेक कंपन्यांनी यावर संशोधन करून आपापल्या पद्धतीची नवीन प्रकारची 'लॅमिनेशन' यंत्रे तयार केली. तसेच आच्छादनासाठीही सेलोफेन कागदाला पर्यायी अनेक प्रकारच्या विविध फिल्म्स उपलब्ध झाल्या. यामध्ये पॉलिथीन, सेल्युलस अ‍ॅसिटेट, पीव्हीसी व पॉलिएस्टर यांचा समावेश आहे. सध्या पीव्हीसी व पॉलिएस्टर या दोन प्रकारच्या फिल्म जास्तीतजास्त प्रमाणात वापरल्या जातात.
लॅमिनेशन प्रक्रिया आता कागदापुरती मर्यादित राहिली नसून टिन, ज्यूटचं कापड इ.वरही लॅमिनेशन करणं शक्य झालं आहे. चामडे, मेणकापड यावरही लॅमिनेशन करता येतं. लॅमिनेशनचे आणखीही काही प्रकार आहेत. प्लायवूड किंवा लाकडाच्या फळीवर फोटो चिकटवून त्यावर लॅमिनेशन करण्याची पद्धत आहे.