Tuesday, April 2, 2019

मूल आणि इतर भाषा वयाची पहिली दोन वर्ष भाषाशिक्षणासाठी चांगली असतात.

मूल आणि इतर भाषा

वयाची पहिली दोन वर्ष भाषाशिक्षणासाठी चांगली असतात.

|| डॉ. श्रुती पानसे
वयाची पहिली दोन वर्ष भाषाशिक्षणासाठी चांगली असतात. या काळात आसपासचे सर्व आवाज मुलांचे कान टिपत असतात. घरच्या, शेजारच्या माणसांकडून, नातेवाईकांकडून ज्या भाषा सहजरीत्या मुलांच्या कानावर पडतात, त्या त्यांना बोलता येऊ  शकतात. जन्मापासून जी मुलं एकापेक्षा जास्त भाषांच्या/ भाषिकांच्या संगतीत असतात, त्यांना कमी-अधिक प्रमाणात त्या सर्व भाषा समजतात. मुलांना या भाषांमध्ये व्यक्त होण्याच्या संधी मिळाल्या तर मुलं या भाषा बोलूही शकतात.
मात्र एक लक्षात ठेवावं लागेल ते म्हणजे मुलं भाषा आत्मसात करत असतात; शिकत नसतात. त्यामुळे मुद्दाम शिकवायला जाऊ  नये. त्यात सक्ती आणि जबरदस्ती आली तर मूल सहजपणे भाषा आत्मसात करू शकणार नाही. मेंदूची ही क्षमता लक्षात घ्यावी आणि सहज- पूरक वातावरण तयार करता आलं तर करावं. मुद्दाम शिकवायला जाऊ  नये. तसं झालं तर विपरीत परिणाम होतो.
नवीन माणूस भेटतो तेव्हा
जेव्हा एखादा नवीन माणूस भेटतो तेव्हा डोळे आणि मेंदू कामाला लागतात. नवी माहिती साठवण्याच्या दृष्टीने मेंदू विविध भागांना आदेश सोडतो. दृश्य क्षेत्र (व्हिज्युअल कॉर्टेक्स) हा भाग चेहरा लक्षात ठेवतो. इथं त्या माणसाचे कपडे, त्या कपडय़ांचा रंग, आसपासचा परिसर, मागची दृश्यं हीदेखील तिथंच साठवली जातात. त्या माणसाचं नाव  मेंदूच्या डाव्या भागात असलेल्या भाषेच्या क्षेत्रात साठवलं जातात. त्या माणसाचा आवाज, त्याच वेळेला ऐकू येणारे इतर आवाज हे ऑडिटरी कॉर्टेक्समध्ये साठवले जातात.
या माणसाला पुन्हा आठवायचं झाल्यास आपल्या लक्षात येतं की, आपलं त्याच्याकडे किती लक्ष होतं. तो माणूस आपल्यासाठी किती महत्त्वाचा आहे, आपण त्या वेळी खूप घाईत होतो का, आपला मूड चांगला होता की वाईट, यावरून त्या माणसाचे कमी-अधिक प्रमाणात बारकावे आपल्या लक्षात राहतील. तो माणूस आपल्याला फारसा महत्त्वाचा वाटला नाही तर फारसा लक्षातही राहत नाही.
contact@shrutipanse.com
First Published on January 7, 2019 1:29 am
Web Title: how do children learn language

मेंदूशी मैत्री : जिवंत मेंदूचं ज्ञान उंदरांवर किंवा त्यांच्या मेंदूवर संशोधन करून निष्कर्ष काढणं हा मेंदू संशोधनातला एक टप्पा आहे.

मेंदूशी मैत्री : जिवंत मेंदूचं ज्ञान

उंदरांवर किंवा त्यांच्या मेंदूवर संशोधन करून निष्कर्ष काढणं हा मेंदू संशोधनातला एक टप्पा आहे.

डॉ. श्रुती पानसे
मेंदूचं काम कसं चालतं, तो कायकाय करतो, कसा ‘वागतो’? मेंदूविषयीच्या ताज्या संशोधनांचा आपल्या जगण्याशी कसा काय संबंध आहे? यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरं मिळवून देणारं हे नवं सदर! मेंदू प्रत्येकाकडे आहे; त्यामुळे तो कसा वापरावा याची ‘हस्तपुस्तिका’ (मॅन्युअल) म्हणूनही या सदराचा वापर काही वेळा होऊ शकेल आणि त्याही पलीकडे, आपण इतरांच्या मेंदूंचाही विचार जाणतेपणी करू शकू.
उंदरांवर किंवा त्यांच्या मेंदूवर संशोधन करून निष्कर्ष काढणं हा मेंदू संशोधनातला एक टप्पा आहे. यानंतर मृत मानवी मेंदूवर संशोधन हादेखील एक टप्पा होता; पण आता चालत्या-बोलत्या, विचार करणाऱ्या मेंदूमध्ये नक्की काय होतं, आपली शिकण्याची प्रक्रिया कशी होते, भावनांचं काम कसं चालतं, ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम अनेकांनी केलं आहे. कित्येक न्यूरॉलॉजिस्ट, डॉक्टर्स हे मानवी मेंदूवर गेली अनेक वर्षे प्रयोग करत होते. मात्र गेल्या काही शतकांत या प्रयोगांना नव्या तंत्रज्ञानाचा आधार मिळाला. तंत्रज्ञानात एक्सरेपासून एफ.एम.आर.आय.पर्यंत अनेक शोध लागले. शरीराच्या आत नेमकं काय चाललं आहे, याचे जसेच्या तसे फोटो घेण्याची क्षमता तंत्रज्ञानामध्ये आली, त्यामुळेच अनेक गोष्टींवर प्रकाश पडला.
या शोधांचा, त्यातून निघालेल्या निष्कर्षांचा उपयोग शिक्षणतज्ज्ञांनी, मानसशास्त्रज्ञांनी आपल्या क्षेत्राच्या अभ्यासासाठी करून घेतला. त्यामुळे मेंदू विचार कसा करतो, हे आपल्याला समजायला लागलं.
contact@shrutipanse.com
First Published on January 3, 2019 1:55 am
Web Title: article about knowledge of the living brain

कुतूहल : मानवी उत्क्रांतीचा शोध गेल्या पन्नास-शंभर वर्षांत, मानवी उत्क्रांतीची शृंखला सुस्पष्ट करण्यासाठी अनेक अभ्यासक झटत आहेत.

कुतूहल : मानवी उत्क्रांतीचा शोध

गेल्या पन्नास-शंभर वर्षांत, मानवी उत्क्रांतीची शृंखला सुस्पष्ट करण्यासाठी अनेक अभ्यासक झटत आहेत.

डॉ. नंदिनी नेरुरकर-देशमुख
गेल्या पन्नास-शंभर वर्षांत, मानवी उत्क्रांतीची शृंखला सुस्पष्ट करण्यासाठी अनेक अभ्यासक झटत आहेत. त्यांना कधी मानवाच्या एखाद्या बोटाचे हाड मिळते, तर कधी एखादा दात. या अल्पशा अवशेषांवरून मानवी उत्क्रांतीचे चित्र उभे केले गेले आहे. या अवशेषांची वये नक्की करण्यासाठी रेडिओमेट्रिक डेटिंगची पद्धत वापरली जाते. या पद्धतीत, सापडलेल्या अवशेषांतील काही नैसर्गिक किरणोत्सारी समस्थानिकांचे प्रमाण, त्यांच्या किरणोत्साराच्या मापनाद्वारे काढले जाते व त्या अवशेषातील इतर समस्थानिकांच्या प्रमाणाशी त्याची तुलना करून त्या अवशेषाचे वय काढले जाते. ज्या खडकांच्या थरात हे अवशेष सापडले आहेत, त्या खडकांच्या वयावरूनही या अवशेषांच्या वयाचा अंदाज बांधण्यास मदत होते.
मानवी उत्क्रांतीतील पहिला टप्पा म्हणजे ऑस्ट्रेलोपिथेकस – अर्थात दक्षिणेकडचा वानर! या मानवाचा शोध १९२४ साली दक्षिण आफ्रिकेतील ताऊंग येथे रेमंड डार्ट या ऑस्ट्रेलियातल्या संशोधकाने लावला. इथिओपियातील हादार गावाजवळ, डोनाल्ड जोहान्सन आणि त्यांच्या सहकाऱ्यांना सापडलेली सुप्रसिद्ध ‘ल्यूसी’ आणि झेरेसेने अलेमसेगेद यांना सापडलेली तीन वर्षांची ‘सेलाम’ हीसुद्धा याच प्रजातीची होती. ऑस्ट्रेलोपिथेकसनंतर होऊन गेलेल्या, होमो इरेक्टसचा शोध १८९१ साली, म्हणजे ऑस्ट्रेलोपिथेकसच्या शोधाच्या अगोदरच लागला होता. हे अवशेष डच संशोधक युजिन डुबॉइस यांना, आफ्रिकेपासून दूरवर इंडोनेशियातील ट्रिनिल येथे सापडले. आजच्या बिजिंगजवळील चाऊ कुतिएन येथील, १९२७ साली कॅनडाच्या डेव्हिडसन ब्लॅक यांनी शोधलेला ‘पेकिंग मॅन’ हासुद्धा होमो इरेक्टस याच प्रजातीचा होता. मानवी उत्क्रांतीतील चार महत्त्वाच्या प्रजातींपैकी, होमो इरेक्टस ही सर्वात दीर्घकाळ अस्तित्वात राहिलेली प्रजाती आहे.
आधुनिक मानवाशी अगदी जवळीक दाखवणाऱ्या निअ‍ॅन्डरथल या प्रजातीचा शोध याही अगोदरचा – १८२९ सालचा. जर्मनीतील निन्डर खोऱ्यात सापडल्यामुळे या प्रजातीला निअ‍ॅन्डरथल या नावे ओळखले जाऊ लागले. निअ‍ॅन्डरथल हा अतिशय हुशार आणि सुदृढ असावा असा अंदाज त्याच्या कवटीच्या आणि हाडांच्या आकारावरून केला जातो. निअ‍ॅन्डरथलनंतर जन्माला आलेल्या, होमो सेपिअन्स (हुशार माणूस) या आधुनिक मानवाचे सर्वात जुने अवशेष १९६१ साली मोरोक्कोमधील एका खाणीत सापडले आहेत. हे अवशेष तब्बल तीन लाख वर्षे जुने असल्याचे अगदी अलीकडील संशोधनात स्पष्ट झाले आहे. याचा अर्थ आधुनिक मानव जन्माला येऊन किमान तीन लाख वर्षे झाली आहेत!
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२
office@mavipamumbai.org
First Published on January 3, 2019 1:53 am
Web Title: article about human evolution research

कुतूहल : मानवी उत्क्रांतीची वाटचाल मानवाची उत्क्रांती ही संपूर्ण पृथ्वीलाच बदलून टाकणाऱ्या प्रजातीची उत्क्रांती आहे.

कुतूहल : मानवी उत्क्रांतीची वाटचाल

मानवाची उत्क्रांती ही संपूर्ण पृथ्वीलाच बदलून टाकणाऱ्या प्रजातीची उत्क्रांती आहे.

डॉ. नंदिनी नेरुरकर-देशमुख
मानवाची उत्क्रांती ही संपूर्ण पृथ्वीलाच बदलून टाकणाऱ्या प्रजातीची उत्क्रांती आहे. तिचा प्रवास समजून घ्यायचा तर तीन कोटी वर्षांपूर्वीपासून चालू असलेल्या घटनाक्रमाचा नेमका शोध घ्यायला हवा. तत्कालीन पृथ्वीवरील हवा हळूहळू थंड होत होती, कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण कमी होत होते, दाट जंगले कमी होऊन गवताळ प्रदेश वाढू लागले होते. १९७० च्या दशकाच्या अगोदरच्या शास्त्रज्ञांच्या मते, याच सुमारास वानरसदृश जातीपासून मानव उत्क्रांत होत गेला असावा; पण १९६८ सालच्या सुमारास, अमेरिकेतल्या कॅलिफोर्निया विद्यापीठातील व्हिन्सेन्ट सॅरीच आणि अ‍ॅलन विल्सन या संशोधकांनी वानर आणि नर यांच्या डीएनएचा अभ्यास करून असे ठाम प्रतिपादन केले की, वानर आणि नर दोन्ही समांतर, परंतु वेगवेगळे उत्क्रांत होत गेले. असे असले तरी मानव, चिम्पान्झी आणि गोरिला यांचा ऐंशी लाख वर्षांपूर्वीचा पूर्वज एकच. आधुनिक चिम्पान्झी आणि मानव यांच्या जीनोममध्ये म्हणजेच संपूर्ण जनुकीय आराखडय़ात आताही ९६ टक्के साम्य आहे. यावरून आपण एकाच पूर्वजाचे वंशज असल्याचे नक्की होते. पुढील संशोधनावरून असेही लक्षात आले की, आपल्या या वंशजांचे वास्तव्य आफ्रिका खंडात होते.
मानवाच्या उत्क्रांतीतले चार महत्त्वाचे टप्पे आहेत – बेचाळीस लाख वर्षांपूर्वी जन्माला आलेला, दोन पायांवर चालू शकणारा ऑस्ट्रेलोपिथेकस; जमिनीवरच्या जीवनाला पूरक शरीर असणारा, आफ्रिकेच्या बाहेर पडलेला, सुमारे पंधरा लाख वर्षांपूर्वी जन्माला आलेला होमो इरेक्टस; आजच्या मानवाशी बऱ्याच अंशी साधम्र्य असलेला, तसेच हत्यारांचा, अग्नीचा, कपडय़ांचा वापर करणारा साडेतीन लाख वर्षांपूर्वी जन्माला आलेला निअ‍ॅन्डरथल मानव आणि सुमारे तीन लाख वर्षांपूर्वी जन्माला आलेला आजचा आधुनिक मानव – होमो सेपियन्स. होमो सेपियन्सच्या उदयाच्या काळातदेखील ‘होमिनीन’ गटातील तीसहून अधिक निरनिराळ्या मानवसदृश प्रजाती एकाच वेळी अस्तित्वात होत्या. आज मात्र फक्त होमो सेपियन्स ही एकमेव प्रजाती शिल्लक राहिली आहे.
या होमो सेपियन्स प्रजातीतल्या, म्हणजे आपल्यापैकीच काही मानवांनी मानवाचा हा रंजक प्रवास जाणून घेण्यासाठी खूप प्रयत्न केले आहेत. यातले पहिले नाव म्हणजे इ.स.पूर्व पाचव्या शतकात होऊन गेलेला ग्रीकवंशीय हेरोडोटस. मानववंशशास्त्राचा जनक मानल्या गेलेल्या हेरोडोटसच्या काळापासून आतापर्यंत मानव उत्क्रांतीचे कोडे सोडवण्याचे प्रयत्न चालूच आहेत आणि त्यातूनच मानवी उत्क्रांतीचे चित्र आपल्यापुढे उभे राहिले आहे.
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२
office@mavipamumbai.org
First Published on January 2, 2019 1:35 am
Web Title: article about path of human evolution

मेंदूशी मैत्री : सिनॅप्स – आपली निर्णयक्षमता आपल्या डोक्यात मेंदू नावाची एक सक्षम, स्वतंत्र, जिवंत यंत्रणा दिवसरात्र काम करत असते

मेंदूशी मैत्री : सिनॅप्स – आपली निर्णयक्षमता

आपल्या डोक्यात मेंदू नावाची एक सक्षम, स्वतंत्र, जिवंत यंत्रणा दिवसरात्र काम करत असते

डॉ. श्रुती पानसे
मेंदूचं काम कसं चालतं, तो काय काय करतो, कसा ‘वागतो’? मेंदूविषयीच्या ताज्या संशोधनांचा आपल्या जगण्याशी कसा काय संबंध आहे? यांसारख्या अनेक प्रश्नांची उत्तरं वाचकांना मिळवून देणारं हे नवं सदर!
आपल्या डोक्यात मेंदू नावाची एक सक्षम, स्वतंत्र, जिवंत यंत्रणा दिवसरात्र काम करत असते. ही यंत्रणा आहे म्हणून आपण बोलू शकतो, विचार करू शकतो. वाचू शकतो. आत्ता वाचत आहोत, तो लेख वाचून त्यावर मत बनवू शकतो. अर्थात, मेंदू केवळ विचार करणारा अवयव आहे असं नाही. तर भावनांचं क्षेत्रही तिथेच- मेंदूमध्येच आहे हे नव्या संशोधनातून प्रकर्षांने लक्षात आलं आहे.
मेंदूत न्यूरॉन्स या लक्षावधी पेशी असतात. जन्मापासून मिळणारा प्रत्येक अनुभव मेंदूत दोन न्यूरॉन्सची मत्री करत असतो. या मत्रीला मेंदूशास्त्रीय भाषेत ‘सिनॅप्स’ म्हणतात. आपले सर्व बारीकसारीक निर्णय या सिनॅप्सवर आधारित असतात. सिनॅप्स ही दोन न्यूरॉन्समध्ये घडणारी एक विद्युत- रासायनिक क्रिया आहे. आपला आहार, झोप, प्रेम, मत्री, शिक्षण, नाती जपणं, करियर हे सर्व निर्णय सिनॅप्सचेच असतात!
contact@shrutipanse.com
First Published on January 2, 2019 1:37 am
Web Title: article about synapse our decision making

कुतूहल : शोधांचा मागोवा एखादे संशोधन विकसित कसे झाले, याचा परामर्श घेताना त्यामागचे विज्ञान समजणे, हेही गरजेचे असते.

कुतूहल : शोधांचा मागोवा

एखादे संशोधन विकसित कसे झाले, याचा परामर्श घेताना त्यामागचे विज्ञान समजणे, हेही गरजेचे असते.

विज्ञान-तंत्रज्ञानातील प्रगतीचा पाया म्हणजे शोध. विविध शोधांद्वारेच विज्ञान-तंत्रज्ञानाची वाटचाल सुरू असते. यातील काही शोध एखाद्या गोष्टीचा सातत्याने पाठपुरावा केल्यावर लागतात; तर काही शोध हे इतर काही संशोधन चालू असताना अनपेक्षितपणे लागतात. शोध पाठपुरावा करून लागलेला असो वा अनपेक्षितपणे लागलेला असो- प्रत्येक शोधाला इतिहास असतोच. शोधांमागचा हा इतिहासही वाचनीय असतो. अनेक शोधांच्या बाबतीत हा इतिहास, शोधाचा ‘इतिहास’ म्हणूनच फक्त महत्त्वाचा असतो असे नव्हे, तर त्या शोधामागचे तर्कशास्त्र समजून घेण्याच्या दृष्टीनेही तो महत्त्वाचा ठरतो. सन २०१९ च्या कुतूहल सदराचा उद्देश हा, विज्ञान-तंत्रज्ञानातील महत्त्वाच्या शोधांचा याच दृष्टीने मागोवा घेणे हा आहे. हा मागोवा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित इत्यादी विषयांपासून ते अगदी तंत्रज्ञानापर्यंत अनेक विषयांचा असेल.
विज्ञान-तंत्रज्ञानातील ज्या शोधांनी विज्ञानाच्या इतिहासाला नवे वळण दिले, जे शोध क्रांतिकारी ठरले किंवा विज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रगतीत ज्या शोधांनी महत्त्वाची भूमिका बजावली, अशा शोधांची संख्या अक्षरश: असंख्य आहे. या सर्वच शोधांचा मागोवा या वर्षभरातील सुमारे अडीचशे लेखांच्या मालिकेत घेता येणे शक्य नाही. त्यामुळे काही मोजक्या शोधांचाच या मालिकेत परामर्श घेतला जाईल. मुख्य म्हणजे, हा परामर्श ‘संशोधक केंद्रित’ नसून तो ‘संशोधन केंद्रित’ असणार आहे. त्यात संशोधकांच्या चरित्रापेक्षा वा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील घटनांपेक्षा, त्यांच्या संशोधनावर लक्ष केंद्रित केले जाईल. एखादे संशोधन विकसित कसे झाले, याचा परामर्श घेताना त्यामागचे विज्ञान समजणे, हेही गरजेचे असते. त्यामुळे जिथे जिथे शक्य असेल तिथे या शोधांच्या वैज्ञानिक पाश्र्वभूमीचाही आढावा घेतला जाईल.
या सदरातील लेख हे अर्थातच त्या त्या विषयातील तज्ज्ञांकडून लिहून घेतले जाणार आहेत. तरीही मोजक्या शब्दसंख्येत, सोप्या भाषेत शोधांचे वर्णन करणे, त्या मागचे विज्ञान स्पष्ट करणे हे या तज्ज्ञ-लेखकांच्या दृष्टीने एक आव्हानात्मक काम असणार आहे. सर्वच संशोधन काही अगदी सोप्या भाषेत मांडणे, शक्य असतेच असे नाही. परंतु या सदरात तसा प्रयत्न सतत असणार आहे. या प्रयत्नात ‘कुतूहल’चे लेखक पूर्ण यशस्वी ठरतील असा  मराठी विज्ञान परिषदेला विश्वास  आहे. त्यामुळे, शोधांचा मागोवा घेणारे या वर्षीचे हे ‘कुतूहल’सुद्धा, नेहमीप्रमाणेच लोकप्रिय ठरेल याची परिषदेला खात्री वाटते.
– डॉ. राजीव चिटणीस, मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 
office@mavipamumbai.org
First Published on January 1, 2019 2:56 am
Web Title: science technology through various researches

मेंदूशी मैत्री : ज्ञानेंद्रियं उघडतात.. प्रत्येक अनुभवाचं रूपांतर विद्युत संदेशात आणि त्या संदेशाचं रूपांतर रासायनिक संदेशात होतं.

मेंदूशी मैत्री : ज्ञानेंद्रियं उघडतात..

प्रत्येक अनुभवाचं रूपांतर विद्युत संदेशात आणि त्या संदेशाचं रूपांतर रासायनिक संदेशात होतं.

डॉ. श्रुती पानसे contact@shrutipanse.com
मेंदूचं काम कसं चालतं, तो काय काय करतो, कसा ‘वागतो’? मेंदूविषयीच्या ताज्या संशोधनांचा आपल्या जगण्याशी कसा काय संबंध आहे? यांसारख्या अनेक प्रश्नांची उत्तरं वाचकांना मिळवून देणारं हे नवं सदर!
बाळ जन्माला येतं. जन्माला आल्यावर पहिल्या काही क्षणांपासून त्याला विविध प्रकारचे अनुभव मिळायला सुरुवात होते. हे अनुभव एकूण मेंदूविकासाच्या दृष्टीने फार महत्त्वाचे असतात. या प्रत्येक आणि प्रत्येक अनुभवाच्या नोंदी मेंदू करायला घेतो. माणसांचा स्पर्श, पाण्याचा स्पर्श, तापमानातले बदल, विविध लोकांचे आणि वस्तूंचे आवाज, दुधाची चव, किती तरी प्रकारचे वास, डोळ्यांसमोरून जाणारी विविध माणसं हे अनुभव बाळाच्या दृष्टीने अगदी नवीन असतात. बाळ जन्मलं की मेंदूतल्या विविध क्षेत्रांत असणारे सुटे सुटे न्यूरॉन्स लगबगीने कामाला लागतात. ते एकमेकांशी जुळायला सुरुवात होते. प्रत्येक अनुभवाचं रूपांतर विद्युत संदेशात आणि त्या संदेशाचं रूपांतर रासायनिक संदेशात होतं. ही पहिल्या काही क्षणांत सुरू झालेली ही ‘सिनॅप्स’ची प्रक्रिया आयुष्यभर कायम राहाते.
‘सिनॅप्स’ हा शब्द जरा अपरिचित आहे.. होय ना?  पण सध्या एवढंच लक्षात ठेवू की, जन्मापासून मिळणारा प्रत्येक अनुभव मेंदूत दोन न्यूरॉन्सची मत्री करत असतो. या मत्रीला मेंदूशास्त्रीय भाषेत ‘सिनॅप्स’ म्हणतात.

First Published on January 1, 2019 2:55 am
Web Title: recent research on the brain