Monday, September 10, 2018

शब्दबोध मराठीत बेदम हा शब्द मारण्याची तीव्रता दर्शवण्यासाठी वापरतात. कारण बेदम मारणे म्हणजे खूप मारणे.

शब्दबोध

मराठीत बेदम हा शब्द मारण्याची तीव्रता दर्शवण्यासाठी वापरतात. कारण बेदम मारणे म्हणजे खूप मारणे.

डॉ. अमृता इंदुरकर
बेदम
‘लोकांनी चोराला पकडून बेदम मारले’ किंवा ‘आता ऐकले नाही तर बेदम मार खाशील’ अशी वाक्ये आपल्याला अगदी माहितीची असतात. ती आपण सहज वापरतो. मराठीत बेदम हा शब्द मारण्याची तीव्रता दर्शवण्यासाठी वापरतात. कारण बेदम मारणे म्हणजे खूप मारणे. काही अंशी हा अर्थ योग्यही आहे. फारसीमध्ये ‘दम’ म्हणजे श्वास, जोर, ताकद. या ‘दम’ला ‘बे’ हा पूर्वप्रत्यय लागून तयार झाला ‘बेदम’. फारसीमध्ये या बेदमचा अर्थ मुळात निपचित पडेस्तोवर दिलेला मार असा आहे. म्हणजे दम, श्वास निघेपर्यंत दिला जाणारा मार म्हणजे बेदम. मराठीत याचा अर्थविस्तार झाला आणि केवळ अती मार या क्रियेसाठी बेदम मारणे हा शब्दप्रयोग रूढ झाला.
गप्पिष्ट
‘ती अमुक ना भलती गप्पिष्ट आहे.’ असे आपण अगदी सहज म्हणतो किंवा ओठांवर तीळ असलेल्या व्यक्ती गप्पिष्ट असतात, असाही एक रूढ समज बोलून दाखवला जातो. या शब्दाच्या व्युत्पत्तीचा शोध घेतल्यावर मात्र गप्प बसायची वेळ आली, इतके अनेक अर्थाचे पदर सापडले.
प्राथमिक अभ्यासाअंती या शब्दाचे मूळ दोन भाषांमध्ये सापडते. फारसीमधे स्त्रीलिंगी मूळ शब्द आहे ‘गप्/ गप्पा’ ज्याचे अर्थ आहेत आवई, खोटी, बनावट, उडती बातमी, अफवा, वार्ता, खोटी हकीकत, कथा, स्तब्ध, चूप. मराठीमध्ये मात्र गप म्हणजे चूप, न बोलणे हाच अर्थ गृहीत आहे. फारसीत याच गप् वरून ‘गपसप’ शब्द तयार झाला. गपसप/ गपशप म्हणजे रिकामटेकडय़ा अथवा शिळोप्याच्या गप्पा. तर दुसऱ्या व्युत्पत्तीनुसार ‘गप/गप्प’ हा मूळ कानडी शब्द आहे. याचा अर्थ शांत, निश्चल, मुकाटय़ाने, न बोलता, पत्ता नसलेले.
फारसीतील गप/ गप्पवरूनच पुढे गप्पागोष्टी, गप्पीदास, गप्पाष्टक आणि गप्पिष्ट ही सर्व विशेषणे तयार झालीत. या दोन्ही व्युत्पत्तींचा विचार करता एक गोष्ट स्पष्ट होते की शब्दकोशात गप्पिष्ट म्हणजे बाता मारणारा, अतिबडबड करणारा असा अर्थ असला तरी मराठीत मात्र गप्पिष्ट हा शब्द सकारात्मक अर्थाने, कौतुकाने वापरला जातो. गप+इष्ट  अशी फोड करून ‘गप्पिष्ट’ तयार झाला, असा कयास लावण्यासही पुष्टी मिळते. कारण इष्ट म्हणजे इच्छिलेले, आवडते, कल्याणकारक, योग्य, पसंत असलेले, शुभ, हितप्रद इत्यादी अर्थाने वापरतो. म्हणजे जे पसंत आहे ते भरभरून बोलणारा म्हणजे गप्पिष्ट असे गृहीत धरले तरी चूक ठरणार नाही. तेव्हा प्रत्येक गप्पिष्ट व्यक्तीचे बोलणे ऐकून आता अनुमान लावावे की हा गप्पिष्टपणा फारसी की कानडी?
First Published on September 8, 2018 4:55 am
Web Title: article about vocabulary words

आयआयटी मोनॅश युनिव्हर्सिटीची संशोधनपर पीएचडी योजनेअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबई व मोनॅश युनिव्हर्सिटी, ऑस्ट्रेलियामध्ये संशोधनपर पीएचडीचा अभ्यास करावा लागेल

आयआयटी मोनॅश युनिव्हर्सिटीची संशोधनपर पीएचडी

योजनेअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबई व मोनॅश युनिव्हर्सिटी, ऑस्ट्रेलियामध्ये संशोधनपर पीएचडीचा अभ्यास करावा लागेल


इंडियन इनिस्टटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी- मुंबई व मोनॅश युनिव्हर्सिटी- मेलबर्न, ऑस्ट्रेलिया यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यरत असणाऱ्या आयआयटीबी मोनॅश रीसर्च अकादमीतर्फे २०१८ मध्ये संशोधन पीएचडीसाठी नोंदणी करण्यासाठी खालीलप्रमाणे प्रवेशिका मागविण्यात येत आहेत.
संशोधनपर पीएचडीसाठी समाविष्ट विषय
वरील योजनेअंतर्गत संशोधनपर पीएचडी करण्यासाठी विज्ञान-तंत्रज्ञान, संगणकशास्त्र व विज्ञान, अभियांत्रिकी, गणित, आरेखन- डिझाइन व समाजशास्त्र या विषयांचा समावेश करण्यात आला आहे.
आवश्यक पात्रता
अर्जदारांनी चांगल्या शैक्षणिक आलेखासह अभियांत्रिकी, विज्ञान- तंत्रज्ञान या विषयातील पदवी उत्तीर्ण केलेली असावी व त्यांना संशोधनपर कामाची विशेष रुची असावी अथवा त्यांनी संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण केलेली असावी.
विशेष सूचना
वरील  शैक्षणिक पात्रतेशिवाय ज्या विद्यार्थी उमेदवारांनी जीएटीई, जीआरई, सीएसआयआर- एनईटी, जेएमएम यांसारखी पात्रता परीक्षा चांगल्या गुणांकासह दिली असेल अथवा त्यांना औद्योगिक क्षेत्रात संबंधित विषयातील संशोधनपर कामाचा अनुभव असेल अशांना प्राधान्य देण्यात येईल.
योजनेअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबई व मोनॅश युनिव्हर्सिटी, ऑस्ट्रेलियामध्ये संशोधनपर पीएचडीचा अभ्यास करावा लागेल. त्या दरम्यान त्यांना या उभय संस्थांमधील शैक्षणिक तज्ज्ञ व भारत आणि ऑस्ट्रेलियातील विषयतज्ज्ञांकरवी शैक्षणिक संशोधनपर मार्गदर्शन मिळून त्याआधारे त्यांना आपल्या विषयातील संशोधनपर पीएचडी पूर्ण करावी लागेल.
अधिक माहिती व तपशील
वरील योजनेच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रांत प्रकाशित झालेली आयआयटीबी मोनॅश रीसर्च अकादमीची जाहिरात पाहावी अथवा अकादमीच्या www.iitbmonash.org या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १० सप्टेंबर २०१८.
First Published on September 7, 2018 5:18 am
Web Title: phd on research at iit monash university

यूपीएससीची तयारी : जाती प्रश्न जात आणि जातीसंबंधीचे प्रश्न हे भारतीय समाजाचे कायम वास्तव राहिलेले आहे.

यूपीएससीची तयारी : जाती प्रश्न

जात आणि जातीसंबंधीचे प्रश्न हे भारतीय समाजाचे कायम वास्तव राहिलेले आहे.

चंपत बोड्डेवार
यूपीएससीच्या लेखी चाचणीत अर्थात मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर १ मध्ये ‘भारतीय समाजातील ज्वलंत मुद्दे’ या अभ्यासघटकांतर्गत असलेल्या ‘जातीव्यवस्था आणि जाती प्रश्न’ यासंबंधी आजपर्यंत जवळपास तीन प्रश्न विचारलेले आहेत. त्यातील एक – ‘अनुसूचित जमातीमधील स्त्री-पुरुष गुणोत्तर प्रमाण अनुसूचित जातीपेक्षा प्रगत आहे.’ त्यावर टिप्पणी करा आणि ‘वर्तमान जात अस्मिता आधारित चळवळी जाती निर्मूलनाच्या दिशेने पाऊल टाकीत आहेत का?’ याचे चिकित्सक परीक्षण करा. त्यासोबतच मागील वर्षी अनुसूचित जमातीची व्याख्या आणि त्यांच्या सक्षमीकरणासाठी संविधानात काय प्रकारच्या तरतुदी केल्या या आशयाचा प्रश्न होता.
जातीव्यवस्थेवर विचारलेले प्रश्न पाहता जातीव्यवस्थेच्या वर्तमानातील दृश्य आणि अदृश्य अशा बहुविध कंगोऱ्यांना स्पर्श करण्याचा लेखी परीक्षेचा उद्देश दिसून येतो. या अभ्यास घटकामध्ये अनुसूचित जाती-जमातींवर वरचेवर प्रश्न विचारलेले दिसतात. अशा प्रश्नांचा दृष्टिक्षेप (Focus) कशावर आहे हे लक्षात येण्यासाठी जातीव्यवस्था आणि जाती प्रश्नाचा संकल्पनात्मक व्यवहार समजून घेण्याची नितांत आवश्यकता आहे. अन्यथा जातीच्या वर्तमान आयामाचे अन्वयार्थ लावणे दुरापास्त होऊन बसते.
जात आणि जातीसंबंधीचे प्रश्न हे भारतीय समाजाचे कायम वास्तव राहिलेले आहे. भारतीय समाजात जात ही व्यक्तीचे सामाजिक स्थान निश्चित करते. सामाजिक स्थानामुळे व्यक्तीची प्रतिष्ठा आणि कार्य अधोरेखित होतात. उच्च-नीच स्तरावर आधारलेली ती एक बंदिस्त व्यवस्था आहे. जात ही एका अर्थाने सामाजिक स्थानाची उतरंड किंवा श्रेणीबद्ध समाजरचना असते असेही म्हणता येते.
आर्थिक स्वातंत्र्यावर निर्बंध घातल्याने दुसरा व्यवसाय निवडता येत नाही. परिणामी व्यवसाय हे जातीची ओळख म्हणून निर्धारित झाले. दुसऱ्या बाजूला जाती-जातींमध्ये रोटी-बेटी व्यवहारास बंदी असल्याने जातीअंतर्गत व्यवहार करणे क्रमप्राप्त ठरले. त्यातून जातीची ओळख अधिक घट्ट बनली. जातीव्यवस्थेचे महत्त्वाचे गुणवैशिष्टय़ म्हणजे स्पृशास्पृश्य भेदाभेदाचे अस्तित्व होय. अस्पृश्यता नावाची समाजविसंगत परंपरा हे जातीव्यवस्थेचे खास वैशिष्टय़ राहिले आहे.
जातीव्यवस्थेची पितृसत्ता आणि लिंगभेदाशी पक्की मोट बांधलेली असते. त्यातून स्त्रीची भूमिका निर्धारित होते. नर-मादी या नसíगक भेदाचे रूपांतर पुरुष-स्त्री अशा सामाजिक भेदात करून त्यास परत नसíगक ठरविण्यात पितृसत्ता महत्त्वाची भूमिका पार पाडत असते. ही प्रक्रिया प्रत्येक जातीअंतर्गत सुरू असते. कारण जातीच्या पांघरुणाखाली लिंगभेदाची प्रक्रिया काम करते.
जातीव्यवस्था आणि जमातवाद यातील भिन्नत्व लक्षात घेता चातुर्वण्य व्यवस्थेने जातीला स्वतंत्र आणि स्वायत्त अशी ओळख आणि कार्ये प्रदान केली. परिणामी सामाजिक समूहांची एकात्मता तयार न होता भारतातील सामाजिक समूह विखंडित राहिले आणि जातीव्यवस्था ही एक सामाजिक विभागणी बनली. याउलट जमातवाद सार्वजनिक व्यवहारामध्ये जातीव्यवस्थेवर, त्यातील अंतर्विरोधावर पांघरूण टाकण्याचे काम करतो. जातीची सामाजिक आणि भौतिक ओळख अंधुक करून व्यापक अशी जमातीय किंवा सांप्रदायिक ओळख देण्याचा प्रयत्न करतो. भारतात मात्र जमातवादाची प्रक्रिया वसाहतकाळापासून सुरू झाल्याची दिसते.
दळणवळणाच्या साधनात झालेले क्रांतिकारक बदल, वाढते शहरीकरण आणि प्रातिनिधिक लोकशाही शासनसंस्थांनी प्रस्थापित केलेले कायद्याचे राज्य यातून जातींचे कार्यात्मक आधार छिन्नविच्छिन करून टाकले. ही प्रक्रिया साधारणपणे वसाहतकाळापासून सुरू झाली.
वर्तमान समाजव्यवस्थेमध्ये जातीअंतर्गत मोठय़ा प्रमाणात आर्थिक स्तरीकरण घडून आल्याचे दिसते. बदलत्या भौतिक अवस्थेतून प्रत्येक जातीत वर्ग तयार झालेले दिसतात. त्यामुळे विशिष्ट जातीचे विशिष्ट हितसंबंध असे चित्र पुसट होताना दिसते. किंबहुना एका जातीत अनेक हितसंबंधाचे अस्तित्व प्रतििबबित होताना दिसते.
स्वातंत्र्योत्तर भारतात सामाजिक शास्त्रांच्या अभ्यासविश्वात जातीकडे गरीब घटक शोधण्याचे आणि ओळखण्याचे एक मापदंड म्हणून पाहिले गेले. वर्तमानकाळातसुद्धा जात जनगणनेकडे सामाजिक न्यायाची पूर्वअट म्हणूनही पाहता येते. सामाजिक न्याय शाश्वत करण्यासाठी कनिष्ठ जातींच्या उत्थानाचे कृतिकार्यक्रम आखताना किंवा त्यासंबंधी धोरणनिश्चिती करताना जातीआधारित जनगणनेतून महत्त्वाचे स्रोत हाती लागू शकतात.
जातीव्यवस्थेचे अक्राळविक्राळ रूप बघता भारतीय संविधानाने कमकुवत जातींना सामाजिक सुरक्षेचा विश्वास दिला. अस्पृश्यतेला नाकारून दलित जातीसमूहांना सामाजिक संरक्षण पुरवले आणि दलित जातींसोबत इतर कनिष्ठ जातीसमूहांच्या सक्षमीकरणावर भर देऊन कल्याणकारी राज्यव्यवस्थेत तशी तरतूद केली. एका बाजूला आरक्षण आणि दुसऱ्या बाजूला शासनसंस्थेद्वारे सक्षमीकरणाचे कोणते कृतिकार्यक्रम राबविले गेले हे पाहणे महत्त्वाचे आहे.
भारतीय संविधानात कनिष्ठ जातींच्या सामाजिक सुरक्षिततेसाठी विशेषत: अनुसूचित जाती-जमातीसाठी विविध स्वरूपाच्या तरतुदी करण्यात आल्या. त्यामध्ये कायदे, धोरणे, योजना यांच्या अनुषंगाने या जातींच्या सक्षमीकरणासाठी विद्यमान शासन संस्थेकडून कोणत्या प्रकारचे प्रयत्न केलेले आहेत हे अभ्यासावे. यासाठी योजना, कुरुक्षेत्र या नियतकालिकासोबत हिंदू आणि इंडियन एक्स्प्रेसमधून या घटकाची तयारी करता येते.
येथून पुढील काळात लेखी परीक्षेमध्ये या घटकांतर्गत जात आणि भारतीय राजकारण, जातीचे सक्षमीकरण, जात आणि मध्यम वर्ग, जात आणि आरक्षण, मंडल आयोग आणि मागास जाती, अल्पसंख्याक आणि सच्चर आयोगाचा अहवाल, जात आणि विकास, जातीसंदर्भातील आंबेडकर आणि लोहियांची भूमिका, माहिती तंत्रज्ञान क्रांतीनंतर जातीचे बदलेले स्वरूप, आदिवासींचा प्रश्न, जागतिकीकरणानंतर जात आणि तिच्या संरचनेच्या गुणवैशिष्टय़ामध्ये झालेले आमूलाग्र बदल, जातीच्या टोकदार बनत चाललेल्या अस्मिता, जाती आणि प्रतीके तसेच जाती-जमातींच्या सबलतेसाठी आखलेली धोरणे, योजना अशा स्वरूपाच्या अनेकविध मुद्दय़ांवर प्रश्न विचारले जाऊ शकतात.
First Published on September 6, 2018 5:14 am
Web Title: article about upsc preparation 3

संशोधन संस्थायण : इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, हैदराबाद १९४४ मध्ये तत्कालीन ब्रिटिश हैदराबाद संस्थानामध्ये या संस्थेची स्थापना झाली होती.

संशोधन संस्थायण : इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, हैदराबाद

१९४४ मध्ये तत्कालीन ब्रिटिश हैदराबाद संस्थानामध्ये या संस्थेची स्थापना झाली होती.

रसायन आणि तंत्रज्ञानाची सांगड
तेलंगणा राज्याची राजधानी असलेल्या हैदराबाद येथे असलेली इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी(आयआयसीटी) म्हणजेच भारतीय रसायन-तंत्रज्ञान संशोधन संस्था ही रसायन-तंत्रज्ञान या विषयामध्ये मूलभूत आणि उपयोजित संशोधन करणारी संस्था आहे. आयआयसीटी ही सीएसआयआरशी (वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद) संलग्न संशोधन संस्था आहे. आयआयसीटीने भारतीय रसायन-तंत्रज्ञानातील संशोधन-विकास व उद्योगातील मूलभूत आणि उपयोजित संशोधनाबरोबरच या क्षेत्रातील देशभरातील संशोधन, शैक्षणिक आणि औद्योगिक संस्थांसाठी एक प्रमुख मार्गदर्शक म्हणून काम केलेले आहे.
संस्थेविषयी 
इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (आयआयसीटी) ही वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या जुन्या राष्ट्रीय प्रयोगशाळांपकी एक आहे. १९४४ मध्ये तत्कालीन ब्रिटिश हैदराबाद संस्थानामध्ये या संस्थेची स्थापना झाली होती. तेव्हा संस्था ‘सेंट्रल लॅबोरेटरीज फॉर सायंटीफिक अ‍ॅण्ड इंडस्ट्रियल रिसर्च’ (सीएलएसआयआर) या नावाने कार्यरत होती. कालांतराने संस्थेचे नाव बदलण्यात आले. १९५६ मध्ये सीएसआयआरने सीएलएसआयआरचे नामांतर रिजनल रिसर्च लॅबोरेटरी (आरआरएल) असे केले. नंतर १९८९मध्ये पुन्हा एकदा संशोधन विषय बदलल्यामुळे संस्थेचे नाव बदलून सध्याचे नाव देण्यात आले. संस्थेने १९९४ मध्ये आपला सुवर्ण महोत्सव तर २००४ मध्ये हीरक महोत्सव साजरा केला. नवीन सहस्रकामध्ये प्रवेश करतानाच संस्थेने आपले उद्दिष्ट पुनर्रचित केले आहे. रासायनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात एक अभिनव जागतिक संशोधन व विकास संस्थेच्या रूपात उदयास येण्याच्या उद्देशाने संस्थेने आपली वाटचाल सुरू ठेवलेली आहे. संस्थेने आपल्या संशोधन कार्यामध्ये मदत व्हावी यासाठी स्वतंत्रपणे राष्ट्रीय पातळीच्या तीन संशोधन केंद्रांची लिपिड रिसर्च, सेमि केमिकल्स आणि केमिकल बायोलॉजीची स्थापना केली आहे. आयआयसीटीने आपल्या सत्तर वर्षांच्या प्रवासात गतिशील, अभिनव आणि परिणामकारक संशोधन केलेले आहे. भारत हे जगभरातील रासायनिक व जैवतंत्रज्ञान उद्योगांचे एक विश्वासार्ह गंतव्यस्थान आहे. मोठय़ा प्रमाणावर उपलब्ध असलेले संशोधन क्षेत्रातील तज्ज्ञ तसेच प्रभावी व्यावसायिक विकास धोरणे या दोन गोष्टींमुळे आयआयसीटी या क्षेत्रातील एक विश्वासार्ह संशोधन व विकास भागीदार म्हणून औद्योगिक ग्राहकांमध्ये आपली ओळख प्रस्थापित करू शकलेली आहे.
संशोधनातील योगदान 
आयआयसीटी ही रसायन तंत्रज्ञान, उपयोजित रसायनशास्त्र, जैव रसायनशास्त्र, बायो इन्फोम्रेटिक्स, रसायन अभियांत्रिकी व संबंधित शास्त्रांमध्ये संशोधन करणारी संस्था आहे. मात्र सीएसआयआरच्या मार्गदर्शनानुसार संस्थेमध्ये रसायन तंत्रज्ञानाबरोबरच विज्ञान व अभियांत्रिकीच्या इतर शाखांमधील संशोधनसुद्धा – आंतरविद्याशाखीय संशोधन (Interdisciplinary research) राबवले जाते. या सर्व शाखांमधील संशोधन समन्वयाने चालावे यासाठी संस्थेने संशोधनाच्या सोयीने विविध विभागांची रचना केलेली आहे. या संशोधन विभागांच्या साहाय्याने संस्थेने देश-विदेशातील उद्योगांचे अनेक प्रकल्प हाती घेऊन यशस्वीपणे ते पूर्ण केलेले आहेत. संस्था सध्या ऑरगॅनिक सिंथेसिस, नॅचरल प्रॉडक्ट्स आयसोलेशन, मेडिसिनल केमिस्ट्री, फ्लुरो ऑरगॅनिक्स, अ‍ॅग्रो केमिकल्स, फिरोमोन्स, कॅटॅलीसीस, मटेरियल्स फॉर सोलर एनर्जी, पॉलिमर्स अ‍ॅण्ड फंक्शनल मटेरियल्स, बायोमटेरियल्स, बायोकेमिकल्स, एनएमआर स्पेक्ट्रोस्कोपी इत्यादी विषयांमध्ये संशोधन करते. आयआयसीटीचे संशोधन हे रसायन तंत्रज्ञानाच्या विकास आणि अद्ययावत उत्पादन यांसाठी सर्वत्र नावाजलेले आहे.
विद्यार्थ्यांसाठी संधी
आयआयसीटीमध्ये चाललेल्या इतक्या उत्कृष्ट संशोधनाचा फायदा शैक्षणिक क्षेत्रालाही व्हावा म्हणून आयआयसीटीने देशातील विविध विद्यापीठांबरोबर संलग्न होऊन अनेक शैक्षणिक व संशोधन कार्यक्रम सुरू केले आहेत. भारतातील इतर संशोधन संस्थांसारखे या संस्थेमध्येही Academy of Scientific & Innovative Research (AcSIR) च्या अंतर्गत पदव्युत्तर, पीएच.डी. व पोस्ट डॉक्टरल संशोधन अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना पूर्ण करता येतात. अलीकडेच आयआयसीटीने केमिकल इंजिनीअिरगमध्ये एम.टेक डिग्रीची सुरुवात केली जी पीएच.डी. प्रोग्राम आणि डिग्री अ‍ॅकेडमी ऑफ सायंटिफिक अ‍ॅन्ड इनोव्हेटिव्ह रिसर्च (एसीएसआयआर) द्वारे प्रदान करण्यात येईल. आयआयसीटी भारतीय व परदेशी विद्यापीठांशीही पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी संलग्न आहे. तसेच दरवर्षी सीएसआयआरच्या ‘नेट’ व ‘गेट’सारख्या परीक्षांमधून गुणवत्ताप्राप्त  जेआरएफ व एसआरएफ विद्यार्थी या संस्थेमध्ये पीएच.डी.चे संशोधन करण्यासाठी प्रवेश घेतात.
संपर्क
इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी,
उप्पल मार्ग, तारनाका, हैदराबाद, तेलंगणा – ५००००७.
दूरध्वनी – +९१-४०-२१७९१६२३,२७१९१६१९.
ई-मेल –  aau@iict.res.in , aau.iict@gov.in
संकेतस्थळ –  http://www.iictindia.org/
itsprathamesh@gmail.com
First Published on September 6, 2018 5:12 am
Web Title: article about indian institute of chemical technology hyderabad

मॅनेजमेंट अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट- ‘मॅट’ अर्जदार कुठल्याही विषयातील पदवीधर असावेत अथवा ते पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षेला बसलेले असावेत.



मॅनेजमेंट अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट- ‘मॅट’

अर्जदार कुठल्याही विषयातील पदवीधर असावेत अथवा ते पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षेला बसलेले असावेत.


द.वा.आंबुलकर
ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशनतर्फे देशांतर्गत १६० व्यवस्थापन अभ्यासक्रम शिक्षण संस्थांमध्ये उपलब्ध असणाऱ्या व्यवस्थापन विषयक पदविका अथवा व्यवस्थापनशास्त्र विषयातील एमबीए या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमात प्रवेश देण्यासाठी घेण्यात येणाऱ्या मॅनेजमेंट अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट म्हणजे ‘एमएटी : सप्टेंबर २०१८’ या प्रवेश पात्रता परीक्षेसाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक विद्यार्थ्यांकडून प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत.
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
अर्जदार कुठल्याही विषयातील पदवीधर असावेत अथवा ते पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षेला बसलेले असावेत.
निवड पद्धती-
अर्जदारांना खालीलप्रमाणे प्रवेश पात्रता परीक्षेला बसावे लागेल.
*      प्रवेश पात्रता परीक्षा संगणकीय पद्धतीने १५ सप्टेंबर २०१८ रोजी घेण्यात येईल.
*      अर्जदारांची पदवी परीक्षेतील गुणांची टक्केवारी व प्रवेश पात्रता परीक्षेतील गुणांकाच्या आधारे त्यांना संबंधित शिक्षण संस्थेतील व्यवस्थापन विषयक पदविका अथवा एमबीए अभ्यासक्रमात प्रवेश देण्यात येईल. अर्जासह भरावयाचे प्रवेश शुल्क म्हणून १५५० रुपये भरणे आवश्यक आहे.
अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख-
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ सप्टेंबर २०१८ आहे.
अधिक माहिती व तपशील
वरील अभ्यासक्रमांच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशनची जाहिरात पाहावी अथवा ‘एआयएमए’च्या www.aima.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
First Published on September 6, 2018 5:09 am
Web Title: article about management aptitude test
0
Shares

शिक्षणध्यास : भारतियर विद्यापीठ, कोईम्बतूर तामिळनाडू राज्यामधील एक महत्त्वाची शैक्षणिक संस्था म्हणून कोईम्बतूर येथील ‘भारतियर विद्यापीठा’चा विचार केला जातो.

शिक्षणध्यास : भारतियर विद्यापीठ, कोईम्बतूर

तामिळनाडू राज्यामधील एक महत्त्वाची शैक्षणिक संस्था म्हणून कोईम्बतूर येथील ‘भारतियर विद्यापीठा’चा विचार केला जातो.


संस्थेची ओळख – तामिळनाडू राज्यामधील एक महत्त्वाची शैक्षणिक संस्था म्हणून कोईम्बतूर येथील ‘भारतियर विद्यापीठा’चा विचार केला जातो. तामिळनाडू सरकारने फेब्रुवारी १९८२मध्ये या राज्य विद्यापीठाची स्थापना केली. या विद्यापीठाची स्थापना होण्यापूर्वीच्या काळात कोईम्बतूरमध्ये मद्रास विद्यापीठाचा पदव्युत्तर विभाग चालत असे. त्याच पायावर पुढे हे विद्यापीठ उभे राहिले. विद्यापीठ अनुदान आयोगाने १९८५ सालापासून या विद्यापीठाला मान्यता देत, अनुदानही सुरू केले. प्रसिद्ध तमिळ कवी सुब्रमण्यम भारती यांचे साहित्यिक तसेच भारतीय स्वातंत्र्यलढय़ातील योगदान विचारात घेत, त्यांच्या स्मरणार्थ ‘भारतियर विद्यापीठ’ या नावाने हे विद्यापीठ ओळखले जाते. शिक्षणसंस्था या ज्ञानमंदिर असाव्यात, या त्यांच्या विचारांप्रमाणे ‘उन्नतीसाठी शिक्षण’ हे ब्रीदवाक्य ठेवून हे विद्यापीठ दक्षिणेतील विद्यार्थ्यांसाठी ज्ञानदानाचे कार्य करत आहे. देश उभारणीसाठी, चांगला मनुष्य घडण्यासाठी आवश्यक ज्ञान, कौशल्ये, दृष्टिकोन, मूल्ये रुजवण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील आहे. यंदा ‘एनआयआरएफ’ या राष्ट्रीय पातळीवरील मूल्यांकनामध्ये हे विद्यापीठ देशभरातील विद्यापीठांच्या क्रमवारीत तेराव्या स्थानी आहे.
विभाग आणि अभ्यासक्रम – या विद्यापीठात एकूण चौदा स्कूल्समधून विद्यापीठाचे वेगवेगळे विभाग आणि अभ्यासक्रम विभागण्यात आले आहेत. त्याअंतर्गत विद्यापीठाचे ३९ शैक्षणिक विभाग चालतात. या विभागांच्या मदतीने विद्यापीठाने आपल्या विद्यार्थ्यांसाठी निवडक असे ५९ नियमित अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले आहेत. त्यामध्ये वेगवेगळ्या पदवी, पदव्युत्तर पदवी, संशोधन, पदव्युत्तर पदविका आणि प्रमाणपत्र स्वरूपातील अभ्यासक्रमांचा समावेश आहे. कला विद्याशाखांतर्गत असलेल्या इकॉनॉमॅट्रिक्स विभागामध्ये एम. एस्सी. इकॉनॉमॅट्रिक्स हा दोन वर्षे कालावधीचा पदव्युत्तर अभ्यासक्रम उपलब्ध आहे. इकॉनॉमिक्स, इकॉनॉमॅट्रिक्स, मॅथेमॅटिक्स, स्टॅटेस्टिक्स, बिझनेस इकोनॉमिक्स, कॉमर्स, मॅनेजमेंट आदी विषय शिकलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येतो. याच विद्याशाखांतर्गत असलेल्या डिपार्टमेंट ऑफ एज्युकेशनल टेक्नॉलॉजीमध्ये एम. एस्सी. ई- लìनग टेक्नॉलॉजी हा एक वेगळा अभ्यासक्रमही चालतो. कोणत्याही विद्याशाखेचे पदवीधर या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतात, हे या अभ्यासक्रमाचे वैशिष्टय़ ठरते. कला विद्याशाखेमधून उपलब्ध असलेले एम. ए. करिअर गाइडन्स आणि पदवी पातळीवर उपलब्ध असलेला बी. व्होक. मल्टिमीडिया अँड अ‍ॅनिमेशन हेही याच प्रकारचे वैशिष्टय़पूर्ण अभ्यासक्रम ठरतात. विद्यापीठाच्या विज्ञान विद्याशाखांतर्गत असलेल्या डिपार्टमेंट ऑफ मेडिकल फिजिक्समध्ये एम. एस्सी. मेडिकल फिजिक्स हा अभ्यासक्रम चालतो. कोईम्बतूरमधील एका हॉस्पिटलच्या सहकार्याने चालणारा हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकांवर आधारलेल्या शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यास उपयुक्त ठरतो. याच विषयाशी संबंधित एम. फिल. आणि पीएचडीचे अभ्यासक्रमही या विभागामध्ये चालविले जातात. मॅथेमॅटिक्स आणि केमिस्ट्री या विषयांसह शिक्षण घेत फिजिक्स विषयातील पदवी पूर्ण करणारे उमेदवार या अभ्यासक्रमासाठी पात्र ठरतात. विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ बॉटनीमध्ये ‘हर्बल टेक्नॉलॉजी’ या विषयामधील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम चालतो. दोन वर्षे कालावधीच्या या अभ्यासक्रमासाठी बायोलॉजिकल सायन्सेसमधील पदवी किंवा पदव्युत्तर पदवीधारक विद्यार्थी पात्र ठरतात. कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन्स विभागामध्ये चालणारा ‘डेटा अ‍ॅनालिटिक्स’ या विषयातील एम. एस्सी.चा दोन वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम, अप्लाइड मॅथेमॅटिक्स विभागामध्ये चालणारा ‘एम. एस्सी. मॅथेमॅटिक्स विथ कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन्स’, डिपार्टमेंट ऑफ टेक्स्टाइल्स अँड अ‍ॅपरल डिझाइनमध्ये उपलब्ध असलेला याच विषयातील एम. एस्सी. हे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी वेगळ्या वाटेने जाणाऱ्या करिअरचा मार्ग दाखवतात. याशिवाय विद्यापीठाच्या विभागांमधून नेहमीच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या जोडीने एम. फिल. आणि पीएचडीसाठीच्या संशोधन अभ्यासक्रमांचीही उपलब्धता करून देण्यात आली आहे. विद्यापीठाच्या ‘स्कूल ऑफ डिस्टन्स एज्युकेशन’ या माध्यमातून दूरशिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्या आधारे दूरशिक्षणाचे ४६ पदवी, १९ पदविका किंवा प्रमाणपत्र, २५ पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांचे पर्याय विद्यापीठाने उपलब्ध करून दिले आहेत. याशिवाय पदव्युत्तर पदविका आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांची सुविधाही दूरशिक्षणाच्या आधारे उपलब्ध करून देण्यात आली आहे.
संकुल आणि सुविधा
कोईम्बतूर शहरापासून जवळच असलेल्या निसर्गरम्य परिसरामध्ये या विद्यापीठाचे शैक्षणिक संकुल वसले आहे. विद्यापीठाने आपल्या विद्यार्थ्यांसाठी मूलभूत पायाभूत सुविधांची उभारणी करताना या संकुलाच्या निसर्गरम्यतेला धक्का लागणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली आहे. विद्यापीठामध्ये सध्या विद्यार्थ्यांसाठीच्या चार वसतिगृहांची सुविधा उपलब्ध आहे. तसेच, शिक्षकांसाठीच्या स्वतंत्र वसतिगृहाची सुविधाही विद्यापीठाने उभारली आहे. त्याद्वारे कामानिमित्त विद्यापीठामध्ये येणाऱ्या शिक्षकांची रहिवासाची अडचण दूर करण्यात विद्यापीठ यशस्वी ठरते आहे. विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी मध्यवर्ती ग्रंथालयाची सुविधा उपलब्ध आहे. सध्या या ग्रंथालयामध्ये एकाच वेळी ३०० विद्यार्थी बसून अभ्यास करू शकतील, अशा सुविधा उपलब्ध आहेत. राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय पातळीवरील वेगवेगळी नियतकालिकेही ग्रंथालयामध्ये उपलब्ध आहेत. त्यामध्ये अगदी १८८० पासूनच्या काही खंडांचाही समावेश आहे. नागरी सेवा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ‘अण्णा सेंटेनरी सिव्हिल सर्व्हिसेस कोचिंग अ‍ॅकेडमी’ हे निवासी प्रशिक्षण केंद्रही विद्यापीठाने उभारले आहे. या केंद्रामधून तामिळनाडूच्या पश्चिम भागातील विविध जिल्ह्यंमधील उमेदवारांना स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. विद्यापीठाच्या कम्युनिटी कॉलेज कन्सल्टन्सी सेंटरच्या माध्यमातून शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून लांब असणाऱ्या समाजघटकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये सहभागी करून घेण्यासाठीचे व्यापक प्रयत्न केले जात आहेत. विज्ञानाच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरू शकणाऱ्या अत्याधुनिक वैज्ञानिक उपकरणांनी सज्ज असलेले ‘सायन्स इन्स्ट्रमेंटेशन सेंटर’ही विद्यापीठाने उभारले आहे.
borateys@gmail.com
First Published on September 4, 2018 3:11 am
Web Title: article about bhartiar university coimbatore

यशाचे प्रवेशद्वार : कॅटचे महत्त्व बरेच विद्यार्थी आयआयएमपेक्षा एफएमएस दिल्लीला पहिला पसंतीक्रम देतात.

यशाचे प्रवेशद्वार : कॅटचे  महत्त्व

बरेच विद्यार्थी आयआयएमपेक्षा एफएमएस दिल्लीला पहिला पसंतीक्रम देतात.

कॉमन एन्ट्रन्स टेस्ट म्हणजेच कॅट परीक्षेतील गुण देशातील २० इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंटच्या कॅम्पसेसमधील प्रवेशासाठी प्रमुख घटक म्हणून ग्राह्य़ धरले जाते. त्याशिवाय देशातील महत्त्वाच्या शासकीय, विद्यापीठीय आणि खासगी संस्थेतील एमबीए किंवा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट-पीजीडीबीएम प्रवेश प्रकियेतील स्क्रीिनग म्हणजेच प्रारंभिक निवड सूची करण्यासाठी उपयोग आणले जातात. यातील काही संस्था या बऱ्याच आयआयएमपेक्षा विद्यार्थ्यांची पहिली पसंती असते.
यामध्ये पुढील काही महत्वाच्या शासकीय संस्थांचा समावेश आहे.
१)     दिल्ली युनिव्हर्सटिी अंतर्गत येणाऱ्या फॅकल्टी ऑफ मॅनेजमेंट स्टडीज
२)     डिपार्टमेंट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज – आयआयटी मद्रास
३)     शैलेज जे मेहता, स्कूल ऑफ मॅनेजमेंट स्टडीज- आयआयटी बॉम्बे
४)     विनोद गुप्ता, स्कूल ऑफ मॅनेजमेंट स्टडीज- आयआयटी खरगपूर
५)     स्कूल ऑफ मॅनेजमेंट स्टडीज-आयआयटी दिल्ली
६)     डिपार्टमेंट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज-आयआयटी रुरकी
७)     डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्रियल अ‍ॅण्ड मॅनेजमेंट इंजिनीअिरग – आयआयटी कानपूर
८)     डिपार्टमेंट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज- आयएमएस धनबाद
९) नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ इंडस्ट्रिअल इंजिनीअिरग, मुंबई
१०) इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ फॉरेन ट्रेड दिल्ली
११) डिपार्टमेंट ऑफ मॅनेजमेंट सायन्स – इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स बेंगळुरु
११) इन्स्टिटय़ूट ऑफ रुरल मॅनेजमेंट आनंद
१२) एनआयटी रुरकेला
१३) एनआयटी तिरुचिरापल्ली, डिपार्टमेंट ऑफ मॅनेजमेंट. इत्यादी.
फॅकल्टी ऑफ मॅनेजमेंट स्टडीज
फॅकल्टी ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (एफएमएस) ही संस्था रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट म्हणजेच एकूण शैक्षणिक शुल्काच्या तुलनेत पॅकेजच्या रक्कमेच्या बाबतीत देशातील सर्व आयआयएम आणि इतर शासकीय व खासगी संस्थांच्या कित्येकपट जास्त आहे. या संस्थेतील वार्षकि शैक्षणिक शुल्क १० हजार ४८० रुपये आहे. म्हणजेच दोन वर्षांचा हा अभ्यासक्रम अवघ्या २५ हजार रुपयांच्या शुल्कामध्ये शिकता येतो. यंदा या संस्थेतील सर्वोच्च पॅकेज ५६ लाख रुपये आहेत, तर पहिल्या १०० विद्यार्थ्यांचे सरासरी पॅकेज २६ लाख रुपये आहे. आयआयएम अहमदाबाद, आयआयएम बेंगळुरु, आयआयएम कोलकता या महत्त्वाच्या आयआयएमचे शुल्क २० ते २२ लाख रुपयांच्या आसपास आहे. या संस्थेतील सर्वोच्च पॅकेज ८२ लाख रुपये आहेत, तर विद्यार्थ्यांचे सरासरी पॅकेज ४८ लाख रुपये आहे. या आकडेवारुन लक्षात येईल की एफएमएसमधील गुंतणुकीपेक्षा मिळणारे रिटर्न्‍स हे आयआयएम अहमदाबादपेक्षा अधिक पटीने आकर्षक आहे. त्यामुळे बरेच विद्यार्थी आयआयएमपेक्षा एफएमएस दिल्लीला पहिला पसंतीक्रम देतात.
आयआयटीमधील एमबीए
आयआयटी (दिल्ली, कानपूर, मुंबई, खरगपूर,रुरकी) मधील एमबीएचे शुल्क हे १० ते १२ लाखाच्या आसपास आहे. काही महत्त्वाच्या नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी (एनआयटी) मधील व्यवस्थापन अभ्यासक्रमांचे शुल्कसुद्धा आयआयएमपेक्षा कितीतरी कमी आहे. त्यामुळे आयआयएमसोबतच कॅट परीक्षेतील गुण हे या शासकीय संस्थांमधील एमबीए अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचे द्वार उघडणारी पहिली पायरी ठरते.
प्रवेशाचे टप्पे
यामुळे कॅट परीक्षेत किमान एकूण ९० पर्सेटाइल आणि तिनही विभागात किमान ८० टक्के पर्सेटाइल मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राथमिक फेरीसाठी निवड होण्याची संधी मिळते. दुसऱ्या फेरीत समूह चर्चा, मुलाखत, लेखन कौशल्य, दहावी-बारावी-पदवीमधील गुण, संगीत/नृत्य/नाटक /क्रीडा आदी घटकांमध्ये उत्तम कामगिरी अशा बाबींवर गुण दिले जातात आणि अंतिम यादीत स्थान मिळू शकते. साधारण पन्नास टक्के वेटेज किंवा महत्त्व हे कॅटमधील गुणांना व इतर बाबींना उर्वरित पन्नास टक्के वेटेज दिले जाते. यंदा काही आयआयएम वा इतर महत्त्वाच्या शासकीय संस्था कॅटच्या गुणांचे वेटेज हे ४० टक्क्यांपर्यंत आणण्याची शक्यता आहे.
अभियांत्रिकीसोबतच इतर ज्ञानशाखांमधील विद्यार्थ्यांनाही आयआयएममध्ये प्रवेश मिळणे सुलभ व्हावे यासाठी अभियांत्रिकीव्यतिरिक्त इतर शाखेच्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण दिले जातात. शिवाय विद्यार्थिनींची संख्या वाढावी यासाठी त्यांनाही अतिरिक्त गुण दिले जातात. यंदा कोझिकोड आयआयएममध्ये नियमित जागांशिवाय महिलांच्या ६० अतिरिक्त जागाही भरणार आहे. गेल्या वर्षीपर्यंत मुंबईतील जमनलाल बजाज इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स अ‍ॅण्ड रिसर्चमधील काही जागा भरण्यासाठी कॅट गुणांचा आधार घेतला जात होता. यंदा केवळ एमएच-सीईटी-एमबीए या परीक्षेतील गुण ग्राह्य़ धरले गेले. मात्र पुढील वर्षी नियमांमध्ये बदल झाल्यास कॅटमधील गुणांचा फायदा होऊ शकतो. रिटर्न ऑन इव्हेंस्टमेंट या घटकांमध्ये देशामध्ये तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या मुंबईतील सिडनहॅम इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड रिसर्च या संस्थेतील काही जागा भरण्यासाठी कॅटचे गुण ग्राह्य़ धरले जातात. ही महाराष्ट्र शासनाची संस्था आहे. महाराष्ट्रातील एस.पी.जैन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड रिसर्च, नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ बँक मॅनेजमेंट पुणे, वैकुंठ मेहता नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट पुणे, या संस्थांमधील प्रारंभिक चाळणीसाठी कॅटमधील गुणांचा आधार घेतला जातो. या शिवाय देशातील पहिल्या ५० संस्थांमधील प्रवेशासाठीही कॅटचे गुण ग्राह्य़ धरले जातात. ही बाब कॅट परीक्षेचे महत्त्व व्यवस्थापन अभ्यासक्रम शिक्षणात अधोरेखित करणारे आहे.
अशी करा तयारी
कॅट परीक्षा ही कठीण असली तरी दररोजच्या सरावाने या परीक्षेतील यशाची खात्री वाढू शकते. ही परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांने या परीक्षेत एकूण किमान पर्सेटाईल आणि तिनही सेक्शनमधील किमान पर्सेटाईल गुण मिळवण्याचे ध्येय ठेवले पाहिजे. त्यासाठी प्रत्येक सेक्शनमधील प्रश्नांचा अधिकाधिक सराव करायला हवा. अशा सराव चाचण्या मुबलक प्रमाणात इंटरनेटवर उपलब्ध आहेत. विशिष्ट रक्कम ऑनलाइन पद्धतीने भरली की, निर्धारित कालावधीत या खासगी शिकवण्यांच्या सराव चाचण्या संगणकावर येत राहतात.
याशिवाय पूर्ण कालावधीच्या (तीन तास) पेपरचा सराव करण्यासाठी मॉक टेस्ट उपलब्ध करुन दिले जातात. पुढील काळात दररोज किमान एक तरी पेपर तरी सोडवायला हवा. हा पेपर सोडवल्यावर त्यातील न आलेल्या प्रश्नांचे विश्लेषण करायला हवे. ते केल्यावरच दुसरा पेपर सोडवायला घ्यावा. यासोबतच दररोज सेक्शनल विषयांचे पेपरही सोडवायला हवेत. त्यामुळे होणाऱ्या चुका कळतात व विश्लेषण केल्यावर त्याची दुरुस्ती करता येते. या दोन्ही गोष्टी करण्यासाठी काही वेळ राखून ठेवणे आवश्यक आहे.
गती आणि अचुकता
कॅट परीक्षेमध्ये गती आणि अचूकता या दोन्ही गोष्टी तपासल्या जातात. त्यामुळे तिन्ही विभागांचा अभ्यास करताना समान वेळ शक्यतो द्यावा. कारण एखादा विभाग सोपा वाटतो म्हणून सरावात त्याकडे दुर्लक्ष करू नये. प्रत्यक्ष परीक्षेत सरावाच्या वेळी नेहमी सोपा जाणारा विभाग कठीण जाऊ शकतो. त्यामुळे सर्व विभागांना समान न्याय देणेच उचित ठरेल.
पूर्ण लांबीचा पेपर हा काटेकोरपणे तीन तासाच्या वेळेत सोडवायचा प्रयत्न करावा या परीक्षेत चुकलेल्या प्रश्नांसाठी गुण कापले जातात. त्यामुळे शक्यतो अंदाजपंचे उत्तरे लिहिण्याचे टाळले पाहिजे. अधिक अचूक प्रश्नांची सोडवणूक म्हणजे अधिक गुण ही बाब लक्षात ठेवायला हवी. तिन्ही विभाग सोडवण्यासाठी शक्यतो समान वेळ देण्याचा प्रयत्न करावा.
First Published on September 1, 2018 4:01 am
Web Title: article about the importance of cet