नवनीत
Published: Tuesday, July 8, 2014
कुतूहलस्वसंरक्षणार्थ काहीही!
मुंग्यांच्या डंखांमध्ये असलेलं फॉर्मिक आम्ल हे रसायन मधमाशीच्या डंखामध्येही असतं. पण त्याचबरोबर मधमाशी आपल्या डंखामध्ये मेलिटीन या तीव्र अल्कधर्मी रसायनाचा वापर करते. त्यामुळे मधमाशीच्या डंखाची तीव्रता जास्त असते. आणि कधी कधी तर मधमाशीच्या डंखांमुळे शरीरावर अॅलर्जीही उठते.
अशा प्रकारे अनेक प्राणी स्वसंरक्षणार्थ आपल्या शरीरातल्या रसायनांचा सढळपणे वापर करीत असतात. काही छोटे कीटक तर शत्रूवर चढाई करून जाण्यासाठी आपल्या शरीरातून एक वायुरूपी रसायन सोडतात. हे रसायन थोडंसं जाडसर आणि चिकट असतं. त्यामुळे शत्रुकीटकाचे तोंड किंवा हातपाय चिकटले जातात आणि तो जायबंदी होतो. आफ्रिकेत आढळणारी स्पिटिंग कोब्रा नावाची सापाची एक जात आहे. स्पिटिंग म्हणजे थुंकणे! स्पिटिंग कोब्रा त्याच्यापासून जवळजवळ अडीच ते तीन मीटर अंतरावर असलेल्या शत्रूच्या डोळ्यात थुंकीचा नेमका फवारा मारू शकतो. हा थुंकणारा साप आपल्या थुंकीद्वारे फॉस्फोलिपेसेस ए-२ हे रसायन शत्रूच्या डोळ्यात थुंकतो. या रसायनामुळे पेशींच्या आवरणावर परिणाम होतो डोळ्यांची विलक्षण जळजळ होते आणि कधी कधी प्राणी आंधळाही होतो.
सापाशी जन्मजात शत्रुत्व असलेला प्राणी म्हणजे मुंगूस. काही ठरावीक जातीची मुंगुसं आपल्या शेवटी जवळ असलेल्या पिशवीतून काळ्या-पांढऱ्या रसायनाचा फवारा सोडतात. हे रसायन म्हणजे मिथाईल किंवा ब्युटाईल थायोलसारखं गंधकाचा अंश असलेलं रसायन असतं. या रसायनाला कुजकं लसूण आणि जळणारा रबर अशा मिश्रणासारखा दरुगध येतो. हे रसायन शरीरातून सोडण्याआधी मुंगूस आपल्या शत्रूला तशी सूचना देतं. पाय आपटून किंवा गुरगुरून आपण तो भयानक वास सोडत असल्याची सूचना देऊनही शत्रू पक्ष बधला नाही तर मुंगूस स्वसंरक्षणाचं आपलं हत्यार बाहेर काढतं. स्पिटिंग कोब्राप्रमाणेच मुंगूस त्याच्यापासून चार मीटर अंतरावर असलेल्या प्राण्यावर या रसायनाचा अचूक मारा करू शकतं. ज्या वाटेवर हे रसायन मारलं असेल तिथला तो विशिष्ट वास पुढे कित्येक दिवस तसाच राहतो.
डॉ. मानसी राजाध्यक्ष (मुंबई)
मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org
No comments:
Post a Comment