Wednesday, July 16, 2014

नवनीत कुतूहल - गंधकाचा वापर

नवनीत


कुतूहल - गंधकाचा वापर

Published: Tuesday, July 15, 2014
सल्फर (गंधक) या अधातूच्या औषधी गुणधर्मामुळे याचा वापर वाढत आहेच, पण औद्योगिक क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात वापरलं जात असल्यामुळे या मूलद्रव्याला महत्त्व प्राप्त झालं आहे. सल्फर मानवाला फार प्राचीन काळापासून परिचित आहे. लवायजर या शास्त्रज्ञानं सल्फर हे एक स्वतंत्र मूलद्रव्य आहे, हे सिद्ध करीपर्यंत या पेटणाऱ्या आणि निळसर ज्योत देणाऱ्या दगडांभोवती चमत्काराचं काल्पनिक आणि कल्पनातीत रहस्यमय समजुती निर्माण झाल्या होत्या.
एकूण भूपटलाच्या सुमारे ०.१% एवढं निसर्गामधलं सल्फरचं मूलद्रव्यस्वरूपात आणि संयुगाच्या स्वरूपात अस्तित्व आहे. इटली, अमेरिका, कॅनडा, जपान, रशिया, चिली इ. अनेक देशांत शुद्ध सल्फरच्या मोठाल्या खाणी आहेत. भारतात मात्र शुद्ध सल्फर सापडत नाही. भूपृष्ठाखाली हजार-दोन हजार फुटांवर शुद्ध सल्फरचे थर असतात. नलिका कूपासारख्या विवरातून एवढय़ा खोलीवर एका बाजूनं वाफ सोडली जाते आणि वितळलेलं शुद्ध सल्फर नळीतून वर येऊन वाहू लागतं. शुद्ध सल्फरनंतर औद्योगिक महत्त्वाच्या दृष्टीनं पायराइट या सल्फरयुक्त खनिजाचा वापर होतो.
रासायनिक औद्योगिक क्षेत्रात सल्फर हा अधातू वापरून सल्फ्युरिक आम्ल (गंधकाम्ल) तयार केलं जातं. तसंच लाकडाच्या कागदासाठी लगदा बनविण्यासाठी, कार्बन डायसल्फाइडसारखी रसायनं, कीटकनाशकं  व बुरशीनाशकं तयार करण्यासाठी सल्फर वापरतात. सल्फर वापरून सुरुंगाची दारू, बंदुकीची वा शोभेची दारू बनवितात. साखर कारखान्यात रसाच्या शुद्धीकरणासाठी सल्फरचा वापर होतो. सल्फा वर्गातली अनेक औषधं व मलमं आणि अनेक आयुर्वेदीय औषधांमध्ये सल्फरचा वापर होतो. सल्फर वापरून तयार केलेल्या एका खास रंगानं विटांच्या िभती रंगविल्या तर त्या जलविरोधी तर होतातच, पण इमारतीवर भूकंपासारख्या आपत्तीत वेडावाकडा ताण पडला असताही त्या चांगल्या टिकाव धरतात, असं निदर्शनास आलं आहे.
भारतात सल्फर शुद्ध स्वरूपात सापडत नाही. शुद्ध सल्फरला पर्यायी पदार्थ म्हणून पायराइट वापरून सल्फ्युरिक आम्ल बनविण्याकरिता प्रयत्न सुरू आहेत. सल्फरला आणि सल्फ्युरिक आम्लाला आणि जिथं जिथं सल्फरचा उपयोग होतो तिथं तिथं पर्यायी पदार्थ शोधणं हे भारतीय शास्त्रज्ञांना परिस्थितीचं एक आव्हान आहे.
शुभदा वक्टे (मुंबई)
मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई office@mavipamumbai.org

No comments:

Post a Comment