Friday, July 11, 2014

नवनीत कुतूहल: मुंगीचा चावा

नवनीत


कुतूहल: मुंगीचा चावा

Published: Monday, July 7, 2014
आपल्यापकी जवळजवळ सर्वानाच आयुष्यात एकदा तरी मुंगी चावली असेल. असुरक्षित वाटल्याक्षणी मुंगी समोरच्या प्राण्याला चावते किंवा डंख मारते. त्या वेळी ती तिच्या शरीरातलं फॉर्मिक आम्ल हे रसायन शत्रूच्या त्वचेवर सोडते. या रसायनाचा स्पर्श तिच्या शत्रूला त्रासदायक ठरतो. काही ठरावीक जातीच्या मुंग्यांच्या दंशात तर पायपिरिडीन अल्कोलोइड हे विषारी रसायन असते. अशा मुंग्यांचा दंश हा अत्यंत वेदनादायक असतो.
स्वसंरक्षणाव्यतिरिक्त जीवनाला आवश्यक असलेल्या इतर अनेक बाबींसाठी मुंग्या आपल्या शरीरातली रसायने वापरत असतात. मुंग्या आपल्या खाद्याच्या किंवा वारुळाच्या दिशेने एका रांगेत जात असताना आपण नेहमीच पाहतो. मुंग्या आपल्या शरीरातून 'फेरोमोन'नामक रसायनाचा फवारा आपल्या वाटेवर सोडत पुढे जातात. पाठच्या मुंग्या या फेरोमोन्सच्या वासाचा मागोवा घेत रांगेत पुढे जातात. 'फेरोमोन्सचेही' अनेक प्रकार मुंग्यांच्या शरीरात असतात. एखादी मुंगी चिरडली गेली तर तिच्या शरीरातून अत्यंत तीव्र वासाचे फेरोमोन बाहेर पडते, जेणेकरून अगदी दूरवरच्या मुंग्यांनासुद्धा धोक्याची सूचना मिळते.
एका मलेशियन जातीच्या मुंग्यांची तर तऱ्हाच वेगळी! एखाद्या शत्रू-कीटकाकडून धोक्याची जाणीव होताच या मुंग्या स्वत:च्या पोटाजवळची एक पिशवी स्वत:च्याच सोंडेने फोडतात आणि त्यातील 'अ‍ॅसिटोफिनोन' हे रसायन बाहेर सोडतात. या रसायनामुळे शत्रूकीटक काही काळाकरिता जायबंदी होतो आणि इतर मुंग्यांना या शत्रूच्या आगमनाची वार्ता कळते आणि त्या त्यावर योग्य ती उपाययोजना करू शकतात. पण या साऱ्या गडबडीत स्वत:चे पोट फाडून घेणारी मुंगी मात्र मरण पावते.
मुंग्या स्वसंरक्षणाबरोबरच स्वत:च्या वसाहतींचे म्हणजे वारुळांचे संरक्षण करण्यातही तत्पर असतात. वारुळात मरणाऱ्या मुंग्याचे शरीर कुजून त्यामुळे सूक्ष्म जिवाणूंचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून काही कामकरी मुंग्या स्वत:च्या शरीरातून ओलिक आम्लासारख्या काही रसायनांचा फवारा वारुळात सोडतात. एवढेच नव्हे तर मेलेल्या मुंग्यांच्या शरीरातूनही ओलिक आम्लाचा अंश असलेले रसायन सोडले जाते, ज्याने वारुळांचे जंतूपासून संरक्षण होते.

No comments:

Post a Comment