- नवनीत
Published: Wednesday, July 23, 2014
पूर्वापार
मानवाला माहीत असलेला पदार्थ म्हणजे प्राणिजन्य तूप, जो गाई, म्हैस, शेळी,
मेंढी यांच्या दुधापासून तयार करतात. साधारण पहिल्या महायुद्धानंतर
मानवाला परिचित झालेला, प्राणिजन्य तुपासारखा दिसणारा पदार्थ म्हणजेच
'वनस्पती तूप' होय. 'वनस्पती तूप' बनविताना वनस्पती तेलावर रासायनिक
प्रक्रियेद्वारा हायड्रोजनशी संयोग करून त्याचं घनीकरण केलं जातं, म्हणजेच
तो तेलाचा घन स्थितीतील प्रकार आहे. वनस्पती तेलांपासून वनस्पती तूप बनविण्यासाठी हायड्रोजनीकरण प्रक्रिया फार महत्त्वाची ठरलेली आहे. यासाठी शुद्ध तेल, शुद्ध हायड्रोजन वायू व उत्प्रेरक (कॅटॅलिस्ट- रासायनिक क्रियेत प्रत्यक्ष भाग न घेता तिची गती बदलणारा पदार्थ) हे घटक महत्त्वाचे आहेत. हायड्रोजनीकरणाकरिता प्रारंभी फक्त शेंगदाण्याचं तेल वापरीत असत, पण जसजसा वनस्पती तुपाचा व्यवसाय वाढत गेला आणि इतर व्यवसायांत व खाण्याकरिताही त्याचा खप वाढत गेला तसतसा त्याचा तुटवडा पडू लागला, त्यामुळे मग वनस्पतिजन्य खाद्य द्रव तेलांचा उपयोग करण्याचे प्रयत्न झाले. आता शेंगदाण्याच्या तेलाबरोबरच सरकी, तीळ, करडई, कारळे, भाताचा कोंडा, मका, मोह, सोयाबीन, पाम, सूर्यफूल इत्यादींच्या खाद्य तेलांचा वनस्पती तूप तयार करण्यासाठी उपयोग करता येतो.
तेलातील असंपृक्त मेदाम्लांना हायड्रोजन वायूचे अणू संलग्न करण्यासाठी उत्प्रेरकाची आवश्यकता असते. या प्रक्रियेकरिता प्रामुख्यानं निकेल उत्प्रेरक वापरतात. जसजसं हायड्रोजनीकरण होत जातं तसतसा तेलाचा वितळिबदू वाढत जाऊन साधारण ३७ अंश सेल्सिअसपर्यंत पोचतो.
वनस्पती तूप म्हणजे संपृक्त केलेलं वनस्पती तेल होय. वनस्पती तूप जर काळजीपूर्वक संपृक्त बनवलं तर ते तुपासारखं दाणेदार बनविता येतं किंवा लोण्यासारखं स्निग्ध व घट्ट बनविता येतं. वनस्पती तेल संपृक्त केल्यानंतर घट्ट होत असल्यानं डब्यांतून गळण्याची भीती नाही व टिकाऊही आहे, शिवाय शुद्ध तुपापेक्षा बरंच स्वस्त. त्यामुळे तेही लोकप्रिय होऊ लागलं. पण हायड्रोजनीकरणच्या प्रक्रियेत तेलातील बहुतेक सर्व आवश्यक मेदाम्लं नष्ट होतात किंवा त्यांचं मूळ मेदाम्लांपेक्षा वेगळ्या प्रकारच्या मेदाम्लांत (Trans Fatty Acid) रूपांतर होतं. ही रूपांतरित मेदाम्लं शरीरास निरुपयोगीच नव्हे तर अपायकारक असतात. वनस्पती तुपात 'अ' जीवनसत्त्व नसतं, म्हणून ते बाहेरून घातलं जातं.
शुभदा वक्टे (मुंबई)
मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई - office@mavipamumbai.org
No comments:
Post a Comment