नवनीत
Published: Thursday, July 31, 2014
लिखित
नमुन्याच्या अनेक प्रती हव्या असतील तर आता झेरॉक्स, कॅम्प्युटर यांसारखी
यंत्रं वापरून मिळविता येतात. पण जर ही यंत्रं उपलब्ध नसतील तर मात्र
आपल्याला 'कार्बन पेपर'चा आधार घ्यावा लागतो. हा कार्बन पेपर म्हणजे नक्की
काय असतं, की ज्यामुळे थोडा जरी दाब पडला तरी त्याखालील पानावर रंग उतरतो?
कार्बन पेपर म्हणजे मेणासारखा पदार्थ व रंगद्रव्य यांच्या मिश्रणाचा पातळ
लेप दिलेला व एकाच वेळी एक किंवा अधिक प्रती काढण्यासाठी वापरण्यात येणारा
कागद होय. दोन कोऱ्या कागदांमध्ये कार्बन कागद योग्य रितीनं ठेवून वरील
कोऱ्या कागदावर दाब देऊन जे लिहिलं किंवा रेखाटलं जातं त्याची हुबेहूब
नक्कल खालील कोऱ्या कागदावर मिळते. कारण कार्बन कागदावरील रंगद्रव्य
कागदापासून सुटं होऊ शकणारं असतं व त्यामुळे दाब दिलेल्या भागावरचं काही
रंगद्रव्य खालील कोऱ्या कागदावर गेल्यानं नक्कल निघते. अशा कागदावरील
काळ्या रंगासाठी काजळी किंवा ग्रॅफाइट (कार्बनचं अपरूप) वापरत असल्यामुळे
'कार्बन कागद' हे नाव पडलं असावं.यासाठी लागणारा कागद चिंध्या, लाकूड व ताग यांच्यापासून तयार करतात. तो पातळ, चिवट व टिकाऊ असावा लागतो. साधं मेण व माँटन, जपान, पॅरोफीन, कार्नुबा यांसारखी मेणं व ओलीन, रोझीन यांच्यासारखे पदार्थ लेपासाठी वापरतात. काळ्या कागदासाठी नेहमी काजळी तर इतर रंगांसाठी ब्राँझ निळा, व्हिक्टोरिया निळा, मिलोरी निळा, अल्ट्रामरीन, इंडिगो, कॅरमीन इ. रंगद्रव्ये किंवा त्यांची मिश्रणं व अॅयनिलीन रंजकद्रव्यं किंवा फॅटी अॉसिडमध्ये विद्राव्य अशी रंजकद्रव्यं वापरतात.
आधुनिक पद्धतीमध्ये लेपाचे मिश्रण तयार करणे व कागदावर लेप देणे या दोन प्रमुख प्रक्रिया असतात. मेणे व इतर पदार्थ सुमारे १५०० सें. तापमानाला वितळवितात, नंतर रंगद्रव्य टाकून मिश्रण एकजीव करतात. टंकलेखन यंत्रांमध्ये सटकू नये व चांगला दिसावा म्हणून त्याच्या दुसऱ्या बाजूवर न चिकटणारा व जलशोषक नसलेला असा मेणाचा थर देतात.
विविध रंगांचे कार्बन कागद उपलब्ध असले तरी काळा, निळा, जांभळा आणि तांबडा हे रंग अधिक वापरले जातात.