Thursday, October 22, 2015

उत्पादन व्यवस्थापन मागील काही लेखांमध्ये आपण एमबीएच्या दुसऱ्या वर्षांसाठी असलेल्या विशेषीकरणाच्या (स्पेशलायझेशन) विविध पर्यायांचा विचार केला

उत्पादन व्यवस्थापन

मागील काही लेखांमध्ये आपण एमबीएच्या दुसऱ्या वर्षांसाठी असलेल्या विशेषीकरणाच्या (स्पेशलायझेशन) विविध पर्यायांचा विचार केला

नचिकेत वेचलेकर | October 18, 2015 13:11 pm

मागील काही लेखांमध्ये आपण एमबीएच्या दुसऱ्या वर्षांसाठी असलेल्या विशेषीकरणाच्या (स्पेशलायझेशन) विविध पर्यायांचा विचार केला आणि वेगवेगळ्या विषयांच्या म्हणजे मार्केटिंग, फायनान्स, ह्युमन रिसोर्सेस इत्यादी विषयांच्या क्रमिक पुस्तकांपलीकडे पोहोचत अभ्यास कसा करावा हे पाहिलं. आजच्या या लेखामध्ये उत्पादन व्यवस्थापन (मॅन्युफॅक्चरिंग मॅनेजमेन्ट ज्याला काही ठिकाणी ऑपरेशन्स मॅनेजमेंट म्हणतात त्याचा विचार करूयात.
उत्पादन व्यवस्थापन हा विषय स्पेशलायझेशनचा एक पर्याय आहे. या विषयाचे स्वरूप हे तांत्रिक (टेक्निकल) स्वरूपाचे असल्याने अभियांत्रिकीची पाश्र्वभूमी असणारे विद्यार्थी- विद्यार्थिनी हा विषय घेतात असा सर्वसाधारण अनुभव आहे. अर्थात या विषयाकडे वळणाऱ्यांची संख्या तशी मर्यादितच आहे. कारण एकदा अभियांत्रिकीची पदवी घेतल्यानंतर पुन्हा उत्पादन व्यवस्थापन का शिकायचे हा प्रश्न येतो. मात्र लक्षात घेतले पाहिजे की, या विषयात उत्पादनाचे व्यवस्थापन कसे करावे याचा विचार करण्यात आला आहे. फक्त तांत्रिक बाजू विचारात घेतलेली नाही तर उत्पादनाचे व्यवस्थापन करताना कोणकोणत्या अडचणी येऊ शकतात, कोणकोणत्या बाबी विचारात घेतल्या पाहिजेत, व्यवस्थापनाची जी मूलभूत कार्ये आहेत- उदा. नियोजन, नियंत्रण, निर्णयक्षमता आदी  उत्पादन व्यवस्थापनात कशा पद्धतीने वापरता येतात, उत्पादन व्यवस्थापनातील नवीन विचार कोणते आहेत या सर्व तसेच इतर अनेक गोष्टींचा विचार केला जातो. त्यामुळे उत्पादन प्रक्रियेपेक्षा हा विषय वेगळा असून यामध्ये संपूर्ण उत्पादन प्रक्रियेच्या व्यवस्थापनाचा विचार केला जातो.
या स्पेशलायझेशनमधील वेगवेगळ्या उपघटकांचा विचार केल्यास असे दिसते की, यामध्ये अनेक महत्त्वाच्या विषयांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये उत्पादन व्यवस्थापन हा विषय तर आहेच,  त्याशिवाय वस्तूंच्या/ उत्पादनाच्या साठय़ाचे व्यवस्थापन (इन्वेंटरी मॅनेजमेंट) तसेच उत्पादकता व्यवस्थापन, यंत्रसामग्रीच्या देखभालीचे व्यवस्थापन (मेंटेनन्स मॅनेजमेंट) उत्पदनासाठीच्या इतर बाबींचे व्यवस्थापन व नियोजन (युटिलिटी मॅनेजमेंट), सिक्स सिग्मा, पुरवठा साखळी व्यवस्थापन (सप्लाय चेन मॅनेजमेंट), टोटल क्वालिटी मॅनेजमेंट, जागतिक दर्जाचे उत्पादन, लीन मॅन्युफॅक्चुरिंग, बिझनेस प्रोसेस रिइंजिनीअरिंग, ईआरपी (एन्टरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग), उत्पादन प्रक्रिया व व्यवस्थापन यासाठी आवश्यक असे वित्तीय व्यवस्थापन अशा उपघटकांचा समावेश होतो. आपण ज्या वेळी उत्पादन व्यवस्थापन म्हणतो त्या वेळी फक्त कारखान्यांतील उत्पादनाचाच विचार केला जाता, पण ज्या वेळी ऑपरेशन्स मॅनेजमेंट म्हटले जाते त्या वेळी फक्त उत्पादन व्यवस्थापन असा मयादित अर्थ न राहता सेवा क्षेत्रातील वेगवेगळ्या कामांचे व्यवस्थापन कसे केले जाते, हेदेखील समाविष्ट केले जाते. म्हणून ज्या विद्यापीठांमध्ये ‘ऑपरेशन्स मॅनेजमेंट’ असे विषयाचे नाव आहे, त्या ठिकाणी सेवा क्षेत्रातील  वेगवेगळ्या कामांचे व्यवस्थापन (सव्‍‌र्हिस ऑपरेशन्स मॅनेजमेंट) या विषयाचासुद्धा समावेश होतो.
वरील सर्व विवेचनांवरून लक्षात येते की, या विषयामध्ये उत्पादनविषयक वेगवेगळ्या कामांचे व्यवस्थापन कसे करावे याचा प्रामुख्याने विचार केलेला आहे. कारखान्यातील उत्पादन प्रक्रिया सुरळीत कशी सुरू राहील, त्यात अडथळे कसे येणार नाहीत, उत्पादनाचे नियोजन कशा पद्धतीने करावे यासंबंधीची माहिती व त्यासाठी लागणारी विविध तंत्रे यांचा या विषयात समावेश असतो. हीच संकल्पना सेवा क्षेत्रासाठी वापरली तरी सेवा क्षेत्रात, उदा. बँका, वाहतूक संस्था इत्यादींचे दैनंदिन कामकाज सुरळीत कसे चालेल यासंबंधीचा अभ्यास करता येतो.
उत्पादनाचे काम करताना गरजेपेक्षा जास्त उत्पादन होणार नाही याची जशी काळजी घेतली जाते, तशीच काळजी गरजेपेक्षा उत्पादन कमी होणार नाही याचीही घेतली जाते. यासाठी आवश्यक असतो तो वस्तूंच्या मागणीचा अचूक अंदाज (डिमांड फोरकास्ट). वस्तूंच्या मागणीचे अंदाज कसे बांधावेत यासंबंधीच्या काही पद्धती आहेत. या पद्धतींचा अभ्यास या विषयात समाविष्ट आहे. पाठय़पुस्तके तसेच संदर्भग्रंथांमध्ये मागणीचा अंदाज कसा करावा याच्या पद्धती दिलेल्या असतातच, पण या पद्धतींचा वापर करून मागणीचा अंदाज कसा बांधावा हे आपण प्रत्यक्ष व्यवहारात करू शकतो. कोणत्याही वस्तूच्या उदा. टीव्ही संचाच्या मागणीचा अंदाज बांधून त्याची प्रत्यक्षात मागणी किती होती हे बघता येते. म्हणजेच प्रत्यक्षातील मागणी आणि मागणीचा अंदाज यामध्ये किती फरक पडला हे पाहता येते. यासाठी टीव्हीच नव्हे तर इतर वस्तूही घेता येतात. आपल्या घराजवळच्या एखाद्या शोरूममध्ये जाऊन या गोष्टी पाहता येतात.
उत्पादन व्यवस्थापनातील इतर विषय उदा. सप्लाय चेन मॅनेजमेंट, इन्व्हेंटरी मॅनेजमेंट तसेच क्वालिटी मॅनेजमेंट इत्यादी विषयांच्या माहितीसाठी उत्पादन क्षेत्रातील कंपन्यांना प्रत्यक्ष भेट देणे श्रेयस्कर ठरते. मात्र अशा भेटींचेही नियोजन करायला हवे. भेटीचा उद्देश काय, ते करताना आपण कुठल्या गोष्टी लक्षात घेणार अशा गोष्टींचे नियोजन करून त्याप्रमाणे भेट  दिल्यास भेटीचा हेतू साध्य होतो. जागतिक दर्जाचे उत्पादन, लीन मॅन्युफॅ क्चरिंग या संकल्पनांचा अर्थ आणि या संकल्पना कशा पद्धतीने अंमलबजावणी केल्या जातात हे पाहणे गरजेचे आहे.
उत्पादन क्षेत्रातील कंपन्यांना भेट देणे आवश्यक ठरते. यामध्ये बँका, विमा कंपन्या, मोठय़ा कंपन्यांची सेवा केंद्रे, वित्तीय कंपन्या इत्यादी अनेक कंपन्यांचा  समावेश होतो. या भेटींतून कंपन्यांची कार्यपद्धती आणि प्रत्यक्षात सेवा कशा दिल्या जातात (सव्‍‌र्हिस डिलिव्हरी) याचा अभ्यास करता येतो. सेवा क्षेत्रामध्ये वस्तूंचे नियंत्रण व व्यवस्थापन  कसे केले जाते याचाही अभ्यास करता येतो.
उत्पादन क्षेत्रातील आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे इंटरप्राइज रिसरेसेस प्लॅनिंग (ईआरपी) आणि बिझनेस प्रोसेस इंजिनीअरिंग. या दोन्ही विषयांचा उपयोग उत्पादन क्षेत्रात आणि सेवा क्षेत्रात कसा होतो याचा अभ्यास करणे आवश्यक ठरते.
वरील विवेचनावरून लक्षात येईल की, उत्पादन व्यवस्थापन किंवा इतर कोणत्याही विषयाचा अभ्यास करताना पुस्तकांबरोबरच प्रत्यक्ष व्यवहारातील या तंत्रांचा वापर समजून घेणे गरजेचे आहे, म्हणजेच विषयाची उपयोजित बाजू समजायला हवी.
याखेरीज असेही सुचवावेसे वाटते की, दर महिन्याला केंद्र सरकारतर्फे औद्योगिक उत्पादनाच्या वाढीचा दर किती होता हे प्रसिद्ध केले जाते. याला औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक (ककढ) असे म्हटले जाते. याचप्रमाणे सेवा क्षेत्रातील वाढीचा दरसुद्धा जाहीर केला जातो. हे निर्देशांक कसे काढले जातात व यावरून उत्पादन क्षेत्रातील स्थिती कशी समजते याचाही अभ्यास करता येईल.
सारांश, शिकण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत, मात्र त्यासाठी आपल्याकडे जिद्द व वेळेचे व्यवस्थापन करण्याची कला असायला हवी.
nmvechalekar@yahoo.co.in
(लेखक पुण्याच्या इंडसर्च संस्थेचे अधिष्ठाता आहेत.)
First Published on October 19, 2015 1:08 am
Web Title: mba production management

प्रत्यक्ष मुलाखत मुलाखत कक्षात प्रवेश केल्यानंतरच्या सुरुवातीच्या दोन-चार मिनिटांतील तुमच्या हालचालींवरून, हावभावातून, तुमच्या देहबोलीतून मुलाखत मंडळाला

प्रत्यक्ष मुलाखत

मुलाखत कक्षात प्रवेश केल्यानंतरच्या सुरुवातीच्या दोन-चार मिनिटांतील तुमच्या हालचालींवरून, हावभावातून, तुमच्या देहबोलीतून मुलाखत मंडळाला

फारूक नाईकवाडे | October 18, 2015 13:11 pm

मुलाखत कक्षात प्रवेश केल्यानंतरच्या सुरुवातीच्या दोन-चार मिनिटांतील तुमच्या हालचालींवरून, हावभावातून, तुमच्या देहबोलीतून मुलाखत मंडळाला तुमच्या मन:स्थितीविषयीचा पूर्ण अंदाज आलेला असतो. तुम्ही तणावात आहात, तुमच्यात आत्मविश्वास आहे, तुम्ही शांत आहात की घाबरलेल्या- गोंधळलेल्या मन:स्थितीत आहात याचा संदेश तुमच्या देहबोलीद्वारे समोरच्या मंडळींपर्यंत पोहोचत असतो.
केंद्र आणि राज्य लोकसेवा आयोगाच्या विविध परीक्षांतील मुलाखतींना सामोरे गेलेल्या आमच्या अनेक विद्यार्थ्यांचा अनुभव असा आहे की, उमेदवार घाबरलेला किंवा तणावात दिसला की मुलाखत मंडळ उमेदवाराला सहकार्य करते. ‘तुम्ही शांतपणे आणि आरामात बसा. घाबरू नका. चहा, कॉफी, किंवा थंड पाणी घ्याल का?’ असे उमेदवाराला विचारले जाते. सुरुवातीपासूनच त्याच्यावर प्रश्नांचा भडिमार न करता, उमेदवाराला रिलॅक्स करण्यासाठी नाव, गाव, शैक्षणिक पात्रता अशा वैयक्तिक माहितीवर आधारित साध्या, सोप्या प्रश्नांपासून मुलाखतीला सुरुवात होते. मुलाखत मंडळाकडून चहा किंवा पाण्याची ऑफर झालीच तर सकारात्मकपणे स्वीकारावी. अशा वेळी पाणी हळूहळू घोट- घोट प्यावे.  घाईघाईत घटाघट संपवण्याचा प्रयत्न करू नये. मात्र मंडळासमोर बसून चहा/कॉफी घेताना अवघडलेपणा येईल असे वाटत असेल तर नम्रपणे ऑफर नाकारली तरीही हरकत नाही. कधी कधी मुलाखतीची १०-१५ मिनिटे झाल्यानंतर उमेदवाराला तहान लागू शकते. अशा वेळी सरळ समोरचा ग्लास उचलून पाणी प्यायला सुरुवात करू नये. मुलाखत मंडळाची ‘सर, मी पाणी पिऊ शकतो का / शकते का?’ अशा शब्दांत परवानगी घ्यावी. परवानगी मिळाल्यावर त्यांना धन्यवाद देऊन पाणी घ्यावे.
मुलाखत मंडळाकडून विचारले जाणारे प्रश्न लक्षपूर्वक ऐकावेत. प्रश्न विचारणाऱ्या सदस्याकडे पाहून उत्तर द्यावे. एखादा प्रश्न विचारला जात असताना पूर्णपणे ऐकून न घेता, मध्येच बोलू नये. पूर्ण प्रश्न ऐकल्यानंतरच उत्तराला सुरुवात करावी. सहमतीदर्शक प्रश्न विचारला गेल्यास, ‘होय सर! मी या मताशी सहमत आहे’ किंवा असहमती दर्शविताना नम्रपणे आपली असहमती नोंदवावी. लक्षात ठेवा, मुलाखतीतील प्रश्नांची उत्तरे चूक किंवा बरोबर अशी नसतात. तेव्हा प्रामाणिकपणे व पारदर्शीपणे उत्तर द्यावे. तुमची उत्तरे व्यवहार्य व तुमची स्वत:ची असावीत. त्यातून फाजील आत्मविश्वास दिसता कामा नये. उत्तरात धीटपणा असावा, पण अहंभाव किंवा अविचार असू नये.
विचारलेला प्रश्न नीट कळला नसेल तर नम्रपणे तसे सांगून अधिक तपशील विचारावा. असे केल्याने तुमचे मार्क्‍स कमी होत नाहीत, उलट तुमचा प्रामाणिकपणा दिसून येतो. कधी कधी विचारलेल्या प्रश्नाचे नेमके उत्तर उमेदवाराला ठाऊक नसते. अशा वेळी प्रश्नार्थक चेहऱ्याने हात हातावर चोळणे, वर पाहणे, डोके खाजवणे अशा कोणत्याही नकारात्मक भावमुद्रेचे प्रदर्शन करू नये. माहीत नसलेल्या उत्तराविषयी नम्रतापूर्वक  मला याबाबत फारशी माहिती नाही, असे सांगावे.
आपण अनभिज्ञ असलेल्या विषयावर तर्क बांधून, ओढूनताणून उत्तर देण्याचा प्रयत्न अजिबात करू नये. त्याऐवजी ‘मला याविषयी माहीत नाही,’ हे प्रांजळपणे कबूल केलेले उत्तम. कोणताही उमेदवार सर्वज्ञ नसतो, हे मुलाखत मंडळाला ठाऊक असते. त्यामुळे पारदर्शी असण्यातून उमेदवाराचा स्पष्टपणा व लवचीकता दिसून येते.
मुलाखत जशी ज्ञानाची परीक्षा आहे तशी तुमच्या व्यक्तिमत्त्वाचीही परीक्षा आहे. चांगल्या उत्तराची स्तुती किंवा उत्तर न देता येणारी स्थिती तुम्ही कशी हाताळता, कशा पद्धतीने सामोरे जाता, ही तुमच्या व्यक्तिमत्त्वाची परीक्षा आहे. मुलाखत मंडळाकडून तुमच्या दृष्टीने चांगल्या असलेल्या उत्तराबाबत प्रतिक्रियेची अपेक्षा करू नका. तुमच्या चांगल्या-वाईट कुठल्याही उत्तराबाबतची तुमची मन:स्थिती तुमच्या देहबोलीतून सामोरी येऊ देऊ नका.
मुलाखतीदरम्यान आपल्या कामगिरीबाबत विचार करायला सुरुवात करू नये.  मुलाखत सुरू असतानाच, तुमच्या दृष्टीने चांगली कामगिरी झाली असेल तर चांगले गुण मिळणार किंवा तुमच्या दृष्टीने वाईट कामगिरी झाली असेल तर कमी गुण मिळणार अशा विचारांमध्ये गुरफटून गेल्यास अशा विचारांचा आपल्याही नकळत आपल्या देहबोलीवर परिणाम होत असतो.
केंद्रीय लोकसेवा आयोगाची मुलाखत सर्वसाधारणपणे २५ ते ३५ मिनिटे तर राज्य लोकसेवा आयोगाची मुलाखत २० ते ३० मिनिटे चालते. उमेदवाराच्या कामगिरीनुसार हा वेळ वाढतो किंवा कमीसुद्धा होऊ शकतो. अशा वेळी संयम ठेवावा. मनगटावरील घडय़ाळात वेळ पाहण्यासारखा आततायीपणा तर अजिबात करू नये.
मुलाखत पूर्ण झाल्यानंतर उमेदवार कक्षाबाहेर येण्याची वेळ येते. पण अशा वेळी मुलाखत मंडळाने उमेदवाराला ‘मुलाखत संपली, तुम्ही आता बाहेर जाऊ शकता,’ असे सांगितल्याशिवाय उमेदवाराने आपल्या आसनावरून उठू नये किंवा समोर ठेवलेली कागदपत्रांची फाइल आवरायला घेऊ नये. मुलाखत मंडळाकडून सांगितल्यानंतर शांतपणे, कागदपत्रांचा जास्त आवाज न होऊ देता फाइल घ्यावी व सहजतेने आसन सोडावे. खुर्चीवरून उठल्यानंतर खुर्ची पूर्ववत ठेवावी. व्यवस्थित उभे राहून मुलाखत मंडळाचे अध्यक्ष व सदस्यांना प्रसन्नतापूर्वक अभिवादन करावे. धन्यवाद / थँक यू म्हणायला विसरू नये. मुलाखत कक्षातून बाहेर येताना चालण्याचा, दरवाजा उघडण्याचा आवाज येणार नाही याची काळजी घ्यावी. बाहेर पडताना मागे वळून सदस्यांकडे पाहणे टाळावे. असे बारीकसारीक वर्तणुकीचे संकेत पाळले की मुलाखतीचा अनुभव चांगलाच ठरतो.
First Published on October 19, 2015 1:07 am
Web Title: mpsc interview

शिका इंग्रजी! विषयाची आवड निर्माण होण्यासाठी आणि भाषेचा पाया पक्का होण्यासाठी जर एखादी इंटरअ‍ॅक्टिव्ह साइट मिळाली मनाली रानडे | October 18, 2015 01:25 am

शिका इंग्रजी!

विषयाची आवड निर्माण होण्यासाठी आणि भाषेचा पाया पक्का होण्यासाठी जर एखादी इंटरअ‍ॅक्टिव्ह साइट मिळाली

येथे काही ट्रिकी वर्डस्चे खेळ आहेत. ‘वर्ड शेक’हा गेम- ज्यात काही अक्षरे तुम्हाला स्क्रीनवर दिसतात.

इंग्रजी विषयाची आवड निर्माण होण्यासाठी आणि भाषेचा पाया पक्का होण्यासाठी जर एखादी इंटरअ‍ॅक्टिव्ह साइट मिळाली, तर तुम्हाला हसत खेळत अभ्यास करायला मजा येईल ना? ब्रिटिश कौन्सिलच्या http://learnenglishkids.britishcouncil.org/en/ या साइटवर असे अनेक खेळ आणि कोडी तुमच्यासाठी उपलब्ध आहेत. उदाहरणादाखल आपण त्यातील काही पाहू या. घरातील खोली किंवा शाळेतील वर्ग याचे चित्र दाखवून त्यात दिसणाऱ्या वस्तूंची इंग्रजी नावे तुम्हाला ओळखायची आहेत. ड्रॅग आणि ड्रॉप पद्धतीने त्यांच्या जोडय़ा लावायच्या आहेत.
दुसऱ्या खेळात वाक्यातील शब्दांची सरमिसळ करून दिलेली असते. ते शब्द वाचून आपण त्यांचा योग्य क्रम लावून अर्थपूर्ण वाक्य बनवायचे असते. येथे ‘वर्डसर्च’ची अनेक कोडी आहेत. हे शब्द शोधण्यासाठी सूचक अर्थ दिलेले असतात. उदाहरणार्थ  A Person who checks your teeth   या सूचक अर्थासाठी Dentist हा शब्द शोधायचा आहे.
येथे काही ट्रिकी वर्डस्चे खेळ आहेत. ‘वर्ड शेक’हा गेम- ज्यात काही अक्षरे तुम्हाला स्क्रीनवर दिसतात. ज्या अक्षरांचा उपयोग करून तुम्हाला जास्तीत जास्त अर्थपूर्ण शब्द बनवायचे असतात. मेसेज एनकोडर या गेममध्ये प्रत्येक इंग्रजी अक्षराला एक चित्र दिलेले आहे. त्या चित्रांचा उपयोग करून काही इंग्रजी वाक्ये लिहिलेली आहेत. ते इंग्रजी वाक्य काय आहे ते तुम्हाला ओळखायचे असते.
तसेच येथे व्याकरणाचा पाया पक्का करून घेणारे खेळही आहेत. उदाहरणार्थ साधा व चालू वर्तमानकाळ या विषयावर दोन प्रकारचे खेळ खेळता येतील. एका खेळात तुम्हाला एखाद्या वाक्यातील सर्व शब्द कुठल्याही क्रमाने दिलेले असतात. जास्तीत जास्त वेगात शब्दांची जुळवणी करून ते अर्थपूर्ण बनवायचे असते. तर दुसरा खेळ हा गाळलेल्या जागा भरण्याचा आहे. ज्यामध्ये तुम्हाला योग्य क्रियापद निवडायचे आहे.
अशा प्रकारचे खेळ आणि कोडय़ांच्या साहाय्याने इंग्रजी विषयाशी तुम्हाला गट्टी करता येईल.
-मनाली रानडे
manaliranade84@gmail.com


First Published on October 18, 2015 1:25 am
Web Title: manali ranade luen to english
टॅग: Manali-ranade

प्रेरक शब्दचित्रे ! गात काही महान व्यक्तिमत्त्वं अशी असतात, जी कल्पनेपलीकडचं काम करून जातात.

प्रेरक शब्दचित्रे !

गात काही महान व्यक्तिमत्त्वं अशी असतात, जी कल्पनेपलीकडचं काम करून जातात.प्रेरक शब्दचित्रे ! गात काही महान व्यक्तिमत्त्वं अशी असतात, जी कल्पनेपलीकडचं काम करून जातात.

वर्षां गायकवाड | October 18, 2015 01:08 am

एका सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेल्या मुलाचा जगप्रसिद्ध गणितज्ञ म्हणून नावारूपाला येईपर्यंतचा प्रवास कसा झाला,

गात काही महान व्यक्तिमत्त्वं अशी असतात, जी कल्पनेपलीकडचं काम करून जातात. अशा अनवट वाटेवरच्या व्यक्तिमत्त्वांमुळे समाज बदलतो, पुढे जातो, समाजाची प्रगती होते. या महान व्यक्तींच्या कार्यामागची प्रेरणा काय होती, त्यांचं आयुष्य कसं घडलं, येणाऱ्या संकटांचा आणि परिस्थितीचा त्यांनी कसा सामना केला, याचं यथार्थ वर्णन करणारी आणि प्रत्येकापुढेच एक आदर्श उभी करणारी पुस्तकरूपी मालिका म्हणजे भन्नाट माणसं! या मालिकेतली ‘गणित विश्वातील अढळ तारा : श्रीनिवास रामानुजन’ आणि ‘गुलामगिरीमुक्त देशाचं स्वप्न पाहणारा राष्ट्राध्यक्ष : अब्राहम लिंकन’ या दोन अवलियांच्या चरित्राचा परिचय करून घेऊ  या.
गणितविश्वातील अढळ तारा :
श्रीनिवास रामानुजन
एका सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेल्या मुलाचा जगप्रसिद्ध गणितज्ञ म्हणून नावारूपाला येईपर्यंतचा प्रवास कसा झाला, याचं सचित्र वर्णन म्हणजे कीर्ती परचुरेलिखित ‘श्रीनिवास रामानुजन’ हे पुस्तक. गणिताची आवड, अभ्यासाची जिद्द, स्वत:च्या कामावर असणारा विश्वास, संपूर्ण जगात मान्यता मिळवण्यासाठीचा संघर्ष आणि शेवटच्या श्वासापर्यंत कायम राहिलेल्या गणिताच्या अनोख्या प्रतिभेचं दर्शन या पुस्तकातून होतं.
रामानुजन यांचा जन्म मद्रास, म्हणजेच आताच्या चेन्नईतल्या इरोड या छोटय़ाशा गावात गरीब ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांच्या घरची परिस्थिती तशी हलाखीचीच होती. अभ्यासाचं वेड असल्यामुळे ते शाळेत अनेकदा एकाकी पडायचे, पण त्यांची बुद्धी अत्यंत चौकस होती. ‘कुठल्याही संख्येला त्याच संख्येने भागलं, तर उत्तर एक येतं’ या शिक्षकांच्या म्हणण्यावर ‘शून्याला शून्याने भागलं, तरी उत्तर एक येतं का?’ या रामानुजनच्या प्रश्नाने त्यांचं सगळं आयुष्यच बदलून टाकलं. शाळेत असताना गणिताचं वेड लागल्यानंतरच जणू त्यांच्या संशोधनाला सुरुवात झाली होती. अगदी कमी वयात त्यांनी गणितातली अनेक नवीन प्रमेयं मांडली, वेगवेगळे शोध लावले. मात्र, त्या काळात एकूणच माहितीच्या देवाणघेवाणीचा आवाका कमी असल्यामुळे त्यांच्या आयुष्यातला बराचसा काळ पूर्वीच लागलेले अनेक शोध लावण्यात गेला. सतत गणिताचा अभ्यास करण्याच्या नादात इतर विषयांकडे त्यांचं दुर्लक्ष होत गेलं. त्यामुळे पुढे परत परीक्षेला बसण्याचा प्रयत्न त्यांनी सोडून दिला. हातात पदवी नसल्यामुळे काही र्वष त्यांचा निश्चित असा कोणताच व्यवसाय नव्हता; पण त्यांनी त्यांचं गणितातलं स्वतंत्र संशोधन चालू ठेवलं. त्यांच्या संशोधनात रस घेणाऱ्या काही मित्रांनी प्रोत्साहन दिल्याने रामानुजन यांनी केंब्रिजमधले गणिताचे प्राध्यापक सर गॉडफ्रे हेरॉल्ड हार्डी यांच्याशी पत्रव्यवहार सुरू केला. या पत्रात त्यांनी स्वत: शोधलेल्या शंभराहून अधिक प्रमेयांसंबंधी लिहिलं. त्यामुळे हार्डी प्रभावित झाले आणि त्यांनी रामानुजनना केंब्रिजला येण्याचं निमंत्रण दिलं.  समुद्र ओलांडून परदेशात जाणं, हे महापाप समजलं जायचं. त्यामुळे रामानुजन यांनी परदेशात जाणं नाकारलं, पण पुढे हार्डी यांचे सहकारी ई. एच. नेव्हिल यांच्या प्रयत्नांमुळे रामानुजन इंग्लंडला जायला तयार झाले आणि त्यांना १९१४मध्ये केंब्रिजमधल्या ट्रिनिटी कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. हार्डी आणि जे. ई. लिटलवुड यांच्याशी सतत होणाऱ्या चर्चामुळे  रामानुजन यांच्या संशोधनाची गती आणखी वाढली. वेगवेगळ्या नियतकालिकांत त्यांचं संशोधन प्रसिद्ध व्हायला लागलं. शेवटी संशोधनाच्या आधारावर त्यांनी केंब्रिज विद्यापीठाची पदवीसुद्धा मिळवली.  गणितात जोमाने काम करण्यासाठी त्यांना नवी ऊर्जा, नवी प्रेरणा इथे मिळाली, मात्र अडचणींनी इथेही त्यांची पाठ सोडली नाही. त्यांची कारकीर्द बहरत असतानाच आजारपणामुळे त्यांच्या प्रगतीला खीळ बसली. १९१८मध्ये रॉयल सोसायटीचे सदस्य आणि ट्रिनिटी कॉलेजचे फेलो म्हणून त्यांची सन्मानपूर्वक निवड झाली. प्रकृती सुधारल्यावर १९१९मध्ये ते भारतात परत आले. मद्रास विद्यापीठाने त्यांना दर वर्षी १५० पौंड याप्रमाणे पाच वर्षांसाठी शिष्यवृत्ती मंजूर केली; पण हळूहळू त्यांच्या आजाराने भीषण रूप घेतल्याने ते फार काळ जगले नाहीत, पण अक्षरश: शेवटच्या श्वासापर्यंत ते गणितातल्या संशोधनात मग्न होते.
गणितविश्वातील ‘अढळ तारा’ हे पुस्तकाचं शीर्षक रामानुजन यांच्यासाठी अगदी समर्पक आहे. त्यांचं कार्य, कामाप्रति त्यांची निष्ठा, त्यासाठी त्यांनी केलेला अथक संघर्ष, त्यांच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या घटना, त्यांना साथ देणाऱ्या व्यक्ती यांचं जणू काही गोष्टीरूप वर्णन करण्याचा प्रयत्न लेखिकेने केल्यामुळे रामानुजन हे व्यक्तिमत्त्व प्रत्येक वाचकाच्या मनात ठसा उमटवेल, यात शंका नाही.
‘अब्राहम लिंकन : गुलामगिरीमुक्त देशाचं स्वप्न पाहणारा राष्ट्राध्यक्ष’
अब्राहम लिंकन यांचं नाव इतिहासात अजरामर आहे. गुलामगिरीच्या विळख्यातून अमेरिकी जनतेला मुक्त करणाऱ्या या अवलियाचा लढा जितका प्रखर, तितकाच प्रेरणादायीसुद्धा आहे. डॉ. जान्हवी बिदनूरलिखित ‘अब्राहम लिंकन : गुलामगिरीमुक्त देशाचं स्वप्न पाहणारा राष्ट्राध्यक्ष’ या पुस्तकात अब्राहम लिंकन यांचा हा प्रवास अत्यंत मार्मिक शब्दांत मांडला आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हेसुद्धा कृष्णवर्णीय आहेत. एके काळी नाकारला जाणारा हा वर्ग आज जगावर स्वकर्तृत्वाने आपला ठसा उमटवतो आहे. ही काही एका रात्रीतून घडून आलेली गोष्ट नाही. त्यासाठी इतिहासात डोकावून पाहिलं तर लक्षात येतं की, अठराव्या शतकात अमेरिका फाळणीच्या उंबरठय़ावर असताना झालेला लढा आणि त्याहूनही भयंकर प्रश्न म्हणजे, गुलामगिरीच्या विळख्यात अडकलेल्या अमेरिकेला बाहेर काढणं या जवळजवळ अशक्यप्राय गोष्टी लिंकन यांनी स्वत:च्या अथक परिश्रमाने शक्य करून दाखवल्या. या प्रश्नाच्या मुळाशी मुख्यत: गुलामगिरीची प्रथा आणि त्याआधी असलेला वसाहतवाद होता. प्रदीर्घ लढय़ानंतर वसाहतवादातून हा देशमुक्त झाला आणि या नव्या राष्ट्राचा विस्तार अटलांटिक ते मिझुरी असा पश्चिम-पूर्व आणि उत्तरेकडच्या सरोवरांपासून दक्षिणेकडे फ्लोरिडापर्यंत झाला; पण एवढं सगळं होऊनही इथे मध्यवर्ती सत्ता नव्हती. तसंच स्वातंत्र्ययुद्ध संपल्यानंतर वायव्येकडचा नवीन प्रदेश अमेरिकेच्या ताब्यात आला. ‘गुलामगिरी नसावी’ हा एक प्रमुख विचार या प्रदेशात होता. अब्राहम लिंकन यांचे वडील सारखे पश्चिमेकडे याच प्रदेशात सरकत होते. अब्राहम यांच्या मनात गुलामगिरीविरोधात रुजलेल्या तीव्र भावनेची पाळंमुळं याच पाश्र्वभूमीत असू शकतात.
या एकाच राष्ट्रात काही राज्यं गुलामगिरीचं समर्थन करणारी होती, तर काही राज्यं गुलामगिरीचा विरोध करणारी होती. या दुफळीने दारुण रूप धारण करू नये म्हणून अमेरिकेतल्या राज्यकर्त्यांना तारेवरची कसरत करावी लागली. म्हणूनच लिंकनच्या राष्ट्राध्यक्षपदाचा काळ हा संयुक्त राष्ट्रसंघाच्या परीक्षेचा आणि त्याच वेळी त्यांच्या कर्तृत्वाला जगासमोर आणणारा काळ ठरला. या दुफळीमुळे गुलामगिरीचं समर्थन करणाऱ्या राज्यांनी युद्ध पुकारलं आणि राष्ट्राध्यक्षाला (अब्राहम लिंकन यांना) शह म्हणून स्वत:चा स्वतंत्र राष्ट्राध्यक्ष निवडला; पण या युद्धाला लिंकन यांनी अतिशय चोख उत्तर दिलं. अब्राहम दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आल्यावर त्यांनी गोऱ्या लोकांसोबतच काळ्या लोकांनाही मतदानाचा हक्क देऊ  करून वंशभेदावर मुळापासून घाव घातला. त्यांच्या या कर्तृत्वामुळेच त्यांना ‘अमेरिकेची फाळणी टाळणारा महानायक’ म्हणून ओळखलं जातं.
मुलांच्या व्यक्तिमत्त्वाला योग्य आकार आणि दिशा मिळावी, हा उद्देश नजरेसमोर ठेवून  डायमंड पब्लिकेशन्सने तयार केलेली ही मालिका आणि त्यातली ही पुस्तकं नक्कीच प्रेरक ठरतील.
‘श्रीनिवास रामानुजन’ – कीर्ती परचुरे
पृष्ठे- १३०, मूल्य- १०० रुपये
‘अब्राहम लिंकन’- – जान्हवी बिदनूर
दोन्ही पुस्तकांचे प्रकाशक- कनक बुक्स,
डायमंड पब्लिकेशन्स, पुणे
पृष्ठे- ८४, किंमत-८० रुपये  ल्ल
First Published on October 18, 2015 1:08 am
Web Title: varsha article on abraham lincoln book

मतकरींची उदारमनस्क व्यक्तिचित्रे एकूण २० व्यक्तींविषयी रत्नाकर मतकरी यांनी लिहिलेल्या लेखांचे संकलन या पुस्तकामध्ये आहे.

मतकरींची उदारमनस्क व्यक्तिचित्रे

एकूण २० व्यक्तींविषयी रत्नाकर मतकरी यांनी लिहिलेल्या लेखांचे संकलन या पुस्तकामध्ये आहे.

  माधव वझे | October 18, 2015 01:12 am

मतकरी यांनी प्रसंगाप्रसंगाने हे लेख लिहिले आहेत. कधी आनंद व्यक्त करण्यासाठी, कधी दु:खात सहभागी होण्यासाठी.

दराच्या आणि प्रेमाच्या भावनेने एकूण २० व्यक्तींविषयी रत्नाकर मतकरी यांनी लिहिलेल्या लेखांचे संकलन या पुस्तकामध्ये आहे. १९७४ ते २०१४ या कालावधीत लिहिलेले आणि प्रकाशित झालेले हे लेख आहेत. ‘आकाशातील ताऱ्यांकडे आपण नेहमी पाहतो आणि त्यांचे आपले एक नाते तयार होते. या संग्रहातील व्यक्तींशी माझे असे नाते जडलेले आहे, त्या त्या व्यक्तीच्या थोरपणाचे विश्लेषण जसे आपण केले आहे, त्याप्रमाणे त्या व्यक्तींच्या दोषांविषयी लिहिण्याचे आपण टाळलेले नाही,’ असे मतकरी यांनी त्यांच्या मनोगतात म्हटले आहे.
रत्नाकर मतकरी नाटककार, कथालेखक आणि चित्रकार म्हणून प्रसिद्ध आहेत. साहजिकच ‘सादर सप्रेम’ मध्ये नट-नटी, नाटककार, नाटय़-चित्रपट दिग्दर्शक, नाटय़ समीक्षक, चित्रकार यांच्याविषयीचे लेख संख्येने अधिक आहेत आणि त्यांच्या थोरवीबद्दल त्यांनी भरभरून लिहिले आहे. आपल्या शालेय आणि महाविद्यालयीन दिवसातल्या मित्रांच्या मोठेपणाची त्यांनी आठवण काढली आहे, त्याचबरोबर कौटुंबिक परिवारातल्या काही व्यक्तीही इथे आपल्याला दिसतात.
‘दिसतात’ असे म्हटले ते खरेच आहे. आठवणींना उजाळा देता देता त्या त्या माणसांचे रंग-रूप, त्यांची जडणघडण, त्यांची स्वभाववैशिष्टय़े यांची मतकरी अगदी सहजपणे पखरण करीत जातात. त्याचे एक कारण असे आहे, की मतकरी जसे उत्तम चित्रकार आहेत, त्याचबरोबर एक सुरेख रचना कौशल्य त्यांच्यापाशी आहे; आणि याचा प्रत्यय हे पुस्तक वाचताना पानोपानी येतो. उदाहरणार्थ, स्नेहप्रभा प्रधान यांचा ‘ठेंगणा बांधा, रुसलेल्या लहान मुलीसारखा चेहरा, डोळ्याभोवती काळी वलयं पण ओठ मात्र कोवळे वाटणारे’ किंवा, ‘पांढुरका टेरिकॉट झब्बा आणि तशीच सुरवार, गृहस्थ असा दणकट, उंचच उंच, आणि वर्णानं शिसवी-अस्सल धनगर’ असे विठ्ठल उमप या लोक कलाकाराचे आलेले वर्णन. आणि मग नंदकुमार रावते यांच्याबद्दल त्यांचे हे नेमक्या शब्दांत व्यक्त झालेले निरीक्षण- ‘ मी त्यांना चिडलेले पाहिले आहे पण भांडताना नाही’, ‘मजेत जगावे अशी परिस्थिती नसली तरी तसे जगण्याची तिची शैली आहे’ अशा आशयाचे एखादेही वाक्य डॉ. अनिता पाटील देशमुख यांच्या व्यक्तिमत्त्वाची  साद्यंत ओळख करू देते. हे पुस्तक म्हणजे व्यक्तिचित्रे नाहीत, असे मतकरी यांनी मनोगतात म्हटले असले, तरी  त्यांच्या बहुविध आठवणींमधून ती त्यांच्या लेखनामध्ये अलगद उतरली आहेत.
नाटककाराचे नाटक रंगमंचावर यावे म्हणून नाटय़ संस्थांना नाटकांची आवर्जून शिफारस करणारे नट-दिग्दर्शक दामू केंकरे, नाटय़ प्रयोगात अनेक मार्गानी चतन्य भरणारी, नाटय़ संहितांचे अप्रतिम संकलन करणारी विजया (मेहता), दुसऱ्यांना ज्ञानापासून वस्तूंपर्यंत सारे काही वाटत राहण्याच्या वृत्तीचे (मतकरी यांचे सासरे) माधव मनोहर, नवजात अर्भकांच्या आजारपणाचा खास अभ्यास केलेली, भित्र्या व सोशिक स्वभावाची, आणि आपली सुख-दुखे लपवण्याचा प्रयत्न करीत जगलेली डॉ. अनिता पाटील देशमुख, ‘पुण्यप्रभाव’ नाटकात ‘वृन्दावन’ची भूमिका करून, ‘दुष्टतेमध्ये एक सौंदर्य असते आणि पापालाही स्वत:चा डौल असतो’ असा साक्षात्कार घडविणारे नटश्रेष्ठ नानासाहेब फाटक, शिक्षणमंत्री पदावरून अगदी     सहज पायउतार होऊन, शिक्षण क्षेत्रातच रमलेले आणि नजरेत भरावे असे कार्य केलेले गोपाळराव मयेकर, खानदानीपणाचे कायदे मोडून ‘शकुंतला’ या चित्रपटाच्या निमित्ताने एक संस्कृत काव्य घरोघर पोहोचविणारे व्ही. शांताराम, दिशा न सोडता, कुठल्याही मोहाला बळी न पडता एका रोखाने प्रवास करीत राहिलेली दुर्मीळ सामाजिक कार्यकर्ती मेधा पाटकर, जन्मत:च माळावरचा आवाज घेऊन आलेले आणि अंगोपांगात लोककला भिनलेले विठ्ठल उमप, किशोरी आमोणकरांचे यजमान, पण त्यांच्या लोकप्रियतेविषयी आकस नसणारे आणि कुठलाच फायदा न घेणारे किंवा उदासीनताही न दाखविणारे रवींद्र आमोणकर, दिव्य दृष्टीचा, राक्षसी ताकदीचा आणि अलौकिक हातांचा एक प्रचंड माणूस, चित्रकार दीनानाथ दलाल, एखाद्या सामाजिक सत्याने भारावून जाऊन ते सत्यच ज्यांच्या लेखनाचा स्थायीभाव झाले असे कादंबरीकार-नाटककार जयवंत दळवी.. एक-दोन नाही, तर २० व्यक्तींचे मतकरी यांच्या दृष्टीने असलेले थोरपण अनेक घटना-प्रसंगांची अगदी सहज सय करीत इथे समोर येते.
‘मतकरी यांच्या दृष्टीने असलेले थोरपण’ असे म्हटले, त्यामध्ये पुस्तकाचे एकंदर स्वरूप येते, त्याचबरोबर कदाचित त्याची एक मर्यादाही येते. मनोगतामध्ये मतकरी यांनी आकाशातील ताऱ्याचा दृष्टांत दिला आहे. तो निदान सुचवतो तरी असे की कल्पनातीत अशा उंचीवर पोहोचलेल्या व्यक्तींच्या सर्वागीण उत्तुंग उंचीचे स्वरूप आणि शक्य तर त्या उंचीवर पोहोचण्याची जी काही प्रक्रिया घडली असेल ती मतकरी उलगडून दाखवू पाहताहेत.
पुस्तक वाचत असताना आणि ते वाचून संपल्यानंतरही लक्षात येते की, मतकरींनी त्या त्या व्यक्तींची, त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातली कदाचित ऐतिहासिक म्हणावी अशी कामगिरी आपल्यासमोर सादर केली आहे. त्या कार्यामध्ये त्या त्या व्यक्तीचे काही एक थोरपण अर्थातच अनुभवाला येते. प्रश्न आहे तो आकाशातील तारा आणि या पुस्तकामधील बहुतेक सगळ्या व्यक्ती यांच्यामधील साधम्र्याचा.  आपापल्या क्षेत्रामध्ये अविचल राहून निष्ठापूर्वक कार्य करीत आयुष्य वेचणाऱ्या कार्यकर्त्यांची आजच्या भ्रमिष्ट काळातही वानवा नाही. पण ते सगळेच काही तारे नाहीत. टिळक आणि आगरकर यांची थोरवी गाताना गडकऱ्यांनी आकाशातील ताऱ्यांची आठवण करून द्यावी हे ठीक आहे. आज ज्याप्रमाणे आपल्या भोवती सगळेच ‘महा’ होत चालले आहे, महाआरती, महाएकांकिका स्पर्धा.. त्याप्रमाणे सगळ्यांकडे दूरवरचे तारे आणि तारका म्हणून पाहण्याची आवश्यकता नाही. मतकरींनीच एका लेखात म्हटले आहे, की कालपरवा एखादे-दुसरे पारितोषिक मिळविलेल्या मुला-मुलीचा पानभर फोटो प्रसिद्ध करणाऱ्या कफल्लक पुरवण्या आता आपण पाहतो. प्रशस्तिपत्र ज्याला मिळावे त्याला मतकरीसुद्धा एखादे पदक बहाल करीत असल्याचे इथे जाणवत राहते.
मतकरी यांनी प्रसंगाप्रसंगाने हे लेख लिहिले आहेत. कधी आनंद व्यक्त करण्यासाठी, कधी दु:खात सहभागी होण्यासाठी. त्यामुळे सगळ्या लेखांना एक भावनिक डूब असणारच होती. त्या भावनेच्या भरात माधव मनोहर यांच्या आवडत्या शब्दात म्हणायचे तर ते जरा जास्तच ‘उदारमनस्क’ झाले आहेत असे दिसते.
दोन लेखांचा स्वतंत्र उल्लेख केला पाहिजे. एक, विजय तेंडुलकर यांच्या विषयीचा. नाटककार म्हणून तेंडुलकर सामान्य दर्जाचे असल्याचा मतकरींचा एकंदर अभिप्राय आहे. जे काय थोडेफार श्रेय ते तेंडुलकरांना देतात, तेही ‘वरच्या वर्गात घातला आहे’ अशा स्वरूपाचे आहे.
त्यांच्या मतांबद्दल इथे काहीच म्हणायचे नाही. तो विषय इथे नाही. एवढे मात्र म्हटले पाहिजे की अशा प्रकारच्या लेखाचा अशा स्वरूपाच्या पुस्तकात समावेश करायला नको होता. व्यक्तीच्या ‘थोरवी’च्या संदर्भात तो लेख अगदीच अप्रस्तुत ठरला आहे. दुसरा लेख आहे, ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’चे आद्य संचालक इब्राहिम अल्काझी यांचा ‘व्यक्ती व कार्य’ अशा स्वरूपाचा परिचय करू देणारा  प्रतिभा मतकरी यांचा. स्वत: मतकरी अल्काझीना गुरू मानत असले, तरी सहचारिणीच्या लेखाचा समावेश पुस्तकात करण्याचे काही कारण नव्हते. कारण शक्य आहे की रत्नाकर मतकरी अल्काझी यांचे थेट विद्यार्थी असते तर कदाचित त्यांना काही वेगळेच म्हणावेसे वाटले असते.
ज्या व्यक्ती लौकिक अर्थाने सुप्रसिद्ध नाहीत, अशा मित्र व कौटुंबिक परिवारातील लोभस व्यक्तींच्या थोरपणाची ओळख करून देणारे मतकरींचे या पुस्तकातले लेख वाचनीय आणि मननीय आहेत. या पुस्तकाचे सौंदर्य त्या लेखांमध्ये आहे.
‘सादर सप्रेम’- रत्नाकर मतकरी,
मत्रेय प्रकाशन, मूल्य : रु. १८०. 
vazemadhav@hotmail.com


First Published on October 18, 2015 1:12 am
Web Title: madhav vje article on ratnakar matkaris book

संगणक- ३ संगणकाचे बाहय़ स्वरूप आणि आतील महत्त्वाचे भाग समजावून घेतल्यावर आता हे यंत्र कसे

संगणक- ३

संगणकाचे बाहय़ स्वरूप आणि आतील महत्त्वाचे भाग समजावून घेतल्यावर आता हे यंत्र कसे

दीपक देवधर | October 18, 2015 02:05 am

अनेक प्रकारचे कार्यक्रम एकाच संगणकात जतन करून वापरण्याची सुविधा उपलब्ध करून देते,

संगणकाचे  बाहय़ स्वरूप आणि आतील महत्त्वाचे भाग समजावून घेतल्यावर आता हे यंत्र कसे चालते ते पाहू. अनेक ठिकाणी आज मनुष्याचे काम संगणक करतो, असे आपण बघतो. बँकेतील क्लिष्ट आकडेमोड असो, कारखान्यातील अनेक पदरी यांत्रिक काम असो किंवा सुरक्षा व्यवस्था असो, पुनरुक्ती असलेली अनेक कामे आज संगणक करताना दिसतो.
मानवाची अशी अनेक कामे करणारा संगणक आणि मानवी शरीर यांची तुलना करताना आपल्याला काही साम्ये सापडतात.
१. मानवी मेंदू पंचेंद्रियांद्वारे बाहेरून माहिती घेतो. चेतासंस्था ही माहिती मेंदूपर्यंत पोहोचवते. मेंदूत ही माहिती साठवली जाते. या माहितीवर जरूर त्या प्रक्रिया होतात. पुढील कार्य करण्याचे निर्णय मेंदूतील पेशी घेतात आणि तो आदेश चेतासंस्थेमार्फत योग्य त्या अवयवांना पोहोचवला जातो आणि हवे ते कार्य घडते.
२. संगणकात कळफलक, माऊस, ध्वनिमुद्रक, कॅमेरा आणि आंतरजालाशी (Internet) असलेला संपर्क या पंचेंद्रियांकडून माहिती जमा केली जाते. संगणकातील कार्यप्रणाली (Operating System), ती माहिती हार्ड डिस्क समजू शकेल अशा भाषेत बदलवून हार्ड डिस्कपर्यंत पोहोचवते. हार्ड डिस्कमध्ये हे माहिती साठवली जाते. या माहितीवर आवश्यक त्या प्रकिया करण्याचे काम, मध्यवर्ती प्रक्रिया केंद्रातील (CPU) सूक्ष्म चकतीमध्ये होते. ही चकती आणि हार्ड डिस्क म्हणजे संगणकाचा मेंदू. यांना काम करण्याची व्यवस्था लावणारी कार्यप्रणाली म्हणजे संगणकाची चेतासंस्था.
संगणकातील सर्व भाग चालण्यासाठी ऊर्जेबरोबरच एक कार्यप्रणाली लागते आणि त्या भागांना समजेल अशा भाषेत दिलेल्या सूचना लागतात. उदाहरणार्थ- आपल्याला जर संगणकावर एखादे पत्र लिहावयाचे असेल तर प्रथम कळफलकावर असलेली अक्षरे दाबल्यावर ती माहिती आतमध्ये साठवणे, त्याच्यावरील पुढील संस्कार करणे याकरिता आधी एक कार्यक्रम (Programme) लिहून तो संगणकात जतन करणे गरजेचे असते. पूर्वी जेव्हा कुठल्याही संगणकाला समजेल अशी समान भाषा उपलब्ध नव्हती तेव्हा प्रत्येक उपभोक्त्याला हा कार्यक्रम लिहावा लागायचा आणि अर्थातच त्यामध्ये खूप वेळ जायचा. आता हे तयार कार्यक्रम विकत मिळतात. मायक्रोसॉफ्ट कंपनीने बनवलेले वर्ड/एक्सेलसारखे कार्यक्रम आपल्या संगणकावर जतन केले तर त्या कार्यक्रमात शक्य असलेले/लिहून ठेवलेले कुठलेही काम आपण विनासायास करू शकतो. Windows विंडोजसारखाच Open office हाही कार्यक्रम आपण वापरू शकतो, जो सध्या तरी फुकट उपलब्ध आहे.
अनेक प्रकारचे कार्यक्रम एकाच संगणकात जतन करून वापरण्याची सुविधा उपलब्ध करून देते, ती संगणकातील कार्यप्रणाली (Operating System) संगणकातील चेतासंस्था. चित्र क्र. १ मध्ये याचे संकल्पना चित्र दाखवले आहे.
संगणकातील आवक, जावक, स्मृती आणि प्रक्रिया या सर्व गोष्टींचा मेळ घालणारी मूलभूतप्रणाली. उपभोक्ता आणि संगणक यांच्यात संवाद साधणे, थोडक्यात मध्यस्थाचे काम करणे हे या प्रणालीचे काम. बुद्धिबळ खेळणे आणि पत्रे लिहिणे याला लागणारे दोन भिन्न कार्यक्रम (Programme) चालवणारी एकच पायाभूत कार्यक्रमप्रणाली.
कार्यप्रणालीची काय कामे करते ते पाहू.
संगणकातील कार्यक्रम चालण्यासाठी आवश्यक ते भाषांतर करते. आलेले आदेश त्या कार्यक्रमाला कळतील अशा भाषेत त्यांच्यापर्यंत पोहोचवते.
संगणकातील स्मृती (Memory) चे व्यवस्थापन करते.
स्मृती मधील विषयवार(File) आणि विभागवार (Folders) लावलेल्या सर्व माहितीचे व्यवस्थापन करते.
सर्व प्रणाली (Software) चा संगणकातील दृश्य भागांशी (Hardware)  सुलभ संवाद साधून देते.
हार्ड डिस्कवरील माहिती आवश्यकतेनुसार हलवते.
बाहेरून आलेल्या नवीन प्रणाली संगणकात घेण्यापूर्वी तपासते, योग्य असल्यास हार्ड डिस्कवर मुद्रित करून घेते आणि पुढे गरजेनुसार चालवते.
संगणकातील आवक आणि जावक घडवून आणते.
संगणक सुरक्षित ठेवते.
संगणक व्यवस्थेत आलेल्या चुका आणि घोळ याबद्दल उपभोक्त्याला जाणीव करून देते.
संगणकाचा अपेक्षित वापर त्याच्यामध्ये कुठली कार्यप्रणाली असली पाहिजे ते ठरवतो. पुढील तक्त्यात ही माहिती थोडक्यात दिली आहे-
चित्र क्र. २ मध्ये सध्या उपलब्ध असलेल्या विविध कार्यप्रणाली दाखवल्या आहेत.
वरील तक्त्यात दिलेल्या विविध प्रकारच्या कार्यप्रणालींमध्ये बरेचसे गुण/सोयी समान असू शकतात उदा. तत्काळ व्यवस्था आणि आंतरसंवादी व्यवस्था. भ्रमणध्वनी आणि त्याचा नवा आविष्कार ‘टॅब’, हे तर आता संगणकाचेच छोटे , हातात मावणारे अवतार उपलब्ध आहेत. त्यांच्यातही ‘विंडोज’ कार्यप्रणाली चालते, पण त्याच्याबरोबरीने ‘अ‍ॅण्ड्रॉइड’ ही कार्यप्रणालीसुद्धा लोकप्रिय आहे.
ही कार्यक्रम प्रणाली चालण्यासाठी आणखी एक मूलभूत व्यवस्था काम करीत असते, ती म्हणजे आवकजावक यंत्रणा (Basic Input Output System -BIOS) अनेक संगणकांची कार्यक्रमप्रणाली एकच असू शकते, पण प्रत्येक संगणकाची आवकजावक यंत्रणा आपण हवी तशी निवडू शकतो आणि ती नंतर बदलू शकत नाही. ही यंत्रणा आपण निवडलेल्या दृश्य भागांच्या (Hard ware) अनुरूप बनवलेली असते. ही कायमस्वरूपी लिहिलेली प्रणाली असल्याने तिला Firmware असेही म्हणतात. या समान कार्यक्रमप्रणालीमुळे कुठलाही संगणक जगातल्या कुठल्याही संगणकाशी जोडला जाऊ शकतो, एका यंत्रावर झालेले काम दुसऱ्या यंत्रावर पाहता येते, बदलता येते.
खऱ्या अर्थाने जगाला जवळ आणणारे हे तंत्रज्ञान, रोज विकसित होतच आहे.
dpdeodhar@gmail.com
First Published on October 18, 2015 2:05 am
Web Title: deepak deodhar article on computer 2
टॅग: Deepak Deodhar

Friday, October 16, 2015

तरुणांनो, हृदय जपा!

तरुणांनो, हृदय जपा!

तरुणाईचे वय हे हृदयाच्या गुजगोष्टी करण्यासाठी असते. पण सध्या तर तरुण वयातच हृदयविकार जडल्याचे

September 26, 2015 07:46 am

तरुणाईचे वय हे हृदयाच्या गुजगोष्टी करण्यासाठी असते. पण सध्या तर तरुण वयातच हृदयविकार जडल्याचे चित्र आहे.
वाढता ताण, बदलती जीवनशैली, अनियमित आणि निकृष्ट आहार आणि व्यसन आदींमुळे हृदयविकाराच्या तक्रारींचे प्रमाण २५ ते ४० या वयोगटात मोठय़ा प्रमाणावर वाढले आहे.
ही धोक्याची घंटा असून, तरुणांनी आपल्या हृदयाची योग्य काळजी घेणे वश्यक आहे.
‘‘भारतामध्ये हृदयविकाराचे प्रमाण खूप आहे. भारतात ४० टक्के मृत्यू केवळ हृदयविकारामुळे होतात. हृदयविकारावर नियंत्रण मिळविण्यास अपयश आल्यास २०२०मध्ये जगात सर्वाधिक हृदयविकारी भारतातच आढळतील..’’ जागतिक आरोग्य संघटनेने गेल्या वर्षी जागतिक हृदयदिनानिमित्त असे भाकीत केले होते. त्यांचे हे भाकीत सत्यात उतरण्यास २०२०ची वाट पाहावी लागणार नाही, कारण देशातील हृदयरुग्णांची संख्या वाढत चालली आहे. विशेष म्हणजे यामध्ये सर्वाधिक तरुणांचाच समावेश असल्याचे चित्र आहे. २५ ते ४० या वयोगटात हृदयविकाराचे प्रमाण अधिक असून हे धोकादायक आहे.
तरुणांमध्ये हृदयरोगाचे प्रमाण अधिक का आहे, याबाबत मधुमेहतज्ज्ञ डॉ. राजेंद्र आगरकर बदलती जीवनशैली हेच मुख्य कारण असल्याचे सांगतात. ‘‘पूर्वीच्या काळी हृदयरोगाचे प्रमाण खूपच कमी होते. मात्र आधुनिक जीवनशैलीमुळे हृदयाचा ताण वाढलेला आहे. शारीरिक कष्ट न करता बैठे काम, जेवणाच्या व झोपेच्या चुकीच्या वेळा आदींमुळे हृदयरोग वाढलेला आहे,’’ असे सांगताना डॉ. आगरकर यांनी मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयरोग या तिघांचा एकमेकांशी संबंध आहे. त्यामुळे मधुमेहाची व रक्तदाबाची तपासणी वेळोवेळी करणे गरजेचे आहे. कित्येकदा हृदयविकाराचा झटका आल्यानंतर कळते की रुग्णाला मधुमेह होता. मधुमेह व उच्च रक्तदाब असेल तर ते हृदयविकाराला निमंत्रण असते, असे सांगितले.
प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अविनाश इनामदार हृदयरोगाचा संबंध व्यसनांशी जोडतात. तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन हे हृदयरोगास फार मोठय़ा प्रमाणात कारणीभूत आहे. धूम्रपान, तंबाखू किंवा गुटखा यांचे सेवन याचे प्रमाण आपल्या देशात खूपच आहे. हृदयरोगाची व्याधी जडण्यास त्यांचा मोठा हातभार लागतो, असे डॉ. इनामदार यांनी सांगितले.
बदलती जीवनशैली, निकृष्ट आहार, व्यायामाचा अभाव आणि अपुरी झोप या गोष्टीही हृदयरोगास कारणीभूत असल्याचेही ते म्हणाले. सध्या सात्त्विक अन्न खाल्ले जात नाही. सध्याची तरुणाई जंक फूडच्या मागे आहे. सात्त्विक नसलेला आहार सातत्याने पोटात जात असल्याने हृदयरोग होतो. त्याशिवाय प्रदूषणाचे प्रमाणही खूपच वाढलेले आहे. त्यामुळे त्याचे परिणाम शरीरावर आणि त्याचबरोबर हृदयावर होतात. हृदय बिघडविण्यास ही प्रदूषके कारणीभूत असल्याचे डॉ. इनामदार म्हणाले.
मानसिक ताण हाही हृदयविकाराचे प्रमाण वाढविणारा महत्त्वाचा घटक आहे. सध्याची तरुणाई करिअरच्या मागे असल्याने अनियमित आणि अधिक वेळ कामात स्वत:ला गुंतवून घेते. त्याचा परिणाम मानसिक ताण वाढण्यावर होतो. सध्या धकाधकीच्या जीवनात अनेकदा मानसिक स्वास्थ्य बिघडते. मनाचा परिणाम शरीरावर होत असल्याने शारीरिक आजार जडतात. अधिक मानसिक ताण हृदयविकार जडण्यास कारणीभूत ठरतो, असे डॉ. आगरकर यांनी सांगितले.
हृदयविकाराचे प्रमाण कमी करण्यासाठी जनजागृतीची मोठी गरज असल्याचे डॉ. इनामदार सांगतात. आरोग्यविषयक जागृती लोकांमध्ये रुजविली पाहिजे. केवळ सात्त्विक आहार घेऊन बाहेरील निकृष्ट आहार सेवन करणे टाळले पाहिजे. त्याचबरोबर हृदयाच्या आणि अन्य वैद्यकीय चाचण्या वेळोवेळी करणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले.
– संदीप नलावडे
sandeep.nalawade@expressindia.com
First Published on September 26, 2015 7:46 am
Web Title: increasing the no of heart attack patients in youth