Monday, January 20, 2020

यूपीएससीची तयारी : महत्त्वाचे सामाजिक मुद्दे जागतिकीकरणाच्या सांस्कृतिक, आर्थिक प्रवाहाच्या प्रभावातून कुटुंबरचनेत काय प्रकारचे बदल होत आहेत याचाही विचार करावा लागतो.


(संग्रहित छायाचित्र)

चंपत बोड्डेवार
भारतीय समाजातील ज्वलंत प्रश्न (Current Issues In Indian Society) या अभ्यासघटकाचा यूपीएससी मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमातील सामान्य अध्ययन पेपर १ मध्ये अंतर्भाव करण्यात आलेला आहे. या घटकांतर्गत वर्तमान भारतीय समाजाची मूलभूत गुणवैशिष्टय़े, सामाजिक विविधता, स्त्रियांचे आजचे प्रश्न, लोकसंख्या, दारिद्र्य़ आणि विकासाच्या आंतरविरोधातून उद्भवणारे मुद्दे, नागरीकरणातील समस्या व त्यावरील उपाययोजना, जागतिकीकरणाचे भारतीय समाजाच्या विविध अंगांवर होणारे परिणाम, सामाजिक सक्षमीकरणाचे मुद्दे तसेच जमातवाद, प्रदेशवाद आणि धर्मनिरपेक्षतेसंबंधीच्या मुद्दय़ांचा समावेश केलेला दिसून येतो.
या अभ्यासघटकांतर्गत येणाऱ्या उपघटकांवरही यूपीएससीने मुख्य परीक्षेत प्रश्न विचारलेले दिसून येतात. मागील काही वर्षांत ६२ गुणांपासून ते ७५ गुणांपर्यंत प्रश्न विचारले गेले आहेत. प्रश्नांचे स्वरूप पाहता यूपीएससीने सामान्य अध्ययन पेपर १ मध्ये कमीतकमी ५ ते ६ प्रश्न या अभ्यासघटकांवर सातत्याने विचारलेले आहेत.
आजपर्यंत मुख्य परीक्षेत कुटुंबपद्धती, जाती, लिंगभाव, जागतिकीकरण, धर्मनिरपेक्षता, प्रदेशवाद, दारिद्रय़ यांच्या विविध आयामांवर प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. प्रस्तुत लेखात भारतातील कुटुंबसंस्था आणि तिचे वर्तमानकालीन स्थान याचा थोडक्यात ऊहापोह केलेला आहे. या घटकाचा अभ्यास करताना कुटुंबरचना ही एक सामाजिक संस्था आहे आणि इतर सामाजिक संस्थांशी कुटुंबसंस्थेचे नाते काय प्रकारचे राहिले आहे याही बाबी सर्वप्रथम ध्यानात घ्याव्यात. कुटुंबसंस्था आकलनाच्या कक्षेत येण्यासाठी जात, वर्ग, धर्म, विवाह, रीती-परंपरा या संस्थांच्या जोडीने समजून घ्यावी लागते. परंतु त्यासोबत जागतिकीकरणाच्या सांस्कृतिक, आर्थिक प्रवाहाच्या प्रभावातून कुटुंबरचनेत काय प्रकारचे बदल होत आहेत याचाही विचार करावा लागतो.
मुख्य परीक्षेच्या दृष्टीने विचार करू पाहता, मागील काही वर्षांपूर्वी मुख्य परीक्षेत पुढील प्रकारचा प्रश्न विचारण्यात आलेला होता – संयुक्त कुटुंबाची जीवनशैली सामाजिक मूल्याऐवजी आर्थिक चल घटकांवर अवलंबून आहे, यावर चर्चा करा. या प्रश्नाची मुळे शोधण्यासाठी शहरीकरण व औद्योगिकीकरण अंतर्भूत असलेली आर्थिक प्रकिया नीट समजून घ्यावी लागते. दुसऱ्या बाजूला वर म्हटल्याप्रमाणे मुद्दे कितीही जुने असले तरीही वर्तमानातील त्या मुद्दय़ांचे स्थान काय आहे आणि त्याची चिकित्सा यावर यूपीएससी भर देताना दिसते.
भारतीय समाज हा प्रामुख्याने कृषीप्रधान समाज राहिलेला आहे. खेडे ही त्याची पृष्ठभूमी राहिलेली आहे. संयुक्त कुटुंबाला जात-वर्गीय संरचनेचासुद्धा आधार होता. संयुक्त कुटुंबे प्रामुख्याने पितृसत्तात्मक राहिलेली आहेत. कमीतकमी तीन पिढय़ांचे त्यात अस्तित्व दिसून येते. वंशवेल, खानदान, पितृसत्ता आणि सामाजिक दर्जा या सामाजिक मूल्यांसाठी संयुक्त कुटुंबरचना महत्त्वाची मानली जात होती.
शहरीकरण आणि औद्योगिकीकरणाच्या धोरणाने रोजगाराचे आणि उत्पन्नाचे अन्य पर्याय समोर आले. स्वातंत्र्यानंतर शहरीकरणाचे धोरण कायम राहिल्याने संयुक्त कुटुंबरचनेत मोठा बदल घडून येत गेला. रोजगार, शिक्षण तसेच जातव्यवस्थेतील वैगुण्यामुळे खेडय़ातील लोकांचे शहरांकडे स्थलांतर होण्याचे प्रमाण अधिकाधिक वाढत गेले. अशा परिस्थितीत संयुक्त कुटुंबरचेनेचे आधार आणि गुणवैशिष्टय़ांमध्ये बदल घडून आले. थोडक्यात, सामाजिक मूल्याऐवजी संयुक्त कुटुंबावर आर्थिक घटक प्रभाव टाकू लागले.
जागतिकीकरणाच्या रेटय़ातून कुटुंबे वर्तमान बाजारव्यवस्थेचे ग्राहक या भूमिकेत उतरू लागली. वाढत्या गरजांमधून अधिक अर्थार्जन कमावण्याकडे कल वाढू लागला. त्यातून आपण आणि आपली मुले याव्यतिरिक्त घरात इतर माणसांचा वावर नकोसा वाटू लागतो. त्यातूनही संयुक्त कुटुंबरचनेला तडे जाऊ लागले. व्यक्तीचे झालेले वस्तुकरण कुटुंबरचनेत बदल घडवून आणते. त्यामुळे चंगळवादाने कुटुंबसंस्थेवर काय प्रकारचे परिणाम केले याचीही उत्तरे मिळवणे आवश्यक आहे.
संयुक्त कुटुंबरचनेकडून विभक्त कुटुंबरचनेकडे झालेल्या स्थित्यंतरातून अनेक मुद्दे निर्माण झाले. विभक्त कुटुंबात आई-वडील दोघे नोकरीनिमित्ताने घराबाहेर पडणे अनिवार्य असल्याने लहान मुलांचा सांभाळ ही मोठी जिकिरीची समस्या बनली. त्यातून लहान मुलांच्या लैंगिक शोषणाचा प्रश्न निर्माण झाल्याने शहरांमध्ये पाळणाघरे तयार झाली. त्यामुळे शहरीकरण आणि विभक्त कुटुंबे यांच्या आंतरसंबंधावर यूपीएससीकडून प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे.
दुसरी समस्या म्हणजे निवाऱ्याची जागा मर्यादित असल्याने आणि कुटुंबाचा खर्च वाढण्यातून घरातील वृद्धांचे राहणीमान प्रभावित झाले. त्यातून समाजामध्ये त्यांच्यासाठी वृद्धाश्रमे उदयाला आली. या धर्तीवर वृद्धांची हेळसांड थांबवण्यासाठी सरकारने कोणती धोरणे आखली आहेत याचाही विचार अभ्यासामध्ये करावा लागेल.
कुटुंबसंस्थेच्या संक्रमणातून जनरेशन गॅप नावाची समस्या समोर आली. मने जुळत नाहीत, धारणा एकसारख्या राहत नाहीत. दृष्टिकोनामध्ये फरक पडत जातो; अशी विविध लक्षणे असलेल्या जनरेशन गॅपचा अर्थ लावणे, ती निर्माण होण्याचे आधार तपासणे तसेच या जनरेशन गॅपची कारणे आणि परिणाम याचाही अभ्यास अनिवार्य ठरतो.
वर्तमान कुटुंबसंस्थेचा परिचय करून घेण्यासाठी कुटुंबपद्धतीचे पायाभूत घटक आणि तिची गुणवैशिष्टय़े काय होती आणि त्यात वेळोवेळी कसा फरक पडत गेला, तसेच त्यात कोणते बदल घडून आले, बदलास जबाबदार असणारी प्रक्रिया आणि तिचे चलघटक कोणते आहेत, यालाही स्पर्श करावा लागेल. त्या दृष्टीने किमान पातळीवर संकल्पनात्मक अभ्यास एनसीईआरटीच्या इयत्ता बारावी समाजशास्त्राच्या क्रमिक पुस्तकातून करता येऊ शकतो. ती मुख्यत: इंडियन सोसायटी आणि सोशल चेंज अँड डेव्हलपमेंट इन इंडिया या नावाने बाजारात उपलब्ध आहेत. परंतु त्यापुढे जाऊन वर्तमानपत्रे आणि नियतकालिकांमधून संदर्भ पाहावे लागतील.
First Published on August 15, 2019 12:08 am
Web Title: Current Issues In Indian Society Upsc Abn 97

जगाच्या पाटीवर : संशोधनाची मॅजिक बुलेट संशोधन म्हटलं की त्याला लागणारा काळ, वेळ, स्थिर चित्त, मेहनतीची तयारी आणि चिकाटी हे गुण आवश्यक ठरतात


(संग्रहित छायाचित्र)

ओमकार भाटवडेकर
संशोधन म्हटलं की त्याला लागणारा काळ, वेळ, स्थिर चित्त, मेहनतीची तयारी आणि चिकाटी हे गुण आवश्यक ठरतात. तसंच अनेकदा त्यासाठीचा निधी आणि साधनसामुग्रीही महत्त्वाची ठरते. हे सगळे मुद्दे विचारात घेतले तरी मला फर्स्ट इयरपासून संशोधनाची गोडी लागली होती. मी एस.पी.महाविद्यालयातून बारावी झालो. केमिकल इंजिनिअरिंगची आवड होती. गुणही चांगले मिळाले. आयआयटी, बिट्स वगैरे संस्थांचा विचार सुरू होता. आयसीटी उत्कृष्ट आहे ही कल्पना होतीच. तिथून पुढे थेट पीएचडीला वळणाऱ्यांची आणि मास्टर्स करणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे पुण्यातून मुंबईतल्या युडीसीटीमध्ये शिकायला आलो.
मला लॅबमधल्या संशोधनात रस होता. अर्थात हे संशोधन किती वेगाने होऊ  शकेल, त्याचे संभाव्य निष्कर्ष किती परिणामकारी आहेत, त्याची उपयुक्तता किती आहे इत्यादी मुद्दे या कामात पडताळले जातात. या शास्त्रीय दृष्टिकोन आणि निकषांवर आधारित असलेल्या कामाला युरोपमध्ये चांगली संधी उपलब्ध आहे. मात्र संशोधनासाठी उपलब्ध साधनसामुग्री आणि बळकट आर्थिक निधी यामुळे अमेरिकेचं पारडं अधिक जड आहे. सिंगापूरच्या पर्यायाचाही विचार करून ठेवला होता. पण त्याची गरज पडली नाही. मी अर्ज केला होता त्या वर्षभर आधी ब्रेक्झिट करार झाला होता. युरोपातील परिस्थिती स्थिरावलेली नव्हती. शिवाय युरोपमध्ये थेट पीएचडी करायला मिळत नाही. त्यामुळे अमेरिका हा पर्याय होता.
जवळपास १३ विद्यापीठांत अर्ज केले होते. किंचितशी धाकधूक वाटत होती. त्यापैकी चार ठिकाणांहून प्रवेशअर्ज मंजूर झाला. ‘जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटी’ची निवड करण्याचं कारण म्हणजे मला औषधनिर्माण, कॅन्सर थेरपी आदी गोष्टींमध्ये रस होता. इथलं मेडिकल कॅम्पस जगप्रसिद्ध आहे. पुस्तकी ज्ञानाइतकंच भोवतालच्या लोकांशी संवाद साधून, चर्चा करून बरीच माहिती मिळते. संधीची वाट दिसू शकते. लोकारोग्यासाठी काम करायचं मनात आहे. त्यासाठी लोकांशी बोलणं, त्यांना बोलतं करणं गरजेचं आहे. माझे तीन प्रवेशअर्ज मंजूर झाले ती ठिकाणं तुलनेने तितकीशी शहरी नव्हती. त्यामुळे बाल्टिमोरचा पर्याय पक्का केला. माझ्या निर्णयाला घरच्यांचा भक्कम पाठिंबा होता.
मुंबईला हॉस्टेलवर चार वर्ष राहिल्याने एकटं राहण्याची सवय होती. एका अर्थी ती रंगीत तालीम झाली. त्यामुळे इथे आलो तरी फारसं काही वेगळं वाटलं नाही. भारतातून इथे व्हिडिओ कॉल झाले असल्याने लोकांशी तोंडओळख झाली होती. बाल्टिमोर फार श्रीमंती थाटाचं शहर नाही. त्यामुळे मी अमेरिकेत आलो असं ‘वॉव’वालं फिलिंग आलं नाही. ते आपल्या आधीच्या पिढीला वाटत होतं; कारण तेव्हाचं तंत्रज्ञान आणि आधुनिकीकरण त्यांना नवीन होतं. आता या गोष्टी आपल्याकडेही असल्यामुळे फारसा फरक पडत नाही. मात्र काही गोष्टी जाणवल्या. इथे सगळे नियम कटाक्षाने पाळले जातात. लोक आपापल्या कामाशी मतलब ठेवतात. कुणी कुणाच्या आयुष्यात नाक खुपसत नाही. एका अर्थी हे चांगलंच आहे. मात्र दुसरीकडे आपल्याला या गोष्टीशी सवय असल्याने सुरुवातीला याचं थोडं दु:खमिश्रित आश्चर्य वाटलं होतं. हळूहळू एकेक नियम, सवयींचं आकलन होत गेलं आणि मी स्थिरावत गेलो.
सुरुवातीच्या काळात मला स्वयंपाक यायचा नाही. त्यामुळे दोन ते तीन महिने त्या आघाडीवर तोंड द्यावं लागलं. व्हिडिओ कॉलवरून आई शिकवायची. शिवाय युटय़ुबचा सहारा मिळाला. शिवाय तेव्हा खरं आईच्या हातच्या स्वयंपाकाची चव आणि महती कळली. आपण उगीचच केलेल्या कटकटीची आठवण झाली. घर भारतातूनच शोधून ठेवलं होतं. सुदैवाने रुममेट चांगले मिळाले. ते नुकतेच मास्टर्स झाले आहेत. आता मी एकटाच स्वत:च्या स्टुडिओमध्ये राहायला आलो आहे. ऑगस्टमध्ये इथे येऊन दोन वर्ष पूर्ण होतील. इतका स्वावलंबी होईन, असं वाटलं नव्हतं. स्वत:चा स्टुडिओ घेणं आणि आईपेक्षा स्वयंपाक चांगला करणं या गोष्टींमध्ये टप्प्याटप्प्याने प्रगती झाली आहे. आता मीच आईला काही पाककृती सांगतो. त्यासाठीच्या सूचना करतो. पुढचं लक्ष्य आहे उकडीचे मोदक शिकणं..
आपण इतक्या मोठय़ा विद्यापीठात शिकायला आलो आहोत, याचं सुरुवातीला थ्रिल वाटत होतं आणि तितकंच त्या जबाबदारीचं भानही होतं. इथे साध्याला खूप महत्त्व दिलं जातं, तेही व्यावसायिकतेपेक्षा कणभर सरसच. विद्यार्थ्यांना त्यांचं ध्येय साध्य करण्यासाठी विद्यापीठाकडून यथायोग्य सहाय्य मिळतं. प्रा. स्तावरौला सोफू आणि प्रा. यान्निस केवरेकिडीस हे माझे दोन गाईड आहेत. मॅडम आमची सतत काळजी घेणाऱ्या, विचारपूस करणाऱ्या आणि आम्हा विद्यार्थ्यांंना वेळ देणाऱ्या आहेत. तर सरांच्या कामांच्या व्यवधानांमुळे त्यांना आम्हाला फार वेळ देता येत नाही. पण त्यांचं आमच्या कामावर बारीक लक्ष असतं. आमची लॅब मुख्यत्वे ब्रेस्ट आणि प्रोटेस्ट कॅन्सरवर काम करते. या विषयासंदर्भात अगदी मोजकेच लोक संशोधन करत आहेत. मी केमिकल आणि बायोमॉलिक्युलर इंजिनीअरिंगमध्ये पीएचडी करतो आहे. त्यामुळे इतर संशोधकांना त्यांच्या संशोधनात मदत होऊ शकते. संशोधक एखाद्या गोष्टीवर संशोधन करतो, तेव्हा त्याआधी अनेक कामं झालेली असतात. अनेक पर्याय उपलब्ध असतात. ते माहिती नसतील तर खूप वेळ, श्रम, पैसे वाया जातात. नैराश्य घेरू शकतं, हे आणखी वेगळंच. काही वेळा हे संशोधन पूर्णत्वाला जातं असंही नाही. हे सगळं टाळण्यासाठी संगणकाच्या मदतीने काही माहिती देता येईल का, असा विचार मनात आला. म्हणजे या सगळ्या शक्य-अशक्य गोष्टी विचारात घेतल्या जात आहेत. त्यानंतर एक प्रोग्रॅम तयार करणार असून त्यामुळे कॅन्सरवर संशोधन करणाऱ्या संशोधकांना त्यांचं संशोधन करताना गोष्टी थोडय़ा सुकर होऊ  शकतील. अद्याप हे संशोधन बाल्यावस्थेत आहे. म्हटलं तर हे शिवधनुष्य उचलण्यासारखं आहे. या संशोधन विचारांची मॅजिक बुलेट कधीतरी नक्कीच इतरांच्या कामी येईल, असा विचार यामागे आहे. त्यामुळे संशोधनाच्या मंदावणाऱ्या वेगाला अधिक गती मिळेल.
माझे दोन्ही गाईड त्यांच्या क्षेत्रात नामांकित आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणं, ही माझ्यासाठी मोठी भाग्याची गोष्ट आहे. संशोधनाच्या एका टप्प्यावर लॅबमध्ये उंदरांवर काम केलं. त्याआधी मी कधी उंदराला हात लावला नव्हता. आता कामाचा तो एक टप्पा संपला. मी प्रोग्रॅमिंगही करतो. खूप कमी लोकांना अशा दोन्ही गोष्टी करायची संधी मिळते.  त्यामुळे थोडासा ताणही वाढतो. कारण सुरुवातीला माझ्याकडे या दोन्ही गोष्टी करण्यासाठी कौशल्य नव्हतं. कालांतरानं ते आत्मसात होत गेलं. त्यासाठी गाईडनी चांगलं मार्गदर्शन केलं. आमच्या दर आठवडय़ाला भेटीगाठी होतात. व्यावसायिकपणा आणि ध्येय साध्य करण्यासाठी केलेलं काम या दोन चक्रांवर इथल्या संशोधनाचा रथ चालतो. त्यामुळे अर्थात कामही तितकंच करावं लागतं. फक्त त्या कामाचा आनंद घेत ते करता आलं पाहिजे.
जॉर्डन, कॅनडा, चीन, ग्रीस, इटली आदी देशांतील सहाध्यायांसोबत बोलताना जाणवलं की, प्रत्येकाची संस्कृती, बौद्धिक क्षमता, विचारशक्ती, सामाजिक – राजकीय परिस्थिती भिन्न आहे. आमच्या विद्यापीठात या सांस्कृतिक वैविध्याला कायमच जागा दिली जाते. विद्यार्थ्यांच्या विचारांना, कलागुणांना वाव दिला जातो. कधी कुणाची खाद्यसंस्कृती मराठी पदार्थांच्या जवळपास जाणारी आहे, असं दिसतं. कधी एखाद्या संगीतातली धून भारतीय धूनीची आठवण करून देते. कधी बोलता बोलता एकमेकांची भाषा आपसूक शिकली जाते. ज्याचे – त्याचे प्रश्न कळायला लागतात. परस्परांबद्दलचे – देशाबद्दलचे काही गैरसमज दूर होतात. एका अर्थाने जगाचे नागरिक म्हणून वावरता येतं. एक जाणवलं की, भारतीयांना इतरांबद्दल बरीच माहिती असते. मात्र त्यांना विशेषत: अमेरिकन लोकांना इतरांची फारशी माहिती नसते. माझा बराचसा वेळ संशोधनात जात असल्यामुळे विद्यापीठातल्या इव्हेंट्सना जायला जमत नाही. मात्र तज्ज्ञांची व्याख्यानं, परिषदा आदी उपक्रमांमध्ये सहभागी होतो.
शाळेत असताना मी डॉसबॉल खेळायचो. आता इथल्या डॉसबॉल टुर्नामेंटमध्ये वेळ मिळेल तसा भाग घेतो. त्यात काही वेळा सगळ्या विभागांच्या स्पर्धा घेतल्या जातात, त्या खेळताना जाम मजा येते. इथे फिटनेसला खूप महत्त्व आहे. त्यामुळे आपली फिटनेस लेव्हल खूपच कमी आहे, हे मला जाणवलं. तेव्हापासून जिमला जाणं न चुकवल्याने मीही फिट झालो आहे. मला पेटी वाजवायची आवड होती. इथे फावल्या वेळात पियानो वाजवायला शिकलो. इथल्या थंडीचा पहिला मोसम फार कठीण होता. इतक्या थंडीची आणि बदलत्या हवामानाची आपल्याला सवय नसते. त्याचा थोडाफार परिणाम मन:स्वास्थ्यावरही होतो. किचिंतसं नैराश्याचं मळभ दाटून येतं. त्यातून सावरायला छंदांची मदत होते. क्रिकेटची खूप आवड असल्याने सगळ्या मॅच आवर्जून बघतो. क्वचित कधी वॉशिंग्टनला जातो. बाकी आठवडय़ातला बराचसा वेळ लॅबमध्येच जातो. गेल्या वर्षी भारतात आलो होतो. आता वर्षांखेरीस येणार आहे. पीएचडी झाल्यानंतर पोस्टडॉक करायचा विचार आहे. नोकरीचा पर्यायही आहे. मात्र पुढे भारतात परतून एखाद्या संस्थेत किंवा स्वत:च्या संस्थेत प्राध्यापक व्हायचा विचार आहे. किंवा फार्मास्युटिकल कंपनीत कामाचा पर्यायही उपलब्ध आहे. येत्या काही वर्षांत लोकारोग्याचा प्रश्न फार जटिल होणार असल्यामुळे त्यासाठी काही करता येईल का, याचाही विचार सुरू आहे. आपल्यासारख्या भारतात परतू इच्छिणाऱ्यांची संख्या पाहून वाटतं आहे की, काही सकारात्मक बदल नक्कीच घडतील. बी पॉझिटिव्ह!
कानमंत्र
* केवळ अभ्यासावर लक्ष्य केंद्रित न करता प्रत्यक्ष कामाचा अनुभव घ्यायची किंवा काही नवीन गोष्टी शिकायची संधी मिळाल्यास ती सोडू नका.
* भविष्यातल्या संधी आणि आपल्या आवडीचा बारकाईने अभ्यास करून पुढचा आराखडा आखून निर्णय घ्या.
 शब्दांकन : राधिका कुंटे
viva@expressindia.com
First Published on July 19, 2019 1:44 am
Web Title: Article On Magic Bullet Research Abn 97

यूपीएससीची तयारी : सद्गुणांवर आधारित नैतिक मांडणी नीतीशास्त्राच्या अभ्यासामध्ये कायमच पुढील तीन सिद्धांतांचा प्रामुख्याने विचार केला जातो.


सुश्रुत रवीश
नीतीशास्त्राच्या अभ्यासामध्ये कायमच पुढील तीन सिद्धांतांचा प्रामुख्याने विचार केला जातो.
(१) उपयुक्ततावादी मांडणी (जेरेमी बेंथम, जे.एस. मिल)
(२) कर्तव्यवादी विचारसरणी (इमॅन्युएल कान्ट, रॉल्सची न्यायाची मांडणी)
(३) सद्गुणांवर आधारित विचारसरणी (प्लेटो, अ‍ॅरिस्टॉटल)
आज आपण तिसऱ्या आणि शेवटच्या विचारसरणीची ओळख करून घेणार आहोत.
सद्गुणांवर आधारित नैतिक विचारसरणी
नैतिक तत्त्वज्ञानाच्या अगदी सुरुवातीच्या जडणघडणीपासून या मांडणीकडे पाहू या. सॉक्रेटीसचा शिष्य असलेल्या प्लेटोने त्याच्या स्वत:च्या कारकीर्दीत आणि येणाऱ्या काळात अथेन्स आणि सर्व जगाला चकीत करून सोडले. याचबरोबर अ‍ॅरिस्टॉटलसारखा तत्त्ववेत्ता बनवण्याचे कामही त्याने केले. अतिशय मोठय़ा प्रमाणात साहित्य निर्मिती व विचारनिर्मिती करणाऱ्या प्लेटोचे सर्वात महत्त्वाचे सद्धांतिक काम The Republica मधून केले गेले आहे. The Republica मधील एकंदरीत विवेचनात नीतिनियमांविषयी (Ethics) खालील दोन प्रमुख मुद्दे स्पष्ट केले आहेत.
(१) नीतिनियम सापेक्ष नसतात.
(२) नीतिनियम न्यायाची संकल्पना स्पष्ट करतात व न्याय मिळवण्याच्या प्रक्रियेतील टप्पे समजावून घेण्यासाठी नीतिनियमांच्या चौकटीचा उपयोग होतो. प्लेटोने नैतिक निर्णयक्षमतेचा गाभा मनुष्याच्या ठायी असलेले मूलभूत सद्गुण आहेत, अशी मांडणी केली.
माणसाला पूर्णत्व प्रदान करणाऱ्या पुढील गुणांना प्लेटोने मूलभूत सद्गुण (Cardinal Virtues) म्हटले –
(१) धर्य (Courage),
(२) संयम (Temperance),
(३) शहाणपण (Wisdom),
आणि (४) न्याय (Justice).
प्लेटोच्या मते या चार गोष्टी एकमेकांपासून सुटय़ा नव्हेत. एकाच संघटित व्यक्तिमत्त्वाचे ते विविध पलू आहेत. त्यातील अधोरेखित करायची बाब म्हणजे, न्याय हा गुण इतर गुणांचे एकमेकांवर अतिक्रमण होऊ देत नाही. वरीलपैकी पहिल्या तीन गुण वैशिष्टय़ांचा उत्तम विकास झाल्यास त्यांची परिणती चौथ्यात म्हणजे न्यायात होते.
प्लेटोचा शिष्य अ‍ॅरिस्टॉटल यानेसुद्धा नीतिनियमविषयक सद्गुणांवर आधारित सवयी रुजविण्यावर व जोपासण्यावर भर दिला. त्याच्या मते, प्रत्येक गोष्टीची ओढ तिच्या स्वाभाविक स्थितीकडे म्हणजेच ‘स्व’त्वाकडे असते. मग असा प्रश्न पडतो की, माणसाचे स्वत्व कशात आहे, माणसाचा खरा ‘स्व’भाव कोणता. अ‍ॅरिस्टॉटलच्या मते, विवेक (Reason) हेच माणसाचे स्वत्व आहे. माणसाची ओढ विवेकाकडे असली पाहिजे. अ‍ॅरिस्टॉटलच्या मांडणीतील पुढचा महत्त्वाचा विचार म्हणजे, प्रत्येक वस्तूस काही कार्य (Function) असते. ते कार्य व्यवस्थित करणे हेच तिचे कल्याण अथवा चांगलेपण होय. उदा. चप्पलचे कार्य पायाचे संरक्षण करणे आहे असे मानले, तर ‘चांगली’ चप्पल तिच असू शकेल जी हे कार्य व्यवस्थितपणे पार पाडते. याच धर्तीवर, मनुष्य या दृष्टीने माणसाचे कार्य काय, याचे अ‍ॅरिस्टॉटलच्या मते ‘विवेकाने वागणे’ असे उत्तर आहे. विवेकपूर्ण असणे हे प्रत्येक व्यक्तीचे स्वत्व आहे. मात्र विवेकी असण्यामध्ये साधारणत: जी भावनाशून्यता गृहीत धरली जाते, ती अ‍ॅरिस्टॉटलला अपेक्षित नाही. किंबहुना, भावना न नाकारता माणसाच्या अनेक ऊर्मी, प्रवृत्ती, वासना, आणि आकांक्षा असतात. त्यांच्यातील संघर्ष टाळून संवाद निर्माण करणे हे विवेकाचे काम होय. विवेकयुक्त जीवन म्हणजे एकसंध व्यक्तिमत्त्व (integrated personality) असा अर्थ अ‍ॅरिस्टॉटलच्या मनात आहे.
माणसाने स्वत:च्या स्वत्वाप्रमाणे म्हणजे विवेकाला अनुसरून वागणे याचा अर्थ सद्गुणी जीवन जगणे हा होय. एकदा कार्य म्हणजेच Function ठरल्यानंतर Proper function म्हणजे काय हेही ठरवावे लागेल; अशी मांडणी त्याने केली. मनुष्याच्या बाबतीत ‘सुवर्णमध्य- Golden meanl साधत विवेकाचा वापर करणे, हे अ‍ॅरिस्टॉटलच्या मते Proper Function आहे. सद्गुण ही नेमकी वा ठरावीक गोष्ट नसून ती परिस्थितीनुरूप बदलत असते हा या मांडणीचा गाभा आहे. सद्गुणाची कमतरता (Deficit Vice) किंवा अतिरेक (Excess Vice) यातून कोणत्यातरी प्रकारचा दुर्गुण जन्म घेत असतो, अशीही मांडणी आहे, आणि म्हणूनच प्रत्येक व्यक्तीने हा सुवर्णमध्य गाठत निर्णय घेण्याचे कौशल्य अंगी बाणवले पाहिजे. अशी व्यक्ती योग्य प्रसंगी आवश्यक योग्य तितकेच बोलू शकते, ताणतणावाच्या परिस्थितीमध्ये सहजता आणू शकते, अवघड किंवा दु:खद बातमी संवेदनशीलतेने सांगू शकते, उद्धटपणा न दाखवता आत्मविश्वासाने सामोरी जाऊ शकते, उधळपट्टी टाळून दिलदारपणा दाखवू शकते. या आणि अशा अनेक प्रसंगांमध्ये ‘योग्य’, ‘नैतिक’ वागणारी व्यक्ती सुवर्णमध्य साधू शकणारी असते. असा या मांडणीचा दावा आहे. एकंदरीतच अ‍ॅरिस्टॉटलच्या virtue ethics चा भर व्यक्तीच्या गुणवैशिष्टय़ांवर आहे आणि या मांडणीत कोणत्याही प्रकारचे ठरावीक साचेबद्ध नियम नाहीत. अशा प्रकारचे वर्तन करणे सोपे नाही. यासाठी समाजामध्ये नैतिक आदर्शाची (moral exemplars) ची गरज असते. सुरुवातीच्या टप्प्यात या आदर्श व्यक्तिमत्त्वांकडे पाहून आणि केवळ त्यांची नक्कल करून योग्य मार्गाने जाता येते. योग्य किंवा नैतिक वागण्याच्या सवयीनेदेखील व्यक्ती अधिक अधिक नैतिक बनत जाते, असा या मांडणीचा विश्वास आहे.
‘You are what you do repeatedly’ हे अ‍ॅरिस्टॉटलचे प्रसिद्ध वाक्य हीच मांडणी सांगणारे आहे. अशा प्रकारे सुवर्णमध्य शोधण्यासाठी जगत असताना स्वत:चे आणखी चांगले रूप मिळवण्याच्या मूलभूत इच्छेला चालना मिळते. यातून व्यक्ती आणि समाज (Eudaimonia) गाठू शकणारे म्हणजेच मानवी भरभराटीचे, परिपूर्णतेचे आयुष्य जगू शकतो.
इ.स.पूर्व ३७०च्या सुमारास मांडलेल्या या विचारांमध्ये प्रचंड सामर्थ्य आहे. आपण या आधी पाहिलेल्या नैतिक विचारांचे मूळ निर्णयातून मिळणाऱ्या सुखात किंवा उपयुक्ततेत, कर्तव्याच्या जाणिवेत, न्यायपूर्ण भूमिकेत दडलेले होते. मात्र प्लेटो-अ‍ॅरिस्टॉटलचा नैतिक विचार व्यक्तीतील स्वाभाविकत: नैतिक असणाऱ्या गुणांवर भर देतो. केवळ परिणामांचा, सुखाचा, कर्तव्याचा विचार करून व्यक्तीच्या नैतिक धारणांचा विचार पूर्ण होत नाही, हे विसाव्या शतकात पुन्हा नव्याने मान्य झाले आहे व नैतिक निर्णयांमध्ये कळीची ठरणारी व्यक्तीची भूमिका पुन्हा एकदा अभ्यासली जात आहे. कान्टबरोबरच मार्टनि ह्य़ुम, नित्शे या सगळ्यांनी आपापल्या पद्धतीने सद्गुणांवर आधारित नैतिक विचारसरणीला बळ दिले आहे. या टप्प्यावर आपण सर्व प्रमुख नैतिक विचारसरणींची ओळख करून घेतली आहे. नैतिक तत्त्वज्ञानाच्या, इतिहासाच्या आणि जडणघडणीच्या विविध टप्प्यांचा मागोवा घेणे आणि यूपीएससीच्या सामान्य अध्ययनाच्या चौथ्या पेपरच्या दृष्टीने या विचारांची प्रस्तुतता स्पष्ट करणे; हा या लेखांमागील प्रमुख हेतू आहे.
याचसाठी पुढील लेखात आपण या विचारसरणीचे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्व पाहणार आहोत. आतापर्यंत यूपीएससीने घेतलेल्या तीन पेपरच्या विश्लेषणातून या नैतिक विचारसरणींचे महत्त्व आपण पुढील लेखात पाहणार आहोत.
First Published on December 31, 2019 2:45 am
Web Title: Preparation Of Upsc Tips For Preparation Upsc Exam Upsc Exam Guidance Zws 70