आर्थिक घोटाळ्याचा भस्मासुर रोखण्यासाठी
मनीलॉण्डरिंग कायद्याच्या उल्लंघनामुळे होणारे दंड ही आज सर्व जागतिक बँकांसमोरची आपत्ती बनली आहे.
मनीलॉण्डरिंग कायद्याच्या उल्लंघनामुळे होणारे दंड ही आज सर्व जागतिक बँकांसमोरची आपत्ती बनली आहे. भारतातल्या कॅनरा बँक, बँक ऑफ बरोडा या बँकांना जागतिक नियमकांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. या आपत्तीमुळे एक गोष्ट मात्र चांगली घडत आहे, ती म्हणजे सर्टिफाइड अॅन्टी मनीलॉण्डरिंग एक्स्पर्ट्सची अर्थात आर्थिक घोटाळ्याला आळा घालू शकणाऱ्या तज्ज्ञांची मागणी कित्येक पटींनी वाढत आहे. अनेक जागतिक बँकांमध्ये या विषयाशी संबंधित रोजगार निर्माण होत आहेत. त्यासाठी कुशल मनुष्यबळाची मागणी दिवसागणिक वाढत आहे.
इंडिया फोरेन्सिक संस्थेने केलेल्या पाहणीनुसार पुढील तीन वर्षांत सर्टिफाइड अॅन्टी मनीलॉण्डरिंग एक्स्पर्ट्सची मागणी किमान १०० टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
भारतात मनीलॉण्डरिंग हा २००२ पर्यंत काही गुन्हा नव्हता, ती पैशाचा रंग बदलायची एक कला होती, पण केंद्राने २००२ साली कायदा पारित केला आणि २००५ साली त्याची अंमलबजावणी चालू झाली. त्यानंतर मनीलॉण्डरिंगमधील तज्ज्ञांची गरज अनेक बँकांमध्ये भासायला लागली. या व्यवहाराची माहिती असलेल्या लोकांसाठी नोकरीची दारे सताड उघडली गेली.
इंडिया फोरेन्सिक सेंटर ऑफ स्टडीज (http://indiaforensic.com/) या संस्थेने २००६ साली भारतात सर्वप्रथम सर्टिफाइड अॅण्टी मनीलॉण्डरिंग एक्स्पर्ट हा अभ्यासक्रम चालू केला आहे. सध्या नॅशनल स्टॉक एक्स्चेंज अकॅडमी लिमिटेडच्या सहयोगाने संस्था सर्टिफाइड फॉरेन्सिक अकाऊंटिंग प्रोफेशनल हा अभ्यासक्रम हा अभ्यासक्रम चालवते आहे. त्यामध्ये बँकिंग फ्रॉड्स आणि स्टॉक मार्केट फ्रॉड्सविषयक अभ्यासक्रमाचा समावेश आहे. हे सर्टिफिकेशन पूर्ण केल्यावर जागतिक बँकांत अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात.
बेकायदेशीर अथवा गुन्ह्य़ांची फलश्रुती असलेल्या अथवा कोणत्याही वैध आर्थिक व्यवहाराविना मिळवलेल्या पैशांचे व्यवहार हे संशयास्पद या गटवारीत येतात. अशा पद्धतीने झालेल्या कोणत्याही व्यवहाराची नोंद Financial intelligence unit येथे करावी लागते. पण या नोंदी करण्यात भारतीय बँकांना म्हणावे तेवढे यश आलेले नाही. अनेक संशयित व्यवहार आजही बँकांकडून नजरचुकीने नोंदवायचे राहून जात होते.
बँकेमध्ये जमा होणारी रोख रक्कम का, कुठून आणि कशी असे अनेक प्रश्न निर्माण करते. आंतरराष्ट्रीय व्यापारात अनेक वेळेस पैशाचा रंग बदलायची किमया साधली जाते आणि गेल्या काही दिवसांत तर बिटकॉइन नावाचा नवीन भस्मासुरही मनीलॉण्डरिंगच्या क्षितिजावर दिसायला लागला आहे. रोज बदलणाऱ्या तंत्रज्ञानाशी झगडून हे मनीलॉण्डरिंग थांबवायचे कसे, त्यासाठी काय उपाय योजना कराव्यात या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे इंडिया फोरेन्सिक या संस्थेच्या सर्टिफाइड अॅण्टी मनीलॉण्डरिंग एक्स्पर्ट या कार्यक्रमातून दिली जातात.
मनीलॉण्डरिंग म्हणजे पैशाचा रंग बदलून काळ्याचा पांढरा करणे असा सर्वमान्य अर्थ आपल्या देशात रूढ झाला आहे. त्यासाठी बँक ही सवरेत्कृष्ट जागा आहे. त्याला इतर अनेक पर्याय असले तरी बँक सर्वात श्रेष्ठ जागा आहे. आज बँकांना या नवीन आर्थिक राक्षसाशी झगडायला मोठी कुमक मिळाली आहे. अनेक बँकांनी संगणक प्रणाली वापरायला सुरुवात केली आहे. पण याचा खरेच किती उपयोग झाला आहे हा एक नवीन वादाचा मुद्दा आहे.
वोल्फ बर्ग या आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वानुसार आज बँकांनी किमान काही गोष्टी करण्याची गरज आहे. त्यात म्हणजे आपल्या कर्मचाऱ्यांना या विषयावरच सर्वोत्तम प्रशिक्षण द्यायला हवे आहे. संगणक प्रणाली वापरली म्हणजे सगळे प्रश्न सुटतात हा भ्रम काढून टाकायला हवा आहे. मनीलॉण्डरिंग करायचे तंत्रज्ञान रोज बदलत आहे. ते आत्मसात करायलाच हवे.
निश्चलनीकरणामुळे रोज वाढणाऱ्या दंडाच्या रकमांमुळे अनेक आर्थिक तज्ज्ञ पैशाचा रंग बदलायच्या शकला लढवत आहेत. यामधूनच मनीलॉण्डरिंग शोधण्याची आस असलेल्या विद्यार्थ्यांसाठी नवीन संधी उपलब्ध होत आहेत. बँकांना सेवा पुरवणाऱ्या तंत्रज्ञान कंपन्या, बँक, आयकर विभाग, पोलीस यंत्रणा आदी ठिकाणी कुशल मनुष्यबळाची निकड भासते आहे, सर्टिफाइड अॅण्टी मनीलॉण्डरिंग एक्स्पर्ट हा अभ्यासक्रम संपवलेले अनेक विद्यार्थी आज मोठय़ा बँक्समध्ये मोठय़ा हुद्दय़ांवर काम करीत आहेत. कॉमर्समध्ये वेगळी वाट चोखाळायची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सर्टिफाइड अॅण्टी मनीलॉण्डरिंग एक्स्पर्ट हा करिअरचा नवा हुकुमी एक्का होऊ पाहत आहे.
First Published on September 22, 2018 4:16 am
Web Title: article about financial fraud scandal
No comments:
Post a Comment