करिअर वार्ता : रोजगारभयाचे भविष्य
‘सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी’ या संस्थेच्या अहवालाने भविष्यातील रोजगारभयाचे सूतोवाच केले आहे.
गेल्या दशकभरापासून, स्मार्ट किंवा स्मार्टपणाकडे झुकणाऱ्या सर्व शहरगावांमध्ये खाण्याचे ताळतंत्र जसे सुटलेय तसेच शिक्षण आणि रोजगाराच्या नातेसंबंधांतही फारकत आली आहे. मणभर शिकूनही आवश्यक कौशल्याअभावी लाखो पदवीधर बेरोजगार आहेत. मोठा बोलबाला झालेले कौशल्य विकास अभियानही या तरुणांना योग्य असा रोजगार मिळवून देण्यासाठी तोकडे पडत असल्याचे दिसत आहे.
‘सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी’ या संस्थेच्या अहवालाने भविष्यातील रोजगारभयाचे सूतोवाच केले आहे. या अहवालानुसार भारतात तीन कोटी दहा लाख इतके तरुण बेरोजगार आहेत. युरोपातील एखाद्या देशातील लोकसंख्येहून आपल्या देशातील बेरोजगारांची ही आकडेवारी सध्या शिक्षण घेत असलेल्या पिढीच्या पोटात गोळा आणणारी आहे. कारण अमेरिकेतील एका खासगी संस्थेने रोजगार बाजाराच्या अभ्यासावरून काढलेल्या निष्कर्षांनुसार भारतात २०२१पर्यंत माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात साडेसहा लाख लोकांना नोकरी गमावण्याची वेळ येणार आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आणखी एका अहवालानुसार जगात गेल्या काही वर्षांमध्ये ४७ कोटी क्रयशील वयोगटापैकी अवघ्या १० टक्के लोकांना रोजगार मिळू शकला आहे. म्हणजेच जी स्थिती देशात आहे, तीच जगातील कित्येक राष्ट्रांमध्ये सध्या चिंतेचे वातावरण पसरवत आहे.
आपल्या देशातील रोजगारस्थिती सुधारण्यासाठीच प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना आखण्यात आली. त्यानुसार २०२० पर्यंत एक कोटी तरुणाईचा कौशल्य विकास करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात पदरी अपयश आलेल्या या योजनेची दुसऱ्या टप्प्यात प्रगतिशील वाटचाल सध्यातरी दिसत नाही. कारण मुळात रोजगारक्षमता ही मनुष्यबळापेक्षा कमी असून वाढत्या यांत्रिकीकरणामुळे नोकऱ्यांची संख्या घटत आहे. त्यामुळे उंचावलेल्या क्षमता आणि कौशल्यांनीही पुढील पिढी टिकाऊ रोजगार मिळवू शकेल का, याचे उत्तर देता येणे शक्य नाही.
संकलन – रसिका मुळ्ये
First Published on September 15, 2018 4:03 am
Web Title: article about employment future
No comments:
Post a Comment