नवनीत
गुणग्राहक सयाजीराव
Published: Monday, July 6, 2015
विविध कलाकारांना राजाश्रय देऊन महाराजा सयाजीरावांनी
बडोद्यातील आपल्या लक्ष्मीविलास पॅलेसच्या दरबार हॉलमध्ये चित्रप्रदर्शने,
शिल्प प्रदर्शने, गायन-संगीताचे जलसे भरविले. मराठी नाटक मंडळींना ते
वर्षांसन देऊन नाटकांचे प्रयोग बडोद्यात करीत. बालगंधर्वानी आपली स्वतंत्र
नाटक कंपनी काढली तेव्हा महाराजांनी त्यांच्या गंधर्व नाटक कंपनीला ५,०००
रुपये वर्षांसन सुरू केले. नाटकाच्या जाहिरातींवर व तिकिटांवरही
महाराजांच्या आश्रयाचा उल्लेख केला जाई. १९१९ साली गंधर्व कंपनीने 'एकच
प्याला' या नाटकाचा पहिला प्रयोग सयाजीरावांच्या उपस्थितीत सादर केला. या
नाटकातील सिंधूची भूमिका बालगंधर्वानी तर सुधाकरची भूमिका गणपतराव बोडसांनी
साकारली होती. महाराज या दोघांच्या अभिनयावर इतके खूश झाले की, नाटक
मंडळीला त्यांनी वर्षांसनाशिवाय एक हजार रुपये वाढवून दिले. 'एकच प्याला'चे
लेखक गडकरी या प्रयोगाच्या वेळी आजारी होते. इतर नाटक कंपन्यांचेही प्रयोग
बडोद्यात नेहमी होत. सयाजीरावांच्या पत्नी चिमणाबाईही नाटय़ कलावंतांना
उत्तेजन देत. बालगंधर्वाना त्या आपली शाही वस्त्रे आणि अलंकारही
नाटय़प्रयोगासाठी देत. ऐतिहासिक नाटकांमधील पात्रांचा पोशाख, अलंकार,
नाटकांचे सेट्स कसे असावेत याविषयी सयाजीराव नाटय़निर्माते, दिग्दर्शकांना
सूचना देत असत. तशा प्रकारची वेशभूषा, बठकीची व्यवस्था असलेल्या म्हैसूर,
ग्वाल्हेर, इंदूर इत्यादी ठिकाणी अवलोकन करण्यासाठीही नाटय़निर्मात्यांना
महाराजांनी पाठविले. सयाजीराव स्वत: उच्च दर्जाचे जाणते प्रेक्षक असल्याने
अनेक नाटककारांनी त्यांच्या सूचना स्वीकारून तसे बदल केले. कलाभिरुची
असलेल्या महाराजा सयाजीरावांनी कलेच्या क्षेत्रात बडोद्याला अग्रकम मिळवून
दिल्यामुळे पुढच्या काळातही कलाकार, कारागीर बडोद्याला आपले माहेरघर समजत
आले आहेत.सुनीत पोतनीस - sunitpotnis@rediffmail.com
No comments:
Post a Comment