नवनीत
कुतूहल - वात साचा किंवा पंखाच्या चात्याचा साचा
Published: Thursday, July 9, 2015
खेचण साच्यामधून बाहेर पडणारा पेळू हा सूत बनविण्यासाठी
योग्य प्रकारे तयार झालेला असतो. आता या पुढे या पेळूची जाडी कमी करून
त्याला पीळ दिला की सूत तयार होते. पेळूची जाडी ही त्यापासून तयार
करावयाच्या सुताच्या जाडीपेक्षा २०० ते ५०० पटीने अधिक असते. त्यामुळे सूत
बनविण्यासाठी अंतिम खेचण साच्यामधून बाहेर पडणाऱ्या पेळूची जाडी ही २०० ते
५०० पटीने कमी करणे गरजेचे असते. एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर जाडी कमी करणे
एकाच टप्प्यात शक्य नसते म्हणून ती दोन टप्प्यांत केली जाते. पहिला टप्पा
हा वात साचा हा होय आणि दुसरा किंवा शेवटचा टप्पा हा बांगडी साचा हा होय.
वात साच्याला गिरणीमध्ये भिंगरी साचा असेही संबोधले जाते.पूर्वीच्या काळी जेव्हा वात साच्याची पेळू बारीक करण्याची क्षमता कमी होती त्या वेळी एकामागोमाग एक असे तीन वात साचे वापरले जात असत. त्यांना प्राथमिक साचा (स्लबर फ्रेम), अंतरिम साचा (इंटरमिडिएट फ्रेम) आणि अंतिम किंवा वात साचा (रोविंग फ्रेम) असे म्हणत असत. वात साच्यातील आधुनिकीकरणामुळे आज वात साच्याची खेचण क्षमता वाढली आहे त्यामुळे आज एकच वात साचा वापरला जातो आणि त्याला वात साचा, पंखाच्या चात्याचा साचा किंवा गती साचा असे म्हटले जाते. या साच्यावर पेळूची जाडी सुमारे ८ ते १४ पटीने काम केली जाते.
अंतिम खेचण साच्यातून बाहेर पडणारा पेळू डब्यामध्ये भरून ते डबे वात साच्याच्या मागे ठेवून वात साच्याला पुरविला जातो. हा पेळू पुढे खेचण रुळांमधून पाठवून, या रुळांच्या साहाय्याने त्याची जाडी ८ ते १४ पटीने कमी केली जाते. जाडी कमी केल्यानंतर त्या पेळूला वात असे म्हणतात. या वातीची जाडी इतकी कमी असते की तिची ताकद अगदी कमी असते. म्हणून तिला थोडासा पीळ देऊन ती बॉबिनवर गुंडाळावी लागते. हा पीळ देण्यासाठी आणि वात बॉबिनवर गुंडाळण्यासाठी पंखाच्या चात्याचा वापर केला जातो. या यंत्रावर तयार होणाऱ्या बॉबिनला वातीची बॉबिन असे म्हणतात.
- चं. द. काणे (इचलकरंजी)मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org
No comments:
Post a Comment