Wednesday, July 15, 2015

नवनीत [Print] [Email] कुतूहल : केळ्याबद्दल गरसमज

नवनीत

कुतूहल : केळ्याबद्दल गरसमज

Published: Thursday, December 6, 2012
दवाखाना बंद करणार एवढय़ात एक बाई तिच्या मुलीला घेऊन आली. तिचे डोळे लाल झाले होते, तिला सर्दी झाली होती. या सीझनला अशी सर्दी होतेच. तिला तर सर्दी २-३ वर्षांने झालेली दिसत होती. पण दवाखान्यात आई-मुलीत वेगळाच वाद चालू होता. आई मुलीला सांगत होती की रोज एक-दोन केळी खाल्लीच पाहिजेत. तीसुद्धा सालावर काळे ठिपके पडलेली. ती मस्त गोड लागतात. पण गेले तीन-चार महिने ही मुलगी केळीच खात नाही. का ते आईला समजत नव्हते. डॉक्टर बाईंना म्हणाले, मी हिला तपासतो व औषध देतो. डॉक्टर म्हणाले, सध्याचे युग विज्ञानाचे आहे. झाडावर फळे पिकायला लागतात तसा त्यांच्यात इथिलीन वायू निर्माण होतो. त्याचा वास मधुर असतो. त्या वासामुळे चिलटे होतात. निसर्ग असे सिग्नल्स देत असतो. आपण ते सिग्नल्स ओळखण्याची ताकद आपल्यात निर्माण करायची असते. म्हणजे असे सिग्नल्स ओळखता येतात. केळी पिकू लागली की सालावर काळे ठिपके पडू लागतात, पण त्यातच प्रतिकारशक्ती वाढवणारी द्रव्ये असतात. हल्ली संशोधनात असे आढळून आले आहे की, पिकलेल्या केळ्यात तीएन एफ नावाचे रासायनिक द्रव्य तयार होते. या द्रव्यामुळे त्रासदायक पेशी नष्ट होतात किंवा त्यांच्या वाढीला आळा बसतो. केळ जितके पिकेल तेवढे त्याच्यावर जास्त डाग पडतील आणि तेवढी त्याच्यात जास्त प्रतिकारशक्ती निर्माण होते. कार्न्‍सच्या पेशीही त्रासदायक असतात, पण तीएन एफमुळे कार्न्‍सच्या पेशी नष्ट होतील किंवा त्यांच्या वाढीला आळा बसेल. केळ जितके पिकेल तेवढे त्याच्यावर जास्त डाग पडतील आणि तेवढी त्याच्यात कार्न्‍सच्या विरोधात प्रतिकारशक्ती जास्त. नुसत्या कार्न्‍सविरोधातच नाही तर एकंदरीतच सर्व रोगांना ते प्रतिकारक असते. पण बरेच लोक म्हणतात की केळ खाल्ले की सर्दी होते हे चुकीचे आहे. केळ्याने सर्दी होत नाही, उलट प्रतिकारशक्ती वाढते. केळ्यात व्हिटॅमिन ए, लोह, क्षार, कॅल्शियम, फॉस्फरस, तंतू इ. आवश्यक प्रमाणात असतात. केळ्याने बद्धकोष्ठ होत नाही. त्यातील तंतूमुळे मल पुढे ढकलला जातो. त्यामुळे कॉन्स्टिपेशन होत नाही. असे हे केळे बहुगुणी आहे.
डॉ. शशिकांत प्रधान
मराठी विज्ञान परिषद, पुरव मार्ग, चुनाभ ट्टी,
मुंबई २२
office@mavipamumbai.org

Monday, July 13, 2015

नवनीत

सयाजीरावांची चतुराई

Maharaja Sayajirao gaekwad
Published: Monday, June 29, 2015
बडोदा नरेश सयाजीराव जटिल समस्यांमधून सहजतेने मार्ग काढण्यात माहीर होते. शहरातला 'रावपुरा रोड' हा वाहतुकीचा रस्ता अत्यंत अरुंद आहे आणि त्यामुळे वाहतुकीला अडथळा होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. या रस्त्याच्या रुंदीकरणाची योजना त्यांनी नक्की केली. हे काम सुरू करण्याआधी एक मोठा गुंतागुंतीचा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला. एका ठिकाणी रस्त्यामध्येच मौलानाबाबाची कबर होती. कबर रस्त्यातून काढून परस्पर दुसरीकडे हलविली तर समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या जातात. हा संवेदनशील प्रश्न महाराजांनी मोठय़ा चतुराईने सोडविला. त्यांनी आपल्या ज्येष्ठ मुस्लीम अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडूनच ती कबर रस्त्याच्या कामाच्या जागेपासून १०० फुटांवरील मोकळ्या जागेवर रात्रीतूनच हलवून घेतली. त्या अधिकाऱ्यांनीच दुसऱ्या दिवशी सकाळी अफवा पसरविली की, रात्रीतून मौलानाबाबाची कबर आपोआप दुसरीकडे गेली, चमत्कार झाला!  दुसऱ्या दिवशी मोहोल्ल्यातल्या सर्व मुस्लीम बांधवांच्या उपस्थितीत समारंभपूर्वक महाराजांनी कबरीवर चादर चढवून तिथल्या व्यवस्थेसाठी देणगी दिली!
महाराजांच्या चातुर्याचा एक किस्सा बादशाह पंचम जॉर्जच्या बडोदा भेटीप्रसंगी घडलेला मनोरंजक आहे. पंचम जॉर्ज आणि महाराणी राजवाडा पाहत असताना दरबार हॉलच्या प्रवेशद्वाराच्या आतील सोन्याचे दोन सिंह पाहून थबकले! महाराणी मेरीची त्यावेळची लोभी नजर पाहून महाराज काय ते बरोबर उमजले. पंचम जॉर्जची बडोदाभेट संपल्यावर महाराजांनी त्वरित ते सोन्याचे सिंह वितळवून त्याचे सोने संस्थानाच्या खजिन्यात जमा केले. आठ दहा दिवसांनी महाराजांना व्हाइसरॉयचे पत्र आले की, 'आपल्या दरबारातील सोन्याचे सिंह राणीसाहेबांना आवडले. त्यांच्या बकिंगहॅम पॅलेसमध्ये ठेवण्यासाठी ते आमच्याकडे त्वरित पाठवावे म्हणजे मग आम्ही ते लंडनला पाठवू.' चतुर महाराजांनी कळविले की, 'आíथक टंचाईमुळे आम्ही ते वितळवून टाकले आहे. राणीसाहेबांनी सिंहांबद्दल आधी कळविले असते तर आम्ही आनंदाने पाठविले असते!'
सुनीत पोतनीस - sunitpotnis@rediffmail.com

नवनीत [Print] [Email] संस्थानांची बखर - सयाजीरावांची कलासक्ती

नवनीत

संस्थानांची बखर - सयाजीरावांची कलासक्ती

arts and crafts conservation by Sayajirao
Published: Tuesday, June 30, 2015
राजेपद मिळण्यापूर्वी खेडय़ात राहणाऱ्या, अशिक्षित गोपाळने आपल्या कुशाग्र बुद्धीने केवळ सहा वर्षांत पुस्तकी शिक्षणाबरोबर अनेक गोष्टी आत्मसात केल्या. पुढे आपल्या कारकीर्दीत चोख प्रशासनाबरोबर सांस्कृतिक क्षेत्रातही अनेक कलांचे संवर्धन महाराजा सयाजीरावांनी केले. त्यांचे वय १८ वष्रे झाल्यावर त्यांचा विवाह तंजावरचे सरदार मोहिते यांची कन्या लक्ष्मीबाई उर्फ चिमणाबाई प्रथम हिच्याशी झाला.
त्या काळात संस्थानिकांकडे असलेले दरबारी नर्तक, कवी, संगीतकार, कलाकार हे त्या संस्थानिकाचे भूषण समजले जाई. काही ठिकाणी विवाहप्रसंगी देण्याच्या हुंडय़ामध्ये नर्तक, गायक, यांचाही समावेश होता. चिमणाबाई (प्रथम) स्वत भरतनाटय़म् आणि कर्नाटक संगीतामध्ये जाणकार होती. लग्नानंतर चिमणाबाईने आपल्याबरोबर नर्तक गायकांचा एक संच बडोद्याला आणला. त्यात नटवनर अप्पास्वामी आणि त्याची पत्नी कांतिमती हे प्रमुख होते. अप्पास्वामीच्या मृत्यूनंतर कांतीमती आणि तिचा मुलगा कुबेरनाथ हे बडोदा सोडून दाक्षिणात्य चित्रपट उद्योगात गेले होते. परंतु राजे प्रतापसिंगांच्या आग्रहावरून बडोद्यातील कलाभवन पॅलेसमध्ये संगीत शिक्षक म्हणून परत आले.
पुढे कुबेरनाथ तांजोरकरांनी त्यांचा मुलगा रमेश तांजोरकर याच्याबरोबर स्वतची तांजोर डान्स म्युझिक अँड आर्ट रिसर्च सेंटर ही कलाशिक्षणाची संस्था स्थापन केली. सयाजीरावांनी बडोद्यात कलेचे शिक्षण देण्यासाठी कलाभवन ही संस्था सुरू केली. या संस्थेत त्यांनी चित्रकला, शिल्पकला, रंगकाम, विणकाम इत्यादी विषयांचे वर्ग सुरू केले. पुढे या संस्थेत भारतीय संगीत, भरतनाटय़म्, वाद्यवादन यांचेही शिक्षण सुरू झाले.
सुनीत पोतनीस -sunitpotnis@rediffmail.com

नवनीत

कुतूहल - सौम्य स्वच्छक यंत्रे - भाग १

Mild cleaner machines
Published: Wednesday, July 1, 2015
या यंत्रामध्ये कापसावर केली जाणारी प्रक्रिया ही सौम्य असते. यासाठी या यंत्रामध्ये दोन रुळांच्या भरवणी यंत्रणेचा उपयोग केला जातो. सौम्य स्वच्छक यंत्रामध्ये वापरण्यात येणारा आघातक हा पोकळ व कमी वजनाचा असून त्यावरील दांडेसुद्धा पोकळ असून संख्येने कमी असतात. आघातकाची फिरण्याची गतीसुद्धा कमी असते (सुमारे ४०० ते ६०० फेरे प्रति मिनिट).
सौम्य उकलकाची प्रक्रिया फारशी तीव्र नसल्यामुळे या यंत्रात कापूस फार मोठय़ा प्रमाणावर सुटा किंवा मोकळा केला जात नसला तरी कापसातील कचरा मात्र फार मोठय़ा प्रमाणावर वेगळा केला जातो.
एखाद्या यंत्रास पुरविलेल्या कापसामध्ये जो कचरा असतो त्यापकी किती टक्के कचरा ते यंत्र काढून टाकते त्यास त्या यंत्राची स्वच्छता कार्यक्षमता असे म्हणतात. सौम्य स्वच्छक यंत्राची स्वच्छता कार्यक्षमता सुमारे २५% ते ३५% इतकी असते. खरे म्हणजे कापसात जो कचरा असतो तो, कापसाचे गठ्ठे किंवा पुंजके सल किंवा मोकळे केल्याशिवाय, सुटा होत नाही. परंतु कापसातील कचऱ्यापकी काही कचरा हा माती, वाळू, दगड, कापसाच्या बिया अशा स्वरूपात असतो. अशा प्रकारचा कचरा कापसाच्या तंतूंबरोबर गुंतत नाही. त्यामुळे कापूस थोडासा सल करून तो जोराने हलविल्यास अशा प्रकारचा कचरा खाली पडतो. हीच प्रक्रिया सौम्य स्वच्छकाच्या बाबतीत घडते आणि कचरा फार मोठय़ा प्रमाणावर वेगळा केला जातो. कापसापासून वेगळा केला गेलेला कचरा बाजूला करण्यासाठी आघातकाच्या खालील बाजूस आघातकाच्या परिघाशी समांतर अशी दांडय़ाची जाळी बसविलेली असते. त्यामधून सुटा झालेला कचरा खाली पडतो. या यंत्रामध्ये मोठय़ा प्रमाणावर कचरा खाली पडत असल्यामुळे त्या कचऱ्याला पुरेशी जागा देण्यासाठी दांडय़ाच्या जाळीचे आकारमानही मोठे असते. आघातकाच्या परिघाच्या सुमारे ६०% ते ७०% जागा ही दांडय़ाच्या जाळीने व्यापलेली असते. काही सौम्य स्वच्छक यंत्रामध्ये दोन किंवा अधिक आघातक वापरण्यात येतात. यामुळे कचरा खाली पडण्यास पुरेशी जागा मिळते. काही स्वच्छक यंत्रात वैशिष्टय़पूर्ण रचनेमुळे कापूस आघातकाच्या सभोवार दोन ते तीन वेळा फेरे घेतो. साहजिकच तो दांडय़ाच्या जाळीवरून तितक्याच वेळा जातो. याप्रमाणे कचरा खाली पडण्यास पुरेशी जागा व अवधी मिळतो.
चं. द. काणे  (इचलकरंजी) मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

नवनीत [Print] [Email] बडोद्याचा 'लक्ष्मीविलास पॅलेस'

नवनीत

बडोद्याचा 'लक्ष्मीविलास पॅलेस'

samnstanikanchi bakhar Laxmi Vilas Palace Vadodara
Published: Thursday, July 2, 2015
बडोद्याचे महाराज सयाजीराव तृतीय यांनी आपल्या कारकीर्दीत बडोदा राज्य वैभवसंपन्न केले, त्याचप्रमाणे आकर्षक भव्य इमारती, उद्याने, हिरवळीची मदाने, कारंजी, रुंद रस्ते तयार करून बडोदा शहर सुशोभित केले. त्यांनी बांधलेल्या इमारतींमध्ये 'लक्ष्मीविलास पॅलेस' या राजवाडय़ाच्या वास्तूचा सर्वात वरचा क्रमांक लागतो.
७०० एकर परिसरात मध्यभागी बांधलेला या राजवाडय़ात राज्यकर्त्यांचे निवासस्थान आणि राजदरबाराचा दिवाणखाना होता. सयाजीरावांनी मेजर माँट या ब्रिटिश इंजिनीअरकडून या वास्तूचा आराखडा तयार करून घेतला. १८९० साली बांधून पूर्ण झालेल्या लक्ष्मीविलास पॅलेससाठी सोनगडच्या खाणीतून तांबूस रंगाचा दगड आणला होता. ५०० फूट लांब आणि २०० फूट रुंद बांधकाम असलेल्या या राजवाडय़ाच्या मनोऱ्याची उंची आहे २०४ फूट. राजदरबाराच्या मुख्य दिवाणखान्याचे आकारमान आहे ९४ फूट लांब, ५४ फूट रुंद व २२ फूट उंच. खास व्हेनिसहून आणलेल्या फरशा दरबार हॉलमध्ये बसविण्यासाठी व्हेनिसचेच बारा कारागीर अठरा महिने काम करीत होते. या दरबार हॉलच्या प्रत्येक कोपऱ्यात इटालियन शिल्पकार फेलीची याने बनविलेले संगमरवरी पुतळे असून राजघराण्यातील स्त्रियांना बसण्यासाठी हॉलच्या पहिल्या मजल्यावर गॅलऱ्या आहेत.
राजवाडय़ातील संपूर्ण फíनचर फ्रान्समध्ये तयार केलेले असून दक्षिणेकडील भागात महाराजांचे निवासस्थान आहे. विशेष म्हणजे त्या काळात तिसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी विजेवर चालणाऱ्या लिफ्टची सोय होती.
'लक्ष्मीविलास'च्या परिसरात असलेल्या मोतीबाग पॅलेस आणि फतेहसिंग म्युझियम या भव्य इमारतींमध्ये शस्त्रागार आणि महान चित्रकार राजा रविवर्मा यांनी चितारलेली तलचित्रे आहेत. राजवाडय़ाभोवतीच्या परिसरात असलेली उद्याने, हिरवळीची कुरणे आणि कारंजी विल्यम गोल्डिरग या ब्रिटिश उद्यानतज्ज्ञाने तयार केली आहेत.
सुनीत पोतनीस - sunitpotnis@rediffmail.com

नवनीत [Print] [Email] गुणग्राहक सयाजीराव

नवनीत

गुणग्राहक सयाजीराव

maharaja sayajirao of baroda
Published: Monday, July 6, 2015
विविध कलाकारांना राजाश्रय देऊन महाराजा सयाजीरावांनी बडोद्यातील आपल्या लक्ष्मीविलास पॅलेसच्या दरबार हॉलमध्ये चित्रप्रदर्शने, शिल्प प्रदर्शने, गायन-संगीताचे जलसे भरविले. मराठी नाटक मंडळींना ते वर्षांसन देऊन नाटकांचे प्रयोग बडोद्यात करीत. बालगंधर्वानी आपली स्वतंत्र नाटक कंपनी काढली तेव्हा महाराजांनी त्यांच्या गंधर्व नाटक कंपनीला ५,००० रुपये वर्षांसन सुरू केले. नाटकाच्या जाहिरातींवर व तिकिटांवरही महाराजांच्या आश्रयाचा उल्लेख केला जाई. १९१९ साली गंधर्व कंपनीने 'एकच प्याला' या नाटकाचा पहिला प्रयोग सयाजीरावांच्या उपस्थितीत सादर केला. या नाटकातील सिंधूची भूमिका बालगंधर्वानी तर सुधाकरची भूमिका गणपतराव बोडसांनी साकारली होती. महाराज या दोघांच्या अभिनयावर इतके खूश झाले की, नाटक मंडळीला त्यांनी वर्षांसनाशिवाय एक हजार रुपये वाढवून दिले. 'एकच प्याला'चे लेखक गडकरी या प्रयोगाच्या वेळी आजारी होते. इतर नाटक कंपन्यांचेही प्रयोग बडोद्यात नेहमी होत. सयाजीरावांच्या पत्नी चिमणाबाईही नाटय़ कलावंतांना उत्तेजन देत. बालगंधर्वाना त्या आपली शाही वस्त्रे आणि अलंकारही नाटय़प्रयोगासाठी देत. ऐतिहासिक नाटकांमधील पात्रांचा पोशाख, अलंकार, नाटकांचे सेट्स कसे असावेत याविषयी सयाजीराव नाटय़निर्माते, दिग्दर्शकांना सूचना देत असत. तशा प्रकारची वेशभूषा, बठकीची व्यवस्था असलेल्या म्हैसूर, ग्वाल्हेर, इंदूर इत्यादी ठिकाणी अवलोकन करण्यासाठीही नाटय़निर्मात्यांना महाराजांनी पाठविले. सयाजीराव स्वत: उच्च दर्जाचे जाणते प्रेक्षक असल्याने अनेक नाटककारांनी त्यांच्या सूचना स्वीकारून तसे बदल केले. कलाभिरुची असलेल्या महाराजा सयाजीरावांनी कलेच्या क्षेत्रात बडोद्याला अग्रकम मिळवून दिल्यामुळे पुढच्या काळातही कलाकार, कारागीर बडोद्याला आपले माहेरघर समजत आले आहेत.
सुनीत पोतनीस - sunitpotnis@rediffmail.com

नवनीत [Print] [Email] कुतूहल - विपिंजण यंत्र (कार्डिग यंत्र)

नवनीत

कुतूहल - विपिंजण यंत्र (कार्डिग यंत्र)

Carding Machine
Published: Tuesday, July 7, 2015
पिंजण विभागात कापसाचे लहान लहान सुटे पुंजके तयार होतात आणि कापसातील ६०% ते ८०% कचरा काढून टाकला गेलेला असतो. कापूस सूत बनविण्याच्या योग्यतेचा करण्यासाठी कापूस संपूर्णपणे मोकळा म्हणजे प्रत्येक तंतू एकमेकांपासून सुटा करणे आणि त्याचबरोबर कापसातील राहिलेला कचरा काढून टाकून कापूस १००% स्वच्छ करणे गरजेचे असते. हे कार्य विपिंजण यंत्रामध्ये केले जाते. विपिंजण यंत्राला पिंजण यंत्रणेकडून कापूस लॅपच्या रूपात किंवा नळ्याच्या साहाय्याने थेट पुरविला जातो.
या यंत्रात कापूस गेल्यानंतर करवती दाते असलेल्या विविध आघातक आणि पट्टय़ा यांच्या प्रक्रियेमुळे कापसाचे तंतू एकमेकांपासून पूर्णपणे सुटे केले जातात आणि कापसातील संपूर्ण कचरा काढून टाकला जातो. वििपजण यंत्रात कचऱ्याबरोबर काही आखूड तंतू आणि कापसातील गाठीदेखील काढून टाकल्या जातात. त्यामुळे सुताचा दर्जा उंचावण्यात मदत होते.
विपिंजण यंत्रातून शेवटी कापसाचा पेळू तयार केला जातो व तो एका पिंपामध्ये साठविला जातो. या यंत्रामध्ये प्रथमच कापसापासून सलग असा पेळू तयार केला जातो. सूत कातण्याच्या प्रक्रियेची ही पहिली पायरी आहे. कारण पेळू हा सुताप्रमाणे सलग व अखंड पेड असतो. फक्त याची जाडी सुतापेक्षा अनेक पटींनी जास्त असते. त्यामुळे पुढील प्रक्रियांमध्ये पेळूची जाडी कमी करत नेऊन शेवटी सूत कातता येते.
गेल्या १०० वर्षांमध्ये विपिंजण यंत्रामध्ये अनेक बदल झाले आहेत. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला वििपजण यंत्राचे उत्पादन हे ५ ते ७ किलो प्रति तास इतके होते तर आजच्या विपिंजण यंत्राचे उत्पादन हे १२० किलो प्रति तासपर्यंत पोहोचले आहे. पूर्वीच्या वििपजण यंत्राला कापूस हा लॅपच्या रूपात पुरविला जात असे तर आजच्या विपिंजण यंत्राला पिंजण यंत्रणेपासून थेट नळ्याच्या साहाय्याने सलगपणे कापूस पुरविला जातो. या यंत्रामध्ये पेळूची जाडी ही नियंत्रित करता येते. जर तलम सूत बनवायचे असेल तर पेळूची जाडी कमी ठेवावी लागते आणि सूत जाडे भरडे बनवायचे असेल तर पेळूची जाडी जास्त ठेवावी लागते.
चं. द. काणे  (इचलकरंजी) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

Sunday, July 12, 2015

नवनीत [Print] [Email] संस्थानांची बखर - राजकोट राज्य स्थापना

नवनीत

संस्थानांची बखर - राजकोट राज्य स्थापना

Rajkot state foundation
Published: Wednesday, July 8, 2015
आजच्या गुजरात राज्यातील चौथ्या क्रमांकाचे शहर राजकोट, हे ब्रिटिशराजच्या काळात महत्त्वाचे संस्थान होते. जामनगरचे राजे सताजी जडेजा यांचा नातू विभोजी याने १६२० साली हे राज्य स्थापन केले. या प्रदेशात पूर्वी प्रथम महमूद गझनवीचे आणि नंतर महमूद बेगडा याचे राज्य होते. जामनगरच्या फौजेचे मोगलांशी १५९० साली युद्ध झाले, त्यात विभोजीचे वडील मारले जाऊन विभोजीला कैद करून दिल्लीस नेण्यात आले. कैदेतून सुटका झाल्यावर विभोजी हा बादशाह शाहजहानच्या फौजेत भरती झाला. मोगल सन्यात उत्तम कामगिरी केल्यामुळे विभोजीला कलवाड, अरडोई वगरे बारा गावे इनाम मिळाली. विभोजीने आपला सहकारी राजू सांधी याच्या मदतीने या इनाम प्रदेशात नवे राज्य स्थापन केले, पण त्याच वेळी राजूचा मृत्यू झाला व त्याच्या नावाने विभोजीने आपल्या राज्याची राजधानी राजकोट वसविली. विभोजी यांची कारकीर्द सन १६२० ते १६३५ अशी झाली.
पुढे विभोजी यांचा मुलगा मेहरामनजी (प्रथम)ला मोगलांनी गुजरातची सुभेदारी देऊन काही प्रदेशाची जहागिरी दिली. १७२० साली जुनागढचा नवाब मासूम खानने आक्रमण करून राजकोट घेतले व त्याचे नाव बदलून 'मासुमाबाद' केले. मासूम खानाने मजबूत आणि प्रचंड मोठा किल्ला बांधून बारा वष्रे राज्य केल्यावर ठाकूरजी रणमाळजी जडेजाने १७३२ साली त्या राज्यावर परत अंमल बसवून राज्याचे व राजधानीचे नाव पूर्ववत 'राजकोट' असे केले. १७४६ साली गादीवर आलेल्या लाखाजी रणमाळजीच्या कारकीर्दीत जडेजा घराण्यातल्या लोकांमध्ये सतत संघर्ष होत राहिला व अखेरीस ठाकूर रणमाळजी (द्वितीय)ने १८०७ साली कंपनी सरकारशी 'संरक्षण करार' करून त्यांची तनाती फौज राखली.
सुनीत पोतनीस - sunitpotnis@rediffmail.com

नवनीत [Print] [Email] संस्थानांची बखर - राजकोट संस्थानाचे विलीनीकरण

नवनीत

संस्थानांची बखर - राजकोट संस्थानाचे विलीनीकरण

Merger of Rajkot Institution
Published: Friday, July 10, 2015
१९४० साली राजकोट संस्थानचा राजा धर्मेद्रसिंहजी सिंहाची शिकार करताना स्वतच शिकार झाला आणि त्याच्या छळवादातून जनतेची सुटका झाली. धर्मेद्रसिंह नंतर गादीवर आलेला त्याचा भाऊ प्रद्युम्नसिंहजी हा उत्तम प्रशासक आणि प्रजाहितदक्ष राजा होता. त्याने राज्यात अनेक सुधारणा करण्यास सुरुवात केली, पण त्याच काळात दुसरे महायुद्ध सुरू होऊन विकास योजनांच्या कार्यवाहीला खीळ बसली. युद्धाची धुमश्चक्री संपल्यानंतर भारतीय स्वातंत्र्य चळवळ, आंदोलने इत्यादींनी गजबजलेल्या काळात प्रद्युम्नसिंहजी काही नवीन करू शकले नाहीत.
१५ फेब्रुवारी १९४८ रोजी राजकोट संस्थान स्वतंत्र भारतात विलीन झाले. ७३० चौ.कि.मी. राज्यक्षेत्र असलेल्या या संस्थानाची लोकसंख्या १९२१ साली ६१००० होती.  ३४ खेडी अंतर्भूत असलेल्या या राज्याला  ब्रिटिशांनी नऊ तोफ सलामींचा मान दिला.
महात्मा गांधींचे वडील काही काळ राजकोट संस्थानचे दिवाण होते. महात्मा गांधी राजकोटला अिहसेवर आधारित स्वातंत्र्य चळवळींची प्रयोगशाळा म्हणत. स्वातंत्र्य आंदोलनविषयक अनेक घटना, अनेक निर्णय यांचे राजकोट राज्य साक्षीदार आहे.
राजकोट स्वतंत्र भारतात विलीन झाल्यानंतर सौराष्ट्र या नवीन प्रांतामध्ये वर्ग केले जाऊन राजकोट शहर या प्रांताची राजधानी करण्यात आली. यू. एन. ढेबर हे सौराष्ट्र प्रांताचे मुख्यमंत्री आणि जामनगरचे जामश्री, राज्यपाल नियुक्त झाले. राजकोटच्या जडेजा राजघराण्याचे सध्याचे वंशज मनोहरसिंहजी गुजरातमधील मोठे राजकीय कार्यकत्रे असून गुजरात विधानसभेवर अनेक वेळा निवडून आले आहेत आणि त्यांनी तिथले आरोग्यमंत्रीपद भूषविले आहे.
सुनीत पोतनीस - sunitpotnis@rediffmail.com

नवनीत [Print] [Email] कुतूहल - वात साचा किंवा पंखाच्या चात्याचा साचा

नवनीत

कुतूहल - वात साचा किंवा पंखाच्या चात्याचा साचा

final process to make yarn
Published: Thursday, July 9, 2015
खेचण साच्यामधून बाहेर पडणारा पेळू हा सूत बनविण्यासाठी योग्य प्रकारे तयार झालेला असतो. आता या पुढे या पेळूची जाडी कमी करून त्याला पीळ दिला की सूत तयार होते. पेळूची जाडी ही त्यापासून तयार करावयाच्या सुताच्या जाडीपेक्षा २०० ते ५०० पटीने अधिक असते. त्यामुळे सूत बनविण्यासाठी अंतिम खेचण साच्यामधून बाहेर पडणाऱ्या पेळूची जाडी  ही २०० ते ५०० पटीने कमी करणे गरजेचे असते. एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर जाडी कमी करणे एकाच टप्प्यात शक्य नसते म्हणून ती दोन टप्प्यांत केली जाते. पहिला टप्पा हा वात साचा हा होय आणि दुसरा किंवा शेवटचा टप्पा हा बांगडी साचा हा होय. वात साच्याला गिरणीमध्ये भिंगरी साचा असेही संबोधले जाते.
पूर्वीच्या काळी जेव्हा वात साच्याची पेळू बारीक करण्याची क्षमता कमी होती त्या वेळी एकामागोमाग एक असे तीन वात साचे वापरले जात असत. त्यांना प्राथमिक साचा (स्लबर फ्रेम), अंतरिम साचा (इंटरमिडिएट फ्रेम) आणि अंतिम किंवा वात साचा (रोविंग फ्रेम) असे म्हणत असत. वात साच्यातील आधुनिकीकरणामुळे आज वात साच्याची खेचण क्षमता वाढली आहे त्यामुळे आज एकच वात साचा वापरला जातो आणि त्याला वात साचा, पंखाच्या चात्याचा साचा किंवा गती साचा असे म्हटले जाते. या साच्यावर पेळूची जाडी सुमारे ८ ते १४ पटीने काम केली जाते.
अंतिम खेचण साच्यातून बाहेर पडणारा पेळू डब्यामध्ये भरून ते डबे वात साच्याच्या मागे ठेवून वात साच्याला पुरविला जातो. हा पेळू पुढे खेचण रुळांमधून पाठवून, या रुळांच्या साहाय्याने त्याची जाडी ८ ते १४ पटीने कमी केली जाते. जाडी कमी केल्यानंतर त्या पेळूला वात असे म्हणतात. या वातीची जाडी इतकी कमी असते की तिची ताकद अगदी कमी असते. म्हणून तिला थोडासा पीळ देऊन ती बॉबिनवर गुंडाळावी लागते. हा पीळ देण्यासाठी आणि वात बॉबिनवर गुंडाळण्यासाठी पंखाच्या चात्याचा वापर केला जातो. या यंत्रावर तयार होणाऱ्या बॉबिनला वातीची बॉबिन असे म्हणतात.
- चं. द. काणे  (इचलकरंजी)मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org