शब्दबोध
एखाद्याची ख्यालीखुशाली विचारणे यासाठी ‘मिजाज- खुशी’ असा शब्दप्रयोग हिंदीत वापरला जातो.
डॉ. अमृता इंदुरकर
मिजास
मूळ अरबी शब्द आहे ‘मिझाज्’ म्हणजे प्रकृती, तब्येत, बुद्धी. लखनौसारख्या हिंदी बहुसंख्य भागात आजही, एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीची ‘जनाब आपका मिझाज कैसा है?’ अशा पद्धतीने चौकशी करते. एखाद्याची ख्यालीखुशाली विचारणे यासाठी ‘मिजाज- खुशी’ असा शब्दप्रयोग हिंदीत वापरला जातो.
इतिहासाचार्य राजवाडे यांनी नमूद केल्याप्रमाणे – ‘खैर आफियत् मिजाज- खुशीचे वर्तमान पुसिले.’ यावरून हे स्पष्ट होते की शिवकाळापर्यंत मराठीत मिजास या शब्दाचा मूळ अरबी अर्थ कायम होता. पण नंतर साहित्यामध्ये मात्र या ‘मिजाज’चा ‘मिजास’ झाला. अभिमानी, गर्विष्ठ, ऐट, दिमाख दाखविणारे अशा अनेक अर्थानी मिजास हा शब्द वापरला जाऊ लागला. ‘सत्तेवर आल्याबरोबर केवढी मिजास दाखवायला लागला तो!’ किंवा ‘वयाने आणि कर्तृत्वाने लहान असताना इतकी मिजास दाखवू नये’ इ. यावरून पुढे एखाद्या उदंड अभिमानी, अहंकारी व्यक्तीचे वर्णन करताना ‘तो फार मिजासखोर आहे.’ असाही शब्दप्रयोग रूढ झाला. सुप्रसिद्ध शाहीर प्रभाकर यांच्या पोवाडय़ामध्ये ‘घूत्कार धुन्द फुन्दात मिजाशित टाकी’ असे वर्णन आले आहे. म्हणजे एखाद्याच्या प्रकृतीची चौकशी करणे हा मूळ सभ्य अर्थ मागे पडून मिजास दाखवणे अशी मूळ अर्थच्युती झालेला अर्थ रूढ झाला.
मेणा
‘युवराजांच्या चौकशीसाठी राजमाता मेण्यात बसून तातडीने गडावर आल्या.’ ऐतिहासिक कादंबऱ्यांमध्ये हमखास वाचनात येणारा हा शब्द. शिवाय मराठीत अनुवादित झालेले जे बंगाली साहित्य आहे त्या कादंबऱ्यांमध्येही – मेण्यात बसून ठाकुराईन जमीनदाराला भेटायला गेल्या असे उल्लेख येतात. मूळ फारसी शब्द ‘मियाना’ म्हणजे डोली किंवा पालखीसारखे परंतु चारी बाजूंनी बंद करता येईल असे पेटीवजा खांद्यावर वाहून न्यावयाचे वाहन. मराठीत यासाठी पालखी शब्द अधिक प्रचलित आहे. कालौघात मियानाचे उच्चारसुलभतेसाठी मेणा झाले. हा मेणा आजच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे श्रेय बऱ्याच अंशी जुन्या हिंदी-मराठी चित्रपटांना नक्कीच द्यायला हवे.
amrutaind79@gmail.com
First Published on September 29, 2018 3:32 am
Web Title: article about vocabulary words 3
No comments:
Post a Comment