Tuesday, January 3, 2017

एमपीएससी मंत्र : पोलीस उपनिरीक्षक (पूर्व) परीक्षेच्या अभ्यास पायऱ्या

एमपीएससी मंत्र : पोलीस उपनिरीक्षक (पूर्व) परीक्षेच्या अभ्यास पायऱ्या

वयोमर्यादेत झालेली वाढ, साधारणत: दोन वर्षांनी आलेली जाहिरात आणि ७५० जागा !

  
वयोमर्यादेत झालेली वाढ, साधारणत: दोन वर्षांनी आलेली जाहिरात आणि ७५० जागा ! पूर्व परीक्षेच्या अभ्यासास मिळालेला चांगला कालावधी.. अशा अनेक बाबींमुळे सुमारे दोन लाख विद्यार्थी पोलीस उपनिरीक्षक (पूर्व) परीक्षेस अर्ज करतील यात जराही शंका नाही. याचा अर्थ असा की, यापकी वर्दीचा मान फक्त ०.०३७५% उमेदवारांनाच मिळणार आहे.
अर्थात, पोलीस उपनिरीक्षक हे पद मिळविण्यासाठीची स्पर्धा प्रचंड आहे. सध्याचे या परीक्षेचे वातावरण पाहता अनेक वर्षांपासून तयारी करणारे विद्यार्थी गाफील आणि हवेत तयारी करीत आहेत. नव्यानेच या परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी भीतीपोटी अभ्यास करीत आहेत. जुने आणि नवीन विद्यार्थी यात बाजी कोण मारणार?  उत्तर सोपे आहे ! ज्याला अभ्यास पायऱ्या माहिती आहेत तोच जिंकणार…
अभ्यास साहित्य, अभ्यासासाठी उपलब्ध वेळ, परीक्षेची पात्रता सर्वासाठी सारखी आहे. मार्गदर्शन आता गल्लीपर्यंत पोहोचले आहे. विद्यार्थी मित्रांनो, अभ्यासाच्या पायऱ्या समजून घ्या आणि हमखास यश मिळवा.
*     १) परीक्षा योजना आणि अभ्यासक्रम समजून घ्या –
पूर्व परीक्षा योजना –
विषय – सामान्यज्ञान क्षमता, प्रश्नांची संख्या -१००, एकूण गुण – १००,    दर्जा -पदवी, माध्यम -मराठी व इंग्रजी, परीक्षेचा कालावधी -१ तास परीक्षेचे स्वरूप – वस्तुनिष्ठ, नकारात्मक गुणदान पद्धती -१-३
पूर्व परीक्षा अभ्यासक्रम –
अभ्यासक्रम –
१)चालू घडामोडी – जागतिक तसेच भारतातील
२)नागरिकशास्त्र – भारतीय राज्यघटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्यव्यवस्थापन व ग्रामव्यवस्थापन (प्रशासन)
३)आधुनिक भारताचा विशेषत: महाराष्ट्राचा इतिहास
४) भूगोल (विशेषत: महाराष्ट्र) – पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश-रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी
५)अर्थव्यवस्था – भारतीय अर्थव्यवस्था राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्रय़ व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती, इत्यादी शासकीय अर्थव्यवस्था, अर्थ संकल्प, लेखा, लेखापरीक्षण इत्यादी.
६) सामान्य विज्ञान – भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणिशास्त्र, वनस्पतिशास्त्र, आरोग्यशात्र
७) बुद्धिमापन चाचणी आणि अंकगणित –
परीक्षा योजना आणि अभ्यासक्रमाचे विश्लेषण केले असता असे लक्षात येते की, परीक्षेचा दर्जा पदवी असल्यामुळे परीक्षेत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची काठिण्यपातळी राज्यसेवा परीक्षेप्रमाणे कठीण असणार आहे. अभ्यासक्रम आणि प्रश्नसंख्या यांचा विचार करता एका घटकावर सुमारे १५ प्रश्न परीक्षेत विचारले जाऊ शकतात.
*     जुन्या प्रश्नपत्रिकांचे अभ्यासातील महत्त्व
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे विविध स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात यापकी पोलीस उपनिरीक्षक, विक्रीकर निरीक्षक आणि सहायक कक्षाधिकारी या तिन्ही पदांच्या पूर्वपरीक्षांचा अभ्यासक्रम आणि विषयांची काठिण्यपातळी एकसारखी आहे.
शिवाय राज्यसेवा (पूर्व) परीक्षेची काठिण्यपातळीही सारखीच आहे. या चारही प्रकारच्या पूर्व परीक्षांच्या जुन्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. अभ्यासाअंती कोणत्या घटकांवर (विषयावर) कसा प्रश्न विचारला जातो हे उमेदवारांच्या लक्षात येईल. हे लक्षात आल्याशिवाय नेमका कोणत्या विषयाचा काय अभ्यास करावा हे लक्षात येणार नाही. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना काय वाचावे यापेक्षाही जास्त काय वाचू नये हे समजणे आवश्यक आहे.
*     पाठय़पुस्तके वाचणे अनिवार्य आहे
इयत्ता आठवी ते इयत्ता बारावी पर्यंतची पुस्तके आपल्या परीक्षेचा अभ्यासक्रम लक्षात घेऊन वाचणे अनिवार्य आहे. शालेय पाठय़पुस्तके आपणास विषयाच्या काठिण्यपातळीनुसार सोप्या व समजेल अशा भाषेत सोदाहरण विषय ज्ञान देत असतात. विषय आणि जुन्या प्रश्नपत्रिका समजून घेतल्याशिवाय काय वाचावे आणि काय वाचू नये हे लक्षात येणार नाही. स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासात पाठांतराला विशेष महत्त्व नाही. विषय समजून घेणे महत्त्वाचे असते. अभ्यासक्रमातील काही उपघटक पाठय़पुस्तकात सापडत नसतील तर बाजारातील स्पर्धा परीक्षांची पुस्तके आणि इंटरनेटवर माहिती शोधावी.
*    काही विषयांचा रोज अभ्यास करावा
चालू घडामोडींचा अभ्यास ही एक अव्याहत चालणारी प्रक्रिया आहे. यासाठी वर्तमानपत्राचे वाचन, लोकराज्य, योजना ही शासकीय मासिके आणि महाराष्ट्र व भारताचा आíथक पाहणी अहवाल यांचे परीक्षाभिमुख वाचन आवश्यक असते. सरावाने नवनवीन क्लृप्त्या समजतात.
*     सराव चाचण्यास विशेष महत्त्व
परीक्षेची रंगीत तालीम परीक्षा कक्षांतील तांत्रिक चुका टाळण्यास महत्त्वाची ठरते. सराव चाचण्या सोडवणे म्हणजे परीक्षा कक्षातील वेळेचे सूक्ष्म नियोजन करण्यास मदत होणे होय. मूळ परीक्षेपूर्वी किमान तीन सराव चाचण्या वेळ लावून सोडवाव्यात. याचा आपणास नक्कीच फायदा होईल. थोडक्यात कमी वेळेत आणि नियोजित पद्धतीने अभ्यास केल्यास यश हमखास मिळते. गरज आहे ती फक्त अभ्यास पायऱ्यांनुसार अभ्यास करण्याची धन्यवाद!

No comments:

Post a Comment