Tuesday, January 3, 2017

करिअरमंत्र

करिअरमंत्र

एमपीएससीचा तिसरा पेपर हा मानव संसाधन विकास व मानवी हक्क या विषयावर आधारीत असतो.

  
*   मी बी.एस्सीच्या द्वितीय वर्षांला असून मी एमपीएससीची तयारी करत आहे. मला पेपर तीनच्या तयारीसाठी पुस्तकांची यादी सांगा? मला मानव संसाधन विकास याविषयी मार्गदर्शन हवे आहे. 
-ऋतुजा गिरी
एमपीएससीचा तिसरा पेपर हा मानव संसाधन विकास व मानवी हक्क या विषयावर आधारीत असतो. शिक्षण आरोग्य, ग्रामविकास, भारतातील मनुष्यबळ विकास, मानवी हक्क महिला, युवक, बाल, आदिवासी विकास, वरिष्ठ नागरिकांची देखभाल व काळजी, अशा आपले दैनंदिन जीवन,समाज याविषयीच्या घटकांविषयी तुमचे आकलन समजून घेण्यासाठी या पेपरचा उपयोग केला जातो. राज्य लोकसेवा आयोगाने या पेपरचा विस्तृत असा अभ्यासक्रम प्रकाशित केला आहे. या विषयाचा आवाका प्रचंड मोठा आहे. त्यामुळे या अभ्यासक्रमातील विविध घटकांचे काळजीपूर्वक विश्लेषण करणे आवश्यक आहे. या अभ्यासक्रमातील सर्व घटकांचा समावेश असलेले एखादे गाईड स्वरुप पुस्तक अभ्यासाचा प्रांरभ करण्यासाठी वाचण्यास हरकत नाही. काही खासगी शिकवणी वर्ग या अभ्यासक्रमावरील पुस्तके प्रकाशित करतात पण या पेपरसाठी त्याची ठाम खात्री देता येत नाही. मानवी हक्क या विषयातील अभ्यासक्रम इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने सुरु केला आहे. त्याचे अभ्याससाहित्य वापरण्यास हरकत नाही. मानव संसाधन विषयातील काही घटकांची वस्तुनिष्ठ माहिती ही इंडिया इअर बूक/  कुरुक्षेत्र/योजना/लोकराज्य अशा नियतकालिकांमधूनही मिळू शकते. हे घटक लक्षात ठेऊन तशा नोंदी केलेल्या बऱ्या. या घटकांमध्ये काही विषय समाजशास्त्र,कामगार कल्याण,राज्यशास्त्र यातीलही आहेत. हा अभ्यासक्रम या विषयातील चांगल्या प्राध्यापकांना दाखवून त्या विषयातील विद्यापीठीय स्तरावरील पुस्तकांचा सर्वागीण अभ्यास करायला हवा.
*   मी बी.ए पहिल्या वर्षांला आहे. मला आयएएस अधिकारी व्हायचे आहे. या परीक्षेची तयारी कशी करायची? 
– शंकर धावडे
तुम्ही पदवी परीक्षेच्या शेवटच्या वर्षी किंवा पदवी घेतल्यानंतर नागरी सेवा परीक्षा देऊ  शकता. या परीक्षेद्वारे आयएएस होता येते. ही परीक्षा
प्राथमिक, मुख्य आणि मुलाखत अशा तीन टप्प्यांमध्ये होते. या परीक्षेच्या तयारीसाठी तुम्हाला आतापासून लोकसत्ता/इंडियन एक्सप्रेस सारख्या दर्जेदार वृत्तपत्रांचे नियमित वाचन, मुद्दे काढून ठेवणे, एनसीइआरटीने १२वीपर्यंतची
काढलेल्या पुस्तकांचा समजून उमजून अभ्यास करणे, सामान्य अध्ययनाच्या तयारीसाठी भारत वार्षिकी/इंडिया इअर बुकसारख्या पुस्तकाचे नियमित वाचन करणे,  इंग्रजी निबंधाच्या पेपरसाठी उत्तम व अचुक लिहिण्याचा सराव करणे आवश्यक आहे. मुख्य परीक्षेसाठीच्या ऐच्छिक विषयाची निवड आताच करावी. या विषयासाठी विद्यापीठाने सुचवलेले पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठीचे ग्रंथ व या ग्रंथांमध्ये नमूद संदर्भ वा पुरक साहित्याचा अभ्यास करणे गरजेचे आहे.
*   मी बीसीए झालो असून मला डिप्लोमा इन सायबर स्पेस सिक्युरिटी हा अभ्यासक्रम करायचा आहे. त्यासाठी काय करावे?– स्वप्निल चव्हाण
सेंटर फॉर डेव्हलपमेंट फॉर अ‍ॅडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग म्हणजे सी-डॅक या संस्थेने सायबर सुरक्षेशी संबंधित काही अल्पमुदतीचे अभ्यासक्रम सुरु केले आहेत.
ते पुढीलप्रमाणे – डेटाबेस सिक्युरिटी, एथिकल हॅकिंग, पेरिमीटर सिक्युरिटी, सिक्युरिटी इंजिनीअरिंग, वेब अ‍ॅप्लिकेशन सिक्युरिटी, वायरलेस सिक्युरिटी, मोबाइल सिक्युरिटी, सायबर क्राइम, सायबर फॉरेन्सिक.
संपर्क – https://cdac.in/
तसेच एशियन स्कूल ऑफ सायबर लॉ या संस्थेने डिप्लोमा इन सायबर लॉ, डिप्लोमा इन इंटरनेट क्राइम इनव्हेस्टिगेशन हे अभ्यासक्रम सुरु केले आहेत. संपर्क-http://www.asianlaws.org/ascl
First Published on January 4, 2017 4:06 am
Web Title: tips for successful career planning 3
 

No comments:

Post a Comment