Sunday, January 22, 2017

आजपासून अकरावीची दुसरी फेरी

आजपासून अकरावीची दुसरी फेरी

या वेळी सुमारे ५० हजारांहून अधिक विद्यार्थी प्रवेशबदल करण्यासाठी अर्ज करण्याची शक्यता आहे.

संग्रहित छायाचित्र
५० हजार विद्यार्थी अर्ज करण्याची शक्यता; ४४ हजार विद्यार्थ्यांचा प्रवेशबदल
अकरावीच्या पहिल्या विशेष फेरीमध्ये ४४ हजार ४३३ विद्यार्थ्यांनी प्रवेशबदल केल्यानंतर मंगळवारी दुसऱ्या विशेष फेरीला सुरुवात होत आहे. या वेळी सुमारे ५० हजारांहून अधिक विद्यार्थी प्रवेशबदल करण्यासाठी अर्ज करण्याची शक्यता आहे.
याआधी पहिल्या विशेष फेरीसाठी एकूण ६७ हजार ६२७ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यातील ५९ हजार ९६० विद्यार्थ्यांना निश्चित प्रवेश देण्यात आला, तर ७ हजार ६६७ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नव्हता. मात्र प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांपैकी केवळ ४४ हजार ४३३ विद्यार्थ्यांनी प्रवेशबदल केला, तर १५ हजार २३२ विद्यार्थ्यांनी प्रशासनाने दिलेला पर्याय नाकारला आहे. त्यामुळे संबंधित विद्यार्थी पुन्हा प्रवेश अर्ज करण्याची शक्यता आहे.
दरम्यान, पहिल्या फेरीत पात्र अर्ज करणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांपैकी सुमारे ३२ विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आले, तर २६३ विद्यार्थ्यांनी प्रवेश रद्द केलेले आहेत.
त्यामुळे पहिल्या फेरीअखेर प्रवेश अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांमधील सुमारे २३ हजारांहून अधिक विद्यार्थी असंतुष्ट आहेत. याशिवाय पहिल्या विशेष फेरीत ३१ हजार ३४ विद्यार्थ्यांना पूर्ण अर्ज भरता आला नव्हता. त्यामुळे दुसऱ्या विशेष फेरीत सुमारे ५० हजारांहून अधिक अर्ज येण्याची शक्यता आहे.
मंगळवारी, १६ ऑगस्टला दुसरी विशेष फेरी सुरू होत असून पुन्हा लॉगइन आयडी आणि पासवर्ड देण्यास सुरुवात होईल. पहिल्या फेरीत अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना या वेळी नव्याने लॉगइन आयडी व पासवर्ड घ्यावा लागेल, तर अपूर्ण अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांना नव्याने लॉगइन आयडी आणि पासवर्ड घेण्याची गरज नाही.
पहिल्या फेरीतील विद्यार्थ्यांचा नव्याने अर्ज आवश्यक
आधी अपूर्ण राहिलेला प्रवेश अर्ज नव्याने भरून पसंतिक्रम अर्ज भरण्याची गरज आहे. मात्र पहिल्या विशेष फेरीत संपूर्ण अर्ज भरून सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना नव्याने लॉगइन आयडी व पासवर्ड घेऊन नव्याने अर्ज भरावा लागणार आहे.

Wednesday, January 4, 2017

यूपीएससीची तयारी : सीमेपलीकडचा दहशतवाद

यूपीएससीची तयारी : सीमेपलीकडचा दहशतवाद

भारताचा आíथक व लष्करी महासत्ता म्हणून उदय होत आहे.

  

प्रस्तुत लेखातून ‘भारताच्या अंतर्गत व बाह्य सुरक्षेपुढे मोठे आव्हान ठरलेल्या सीमापार दहशतवाद (उ१२२ इ१ीि१ ळी१११्र२े) या समस्येवर चर्चा करूयात. भारतासाठी सीमापार दहशतवाद हे नवीन आव्हान नाही, स्वातंत्र्यप्राप्तीनंतर लगेचच पाक पुरस्कृत ‘आझाद काश्मीर दल’ या पाकव्याप्त काश्मीर (ढङ)मधील स्थानिक दहशतवाद्यांचा समावेश असणाऱ्या दलाने जम्मू आणि काश्मीरवर हल्ला केला होता. यापासून भारत सीमापार दहशतवादाच्या समस्येचा मुकाबला करत आहे. अशाच प्रकारची समस्या १९८०च्या दशकामध्ये पंजाब, त्यापाठोपाठ आसाम व १९९०च्या दशकामध्ये पुन्हा जम्मू आणि काश्मीरमध्ये उद्भवली. सध्या छत्तीसगड, बिहार, आंध्रप्रदेश, पश्चिम बंगाल व ओरिसा हे माओवादी कारवायांशी दोन हात करताना दिसतात. भारत व शेजारी देशांमध्ये वांशिक, धार्मिक व सांस्कृतिक समानता आढळते. संघर्षांच्या काळात तणावाचा काही भाग राज्यपुरस्कृत दहशतवादाच्या रूपामध्ये व्यक्त होत असतो. अशा देशांकडून थेट भरती करण्यात आलेल्या व नियंत्रित असणाऱ्या दहशतवादी गटांमार्फत किंवा काही छुप्या गटांमार्फत सीमापार दहशतवादी कारवाया घडवून आणल्या जातात. अशा देशातील सरकार वा सरकारी एजन्सीमार्फत (उदा. आयएसआय ही पाकिस्तानमधील सरकारी गुप्तचर एजन्सी) वित्त व इतर सामग्री दहशतवाद्यांना पुरविली जाते. परिणामी सीमापार दहशतवादाच्या समस्येवर तातडीने उपाय न केल्यास देशाच्या अंतर्गत सुरक्षेला धोका उत्पन्न होतो.
भारताचा आíथक व लष्करी महासत्ता म्हणून उदय होत आहे. या पाश्र्वभूमीवर भारताच्या शेजारी देशांकडून प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे घुसखोरी, शस्त्रास्त्रे व अमली पदार्थाची तस्करी, मानवी व्यापार, बेकायदेशीर स्थलांतरे, दहशतवादी कारवायांच्या रूपातील आव्हानांचा सामना करावा लागत आहे. सद्य:स्थितीमध्ये इतर कुठल्याही देशापेक्षा पाकिस्तानकडून देशाच्या सुरक्षेला अधिक धोका आहे, ही बाब गुरुदासपूर, पठाणकोट व उरी येथे घडलेल्या दहशतवादी हल्ल्यांनी अधोरेखित केली आहे. भारताचा जम्मू आणि काश्मीर, पाणी वाटप, सरक्रीक, इ. मुद्दय़ांवरून पाकिस्तानशी अगदी स्वातंत्र्यप्राप्तीपासून संघर्ष होत आहे.
पाकिस्तानला भारताचे प्रादेशिक श्रेष्ठत्व मान्य नसल्याने स्वातंत्र्यप्राप्तीपासूनच भारताला अस्थिर बनविण्यासाठी लष्करी व दहशतवादी कारवाया घडवून आणल्या आहेत. पाकिस्तानच्या दहशतवादी कारवाया जम्मू आणि काश्मीरपुरत्या मर्यादित न राहता देशभरामध्ये पसरल्या आहेत, याची भारताला खात्री आहे. आयएसआयच्या वाढत्या कारवाया व इतर राज्यांमध्ये सतत दिसत असलेल्या दहशतवादी हालचालींवरून हे स्पष्ट झाले आहे. याकरिता भारताने पाकिस्तानातून संचालित होणाऱ्या दहशतवादी गटांचा बंदोबस्त करण्यासाठी सुसज्ज राहणे श्रेयस्कर ठरते. नुकताच भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जकिल स्ट्राइक करून दहशतवादी तळ उद्ध्वस्त केला. पण अशा पद्धतीच्या कारवाया झाल्यानंतर गुप्तता राखणे आवश्यक असते.
भारत आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवादाचा सामना करण्याच्या मुद्दय़ांवर जोर देत आहे व या लढय़ामध्ये दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या देशावर राजकीय व आíथक र्निबधांच्या स्वरूपात जागतिक कृतीसाठी प्रयत्नशील आहे. तथापि अमेरिका व चीनसारख्या महासत्तांचे पाकिस्तानमध्ये व सभोवती राजकीय व लष्करी हितसंबंध गुंतल्याने पाकिस्तानच्या गरकृत्यांकडे डोळेझाक केली जात आहे. परिणामी भारताने आपले लष्कर, पोलीस व अर्धलष्करी दले, गुप्तचर यंत्रणा इत्यादीचे बळकटीकरण करून सोबतच आंतरराष्ट्रीय समुदायाचे याकामी समर्थन प्राप्त करून घेत ही लढाई एकटय़ाने लढणे उचित ठरेल.
भारताने सीमापार दहशतवादाच्या समस्येचे निराकरण लष्करी, द्विपक्षीय राजनय व आंतरराष्ट्रीय, राजकीय समर्थनाच्या माध्यमातून करता येईल ही बाब जाणून घेणे महत्त्वपूर्ण ठरते. सोबतच देशांतर्गत स्थिरता, विशेषत: धार्मिक बाबींमध्ये राखणे व सीमापार दहशतवादाच्या लढाईमध्ये सर्व धर्माच्या गटांचे समर्थन प्राप्त करून घेणे आवश्यक ठरते. लष्करी उपायांमुळे सीमापार दहशतवादी कारवायांविरोधात वचक निर्माण होईल व दहशतवादी व त्यांना पािठबा देणारे राष्ट्र यांची अभद्र युती मोडता येईल. याकरिता लष्कर व अर्धलष्करी दलांना अद्ययावत शस्त्रे, उपकरणे, निगराणी ठेवणारी उपकरणे, हेलिकॉप्टर्स, विमाने व इतर परिवहन साहाय्यता उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. सनिकी कारवायांमध्ये समन्वय ठेवण्याकरिता सर्व सुरक्षा दलांमध्ये सहकार्य असणे महत्त्वाचे ठरते. भारताने फक्त पाकिस्तानच नाही तर नेपाळ, भूतान, बांगलादेश आणि म्यानमार या देशांना राजनयाद्वारे व्यस्त ठेवणे आवश्यक आहे, ज्याद्वारे आíथक, लष्करी, सांस्कृतिक क्षेत्र आणि दहशतवादविरोधी कारवायांमध्ये सहकार्याकरिता धोरणे सूत्रबद्ध करता येतील. भारताने आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर दहशतवादाशी मुकाबला करण्यासाठी एकत्रित धोरणे व मार्गदर्शक तत्त्वे सूत्रबद्ध करण्यासाठी पावले उचलली आहेत. तरीही अमेरिका व चीनसारख्या देशांना पाकिस्तानला नियंत्रित करण्यासाठी उद्युक्त करणे गरजेचे आहे. यासोबतच सर्व धर्म व समुदायांमध्ये शांतता व सुसंवाद राखण्यावर भर द्यावा लागेल. यामध्ये विशेषत: काही अल्पसंख्याक समुदाय ईशान्येकडील राज्यातील लोक व माओवादी कारवायांनी प्रभावित क्षेत्रातील लोकांचा अंतर्भाव होईल. कारण आयएसआयसारखी संघटना या प्रदेशातील संघटनांना हाताशी धरून अस्थिरता निर्माण करत असते.
एकूणच दहशतवादाविरोधातील लढाई कठीण व आव्हानात्मक असते. याकामी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील जबाबदार संघटनांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे. सीमापार दहशतवादाशी यशस्वीपणे लढा देण्यासाठी आंतरराष्ट्रीय समर्थन व शेजारील देशांमध्ये सहकार्य व समन्वयाची गरज असते.

Tuesday, January 3, 2017

वेगळय़ा वाटा : सौंदर्य क्षेत्रातील संधी

वेगळय़ा वाटा : सौंदर्य क्षेत्रातील संधी

अगदी लहान मूलही आरशात बघून खुदकन हसते. कारण आपल्या सर्वानाच स्वप्रतिमा आवडते.

  
अगदी लहान मूलही आरशात बघून खुदकन हसते. कारण आपल्या सर्वानाच स्वप्रतिमा आवडते. स्वत:ला पाहायला, स्वत:चे रूप न्याहाळायला ते आणखी सुंदर बनवायला प्रत्येकालाच आवडते. त्यामुळेच ब्युटी इंडस्ट्रीत एक मोठे करिअर निर्माण झाले आहे. राजे-रजवाडय़ांकडे त्यांना सुंदर बनवण्यासाठी खास सेवक होते. काळाच्या ओघात आज तेच कौशल्य सेवा क्षेत्रातून विकसित होते आहे. तसे तर आपल्या सर्वानाच ब्युटी पार्लरची माहिती असते. तिथे कोणत्या सेवा मिळतात, हेसुद्धा कळते. परंतु यात करिअर करायचे तर अभ्यासक्रम आणि प्रमाणपत्रांची फारशी माहिती नसते.
सौंदर्यशास्त्र म्हणजे ब्युटीथेरपी. हा अभ्यासक्रम तीन प्रमुख टप्प्यांत विभागला जातो.
*   ब्युटीथेरपी
*   जनरल अ‍ॅस्थेटिक्स
*    बॉडीथेरपी
*  ब्युटीथेरपी/ ब्युटी कल्चर
ब्युटिशिअन म्हणजे सुंदर बनवणारी व्यक्ती. त्यामुळे या अभ्यासक्रमात सौंदर्य खुलवणारे विषय असतात. जसे थ्रेडिंग, व्ॉक्सिंग, फेशिअल, ब्लीचिंग, मॅनिक्युअर, पेडिक्युअर, बेसिक मेकअप इ. याचबरोबर त्वचेचाही प्राथमिक अभ्यास जसे त्वचेचे प्रकार, शारीरशास्त्र आणि त्वचेची काळजी, आहार त्याचबरोबर प्रथमोपचार, स्वच्छता आणि आरोग्य या सगळ्याचा अभ्यास होतो.
संधी – असिस्टंट ब्युटिशिअन, ऑपरेटर, घरच्या घरी स्वत:चा व्यवसाय करणे.
*  जनरल अ‍ॅस्थेटिशिअन
ब्युटी कल्चरच्या अभ्यासक्रमाची पुढली पायरी म्हणजे जनरल अ‍ॅस्थेटिशिअनचा अभ्यासक्रम. हा अभ्यासक्रम चेहरा, मान, नखे यावर जास्त लक्ष देतो. ब्लड सक्र्युलेशन, मसल्स, बोन्स यांच्या अभ्यासाबरोबर त्वचेचे विकार, दोष जसे िरगवर्म, अ‍ॅक्ने, पांढरे डाग इ.चा अभ्यास असतो. यामध्ये मशीन ट्रीटमेंटस्सुद्धा शिकाव्या लागतात. ज्याच्या त्वचेला फायदा होतो.
संधी- अ‍ॅस्थेटिशिअन किंवा ब्युटीथेरपिस्ट म्हणून तुम्ही स्वत:चा व्यवसाय सुरू करू शकता. फेशिअल किंवा स्किन केअर उत्पादने बनवणाऱ्या आणि विकणाऱ्या कंपनीमध्ये टेक्निकल ट्रेनर किंवा शोरूम ब्युटी अ‍ॅडव्हायझर म्हणून काम करू शकता. याचसोबत ब्युटी स्कूल अथवा अ‍ॅकॅडमीमध्ये ज्युनिअर ट्रेनर म्हणूनही काम करता येते.
*  बॉडीथेरपी
संपूर्ण शरीरशास्त्र, उपचारपद्धतींचा यात समावेश होतो. यात फक्त मसाज किंवा रॅप्स नव्हेत तर पॅसिव्ह स्लिमिंगही शिकवले जाते. इलेक्ट्रिकल मशीनच्या आधारे इंचलॉस करणे, त्याला योग्य आहाराची सांगड घालणे तसेच वेट पोस्ट्रअल फॉल्ट्स यावरही उपचार करणे किंवा प्राथमिक व्यायाम हे विषय शिकवले जातात.
संधी – कॉस्मेटॉलॉजिस्ट, थेरपिस्ट म्हणून स्वत:चा व्यवसाय करणे.
इनोव्हेशन मॅनेजअंतर्गत सलोनसाठी उत्तम उत्पादने निवडून त्याच्या उपचारपद्धती डिझाइन करणे.
सलोन ट्रेनर, ब्युटी कंपन्यांसाठी ट्रेनर म्हणून काम पाहणे. अ‍ॅकॅडमी ट्रेनर, अ‍ॅकॅडमी मॅनेजर.
अभ्यासक्रम आणि संस्था
सर्टिफिकेशनसाठी असोसिएट ऑफ ब्युटीथेरपी अ‍ॅण्ड कॉस्मेटॉलॉजी (इंडिया) हे जनरल अ‍ॅस्थेटिक्ससाठी मान्यताप्राप्त अभ्यासक्रम उपलब्ध करून देतात. सिडेस्को (cidesco) सर्टिफिकेशन फ्रॉम झुरीच ही संस्था आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करण्यासाठी संधी उपलब्ध होतात. त्यासोबत नॅशनल स्कील डेव्हलपमेंट कौन्सिल ही सरकारची संस्था आहे. यातील सौंदर्य आणि प्रसाधन क्षेत्राशी निगडित असलेली संस्था म्हणजे ब्युटी अ‍ॅण्ड वेलनेस सेक्टर स्किल कौन्सिल. या दोन्ही संस्था स्वायत्त आहेत. या दोन्ही संस्था सरकारमान्य अभ्यासक्रम चालवतात.
*    एनरिच अकॅडमी मुंबई  (http://www.enrichsalon.com/)
*    एलटीए स्कूल ऑफ ब्यूटी  (http://www.ltaschoolofbeauty.com/)
*   मिरर अकॅडमी, नाशिक  (http://mirrorsalon.co.in/)
*  ब्युटिक जस्टिस
*   उदय टक्केज, यू टक्केज इन्स्टिटय़ूट ऑफ हेअर अ‍ॅण्ड स्कीन मुंबई
ब्युटिशियन होणे, वाटते तितके सोपे नाही. शिवाय या व्यवसायाला फारशी प्रतिष्ठा अजूनही नाही. फेशिअल, मॅनिक्युअर, पेडिक्युअर अशा साध्या गोष्टी करता येणे सोपे असते. ते आल्यावर लगेचच पार्लर सुरू केले असे होत नाही. पार्लरसोबतच त्याची गुणवत्ता आणि दर्जाही राखायला हवा. कोणत्याही वयोगटातील मुलींना आणि महिलांना आर्थिक स्थैर्य देण्याची ताकद या क्षेत्रामध्ये आहे. कमी गुणवत्तेचे दिखाऊ काम फार काळ चालत नाही. त्याच वेळी नोकरीचा पर्याय स्वीकारल्यास कामाचे स्वरूप समजून घेणे फार महत्त्वाचे आहे. अनेकदा गरजू मुलींना ब्युटी पार्लरमध्ये हेल्पर किंवा असिस्टंट या नावाखाली साफसफाईची कामे दिली जाता. तू हे कामही कर आणि शिकही असे आश्वासन दिले जाते. पण शिकत असल्याने पगार मिळत नाही आणि कामाच्या रेटय़ाखाली शिकायला मिळत नाही, अशी दुहेरी कोंडी होते. ब्युटिशियन म्हणून परदेशात जाताना तर विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
(लेखिका सौंदर्यप्रसाधन क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत.)
 

एमपीएससी मंत्र : पोलीस उपनिरीक्षक (पूर्व) परीक्षेच्या अभ्यास पायऱ्या

एमपीएससी मंत्र : पोलीस उपनिरीक्षक (पूर्व) परीक्षेच्या अभ्यास पायऱ्या

वयोमर्यादेत झालेली वाढ, साधारणत: दोन वर्षांनी आलेली जाहिरात आणि ७५० जागा !

  
वयोमर्यादेत झालेली वाढ, साधारणत: दोन वर्षांनी आलेली जाहिरात आणि ७५० जागा ! पूर्व परीक्षेच्या अभ्यासास मिळालेला चांगला कालावधी.. अशा अनेक बाबींमुळे सुमारे दोन लाख विद्यार्थी पोलीस उपनिरीक्षक (पूर्व) परीक्षेस अर्ज करतील यात जराही शंका नाही. याचा अर्थ असा की, यापकी वर्दीचा मान फक्त ०.०३७५% उमेदवारांनाच मिळणार आहे.
अर्थात, पोलीस उपनिरीक्षक हे पद मिळविण्यासाठीची स्पर्धा प्रचंड आहे. सध्याचे या परीक्षेचे वातावरण पाहता अनेक वर्षांपासून तयारी करणारे विद्यार्थी गाफील आणि हवेत तयारी करीत आहेत. नव्यानेच या परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी भीतीपोटी अभ्यास करीत आहेत. जुने आणि नवीन विद्यार्थी यात बाजी कोण मारणार?  उत्तर सोपे आहे ! ज्याला अभ्यास पायऱ्या माहिती आहेत तोच जिंकणार…
अभ्यास साहित्य, अभ्यासासाठी उपलब्ध वेळ, परीक्षेची पात्रता सर्वासाठी सारखी आहे. मार्गदर्शन आता गल्लीपर्यंत पोहोचले आहे. विद्यार्थी मित्रांनो, अभ्यासाच्या पायऱ्या समजून घ्या आणि हमखास यश मिळवा.
*     १) परीक्षा योजना आणि अभ्यासक्रम समजून घ्या –
पूर्व परीक्षा योजना –
विषय – सामान्यज्ञान क्षमता, प्रश्नांची संख्या -१००, एकूण गुण – १००,    दर्जा -पदवी, माध्यम -मराठी व इंग्रजी, परीक्षेचा कालावधी -१ तास परीक्षेचे स्वरूप – वस्तुनिष्ठ, नकारात्मक गुणदान पद्धती -१-३
पूर्व परीक्षा अभ्यासक्रम –
अभ्यासक्रम –
१)चालू घडामोडी – जागतिक तसेच भारतातील
२)नागरिकशास्त्र – भारतीय राज्यघटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्यव्यवस्थापन व ग्रामव्यवस्थापन (प्रशासन)
३)आधुनिक भारताचा विशेषत: महाराष्ट्राचा इतिहास
४) भूगोल (विशेषत: महाराष्ट्र) – पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश-रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी
५)अर्थव्यवस्था – भारतीय अर्थव्यवस्था राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्रय़ व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती, इत्यादी शासकीय अर्थव्यवस्था, अर्थ संकल्प, लेखा, लेखापरीक्षण इत्यादी.
६) सामान्य विज्ञान – भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणिशास्त्र, वनस्पतिशास्त्र, आरोग्यशात्र
७) बुद्धिमापन चाचणी आणि अंकगणित –
परीक्षा योजना आणि अभ्यासक्रमाचे विश्लेषण केले असता असे लक्षात येते की, परीक्षेचा दर्जा पदवी असल्यामुळे परीक्षेत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची काठिण्यपातळी राज्यसेवा परीक्षेप्रमाणे कठीण असणार आहे. अभ्यासक्रम आणि प्रश्नसंख्या यांचा विचार करता एका घटकावर सुमारे १५ प्रश्न परीक्षेत विचारले जाऊ शकतात.
*     जुन्या प्रश्नपत्रिकांचे अभ्यासातील महत्त्व
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे विविध स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात यापकी पोलीस उपनिरीक्षक, विक्रीकर निरीक्षक आणि सहायक कक्षाधिकारी या तिन्ही पदांच्या पूर्वपरीक्षांचा अभ्यासक्रम आणि विषयांची काठिण्यपातळी एकसारखी आहे.
शिवाय राज्यसेवा (पूर्व) परीक्षेची काठिण्यपातळीही सारखीच आहे. या चारही प्रकारच्या पूर्व परीक्षांच्या जुन्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. अभ्यासाअंती कोणत्या घटकांवर (विषयावर) कसा प्रश्न विचारला जातो हे उमेदवारांच्या लक्षात येईल. हे लक्षात आल्याशिवाय नेमका कोणत्या विषयाचा काय अभ्यास करावा हे लक्षात येणार नाही. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना काय वाचावे यापेक्षाही जास्त काय वाचू नये हे समजणे आवश्यक आहे.
*     पाठय़पुस्तके वाचणे अनिवार्य आहे
इयत्ता आठवी ते इयत्ता बारावी पर्यंतची पुस्तके आपल्या परीक्षेचा अभ्यासक्रम लक्षात घेऊन वाचणे अनिवार्य आहे. शालेय पाठय़पुस्तके आपणास विषयाच्या काठिण्यपातळीनुसार सोप्या व समजेल अशा भाषेत सोदाहरण विषय ज्ञान देत असतात. विषय आणि जुन्या प्रश्नपत्रिका समजून घेतल्याशिवाय काय वाचावे आणि काय वाचू नये हे लक्षात येणार नाही. स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासात पाठांतराला विशेष महत्त्व नाही. विषय समजून घेणे महत्त्वाचे असते. अभ्यासक्रमातील काही उपघटक पाठय़पुस्तकात सापडत नसतील तर बाजारातील स्पर्धा परीक्षांची पुस्तके आणि इंटरनेटवर माहिती शोधावी.
*    काही विषयांचा रोज अभ्यास करावा
चालू घडामोडींचा अभ्यास ही एक अव्याहत चालणारी प्रक्रिया आहे. यासाठी वर्तमानपत्राचे वाचन, लोकराज्य, योजना ही शासकीय मासिके आणि महाराष्ट्र व भारताचा आíथक पाहणी अहवाल यांचे परीक्षाभिमुख वाचन आवश्यक असते. सरावाने नवनवीन क्लृप्त्या समजतात.
*     सराव चाचण्यास विशेष महत्त्व
परीक्षेची रंगीत तालीम परीक्षा कक्षांतील तांत्रिक चुका टाळण्यास महत्त्वाची ठरते. सराव चाचण्या सोडवणे म्हणजे परीक्षा कक्षातील वेळेचे सूक्ष्म नियोजन करण्यास मदत होणे होय. मूळ परीक्षेपूर्वी किमान तीन सराव चाचण्या वेळ लावून सोडवाव्यात. याचा आपणास नक्कीच फायदा होईल. थोडक्यात कमी वेळेत आणि नियोजित पद्धतीने अभ्यास केल्यास यश हमखास मिळते. गरज आहे ती फक्त अभ्यास पायऱ्यांनुसार अभ्यास करण्याची धन्यवाद!

करिअरमंत्र

करिअरमंत्र

एमपीएससीचा तिसरा पेपर हा मानव संसाधन विकास व मानवी हक्क या विषयावर आधारीत असतो.

  
*   मी बी.एस्सीच्या द्वितीय वर्षांला असून मी एमपीएससीची तयारी करत आहे. मला पेपर तीनच्या तयारीसाठी पुस्तकांची यादी सांगा? मला मानव संसाधन विकास याविषयी मार्गदर्शन हवे आहे. 
-ऋतुजा गिरी
एमपीएससीचा तिसरा पेपर हा मानव संसाधन विकास व मानवी हक्क या विषयावर आधारीत असतो. शिक्षण आरोग्य, ग्रामविकास, भारतातील मनुष्यबळ विकास, मानवी हक्क महिला, युवक, बाल, आदिवासी विकास, वरिष्ठ नागरिकांची देखभाल व काळजी, अशा आपले दैनंदिन जीवन,समाज याविषयीच्या घटकांविषयी तुमचे आकलन समजून घेण्यासाठी या पेपरचा उपयोग केला जातो. राज्य लोकसेवा आयोगाने या पेपरचा विस्तृत असा अभ्यासक्रम प्रकाशित केला आहे. या विषयाचा आवाका प्रचंड मोठा आहे. त्यामुळे या अभ्यासक्रमातील विविध घटकांचे काळजीपूर्वक विश्लेषण करणे आवश्यक आहे. या अभ्यासक्रमातील सर्व घटकांचा समावेश असलेले एखादे गाईड स्वरुप पुस्तक अभ्यासाचा प्रांरभ करण्यासाठी वाचण्यास हरकत नाही. काही खासगी शिकवणी वर्ग या अभ्यासक्रमावरील पुस्तके प्रकाशित करतात पण या पेपरसाठी त्याची ठाम खात्री देता येत नाही. मानवी हक्क या विषयातील अभ्यासक्रम इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने सुरु केला आहे. त्याचे अभ्याससाहित्य वापरण्यास हरकत नाही. मानव संसाधन विषयातील काही घटकांची वस्तुनिष्ठ माहिती ही इंडिया इअर बूक/  कुरुक्षेत्र/योजना/लोकराज्य अशा नियतकालिकांमधूनही मिळू शकते. हे घटक लक्षात ठेऊन तशा नोंदी केलेल्या बऱ्या. या घटकांमध्ये काही विषय समाजशास्त्र,कामगार कल्याण,राज्यशास्त्र यातीलही आहेत. हा अभ्यासक्रम या विषयातील चांगल्या प्राध्यापकांना दाखवून त्या विषयातील विद्यापीठीय स्तरावरील पुस्तकांचा सर्वागीण अभ्यास करायला हवा.
*   मी बी.ए पहिल्या वर्षांला आहे. मला आयएएस अधिकारी व्हायचे आहे. या परीक्षेची तयारी कशी करायची? 
– शंकर धावडे
तुम्ही पदवी परीक्षेच्या शेवटच्या वर्षी किंवा पदवी घेतल्यानंतर नागरी सेवा परीक्षा देऊ  शकता. या परीक्षेद्वारे आयएएस होता येते. ही परीक्षा
प्राथमिक, मुख्य आणि मुलाखत अशा तीन टप्प्यांमध्ये होते. या परीक्षेच्या तयारीसाठी तुम्हाला आतापासून लोकसत्ता/इंडियन एक्सप्रेस सारख्या दर्जेदार वृत्तपत्रांचे नियमित वाचन, मुद्दे काढून ठेवणे, एनसीइआरटीने १२वीपर्यंतची
काढलेल्या पुस्तकांचा समजून उमजून अभ्यास करणे, सामान्य अध्ययनाच्या तयारीसाठी भारत वार्षिकी/इंडिया इअर बुकसारख्या पुस्तकाचे नियमित वाचन करणे,  इंग्रजी निबंधाच्या पेपरसाठी उत्तम व अचुक लिहिण्याचा सराव करणे आवश्यक आहे. मुख्य परीक्षेसाठीच्या ऐच्छिक विषयाची निवड आताच करावी. या विषयासाठी विद्यापीठाने सुचवलेले पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठीचे ग्रंथ व या ग्रंथांमध्ये नमूद संदर्भ वा पुरक साहित्याचा अभ्यास करणे गरजेचे आहे.
*   मी बीसीए झालो असून मला डिप्लोमा इन सायबर स्पेस सिक्युरिटी हा अभ्यासक्रम करायचा आहे. त्यासाठी काय करावे?– स्वप्निल चव्हाण
सेंटर फॉर डेव्हलपमेंट फॉर अ‍ॅडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग म्हणजे सी-डॅक या संस्थेने सायबर सुरक्षेशी संबंधित काही अल्पमुदतीचे अभ्यासक्रम सुरु केले आहेत.
ते पुढीलप्रमाणे – डेटाबेस सिक्युरिटी, एथिकल हॅकिंग, पेरिमीटर सिक्युरिटी, सिक्युरिटी इंजिनीअरिंग, वेब अ‍ॅप्लिकेशन सिक्युरिटी, वायरलेस सिक्युरिटी, मोबाइल सिक्युरिटी, सायबर क्राइम, सायबर फॉरेन्सिक.
संपर्क – https://cdac.in/
तसेच एशियन स्कूल ऑफ सायबर लॉ या संस्थेने डिप्लोमा इन सायबर लॉ, डिप्लोमा इन इंटरनेट क्राइम इनव्हेस्टिगेशन हे अभ्यासक्रम सुरु केले आहेत. संपर्क-http://www.asianlaws.org/ascl
First Published on January 4, 2017 4:06 am
Web Title: tips for successful career planning 3