अर्थ नियोजन : गुंतवणुकीच्या कार्यक्षमतेवर सतत लक्ष हवे!
योग्य वित्तीय नियोजक कसा असावा या महत्त्वाच्या विषयावर विचार करावयास लावणारा पुढील लेख होता.
दीपाली चांडक | Updated:
December 4, 2017 1:45 AM
प्रतिनिधिक छायाचित्र
योग्य वित्तीय नियोजक कसा असावा या महत्त्वाच्या विषयावर विचार करावयास लावणारा पुढील लेख होता. आपली उद्दिष्टे आणि गरजा लक्षात घेऊन, अर्थ नियोजनाचे पर्याय सुचविणारा, योग्य नियोजक निवडणे अत्यंत निकडीचे आहे. योग्य नियोजनाच्या मदतीने आपली आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी गरजा व उत्पन्न यांचा ताळमेळ घालता येतो. यासाठी अगदी तरुण वयापासून, अभ्यासपूर्ण केलेले अर्थ नियोजन किती महत्त्वाचे ठरते हे मांडणारा लेख म्हणजे तरुणाईतच अर्थ नियोजनाबद्दल किती जागरूकतेने अभ्यास करणे आवश्यक आहे आणि ते त्यांना कसे आयुष्यभर समाधान आणि आनंद मिळवून देणारे असेल हे मांडण्याचा एक प्रांजळ प्रयत्न होता.
पुढील लेखातून आजच्या काळाची गरज असलेले, निवृत्तीनंतरच्या सुखी व स्वावलंबी दिवसांसाठी आर्थिक नियोजनाचे महत्त्व विशद केले गेले. सर्वसामान्यपणे असे लक्षात आले आहे की, सरासरी आपण जी बचत करतो त्यातून फक्त १२ टक्के रकमेची तरतूद ही निवृत्तीनंतरच्या सुखी आयुष्यासाठी केली जाते. म्हणून या विषयावरील लेख निवृत्तीनंतरच्या विविध पर्यायांवर विचार मांडणारा होता, जसे की पीपीएफ, शेअर बाजारातील गुंतवणूक, म्युच्युअल फंड, आरोग्य विमा.
प्रत्येक कुटुंबाची आवक ही आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर कमी-अधिक असल्याकारणाने, वेळोवेळी बदलत असणाऱ्या बचतीतून – ठरविलेली दीर्घ मुदतीची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी, तसेच निवृत्तीनंतरच्या समाधानकारक आयुष्यासाठी, योग्य काळात कराव्या लागणाऱ्या अर्थ नियोजनवर विचार मांडणारा लेखही आला.
नुस्ोतीच बचत करणे उपयोगाचे नसून त्यातून योग्य असे गुंतवणुकीचे पर्याय निवडताना स्वत:शी आणि कुटुंबाशी निगडित अनेक घटकांचा विचार करणे आवश्यक असते. जसे – आवक, खर्च, वय, जबाबदारी, गरजा, इ. घटक व्यक्तिपरत्वे बदलतात म्हणूनच एका गुंतवणूकदाराने निवडलेले गुंतवणुकीचे पर्याय दुसऱ्या गुंतवणूकदारासाठी योग्य असतीलच असे नाही. त्यातून पुढे एकरकमी गुंतवणूक की नियमित गुंतवणूक करणे योग्य? या प्रश्नाचाही आपण वेध घेतला.
निवड केलेल्या गुंतवणूक पर्यायांची रोकडसुलभता/ तरलतादेखील महत्त्वाची असते. दीर्घ पल्ल्याची आणि अल्पकालीन उद्दिष्टे आणि अचानक उद्भवणाऱ्या गरजांचा विचार समोर ठेवून गुंतवणुकीचे पर्याय निवडले तर तरलतेची अडचण आयुष्यात सहसा भासत नाही. याच विचाराला समोर ठेवत सध्या प्रत्येक सर्वसामान्य गुंतवणूकदाराची गरज पूर्ण करणारे विविध प्रकारचे मुच्युअल फंडही या दरम्यान आपण अभ्यासले.
कॉर्पोरेट अॅक्शन म्हणजे कंपनीने स्वत:हून केलेली कृती ज्याचा परिणाम कंपनीच्या शेअर्सवर आणि कर्जरोख्यांवर होतो आणि एकूणच गुंतवणूकदाराच्या मूळ गुंतवणुकीवरसुद्धा. वाचकांच्या आग्रहाखातर एक लेख कॉर्पोरेट अॅक्शन्सवर आधारित होता. अनेक कंपन्यांच्या विविध कॉर्पोरेट अॅक्शन्स हा त्या समभागात गुंतवणुकीचा निर्णय ठरत असतो, त्या दृष्टीने आवश्यक काळजी आणि दक्षतेचा आपण त्यायोगे विचार केला.
उद्दिष्टाला समोर ठेवून केलेली बचत ते गुंतवणुकीच्या पर्यायांपर्यंतच्या प्रवासात उद्दिष्टाला पूर्ण करण्यासाठी दोन घटक अत्यंत महत्त्वाचे – गुंतवणूक भांडवलाची वाढ आणि नियमित मिळणारा परतावा. पर्याय निवडताना नेहमी लक्षात घेणे आवश्यक आहे की, आपण गुंतवणुकीसाठी विचारात घेत असलेले पर्याय एकाच घटकाचा नियम पाळणारे आहेत की दोन्ही. सर्वसाधारणपणे नेहमी गुंतवणुकीचे पर्याय हे वरील दोन्ही घटकांचा आणि गुंतवणुकीच्या मुदतीचा एकत्रित विचार करणारे असावेत.
‘साकारू अर्थ नियोजन’ या वर्षभर गुंफलेल्या माळेचे हे आजचे शेवटचे पुष्प आणि ते आर्थिक उद्दिष्टपूर्तीसाठी अर्थ नियोजन साकारण्यास अत्यंत महत्त्वाचे. बचत का करावयाची आहे? कारण हे जोपर्यंत बचत करणारा ठरविणार नाही तोपर्यंत त्याला कळूच शकणार नाही. आपण करतोय, करतोय ती बचत पुरेशी आहे की नाही, याचे त्याला भान असायला हवे. यालाच जीवनातील आर्थिक उद्दिष्टांची स्पष्टता म्हणतात. मी कुठे आहे? आणि मला कुठे पोहोचायचे आहे? हे प्रश्न उद्दिष्ट ठरविल्याशिवाय सुटत नाहीत. प्रत्येक उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पैशांच्या रूपात त्यांचे मूल्य ठरविणे महत्त्वाचे असते. आर्थिक उद्दिष्ट एकदा निश्चित केल्यानंतर त्यानुसार बचत, गुंतवणुकीचे नियोजन आणि त्यानुसार कृती आवश्यक ठरते.
गुंतवणुक म्हटली की, अभ्यासावे असे घटक म्हणजे – परतावा आणि जोखीम. अपेक्षेप्रमाणे गुंतवणुकीचे योग्य मूल्य मिळणे म्हणजे योग्य परतावा. आपल्या अपेक्षेपेक्षा वेगळे घडणे म्हणजे जोखीम. योग्य गुंतवणुकीचा पर्याय म्हणजे जोखीम आणि परताव्याचा योग्य समतोल. गुंतवणूक करणाऱ्यांना भीती वाटणे स्वाभाविकच आहे आणि भीतीचे तिमीर दूर करतो तो ज्ञानाचा प्रकाश. भीती कमी करावयाची असेल तर जोखीम समजायला हवी, अभ्यासायला हवी.
गुंतवणूक करायची म्हटली की, जोखीम स्वीकारण्याची तयारी हवीच. आणि त्यासाठीच हवे जोखमीचे नियोजन आणि त्यासाठी हवी समतोल गुंतवणूक. जोखमीचा अंदाज घेऊन तिचे नियंत्रण गुंतवणुकीचा महत्त्वाचा घटक आहे. आपल्यावर असणाऱ्या जबाबदाऱ्या, वय, आर्थिक परिस्थिती आणि उत्पन्न यांचा पूर्णपणे विचार करूनच काही जोखमी घेता येतात आणि म्हणूनच प्रत्येक व्यक्तीने स्वत:चा पूर्ण अभ्यास करूनच गुंतवणुकीचे पर्याय निवडावेत.
खरे तर, गुंतवणुकीस सुरुवात करणे सोपे असते; परंतु बाजाराच्या चढ-उतारानुसार कमी -अधिक होणाऱ्या गुंतवणूक मूल्याकडे, अधिक परताव्याचा मोह आणि बाजार वर-खाली झाल्याची अनावश्यक भीती टाळणे गरजेचे आहे. म्हणूनच अव्वल परतावा देणाऱ्या गुंतवणुकीच्या पर्यायापेक्षा, सातत्य राखणाऱ्या आणि आपल्या आर्थिक व्यक्तिमत्त्वाला साजेसा नियमित शिस्तबद्ध गुंतवणुकीचा पर्याय निवडणे अत्यंत महत्त्वाचे आणि योग्य ठरते.
जसा नियमितपणा गुंतवणुकीत आवश्यक आहे तसेच आपण निवडलेले पर्याय योग्य पद्धतीने, ठरविलेली उद्दिष्टे पूर्ण करण्याच्या दिशेने, कार्य करतात की नाही, याकडे नियमित लक्ष ठेवणे गरजेचे असते. सतत बदलत्या सामजिक, राजकीय आणि आर्थिक घडामोडीच्या या काळात, आपण निवडलेल्या गुंतवणुकीच्या पर्यायांतून जोखीमरहित निश्चित परतावा साध्य करता येईलच असे नाही. म्हणून बदलत्या आर्थिक परिस्थितीनुसार, अभ्यासपूर्वक निर्णय आवश्यक आहे. प्रसंगी निर्णयात योग्य तो बदल करण्याची मानसिकता ठेवणे हिताचे ठरते.
गुंतवणुकीच्या पर्यायात योग्य ते बदल करताना, प्रमाणपत्रधारक वित्तीय नियोजनकाराची मदत घेणे केव्हाही उपयुक्तच असते. जोखीम घेण्याची क्षमता आणि गुंतवणुकीतील जोखीम घटक याचा सारासार विचार करून एक तज्ज्ञ नियोजनकार ठरलेली आर्थिक उद्दिष्टे साध्य करता येतील असे योग्य पर्याय नक्कीच सुचवू शकतो.
इथे लक्षात घेण्यासारखे म्हणजे की, होणारा फायदा आणि नुकसान हे केवळ गुंतवणुकीचे पर्याय योग्य असल्यामुळे किंवा चुकल्यामुळे नसून, आपण त्याच्यावर सातत्याने लक्ष ठेवून, गरज पडल्यास वेळीच घेतलेल्या योग्य निर्णयामुळे होत असतो आणि म्हणून अभ्यासपूर्वक घेतलेले निर्णय महत्त्वाचे ठरतात.
arthasanvad@gmail.com
लेखिका नाशिकस्थित अर्थ-अभ्यासक असून त्या ‘सेबी’तर्फे अर्थसाक्षरतेसाठी उपक्रमशील आहेत.
First Published on December 4, 2017 1:45 am
Web Title: deepali chandak tips for financial planning