Tuesday, September 29, 2015

अकाउंटिंगचे धडे! आपल्यापकी बऱ्याच जणांना दररोज जमाखर्च लिहिण्याची सवय असते.

अकाउंटिंगचे धडे!

आपल्यापकी बऱ्याच जणांना दररोज जमाखर्च लिहिण्याची सवय असते.

मनाली रानडे - manaliranade84@gmail.com | September 22, 2015 06:58 am
आपल्यापकी बऱ्याच जणांना दररोज जमाखर्च लिहिण्याची सवय असते. केलेल्या छोटय़ा-मोठय़ा खर्चाची नोंद एखाद्या वहीत तारखेनुसार केली जाते. त्यामुळे महिनाअखेरी खर्चासाठी काढलेल्या पशातून किती शिल्लक उरली किंवा किती अधिक खर्च झाला याचा अंदाज येतो. मागील महिन्याच्या नोंदीशी चालू महिन्याच्या खर्चाशी तुलना करता येते.
व्यापार आणि उद्योगधंद्यात मोठय़ा प्रकारची आíथक उलाढाल होत असते. व्यवसायाच्या आíथक स्थितीवर याचा मोठा परिणाम होत असतो. त्यामुळे त्याची शास्त्रीय पद्धतीने नोंद, योग्य पद्धतीने वर्गीकरण तसेच विस्तृत विश्लेषण होणे आवश्यक असते.
या नोंदी कशा प्रकारे केल्या जातात, त्यांचे वर्गीकरण कसे करायचे, इत्यादीचे प्राथमिक ज्ञान कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना कॉलेजच्या पहिल्या वर्षांपासूनच दिले जाते. इतर शाखांचे शिक्षण घेतलेल्यांना अकाउंट्स या विषयाबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता असते. उदाहरणार्थ, अनेक लोक शेअरबाजारात गुंतवणूक करीत असतात. ती गुंतवणूक करण्यापूर्वी कंपनीची आíथक स्थिती कशी आहे, हे जाणून घेणे उपयुक्त असते. केवळ ऐकीव माहितीवर अवलंबून राहण्यापेक्षा त्या कंपनीच्या बॅलन्सशिटवरून ही माहिती जास्त अचूकपणे कळू शकते. कंपन्या वार्षकि अहवालाद्वारे आपल्या भागधारकांना ही माहिती पाठवत असतात. तसेच ही माहिती इंटरनेटवरसुद्धा उपलब्ध असते. अशा बॅलन्सशिट समजून घेण्यासाठी अकाउंट्स या विषयाची प्राथमिक माहिती असावी लागते.
अशा सर्वासाठी तसेच या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी, उद्योजकांसाठी या साइटने अकाउंटिंग आणि बुककीपिंगचे धडे खुले करून दिले आहेत. फायनान्शियल आणि मॅनेजरियल अकाउंटिंग अशा तीसहून अधिक संकल्पना समजावून सांगितल्या आहेत.
प्रत्येक संकल्पनेचे सोप्या शब्दांत उदाहरणांसहित स्पष्टीकरण दिलेले आहे. त्यासाठी संकल्पनेचे छोटे छोटे भाग केले आहेत. उदाहरणार्थ, डेबिट आणि क्रेडिट या विषयाचे स्पष्टीकरण चार भागांत समजावले आहे. प्रत्येक संकल्पनेखाली स्पष्टीकरणावर आधारित बहुपर्यायी प्रश्न, गाळलेल्या जागा भरा असे प्रश्न, शब्दकोडे, वर्ड स्क्रँबल अशी कोडीदेखील ऑनलाइन सोडवण्यासाठी दिलेली आहेत. अशा प्रकारच्या चाचण्यांमुळे संबंधित संकल्पनांचे किती आकलन झाले आहे हे समजण्यास मदत होईल.
प्रत्येक विषयावर विद्यार्थ्यांला सामान्यपणे पडणाऱ्या प्रश्नांचा व त्यांच्या उत्तरांचा संच बनवलेला आहे. प्रत्येक प्रश्नाचे मुद्देसूद उत्तर दिलेले आहे आणि तो प्रश्न ज्या संकल्पनांशी संबंधित आहे त्यांची िलक खाली दाखवली जाते. अकाउंटन्सीशी संबंधित सर्व शब्दांचा समावेश असलेला शब्दकोशदेखील येथे उपलब्ध आहे. या साइटवरील परीक्षेसंदर्भातील साहित्य, व्हिज्युअल टय़ुटोरियल्स आणि काही कोडी मिळवण्यासाठी तुम्हाला पसे भरून मेंबरशिप घ्यावी लागते.
अ‍ॅडव्हान्स लेव्हलचा अभ्यास करणाऱ्यांसाठी येथे एका महत्त्वाच्या मुद्दय़ाची नोंद घेणे आवश्यक आहे. अकाउंटन्सीची मूलभूत तत्त्वे सगळीकडे सारखीच असली तरी देशोदेशीच्या आíथक नियमांनुसार त्यांचे संदर्भ थोडे बदलू शकतात. त्यामुळे अ‍ॅडव्हान्स लेव्हलचा अभ्यास करताना अमेरिकन साइट्स अमेरिकन अकाउंटिंग स्टँडर्ड्सची माहिती देतील. भारतीय स्टँडर्ड्स थोडी वेगळी असू शकतात. त्याची माहिती इंटरनेटवर उपलब्ध आहे.
अकाउंटिंगवरील अनेक ऑनलाइन सर्टििफकेट कोस्रेस
https://www.edx.org/school/acca?gclid=CNj4nZewyMcCFRYTjgodJAENQg
या िलक्सवर उपलब्ध आहेत. अकाउंटिंग या क्षेत्रात यशस्वीरीत्या पाऊल टाकण्यासाठी या साइट्सची तुम्हाला नक्कीच मदत होईल.

First Published on September 22, 2015 6:58 am
Web Title: acconting knowledge from website

माहिती कशी शेअर करू? मायक्रोसॉफ्ट विंडोजच्या मोबाइलमधून अँड्रॉइडमध्ये माहिती शेअर करण्यासाठी ब्लुटय़ूथ वगळता कोणत्या अ‍ॅपचा वापर करता येऊ

माहिती कशी शेअर करू?

मायक्रोसॉफ्ट विंडोजच्या मोबाइलमधून अँड्रॉइडमध्ये माहिती शेअर करण्यासाठी ब्लुटय़ूथ वगळता कोणत्या अ‍ॅपचा वापर करता येऊ

September 29, 2015 06:32 am
प्रश्न – मायक्रोसॉफ्ट विंडोजच्या मोबाइलमधून अँड्रॉइडमध्ये माहिती शेअर करण्यासाठी ब्लुटय़ूथ वगळता कोणत्या अ‍ॅपचा वापर करता येऊ शकेल.                  – प्रमोद मुळे
उत्तर – ब्लुटय़ूथने माहिती शेअर होण्यासाठी अनेकदा खूप वेळ लागतो. यासाठी विविध अ‍ॅप्सच्या माध्यमातून माहिती शेअर करणे सोयीस्कर ठरते. दोन्ही फोन एकाच ऑपरेटिंग सिस्टिमवर चालत असले तर माहिती शेअर करणे सोपे होते. पण तुम्ही विचारलेल्या प्रश्नात दोन्ही फोनची ऑपरेटिंग सिस्टिम वेगवेगळी आहे. अशा वेळी तुम्हाला दोन्ही फोनमध्ये चालणाऱ्या डेटा शेअरिंग अ‍ॅपची मदत घ्यावी लागेल. यामध्ये फिन, शेअर इट या अ‍ॅप्सचा वापर करून तुम्ही माहिती शेअर करू शकता. यासाठी सर्वप्रथम तुम्हाला दोन्ही फोनमध्ये ते अ‍ॅप डाऊनलोड करून घ्यावे लागेल. हे अ‍ॅप डाऊनलोड केल्यानंतर त्यामधील सेटिंग्जच्या मदतीने तुम्हाला दोन्ही फोन पेअर करावे लागतील. यानंतर तुम्ही माहिती शेअर करू शकता.
– तंत्रस्वामी
प्रश्न – मायक्रोसॉफ्ट विंडोजच्या मोबाइलमधून अँड्रॉइडमध्ये माहिती शेअर करण्यासाठी ब्लुटय़ूथ वगळता कोणत्या अ‍ॅपचा वापर करता येऊ शकेल.                  – प्रमोद मुळे
उत्तर – ब्लुटय़ूथने माहिती शेअर होण्यासाठी अनेकदा खूप वेळ लागतो. यासाठी विविध अ‍ॅप्सच्या माध्यमातून माहिती शेअर करणे सोयीस्कर ठरते. दोन्ही फोन एकाच ऑपरेटिंग सिस्टिमवर चालत असले तर माहिती शेअर करणे सोपे होते. पण तुम्ही विचारलेल्या प्रश्नात दोन्ही फोनची ऑपरेटिंग सिस्टिम वेगवेगळी आहे. अशा वेळी तुम्हाला दोन्ही फोनमध्ये चालणाऱ्या डेटा शेअरिंग अ‍ॅपची मदत घ्यावी लागेल. यामध्ये फिन, शेअर इट या अ‍ॅप्सचा वापर करून तुम्ही माहिती शेअर करू शकता. यासाठी सर्वप्रथम तुम्हाला दोन्ही फोनमध्ये ते अ‍ॅप डाऊनलोड करून घ्यावे लागेल. हे अ‍ॅप डाऊनलोड केल्यानंतर त्यामधील सेटिंग्जच्या मदतीने तुम्हाला दोन्ही फोन पेअर करावे लागतील. यानंतर तुम्ही माहिती शेअर करू शकता.
– तंत्रस्वामी
First Published on September 29, 2015 6:32 am
Web Title: how to share information from microsoft windows to android via app
टॅग: Apps,Sharing Apps

दहाव्या खिडकीतील नवे ऑफिस विंडोजने दहावी आवृत्ती काढली आणि त्या अनुषंगाने आता अत्याधुनिक सॉफ्टवेअर्सही बाजारात येण्यास सुरुवात झाली

दहाव्या खिडकीतील नवे ऑफिस

विंडोजने दहावी आवृत्ती काढली आणि त्या अनुषंगाने आता अत्याधुनिक सॉफ्टवेअर्सही बाजारात येण्यास सुरुवात झाली

September 29, 2015 06:33 am
विंडोजने दहावी आवृत्ती काढली आणि त्या अनुषंगाने आता अत्याधुनिक सॉफ्टवेअर्सही बाजारात येण्यास सुरुवात झाली आहे. याची सुरुवात मायक्रोसॉफ्टनेच केली असून त्यांनी नुकतेच ऑफिस २०१६ बाजारात आणले आहे.
पाहू या काय आहे ऑफिस २०१६ मध्ये.
डेस्कटॉपचा वापर आणि त्याची मागणी जगभरात तब्बल ४० टक्क्यांनी कमी झाल्याचे नुकत्याच करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. याचा विचार करीत कंपन्याही आता छोटय़ा उपकरणांवर वापरता येईल अशा अ‍ॅप्सची निर्मिती करू लागल्या. याचे उत्तम उदाहरण म्हणजे ऑफिस २०१६ म्हणता येईल. मायक्रोसॉफ्ट ऑफिसला खुल्या बाजारात अनेक पर्याय उभे ठाकले तरी या सॉफ्टवेअरच्या वापरकर्त्यांमध्ये तसा फरक पडलेला नाही. यामुळे पूर्वी एवढीच लोकप्रियता या सॉफ्टवेअरला आजही मिळते आहे. एका सर्वेक्षणानुसार तब्बल एक अब्जाहून अधिक लोक मायक्रोसॉफ्ट ऑफिसचा वापर करतात. २०१५च्या पहिल्या तीन महिन्यांत आयफोन, आयपॅड आणि अ‍ॅण्ड्रॉइड टॅबलेटमध्ये तब्बल १५ कोटी लोकांनी ऑफिस डाऊनलोड केले. हे म्हणजे वापरकर्ते संगणकावरून छोटय़ा उपकरणांकडे वळत असल्याचे उत्तम उदाहरण आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून मायक्रोसॉफ्टने कंपन्यांच्या ‘मोबाइल फस्ट’ या धोरणाची चूणक दाखवून दिली.
ऑफिस २०१६
मायक्रोसॉफ्टने बाजारात आणलेल्या ऑफिस २०१६ या अ‍ॅपच्या माध्यमातून ‘मोबाइल फस्ट’, क्लाऊड फस्ट या तंत्रावर आधारित आहे. यामुळे हे अ‍ॅप समूह कामासाठी उपयुक्त ठरले असून वापरकर्त्यांला कुठूनही कोणत्याही वेळी काम करणे शक्य होते. विंडोज १० या मायक्रोसॉफ्टच्या ऑपरेटिंग प्रणालीच्या आवृत्तीमध्ये अधिक चांगल्या प्रकारे काम करू शकते. हे अ‍ॅप तुमच्यासाठी काम करणार असून ते आत्तापर्यंतचे सर्वात सुरक्षित ऑफिस अ‍ॅप असेल असा दावा कंपनीने केला आहे. या अ‍ॅपमध्ये ‘एसवे’ नावाची एक अतिरिक्त सुविधा देण्यात आली आहे. यामध्ये आपल्याला शेअर करता येतील अशा अनेक चर्चात्मक कथा विकसित करता येणार आहेत.
समूह कामकाज
ऑफिस २०१६ हे अ‍ॅप मोबाइल आणि क्लाऊड तंत्रज्ञानाशी जोडलेले असल्यामुळे त्यामध्ये समूह काम करणे सोपे होते. यात तशा सुविधाही दिल्या आहेत.
सह मालकी – एखादी फाइल आपण तयार केली आणि त्यामध्ये आपल्या सहकाऱ्याला किंवा इतर कुणालाही माहिती द्यावयाची आहे अशा वेळी आपण एकाच फाइलला सहमालकी देऊन हे काम करू शकतो. ही सुविधा रिअल टाइम तंत्रज्ञानावर आधारित असल्यामुळे एखादी व्यक्ती ती फाइल दुरुस्त करीत असेल तेव्हाच दुसरी व्यक्ती ती पाहू शकते. ही सुविधा वर्ड, पॉवरपॉइंट, वन नोटला देण्यात आली आहे.
स्काइपचा सहभाग – या अ‍ॅपमध्ये स्काइपची मदत घेण्यात आली आहे. ग्राहक प्रतिनिधीला एखाद्या ग्राहकापर्यंत पोहोचायचे असेल तर ऑफिस ऑनलाइनचा वापर करून त्यामध्ये देण्यात आलेल्या इन्स्टंट मेसेंजिंग, स्क्रीन शेअर, टॉक किंवा व्हिडीओ चॅटच्या माध्यमातूनही डॉक्युमेंट्स शेअर करता येऊ शकतात.
* यामध्ये देण्यात आलेल्या क्विक सर्चमुळे आऊटलूक २०१६ मधील इनबॉक्स अत्याधुनिक झाला आहे. यामध्ये आधुनिक आणि क्लाऊड आधारित अ‍ॅटचमेंट करण्याची सुविधाही देण्यात आली आहे.
* आऊटलूक २०१६ क्लायंट अ‍ॅपमध्ये ऑफिस ३६५ ग्रुप्स देण्यात आले आहे.
* यामध्ये ऑफिस ३६५ प्लॅनरमध्ये तुम्ही तुमची कामे नोंदवून ठेवू शकता.
कोठेही अ‍ॅप
* ऑफिसचे अ‍ॅप बाजारात दाखल झाल्यामुळे आता आपले कार्यालय आपण सोबत घेऊन फिरू शकतो. हे अ‍ॅप विंडोज, अ‍ॅण्ड्रॉइड आणि आयओएस या सर्वाधिक वापरांच्या मोबाइल ऑपरेटिंगप्रणालीवर उपलब्ध आहेत. तसेच हे अ‍ॅप आपण एकाच वेळी विविध उपकरणांवर इन्स्टॉल करून त्याचा वापर करू शकणार आहोत.
* विंडोज १० वर ऑफिस मोबाइल अ‍ॅप अधिक चांगल्या पद्धतीने काम करीत असून या अ‍ॅपमुळे आपण मोबाइलचे रूपांतर संगणकात करू शकतो.
कोट
सध्या आपण माहितीच्या महाजालात जगतोय. यामध्ये विविध उपकरणांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. यामुळे मायक्रोसॉफ्टने त्यांच्या उत्पादनांची पुनर्निर्मिती करून ‘मोबाइल फस्ट’ आणि ‘क्लाऊड फस्ट’ या धोरणाचा अवलंब करण्यास सुरुवात केली आहे. ऑफिस २०१६ हे याचे उत्तम उदाहरण असून या अ‍ॅपच्या माध्यमातून आम्ही वापरकर्त्यांला त्याची माहिती सोप्या मार्गाने उपलब्ध करून देऊन त्याचे काम सोपे केले.
करण बजवा, व्यवस्थापकीय संचालक, मायक्रोसॉफ्ट इंडिया
वैशिष्टय़े
ऑफिस २०१६ आपल्याला आपले काम अधिक जलद आणि चांगल्या प्रकारे करता येते. यामध्ये देण्यात आलेल्या अंतर्गत बुद्धिमत्ता सुविधेमुळे आपली अनेक कामे अधिक सोपी होणार आहेत. पाहू या काय सुविधा देण्यात आल्या आहेत.
* टेल मी – यामध्ये देण्यात आलेल्या या सुविधेमध्ये आपल्याला काम करताना कोणत्याही प्रकारची अडचण आली तर ती दूर होऊ शकते. आपण आपली अडचण काय आहे यावर जर क्लिक केले तर आपल्या डॉक्युमेंटच्या उजव्या बाजूला त्यावरचे उत्तर आपल्याला मिळते.
* एक्सेल २०१६ – यामध्ये आता अत्याधुनिक तक्ता प्रकार आणि पॉवर बीआयसाठी अंतर्गत सुविधा देण्यात आली आहे. याचा फायदा आपल्याला कोणतीही माहिती टाइप करताना होतो. तसेच माहितीच्या संकलनासाठीही होतो.
* आपण नुकतेच वापरलेल्या फाइल्सची नावे आणि त्याची लिंक आपल्याला यामध्ये उपलब्ध करून देण्यात येते. ही सुविधा आपण अ‍ॅप कोणत्याही उपकरणावर वापरत असलो तरी उपलब्ध होणार आहे. म्हणजे आपण एखादी फाइल टॅबवर सुरू केली आणि थोडय़ा वेळाने आपण डेस्कटॉपच्या अ‍ॅपवर जेव्ही ती फाइल पाहू तेव्हा ती आपल्याला नुकत्याच वापरलेल्या फाइल्सच्या यादीत दिसते. हे अ‍ॅप आपण ऑफलाइन किंवा ऑनलाइन वापरत असलो तरी ते आपण जोडलेल्या उपकरणांशी सिंक होत असते.
* ऑफिसमधील वर्ड, पॉवर पॉइंट, एक्सेल आणि आऊटलूकसारख्या सुविधांमधील माहिती आपल्या दृष्टीने खूप महत्त्वाची असते. ही माहिती काही कारणांमुळे डिलिट झाली किंवा बाहेरच्या व्यक्तीला शेअर करण्याचा प्रयत्न झाला तर आपले किंवा कंपन्यांचे मोठे नुकसान होऊ शकते. पण आता हे सोपे हाणार आहे. कारण ऑफिसच्या या नव्या आवृत्तीमध्ये माहितीला संरक्षण पुरविण्यात आले आहे. आयटी प्रशासकाला याचे हक्क देण्यात आले असून कार्यालयातून माहिती शेअर करण्याच्या धोरणांचा वापर करून तो यावर नियमन आणू शकतो.
– नीरज पंडित
niraj.pandit@expressindia.com
First Published on September 29, 2015 6:33 am
Web Title: microsoft office 2016

चिंतामणरावांची कारकीर्द चिंतामणराव पटवर्धन प्रथम यांनी सांगली येथे स्वतंत्र राज्य स्थापन केले.

चिंतामणरावांची कारकीर्द

चिंतामणराव पटवर्धन प्रथम यांनी सांगली येथे स्वतंत्र राज्य स्थापन केले.

मुंबई | September 24, 2015 00:49 am
चिंतामणराव पटवर्धन प्रथम यांनी सांगली येथे स्वतंत्र राज्य स्थापन केले. त्यांची राजकीय कारकीर्द इ.स. १८०१ ते १८५१ अशी झाली. सुरुवातीला पेशव्यांच्या आदेशाने परशुराम पटवर्धनांसोबत करवीरच्या छत्रपतींविरुद्ध मोहिमेत आणि कंपनी सरकारच्या जनरल वेलस्ली आणि सरदार धोंडोपंत गोखले यांच्याबरोबर धोंडाजी वाघ या दरोडेखोराविरुद्ध कर्नाटकातील मोहिमेत चिंतामणरावांनी मोठी कामगिरी बजावली. त्यामुळे वेलस्लीशी त्यांचे चांगले संबंध तयार झाले. गणेशभक्त असलेल्या चिंतामणरावांनी १८११ साली गणपती मंदिराच्या बांधकामाला सुरुवात केली. सांगलीचे भूषण असलेल्या या गणपती मंदिराचे काम पूर्ण होण्यास तब्बल ३० वष्रे लागली. या मंदिराचे नाव पुढे ‘गणपती पंचायतन’ असे झाले.
चिंतामणराव प्रथम हे प्रजाहितदक्ष राजे होते. त्यांनी व्यापारउदीम वाढवून निरनिराळ्या बाजारपेठा वसविल्या, सांगलीत मोठय़ा प्रमाणात येणाऱ्या हळदीच्या शेतीला प्रोत्साहन देऊन त्याची बाजारपेठ निर्माण केली. सरळ, रुंद रस्ते बांधून त्यांच्या दुतर्फा वृक्ष लागवड सुरू केली. त्यांनी १८२१ साली प्रथम शिळाप्रेस छापखाना स्थापन केला. व्यापाऱ्यांना अनेक सवलती देऊन त्यांनी सांगलीत रेशीम उद्योगाचा पाया घालून, मॉरिशसहून उच्च दर्जाचा ऊस आणून त्याची लागवड सुरू केली. स्वतची नाणी पाडण्यासाठी त्यांनी सांगलीत टांकसाळही सुरू केली. गुणग्राहक, कल्पक, बहुआयामी चिंतामणराव यांनी ठिकठिकाणचे विद्वान, कलाकार, कारागिरांना राजाश्रय देऊन सांगली हे दक्षिण महाराष्ट्रातील महत्त्वाचे सांस्कृतिक केंद्र बनविले. विष्णुदास भावे यांच्याकडून ‘सीतास्वयंवर’ हे नाटक लिहून घेऊन राजांनी मराठी रंगभूमीवरचा पहिला नाटय़प्रयोग केला. १८१९ साली सांगलीचा ईस्ट इंडिया कंपनी सरकारशी संरक्षणाचा करार होऊन ते एक संस्थान बनून राहिले. १८५१ साली या महान राज्यकर्त्यांचे निधन झाले.
सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com

खादीचे कापड आपला देश पारतंत्र्यात असताना इंग्लंडहून कापड आयात केले जायचे. तेच कापड मोठय़ा प्रमाणात बाजारात

खादीचे कापड

आपला देश पारतंत्र्यात असताना इंग्लंडहून कापड आयात केले जायचे. तेच कापड मोठय़ा प्रमाणात बाजारात

दिलीप हेर्लेकर (मुंबई) | September 4, 2015 03:53 am
आपला देश पारतंत्र्यात असताना इंग्लंडहून कापड आयात केले जायचे. तेच कापड मोठय़ा प्रमाणात बाजारात असायचे. म्हणून त्या वेळी खादीचे कापड वापरणे ही देशाभिमानाची गोष्ट असायची. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि खादीबाबत संदर्भ बदलला. आपल्याकडे विपुल प्रमाणात सर्व प्रकारचे कापड तयार होते. आता खादी वापरणे ही फॅशन झाली आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये. पण खादी म्हणजे कोणते कापड हा प्रश्न उरतोच.
आपल्या देशात कापसापासून हाती सूत कातण्याची पद्धत पूर्वापार होती. महात्मा गांधींमुळे चरखा वापरून सूत कातणे सर्वाना माहीत होतेच. हे सूत कातणे जसे हाती केले जायचे तसेच कापड विणण्याची क्रिया ही हातमागावर म्हणजेच हातानेच केली जायची. कापूस स्वच्छ करणे, तो िपजणे, त्याचा पेळू बनवणे त्यापासून सूत कातणे. मग कापड विणण्याकरिता ताणा आणि बाणा सूताची पूर्वतयारी करणे, ताण्याच्या सुताचे गरजेनुरूप बीम बनवून आणि बाण्याचे सूत कांडय़ावर गुंडाळून हातमागावर कापड तयार करणे. त्यावर विरंजन क्रिया (ब्लीचिंग) करायची असेल तर तीही घरगुती पद्धतीने हातीच केली जायची. कधी कुर्ता शिवण्यासाठी कापड (रंगीत) हवे असेल किंवा साडीसाठी रंगीत सूत हवे असेल तर सूताची रंगाई पण हातीच केली जायची. त्या वेळी नसíगक रंगाचा वापर केला जायचा, त्या कापडाला इस्त्री करण्यासाठीसुद्धा लाकडी धोपटय़ाचा वापर केला जायचा. अशा पद्धतीने तयार केले जाणारे कापड खादी म्हणून ओळखले जाते. व्रतस्थ मंडळींपकी काही सूतकताई आणि कापडविणाई स्वत:च करायचे तर काही फक्तसूतकताई करून त्यापासून हातमागावर कापड तयार करून घ्यायचे.
मग आता यंत्रयुग आल्यावर अनेक बदल घडून आले. साध्या चरख्याऐवजी अंबर चरखा आला. त्यात गिरणीतील बांगडी साच्याप्रमाणे सूत कातण्याची व्यवस्था वापरली जाते. फक्त मानवी श्रमाचाच वापर होतो. त्यानंतर आलेल्या लोकयंत्रात मात्र विद्युत ऊर्जेचा वापर आहे. हे सूत खादी म्हणून वापरणे कितपत सयुक्तिक आहे? काळानुरूप लोकसंख्यावाढ, कापडाच्या दरडोई वापरात वाढ याचा मेळ बसवायला यांत्रिक आणि इलेक्ट्रॉनिक मार्ग वापरणे आवश्यक झाले आहे. म्हणून आता खादी फॅशनपुरतीच उरली आहे.
दिलीप हेर्लेकर (मुंबई)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org
First Published on September 4, 2015 3:52 am
Web Title: khadi clothes

Monday, September 14, 2015

व्हॉट्सअप, डॉक?

कोणतेही तंत्रज्ञान जर योग्य पद्धतीने वापरले तर ते उपयोगीच ठरते.

डॉ. समीर भुरे | September 11, 2015 23:10 pm
‘व्हॉट्सअ‍ॅप’चाही चांगल्या प्रकारे वापर होऊ शकतो. माझा आक्षेप आहे तो त्याच्या अतिरेकी वापराला. कोणतेही तंत्रज्ञान जर योग्य
पद्धतीने वापरले तर ते उपयोगीच ठरते. अन्यथा दुष्परिणाम तुमच्याबरोबर इतरांनाही भोगावे लागतात. ‘व्हॉट्सअ‍ॅप’चे हे काही
गमतीशीर(?) अनुभव..
भाग -१
अब्जावधी लोकांना खुळं बनवून अब्जावधी डॉलर्स खिशात टाकणाऱ्या ‘व्हॉट्स अ‍ॅप’च्या त्या दोन निर्मात्यांना आधी दोन्ही हात जोडून कोपरांपासून नमस्कार करतो! ‘व्हॉट्सअप, डॉक?’, असं कुणी सहज जरी विचारलं तर डोकंच फिरतं हल्ली माझं! आज ज्याच्याकडे ‘व्हॉट्स अ‍ॅप’ नाही, त्याच्याकडे अतिशय तुच्छतेनं पाहिलं जातं! म्हणजे, सिग्नलचा लाल दिवा लागल्यावर निमूटपणे गाडी थांबवणाऱ्या वाहनचालकाकडे बेदरकारपणे गाडी हाकणारे ज्या तुच्छतेनं कटाक्ष टाकतात, तशाच तुच्छतेनं! आणि अशा अनेक तुच्छ नजरांना बळी पडून तोही बिचारा कालांतराने ‘व्हॉट्स अ‍ॅप’च्या कळपात सामील होतो आणि अल्पावधीतच त्या मायाजाळात स्वत:ला गुरफटून घेतो!
मागच्याच महिन्यात एक चिंतातुर आई तिच्या तितक्याच बेफिकीर मुलीला घेऊन माझ्याकडे आली. ‘‘डॉक्टर, काही तरी करा हो हिचं! हल्ली बोलतच नाहीय आमच्याशी ही!’’ मी त्या मुलीकडे पाहिलं. ती आपली मान खाली घालून बसली होती. मी त्या मातेला म्हटलं, ‘‘अहो, किती नम्र आहे ही!’’ ‘‘अहो, डॉक्टर, कसली डोंबलाची आलीय आज्ञाधारक? ते म्हणतात ना, खाली मुंडी, आणि ‘व्हॉट्स अ‍ॅप’ धुंडी! (अशी नवीन म्हण आलीय? हे मला माहीतच नव्हतं!) अशी अवस्था झालीय हिची! तुम्ही काहीही करा आणि हिला त्यातून बाहेर आणा हो!’’ ती आई अगदी व्याकूळ होऊन बोलत होती.
क्षणभर माझ्या डोळ्यांसमोर चित्र तरळलं, मी ‘व्हॉट्स अ‍ॅप’ व्यसनमुक्ती केंद्र’ चालवतोय! (ही आयडिया सुचली कशी नाही कोणाला अजून? सुचेल, सुचेल, काही दिवसांनी याचंही मार्केटिंग करणारे पैदा होतील!) मी त्या आईला शक्य होईल तितक्या नम्रपणे सांगितलं, ‘‘अशा गोष्टींसाठी औषधं नसतात हो! हिला समुपदेशनाची गरज आहे!’’ लगेच ती आई म्हणाली, ‘‘मग करा नं समुपदेशन! म्हणूनच तर आणलंय मी हिला इथे!’’ त्यानंतर पुढची वीस मिनिटं मी आणि ती मुलगी एकमेकांचं बौद्धिक घेत होतो. ती मुलगी मला ‘व्हॉट्स अ‍ॅप’चे फायदे काय असतात, त्याने कसं फुकटात चॅटिंग करता येतं, हे सांगत होती. (ही आणखी एक गंमत! टू चॅट म्हणजे गप्पा मारणे.. आम्ही मित्र इराण्याच्या कॅफेत किंवा पार्कातल्या कट्टय़ावर गप्पा मारायचो! अजूनही मारतो. पण आताची पिढी काहीही संवाद न साधता अशा प्रकारे गप्पा ‘मारते’!) आणि मी तिला हे वरवरून जरी फ्री वाटत असलं तरी त्यामध्ये वेळ किती खर्च होतो, डोळ्यांवर कसा ताण पडतो, हातांच्या बोटांच्या सांध्यांची कशी वाट लागते, अशा निरनिराळ्या प्रकारांनी तिला समजावून सांगत होतो. शेवटी, ‘ओके, मी विचार करते याचा’ असं ती म्हणाली आणि मी हुश्श केलं. तिच्या आईकडे उगाचच एक विजयी कटाक्ष टाकला. त्या दोघी जणी बाहेर जायला उठल्या, तेवढय़ात त्या मुलीच्या मोबाइलची चिमणी चिवचिवली आणि ती साधं थँक्सही न बोलता, मोबाइलमध्ये डोकं खुपसून माझ्या केबिनमधून बाहेर पडली!
पंधरा दिवसांनंतर पुन्हा त्या माय-लेकी माझ्याकडे आल्या तेव्हा एकदम ‘ट्रान्स्फर सीन’ होता. आता त्या दोघींचीही अवस्था ‘‘खाली मुंडी, ‘व्हॉट्स अ‍ॅप’ धुंडी’’ अशी झाली होती! मी बोलायचा क्षीण प्रयत्न केला, तेव्हा त्या माऊलीनं मला सांगितलं, ‘‘एक सेकंद हं, डॉक, हा जरा मेसेज पाठवते आणि मग आपण बोलूया!’’ दोन मिनिटं बोटांनी गप्पा मारून झाल्यावर, त्या समाधीवस्थेतून बाहेर आल्यावर तिनं माझ्याकडे पाहिलं. मी व्याकूळ होऊन तिला विचारलं, ‘‘अहो, काय हे? तुम्हाला तर या प्रकाराचा तिटकारा होता ना?’’ त्यावर, तिने ‘हाय, कम्बक्त, तूने पी ही नहीं’ असा एक कटाक्ष माझ्याकडे टाकला आणि म्हणाली, ‘‘अहो, हिच्यासाठी म्हणून मी सुरू केलं एकदाचं ‘व्हॉट्स अ‍ॅप’ आणि खरंच, किती गमतीशीर आहे हो हे! वेळ कसा जातो, ते कळतच नाही! छे बुवा, हा मेसेज जात का नाहीय?’’ शेवटचं वाक्य तिनं मला उद्देशून नक्कीच म्हटलं नव्हतं! ती मुलगी तिच्या आईला म्हणाली, ‘‘अगं, मी सांगतेय ना तुला, नेट पॅक वाढवून घे तुझं!’’ अच्छा, म्हणजे आता ती मुलगी तिच्या आईची सल्लागार झाली होती तर! मग, न रहावून मीसुद्धा त्यांना एक सल्ला देऊनच टाकला, ‘‘मला वाटतं, तुम्ही मोबाइलही नवीन घ्या. थ्री जी सपोर्ट करणारा!’’ ‘‘अय्या, खरंच की! थॅँक्स, डॉक, मला वाटतं, आपण आधी नवीन मोबाइल घेऊ या आणि नंतर नेट पॅक वाढवून घेऊ या!’’ हे शेवटचं वाक्य अर्थातच तिच्या मुलीला उद्देशून होतं! आता, त्या दोघींनाही माझ्या सल्ल्याची गरज नव्हती! त्यांच्यात ‘संवाद’ साधणारं एक नवीन अ‍ॅप त्यांना मिळालं होतं! नवीन मोबाइल कोणता घ्यायचा यावर चर्चा करत त्या बाहेर पडल्या आणि मोबाइलचा खर्च वाढला, नेट पॅकचा खर्च वाढला तरीही ‘व्हॉट्स अ‍ॅप’ कसं फ्री आहे, हे लोकांच्या गळी उतरवणाऱ्या त्या महान निर्मात्या द्वयीला मी पुन्हा एकदा कोपरापासून नमस्कार केला!
भाग -२
वर्ष १९९०
माझ्या दवाखान्यात एक रुग्ण आले. येताक्षणीच त्यांनी टेबलावर सात पाकिटे ओळीने मांडून ठेवली. आता हे कोणती जादू शिकवणार की काय, असा विचार मनात येतच होता, तेवढय़ात ते म्हणाले, ‘‘हे माझे केस!’’ त्यांचा व्याकरणाचा काही गोंधळ होतोय असं वाटून मी त्यांना म्हणालो, ‘‘तुम्हाला ही माझी केस असं म्हणायचंय का?’’
‘‘नाही, हेच केस म्हणायचंय मला.’’ इति रुग्ण, ‘‘अहो, गेले काही दिवस प्रचंड प्रमाणात केस गळती सुरू झालीय. दररोज किती गळतात ते तुम्हाला कळावं म्हणून पाकिटात गोळा करून आणलेत हे. हे पाकीट सोमवार, हे मंगळवार, हे बुधवार..’’ त्यांच्या केसचं गांभीर्य माझ्या लक्षात आलं आणि मी तातडीने उपचार सुरू केले.
वर्ष २०१५
वेळ : सोमवार, रात्री ११. माझी ‘व्हॉट्स अ‍ॅप’ची चिमणी चिवचिवली. मी मोबाइल पाहिला. स्क्रिनवर केसांच्या गुंत्याचा एक फोटो! खाली एक रडक्या चेहऱ्याचं स्माइली (?)
मंगळवार, रात्री ११.. पुन्हा ‘व्हॉट्स अ‍ॅप’चा चिवचिवाट.. पुन्हा केसांच्या गुंत्याचा एक फोटो.. रडका चेहरा, पण आता पुढे एक प्रश्नचिन्हही होतं!
बुधवार, गुरुवार, शुक्रवार.. वेळ तीच.. रात्री ११.. तेच फोटो.. केसांच्या गुंत्याचे.. फक्त आता प्रश्नचिन्हं वाढत चालली होती.. हे काय चाललंय ते मला कळेना, शेवटी मीच उलट टपाली एक प्रश्नचिन्ह पाठवले. तेव्हा कुठे त्या व्यक्तीने मला संदेश पाठवला, ‘‘डॉक्टर, मी गेला आठवडाभर तुम्हाला माझ्या गळणाऱ्या केसांचे फोटो पाठवतेय, पण तुम्ही काहीच रिस्पाँस देत नाही आहात.’’
आता यावर उत्तर देणं मला भाग होतं. मी लिहिलं, ‘‘आपली केस खूपच गुंतागुंतीची दिसतेय. पण असे चिन्हांकित संवाद साधण्यापेक्षा आपण जर समोरासमोर येऊन संवाद साधलात तर फायदा तुमचाच होईल.’’ एक रुग्ण कायमचा गमावल्याच्या दु:खापेक्षा रात्री अकरा वाजता होणारा तो चिवचिवाट कायमचा बंद झाल्याचा आनंद जास्त होता!
असाच एक तरुण रुग्ण.. आजच्या तरुण पिढीचं प्रतिनिधित्व करणारा! लठ्ठ पगाराच्या ओझ्याखाली दबून गेलेला! आपला रक्तदाब वाढलंय,
असं सतत वाटायचं त्याला! त्याच भीतीपोटी रोज रात्री मला त्याचा
‘व्हॉट्सअ‍ॅप’ मेसेज यायला लागले. आत्ता प्रेशर १२०/८० आहे, आत्ता ११०/८२.. तुला काहीही झालेलं नाही, तुझं प्रेशर नॉर्मल असतं, असं सांगून मी थकलो. शेवटी मी त्याच्या त्याच त्याच मेसेजेसना उत्तर देणं बंद केलं. एका रात्री तर त्याने कहरच केला. दर तासांनी तो घरच्या मशीनवर प्रेशर बघून मला तसे मेसेजेस पाठवायला लागला. माझं काहीच उत्तर नाही हे पाहिल्यावर त्याने मला विचारलं, (अर्थात ‘व्हॉट्सअ‍ॅप’वरच!) ‘‘हे काय, तुम्ही काहीच प्रतिक्रिया देत नाही.. काय करू, काही तरी सांगा ना!’’ आता यावर, मी ‘‘जमल्यास ते मशीन बाहेर फेकून दे,’’ असं उत्तर दिलं तर त्यात माझं काही चुकलं का? तुम्हीच सांगा!
आत्ताच जेवायला बसलो असताना ‘व्हॉट्सअ‍ॅप’ची चिमणी चिवचिवली. एक रुग्ण म्हणतोय, ‘‘पोट जरा बिघडल्यासारखं वाटतंय.’’ हे वाचून माझ्या पोटात गोळा आलाय! या रुग्णाला ‘व्हॉट्सअ‍ॅप’वर ब्लॉक करावं की माझं ‘व्हॉट्सअ‍ॅप’ अकाऊंटच डीलीट करून टाकावं, या पेचात मी पडलोय!
त्या दिवशी मुंबईच्या कुप्रसिद्ध ट्रॅफिक जॅममधून वाट काढत काढत घरी चाललो होतो. एका चौकात सिग्नलच्या लाल दिव्याला गाडय़ा चक्क थांबल्या होत्या! काही सेकंदांनी उजव्या बाजूला जाण्यासाठीचा सिग्नल सुरू झाला, पण माझ्या बाजूची गाडी काही हलेना. त्याच्या मागचे वाहनचालक लागले बोंबलायला! लाल दिवा असला तरी थांबत नाही, इकडे तर हिरवा दिवा लागलाय तरी जाता येत नाही म्हणजे काय? त्यांच्या स्वाभिमानाला जणू ठेच लागली होती! न राहवून मी त्या गाडीच्या खिडकीवर ठोठावलं. काच खाली झाली तर चालक माझा रुग्णच निघाला. महाशय मोबाइलवर काही तरी पाहण्यात दंग होते. ‘‘ओ, सॉरी! व्हॉट्सअप, डॉक?’’ असं काहीबाहीसं पुटपुटत स्वारी भरधाव वेगाने निघूनही गेली. या वेळी लाल दिवा असूनही! आता पुढच्या वेळी हा येईल तेव्हा त्याला चांगलंच झापायचं, असं मी मनोमन ठरवून टाकलं.
एक महिन्यानंतर तो माझ्याकडे आला.. आला तो लंगडतच! हातात एक वॉकर.. आतमध्ये आला, खुर्चीवर बसून म्हणाला, ‘‘व्हॉट्सअप, डॉक?’’
‘‘माझं सोड, तुझं हे काय झालंय? हा वॉकर?’’ मी विचारलं.
‘‘बघा ना, काय वेळ आलीय? हातातली जॉनीवॉकर जाऊन आता हा वॉकर आलाय!’’ त्याच्या या उत्तरावर काय बोलावं तेच कळेना! कोणाची विनोदबुद्धी, कधी जागृत होईल, काही सांगता येत नाही, हेच खरं! मनावर खूप ताबा ठेवून मी त्याला विचारलं, ‘‘जरा नीट सांगशील का, काय झालं ते?’’
‘‘तुम्हाला माहीतच आहे, मला गाडी चालवताना ‘व्हॉट्सअ‍ॅप’चे मेसेजेस वाचायची सवय आहे!’’ हे सांगताना अशा चांगल्या सवयी असाव्यात माणसाला, असा त्याचा आविर्भाव होता.
‘‘आहे म्हणजे होती.’’ तो पुढे सांगायला लागला, ‘‘तर त्या दिवशी मी गाडी चालवताना सौभाग्यवतींनी त्यांचा एक फोटो पाठवला. नुकताच हेयर कट करून आल्यानंतर काढलेला! तो फोटो पाहून दचकलोच मी! आणि कचकन् ब्रेक दाबला. मागून येणारी गाडी आदळली माझ्या गाडीवर! आणि हे असं झालं!’’ आता बोला! ‘व्हॉट्सअ‍ॅप’मुळे घटस्फोट होतात हे नुकतंच वाचलं होतं मी, पण असा विचित्र अपघातही होऊ शकतो, याचं प्रत्यक्ष उदाहरण माझ्या डोळ्यांसमोर होतं! या विचित्र अपघाताचे फोटो तुमच्या व्हॉट्सअ‍ॅपवरही आले असतीलच! फक्त त्याच्यामागचं कारण तुम्हाला आत्ता कळलं असेल!
हे सगळं वाचल्यावर तुमचा जर असा समज झाला असेल की ‘व्हॉट्सअ‍ॅप’बद्दल माझ्या मनात आकस आहे, तर तो चुकीचा आहे. ‘व्हॉट्सअ‍ॅप’चाही चांगल्या प्रकारे वापर होऊ शकतो. माझा आक्षेप आहे तो त्याच्या अतिरेकी वापराला. कोणतेही तंत्रज्ञान जर योग्य पद्धतीने वापरले तर ते उपयोगीच ठरते. पण, त्याचा अतिरेक झाला किंवा त्याच्या आहारी गेलात तर त्याचे दुष्परिणाम तुमच्याबरोबर इतरांनाही भोगावे लागतात, वरची सारी उदाहरणे हेच तर सांगतात!
डॉ. समीर भुरे -samirbhure@gmail.com
First Published on September 12, 2015 1:05 am
Web Title: whatsapp experience

निबंधलेखनाची तयारी

निबंधलेखनाची तयारी

मुख्य परीक्षेतील निबंधलेखनाच्या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास कसा करावा, याविषयीचे मार्गदर्शन.

अपर्णा दीक्षित | September 6, 2015 18:32 pm
यूपीएससी- मुख्य परीक्षेतील निबंधलेखनाच्या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास कसा करावा, याविषयीचे मार्गदर्शन.
विद्यार्थी मित्रहो, मागील लेखांत यूपीएससी परीक्षेच्या प्राथमिक तयारीविषयी आपण सविस्तर चर्चा केली. आता मुख्य परीक्षेतील निबंधाच्या विषयापासून सुरुवात करूयात. यूपीएससीच्या मुख्य परीक्षेमधील निबंधाचा पेपर हा महत्त्वाचा तसेच अतिशय आव्हानात्मक असा घटक आहे. २०१३ पर्यंत दिलेल्या सहा विषयांपकी एक विषय निवडून त्यावर तीन तासांमध्ये २,५०० (कमाल मर्यादा) शब्दांमध्ये निबंध लिहिणे अपेक्षित होते. या पेपरसाठी २५० गुण निर्धारित केले आहेत. मात्र, २०१४ पासून २५० गुणांसाठी उमेदवारांनी दोन विषयांवर निबंध लिखाण करणे अपेक्षित आहे.
पहिल्या प्रकारच्या निबंधातून विद्यार्थी एखाद्या तत्त्वविचाराचा अमूर्त पातळीवर कसा विचार करतो, तसेच संबंधित तत्त्वविचार समाजजीवनाच्या विभिन्न क्षेत्रांशी कसा जोडतो याची चाचपणी केली जाते. त्याद्वारे विद्यार्थ्यांच्या विचारव्यूहाची मांडणी मोजली जाते. तद्वतच संबंधित तात्त्विक विधानाचे राजकीय, सामाजिक, आíथक आणि भौगोलिक संदर्भ दाखवता येणे अपेक्षित आहे. तत्त्वविचारांवर आधारलेल्या निबंधाचा लाभ सामान्य अध्ययनाच्या पेपर ४ मधील नीती, सचोटी, तत्त्वज्ञान आणि अभिवृत्ती या अभ्यासघटकांना होतो.
दुसऱ्या प्रकारच्या निबंधाद्वारे विद्यार्थ्यांचे समकालीन घडामोडींचे आकलन, बहुपदरी आणि खोलवर आहे का, याचीचाचणी केली जाते. निबंध लेखनात वर्तमान घडामोडींमागील भिन्न आयाम उलगडून दाखविण्याची क्षमता विकसित करावी लागते. निबंध विषयामध्ये चांगले गुण मिळवून एकंदरीत गुणांची बेरीज वाढवणे शक्य आहे, तर निबंध विषयामुळे एकंदरीत गुणांवर नकारात्मक परिणाम होणे हेदेखील संभव आहे. निबंधाच्या बाबतीत हे लक्षात घेणे आवश्यक आहे की, निबंध हा प्रत्येक व्यक्तीच्या विचारांचा, मतांचा, मूल्यांचा ठसा असतो. यूपीएससी उमेदवारांकडून दिलेल्या विषयाबद्दल माहितीबरोबरच योग्य विश्लेषण व अनुमानांची अपेक्षा करते. म्हणूनच आपली मते, वैचारिक कल, संप्रेषण कौशल्ये या सगळ्याचा परिपाक निबंधात उतरणे अपेक्षित आहे.अनेक विद्यार्थ्यांचे असे मत असते की, सामान्य अध्ययनाच्या इतर तयारीमधूनच निबंधाच्या घटकाचीसुद्धा तयारी होते. मात्र, तयारीच्या या टप्प्यावर आपण हे लक्षात घेतले पाहिजे की, सामान्य अध्ययनाच्या इतर घटकांप्रमाणेच निबंधाच्या घटकाकरता विशिष्ट तयारी करणे गरजेचे असते. ही तयारी करीत असताना विषयाचे ज्ञान संपादन करणे, स्वत:चा वैचारिक कल व मते निश्चित करणे आणि लिखाणाचा सराव करणे या सगळ्या टप्प्यांचे क्रमवार नियोजन करावे लागते. याकरता पुरेसा वेळ द्यावा लागतो. तसेच सामान्य अध्ययनाच्या इतर पेपरप्रमाणे लेखनाचा भरपूर सराव करावा लागतो. दिलेल्या विषयांशी प्रामाणिक राहून सलग तीन तास विचारलेल्या विषयांवर गुणवत्तापूर्ण लिखाण करणे, योग्य माहितीचा वापर करणे, मते आणि विश्लेषण यांची सांगड घालणे या सगळ्याकरता तयारीच्या नियोजनामध्ये वेगळा वेळ द्यावा लागतो. परीक्षेमध्ये यशस्वीरीत्या निबंध लेखन करण्यासाठी तयारीच्या टप्प्यावर भरपूर सराव केलेला असणे आवश्यक आहे. याकरता काय व कसे काम करावे हे आपण पाहणार आहोत.
निबंधाच्या प्रश्नपत्रिकेतील आवश्यक बाबी
विषयाचा आवाका आणि मर्यादा योग्य रीतीने समजून घ्याव्यात.
विचारांतील व मांडणीतील स्पष्टता.
वैचारिक प्रक्रिया.
विषयासंबंधी स्पष्ट भूमिका.
या सर्व गोष्टी लक्षात घेऊन निबंधाच्या पेपरचा सराव करणे गरजेचे आहे. या पेपरमधून तुमच्याकडे असलेल्या माहितीऐवजी, तुम्ही त्या माहितीतून कोणता दृष्टिकोन परावíतत करता हे महत्त्वाचे ठरते.
निबंधलेखनाची तयारी
निबंध हा विशेष लेखन प्रकार आहे हे लक्षात ठेवले पाहिजे आणि म्हणूनच निबंधासाठी लेखनाचा सातत्याने सराव केला पाहिजे. म्हणूनच योग्य शब्दमर्यादेत व कालमर्यादेत लिखाणाचा नियमित सराव करावा. बऱ्याच वेळा विद्यार्थी वाचनावर व वाचलेले लक्षात ठेवण्यावर बहुतेक वेळ खर्च करतात. परंतु लिखाणदेखील अभ्यासाचा नियमित भाग बनले पाहिजे. एकूण अभ्यासाचा साधारण २० टक्के वेळ लिखाणासाठी राखून ठेवला पाहिजे. तसेच या लिखाणामध्ये विचारपूर्वक केलेल्या, सर्जनशील लिखाणाचादेखील समावेश असावा. अशा प्रकारे केलेले लिखाण शिक्षकांकडून, जाणकारांकडून अथवा स्वत: तपासावे. लिखाणातील आवश्यक सुधारणा कोणत्या हे लक्षात घेऊन योग्य ते बदल करावेत. अशा सरावामधून लिखाणाचा वेग, शैली, अर्थपूर्ण शब्दांचा लिखाणातील समावेश व अचूक मजकूर मांडण्याची कौशल्ये विकसित होतात. या सर्वातून निबंध लेखनावर सकारात्मक प्रभाव पडतो. दिलेल्या शब्दमर्यादेत अर्थपूर्ण लिखाण करणे सरावानेच जमते. या सर्व बाबींकडे दुर्लक्ष केल्यास आपल्या अंगी क्षमता व प्रतिभा असली तरीदेखील मोठा फटका बसू शकतो.‘निबंधात काय लिहावे?’ या प्रश्नाचे उत्तर सखोल वाचनात व ताíकक विचारांत दडलेले आहे. सामान्य अध्ययनाच्या इतर पेपरपेक्षा हा पेपर वेगळा ठरतो, याचे कारण याकरता कोणताही ठरावीक अभ्यासक्रम निश्चित केलेला नाही. तसेच निबंधाचे कोणते विषय येऊ शकतील याचा तंतोतंत अंदाज कुणीही वर्तवू शकत नाही. परंतु देशभरातील तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील नुकत्याच घडून गेलेल्या घटनांवरून अपेक्षित निबंध विषयांचा साधारण अंदाज येऊ शकतो. याचबरोबर सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय वर्तुळातील घडामोडीदेखील या दृष्टीने महत्त्वाच्या ठरतात.
एकाच मुद्दय़ाचे अवलोकन विविध दृष्टिकोनांतून केले जाऊ शकते. अनेक विद्यार्थी निबंधाच्या विषयाकडे केवळ दोनच दृष्टिकोनांतून पाहू शकतात. परंतु कोणत्याही विषयाला अर्थाचे अनेक कंगोरे असतात आणि म्हणूनच उमेदवारांनी स्वत:ला मर्यादित दृष्टिकोनांमध्ये अडकवून ठेवू नये. परंतु याचा अर्थ असा नाही की दिलेल्या विषयावर अनेक दृष्टिकोनांतून वरवरचे लिखाण केले जावे. प्रत्येकाने एक ठरावीक दृष्टिकोन, त्यातून निर्माण होणाऱ्या भूमिका यांचा समतोल साधत स्वत:चा ठसा उमटणारे लिखाण करणे अपेक्षित आहे. अनेक वेळा निबंधाच्या विषयासंदर्भातील काही मुद्दे आपल्याला पटत नसतात. परंतु आपले लिखाण ‘योग्य’ व ‘तटस्थ’ असावे या हट्टापायी आपण त्या मुद्दय़ांचेदेखील समर्थन करतो. यामुळे लिखाणात कच्चे दुवे तयार होतात आणि असे लिखाण निबंध तपासणारी व्यक्ती लगेचच ओळखू शकते. म्हणूनच जे आपल्याला पटत नाही ते पटवून देण्याचा अनाठायी प्रयत्न करू नये. याचबरोबर जे मुद्दे आपण पटवून देत आहोत ते नीतीनियमांना, सांविधानिक विचारप्रणालीला व तर्काला धरून असावेत.कोणत्याही निबंधासाठी लिखाणाची शैली व भाषा हे महत्त्वाचे घटक आहेत. प्रत्येकाने आपली स्वतंत्र लेखनशैली विकसित केली पाहिजे. लिखाण सुटसुटीत, अर्थवाही आणि मुद्देसूद असावे. हे लिखाण विचारपूर्वक व ठाम असावे. मात्र ठामपणे मते मांडत असताना त्यात उद्धटपणा नसावा. निबंधामधून ठामपणे व्यक्त केलेल्या मतांचे व विश्लेषणाचे जाळे असावे. आक्रमक अथवा अलंकारिक भाषा वापरून वाचणाऱ्यावर प्रभाव पडतोच असे नाही. तसेच अशी भाषा वापरल्याने चांगले गुण मिळतात हा समजदेखील चुकीचा आहे. निबंधाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत ठरावीक लयीत लिखाण होणे अपेक्षित आहे. भावनांच्या आहारी जाऊन केलेले लिखाण अथवा केवळ माहितीची जंत्री असणारे लिखाण टाळावे. अर्थपूर्ण व प्रभावी निबंध लिहिण्याची प्रक्रिया अनेक वेळा थकवा आणणारी किंवा कंटाळवाणी असू शकते. मात्र कोणत्याही प्रकारच्या अभ्यासपूर्ण लिखाणाच्या सुरुवातीच्या टप्प्यावर असे वाटणे साहजिक आहे. त्यामुळे खचून न जाता सातत्यपूर्ण प्रयत्न करत राहणे गरजेचे आहे.
First Published on September 7, 2015 2:01 am
Web Title: essay writing

Sunday, September 13, 2015

मानसशास्त्राचा अभ्यास व संधी – मनाचिये गुंती..

मानसशास्त्राचा अभ्यास व संधी – मनाचिये गुंती..

मानसशास्त्र विषयाचे पदवी- पदव्युत्तर अभ्यासक्रम, हे अभ्यासक्रम उपलब्ध असणाऱ्या शिक्षणसंस्था आणि त्यातील करिअर संधींचा

September 12, 2015 18:59 pm
मानसशास्त्र विषयाचे पदवी- पदव्युत्तर अभ्यासक्रम, हे अभ्यासक्रम उपलब्ध असणाऱ्या शिक्षणसंस्था आणि त्यातील करिअर संधींचा सविस्तर परिचय-
एखादी तरल भावकविता लिहिणाऱ्या कवींपासून थेट विज्ञानाच्या संशोधकांपर्यंत, प्रत्येकासाठी, अदृश्य मानवी मन हा कायमच कुतूहलाचा विषय राहिला आहे. मानवी मनाचा आणि मानवी वर्तणुकीचा विज्ञाननिष्ठ दृष्टिकोनातून केलेला शास्त्रोक्त अभ्यास म्हणजेच मानसशास्त्र (सायकॉलॉजी).
खरे पाहता मानसशास्त्राच्या अभ्यासाचा उगम ग्रीक संस्कृतीत सापडतो. साधारण एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत मानसशास्त्र हा तत्त्वज्ञान शास्त्राचाच एक भाग मानला जात असे. भारतात १९१६ साली सर्वप्रथम कोलकाता विद्यापीठात ‘एक्स्पिरिमेंटल सायकॉलॉजी’ या अभ्यासविषयाचा अंतर्भाव करण्यात आला.
जागतिकीकरण, झपाटय़ाने होणारे शहरीकरण, आरोग्य सेवा उद्योगात होत असलेली जागतिक वाढ, मानवी आरोग्याबद्दलची वाढती जागरूकता, वाढते वैयक्तिक आणि सामाजिक ताणतणाव, वाढती गुन्हेगारी या सर्व घटकांचा
विचार केल्यास मानसशास्त्राच्या अभ्यासकांना काम करायला मोठा वाव आहे, हे सुस्पष्ट आहे.
मानसशास्त्राच्या क्षेत्रात करिअर करायचे असेल तर मानवी भावनांचा आणि त्यांच्या वर्तणुकीचा अर्थ लावण्याची मनापासून आवड, संवेदनशीलता, तारतम्य, सतत निरीक्षणे घेण्याची आणि त्यातून निष्कर्षांप्रत पोहोचण्याची चिकाटी आणि संयम, मेहनत या गोष्टी खूप आवश्यक ठरतात. बहुतेकदा या कार्यक्षेत्रातील व्यक्ती, आरोग्य क्षेत्रातील अथवा समाजातील अन्य व्यावसायिकांच्या सहकार्याने काम करत असल्याने संघभावना आणि सामंजस्य हेही स्वभावात िबबवणे गरजेचे ठरते.
अनेक महाविद्यालयांमध्ये तसेच विद्यापीठ स्तरावर मानसशास्त्रातील विविध पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणक्रम उपलब्ध असलेले दिसतात. सामान्यत: कोणत्याही अभ्यासशाखेतून १०+२ शिक्षण पूर्ण केल्यानंतर मानसशास्त्रातील पदवी शिक्षणक्रम पूर्ण करता येतो. मानसशास्त्राचे उपयोजन व्यवसाय-उद्योगाच्या अनेक शाखांतून आणि विविध स्तरांतील समाज घटकांसाठी होताना दिसते. याचाच परिणाम म्हणून मानसशास्त्रातील पदव्युत्तर शिक्षणात अनेक अभ्यासशाखा समाविष्ट झालेल्या दिसून येतात.
क्लिनिकल सायकॉलॉजी- या प्रकारातील तज्ज्ञ रुग्णालये, आरोग्य केंद्रे आदी ठिकाणी काम करतात. भावनिकदृष्टय़ा दुर्बल, मनोरुग्ण किंवा प्रदीर्घ आजारामुळे त्रस्त रुग्णांवर उपचार करून त्यांच्या मनाला उभारी देण्याचे काम क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट करतात. रुग्णाच्या मानसिक समस्यांच्या मुळापर्यंत जाऊन त्यावर ते उपाय सुचवतात.
क्लिनिकल न्यूरो सायकॉलॉजी- मेंदूच्या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांच्या मनोवस्था सांभाळणे किंवा तत्संबंधी अडचणी सोडवणे.
समुपदेशन मानसशास्त्र (कौन्सेिलग सायकॉलॉजी) – या विषयाचे तज्ज्ञ समाजातील सर्व घटकांच्या (स्त्री, पुरुष, वृद्ध) कौटुंबिक किंवा नातेसंबंधांतील अडचणींवर समुपदेशन करतात.
शैक्षणिक मानसशास्त्र – शाळकरी, महाविद्यालयीन विद्यार्थी यांना भेडसावणाऱ्या मानसिक समस्या तसेच पालक, पाल्य, शिक्षक यांना ज्या समस्यांना सामोरे जावे लागते, त्यांचा अभ्यास करून मुलांच्या सक्षम, निकोप वाढीसाठी योग्य समुपदेशन करतात.
औद्योगिक मानसशास्त्र (इंडस्ट्रियल सायकॉलॉजी) – या शाखेतील तज्ज्ञ सरकारी, खासगी तसेच अन्य व्यवसायातील निगडित समस्यांचा अभ्यास करून कामगारांच्या कार्यपद्धतीत, मानसिकतेत सुधारणा घडवून आणत उत्पादन क्षमता आणि कार्यक्षमतेत सुधार घडवतात.
क्रीडा मानसशास्त्र (स्पोर्ट्स सायकॉलॉजी) – या विषयातील तज्ज्ञ खेळाडूंच्या मनोवस्थेचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करून त्यांची  कामगिरी उंचावण्यासाठी योग्य ती उपाययोजना करतात.
गुन्हे तपासासाठी मानसशास्त्र (क्रिमिनल सायकॉलॉजी) – गुन्हेगार, कैदी, आरोपी शोधण्यासाठी गुन्हा कोणत्या मानसिकतेतून घडला असेल हे शोधून काढत या विषयातील तज्ज्ञ व्यक्ती गुन्हेतपासात योगदान देतात. गुन्हेगार किंवा गुन्ह्य़ाने पीडित व्यक्तींचे समुपदेशनही या अंतर्गत केले जाते.
मानसशास्त्राचे विविध शिक्षणक्रम उपलब्ध असणाऱ्या शिक्षणसंस्था
* सेंट झेवियर महाविद्यालय, मुंबई.
वेबसाइट- www.xaviers.edu
* ना. दा. ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई.
वेबसाइट- www.sndt.ac.in
* रामनारायण रुईया महाविद्यालय, माटुंगा, मुंबई.
वेबसाइट- www.ruiacollege.edu
* मुंबई विद्यापीठ, कालिना. (मानसशास्त्र विभाग) – पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम (क्लिनिकल सायकॉलॉजी, कौन्सेिलग सायकॉलॉजी, इंडस्ट्रियल सायकॉलॉजी, ऑर्गनायझेशनल सायकॉलॉजी,
सोशल सायकॉलॉजी). पीएच.डी. आणि अ‍ॅडव्हान्स्ड डिप्लोमा कोर्स इन कौन्सेिलग सायकॉलॉजी, अ‍ॅडव्हान्स्ड डिप्लोमा कोर्स इन क्लिनिकल सायकॉलॉजी, अ‍ॅडव्हान्स्ड डिप्लोमा कोर्स इन इंडस्ट्रियल सायकॉलॉजी . कालावधी- एक वर्ष. अर्हता- मानसशास्त्र विषयातील पदव्युत्तर पदवी. संबंधित विषयात स्पेशलायझेशन असल्यास प्राधान्य मिळू शकते. वेबसाइट- www.mu.ac.in
* मुंबईच्या रुपारेल, कीर्ती, के. जे. सोमया आणि जयहिंद महाविद्यालयात मानसशास्त्र विषयक अभ्यासक्रम शिकवले जातात.
* निर्मला निकेतन कॉलेज ऑफ सायकॉलॉजी, मुंबई.
* सिम्बॉयसिस कॉलेज ऑफ आर्ट्स अ‍ॅण्ड कॉमर्स, पुणे.
* फग्र्युसन कॉलेज, पुणे.
मानसशास्त्राचा पदवी अभ्यासक्रम, पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम (इंडस्ट्रियल सायकॉलॉजी आणि क्लिनिकल सायकॉलॉजी).
पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन कौन्सेिलग सायकॉलॉजी,
कालावधी- एक वर्ष. अर्हता- संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी.
वेबसाइट- www.fergusson.edu
* सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (मानसशास्त्र विभाग) अभ्यासक्रम- एमए आणि पीएच.डी. इन सायकॉलॉजी
वेबसाइट- www.unipune.ac.in
* नागपूर विद्यापीठ (मानसशास्त्र विभाग)- एमए आणि पीएच.डी. वेबसाइट- www.nagpurunivercity.org
* हिस्लॉप कॉलेज, नागपूर – बीए आणि एमए इन सायकॉलॉजी ई-मेल- principal@hislopcollege.ac.in
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ (मानसशास्त्र विभाग)- एमए आणि पीएच.डी.
ई-मेल- head.psychology@bamu.net
मानसशास्त्राचे उच्च शिक्षण देणाऱ्या इतर राज्यांतील शिक्षण संस्था
* पीएच. डी.(स्ट्रेस अ‍ॅनालिसिस) – युनिव्हर्सटिी ऑफ दिल्ली, वेबसाइट- director@ducc.du.ac.in
* एम. फील. अप्लाइड सायकॉलॉजी – जस्टीस बशीर अहमद विमेन्स कॉलेज, तामिळनाडू.
वेबसाइट- jbascollege@gmail.com
* इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायकॉलॉजिकल रिसर्च, बंगळुरू – पदव्युत्तर तसेच पदवी शिक्षणक्रम उपलब्ध आहेत.
वेबसाइट- www.iipr.in
* इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ, दिल्ली.
* इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेत ‘ह्य़ुमॅनिटीज अ‍ॅण्ड सोशल सायन्सेस’ या शाखेअंतर्गत मानसशास्त्रातील पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणक्रम शिकवले जातात.
(लखनौ, वाराणसी, दिल्ली, रुरकी, कानपूर)
वेबसाइट- www.iit.ac.in
करिअर संधी
मानसशास्त्राच्या अभ्यासकांना प्रामुख्याने, मानसशास्त्राचे शिक्षक-प्राध्यापक तसेच आरोग्य सेवा उद्योग, सुपरस्पेशालिटी रुग्णालये येथे समुपदेशक म्हणून नोकरीच्या संधी मिळू शकतात. नजीकच्या भविष्यात इंडस्ट्रियल किंवा ऑर्गनायझेशनल सायकॉलॉजीमधील नोकरीच्या संधी विस्तारण्याचे संकेत आहेत. मानसशास्त्रीय अभ्यासाचा उपयोग मीडिया सायकॉलॉजी म्हणजेच दृक्श्राव्य माध्यमांतून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांचा, बातम्यांचा जनमानसावर होणारा परिणाम अभ्यासण्यासाठीही केला जातो.
मानसशास्त्रातील पदवी शिक्षण-
सामाजिक कार्यकर्ता, मनुष्यबळ सहायक, आरोग्य प्रशिक्षक अशा
नोक ऱ्या आरोग्य सेवा क्षेत्रातील उद्योग आणि मानसिक रुग्ण सेवा संस्थांमध्येमिळू शकतात.
मानसशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण-
मानसशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना
रुग्णालये, शाळा-महाविद्यालये, औद्योगिक क्षेत्रांत समुपदेशक म्हणून नोकरीची संधी मिळू शकते.
मानसशास्त्रात एम.फिल., पी.एच.डी-
महाविद्यालये, मनोरुग्णालये, समुपदेशन केंद्रे येथे शिक्षक, समुपदेशक, सल्लागार म्हणून करिअर करता येईल.
– गीता सोनी , geetazsoni@yahoo.co.in
First Published on September 14, 2015 1:03 am
Web Title: psychology education and career opportunities

मपीएससी मंत्र- मुलाखतीची पूर्वतयारी

मपीएससी मंत्र- मुलाखतीची पूर्वतयारी

स्पर्धापरीक्षांच्या मुलाखतीची तयारी करताना सर्वात आधी सकारात्मक दृष्टिकोन विकसित करणे आणि गैरसमजांना थारा न

फारूक नाईकवाडे | September 12, 2015 19:03 pm
स्पर्धापरीक्षांच्या मुलाखतीची तयारी करताना सर्वात आधी सकारात्मक दृष्टिकोन विकसित करणे आणि गैरसमजांना थारा न देणे या गोष्टी आवश्यक असतात. त्याविषयी..
स्पर्धापरीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व उमेदवारांनी अब्राहम िलकनचे एक वाक्य नेहमी लक्षात ठेवायला हवे. ते असे की, यशाच्या ध्येयाप्रती प्रयत्नरत उमेदवाराच्या प्रवासात यशाच्या संकल्पाशिवाय दुसरी कोणतीही बाब महत्त्वपूर्ण असू शकत नाही. राज्य लोकसेवा आयोगाची राज्यसेवा मुख्य परीक्षा अलीकडेच संपली. मुख्य परीक्षा संपली की तीन-चार दिवसांच्या लहानशा ब्रेकनंतर मुलाखतीची तयारी व इतर स्पर्धापरीक्षांची पूर्व, मुख्य परीक्षानिहाय तयारी तुमच्या वेळापत्रकाप्रमाणे सुरू करावी.
राज्य लोकसेवा आयोगाच्या प्रसिद्ध झालेल्या परीक्षांच्या अंदाजित वेळापत्रकात बदल हा नेहमीच ठरलेला असतो. पण म्हणून ‘जेव्हा होईल तेव्हा बघू’ असे धोरण आपल्या वेळापत्रकाचा भाग कधीच असू नये. राज्य लोकसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा संपल्यानंतरच्या लेखात उमेदवारांना सांगितले होते की, पूर्व परीक्षेच्या निकालाची चिंता न करता आपण मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरणार आहोतच असे गृहीत धरून मुख्य परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात करावी. जेणेकरून पूर्व परीक्षेत यशाने हुलकावणी दिली तरी मधला काळ मुख्य परीक्षेच्या अभ्यासासाठी वापरल्याने पुढच्या प्रयत्नांची तयारी भक्कम होते आणि स्पध्रेत आपली दावेदारी कायम राहते. स्पर्धापरीक्षा तयारीचे काही अतिरिक्त नियम आहेत. त्यापकी हा महत्त्वाचा नियम आहे. म्हणूनच आयोगाच्या वेळापत्रकानुसार आपल्या अभ्यासाचे वेळापत्रक गतिशील ठेवावे.
याच धर्तीवर मुख्य परीक्षा दिलेल्या सर्व उमेदवारांनी मुलाखतीसाठी पात्र ठरू किंवा नाही याचे आडाखे न बांधता त्यासाठीची सर्वसाधारण तयारी सुरू ठेवावी. मुख्य परीक्षेत यशस्वी होणारे उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरतीलच. पण अयशस्वी झालेले उमेदवार पुढच्या प्रयत्नांसाठी कार्यरत होतील. मुलाखतीची तयारी हा विषय वस्तुनिष्ठ स्वरूपाचा किंवा दीघरेत्तरी स्वरूपाचा एखादा पेपर सोडविण्यापुरता मर्यादित नाही. मुलाखतीचा थेट संबंध उमेदवारांच्या व्यक्तिमत्त्वाशी असतो. व्यक्तिमत्त्व विकसन ही निरंतर चालणारी प्रक्रिया असते. त्यासाठी नियोजनपूर्वक प्रयत्न आवश्यक असतात.
मुलाखतीसाठी निवड झाली की साहजिकच उमेदवारांना त्याचा आनंद असतो, पण त्याच प्रमाणात दबावसुद्धा जाणवतो. जे उमेदवार पहिल्यांदाच मुलाखत देत आहेत, त्यांच्यावर तर मोठा दबाव असतो. मुलाखतीच्या तयारी दबावात येऊन करणे योग्य नाही. अपेक्षित यश मिळविण्यासाठी तुमचा दबाव सकारात्मक ऊर्जेत परावíतत व्हायला हवा.
मुलाखतीची तयारी करताना उमेदवारांना येणाऱ्या तणावाचे मुख्य कारण म्हणजे त्यांना आपल्या कमतरता ठाऊक असतात. पण हे लक्षात घ्यायला हवे की, उणिवा, कमतरता असणे नसíगक आहे. मुलाखतीच्या तयारीसाठी मिळणाऱ्या दोन-तीन महिन्यांच्या कालावधीत त्या दूर करणे हे अजिबातच शक्य नाही. अशा परिस्थितीत सर्वपथम आपले कच्चे-पक्के दुवे समजून घ्यावेत आणि इच्छाशक्ती आणि दृढ आत्मविश्वासाच्या बळावर उणिवांना सामोरे जाण्याचा प्रयत्न करावा.
काही उमेदवारांना काही बाबतीत साशंक असतात. मुलाखतीबद्दल चुकीच्या लोकांकडून ऐकलेल्या निराधार माहितीमुळे त्यांची चुकीची धारणा झालेली असते. त्या कल्पना विस्तारातच ते उमेदवार मश्गुल असतात. उमेदवारांचा अहंकार- त्यांचे स्वत:बद्दलचे अवास्तव मत फसवे तितकेच धोकादायक असते. अशा सर्व उणिवा-कमतरता जाणून, तणावमुक्त व दबावमुक्त राहून सहजरीत्या मुलाखतीची तयारी करता यायला हवी.
मुलाखतीबाबतचे समज-गरसमज दूर होण्यासाठी सर्वात प्रभावी उपाय म्हणजे याआधी मुलाखतीस सामोरे गेलेल्या यशस्वी-अयशस्वी उमेदवारांशी चर्चा करणे. वेगवेगळ्या मुलाखतींचा अनुभव समजून घेतल्यास मुलाखतीची तयारी आणि विचारांना योग्य दिशा सापडू शकते. पूर्व व मुख्य परीक्षेबाबतचा दृष्टिकोन विकसित करणे, त्याबाबतचे गरसमज दूर होणे ही तुलनात्मकदृष्टय़ा सोपी गोष्ट आहे. मात्र मुलाखतीबाबतचे समज, न्यूनगंड, गरसमज, शंका दूर व्हाव्यात यासाठी नेमके प्रयत्न करणे आवश्यक असतात.
मुलाखतीचा निकाल हा नियुक्तीचे पद, त्यासाठीचे आवश्यक गुण, मुलाखतीचे पॅनल व सदस्य, उमेदवारांच्या तयारीचा व आत्मविश्वासाचा स्तर अशा अनेक मूर्त/अमूर्त गोष्टींवर अवलंबून असतो. त्यामुळे योग्य पद्धतीने व नेमकेपणाने मुलाखतीची तयारी करणे आवश्यक आहे.
शासकीय, निमशासकीय, खासगी क्षेत्रातील मोठय़ा कंपन्या तसेच सार्वजनिक उपक्रमांमध्ये नियुक्तीसाठी मुलाखत मंडळांकडून मुलाखती घेतल्या जातात. या प्रत्येक क्षेत्राची मागणी वेगळी असते आणि त्या त्या क्षेत्रामध्ये कामाच्या/ क्षमतांच्या/ कौशल्यांच्या आवश्यकतेनुसार उमेदवारांची व्यक्तिमत्त्व चाचणी मुलाखत मंडळे घेत असतात. केंद्र व राज्य शासनातील विविध सेवांमधील पदांवर नियुक्तीसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षांमध्येही मुलाखत हा निर्णायक टप्पा असतो. या मुलाखतींच्या तयारीसाठीची चर्चा पुढील काही लेखांमध्ये करूयात..
First Published on September 14, 2015 1:06 am
Web Title: mpsc interview preparation